यशवंतच्या बाकावर तो एकटाच होता. समोरच्या बाकावर एक तरुणी होती. रेखीव चेहरा. बांधेसूद व्यक्तिमत्व. गळ्यात मंगळसूत्र. संपूर्ण रुममध्ये ते दोघेच होते. पार्टीशनच्या पलीकडे रिसेप्शनिस्ट मुलगी होती. त्या पलीकडे डॉक्टरांची खोली. तिघेही डॉक्टरांची वाट पाहात होते.
डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला पेशंट झाल्यावर बोलावत असत. समोरच्या तरूणीला बोलावल्याशिवाय त्याला बोलावणे जाणार नव्हते म्हणून पुरेसा वेळ यशवंतकडे होता. यशवंत ब्रीफकेसमधून स्वतःची फाईल काढून चाळू लागला. आज डॉक्टरांना कोणती औषधे प्रेझेंट करायची आहेत, याचा एकदा आढावा घेऊ लागला. तेवढ्यात समोर हालचाल झाली.
तरुणी हळुहळू गुलाबी ब्लाउजचा एक एक हुक काढू लागली. पुरेसे सैल झाल्यावर ब्लाउज वर केला. पांढरी ब्रेसिअर वर केली. आतून गोरा स्तन बाहेर काढला. मांडीवरच्या बाळाच्या तोंडात दिला. पदराने झाकून घेतले.
बाळ आरामात दूध पीत नव्हते. आज त्याला दूध पिण्यात मजा येत नव्हती. त्या तरूणीने बाळाची नीरसता पाहिली व स्तन ब्लाऊजच्या आत घेतला. काही वेळाने बाळ कुरकूर करू लागले. महिलेने दुसरा स्तन बाहेर काढला. बाळाच्या तोंडात दिला. पदराने झाकले. यावेळी मात्र बाळ सुखाने दूध पिऊ लागले. तरूणीचा पदर अनेकदा पोटावरून सरकत होता. बेंबी दिसत होती, झाकली जात होती.
यशवंतच्या सरावाचे दृष्य होते. जितके सरावाचे, तितके नवे. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करताना गेल्या काही वर्षे तो असे दृष्य पाहत आला होता. यशवंतने ते सगळे पाहिले. तो विषय जितका जुना, तितकाच नवा होता. त्याच्या मनात नेहमीचेच विचार सुरु झाले. किती वर्षांची असेल ? लग्नाला किती वर्षे झाली असतील ? प्रियाचा स्तनही असाच गोरा. तिलाही गुलाबी रंग आवडतो. प्रियाची कंबरही अशीच. गळाही असाच. पोटही असेच. तिची उंचीही प्रियाइतकीच आहे. हळुहळू त्या समोरच्या तरूणीत त्याला प्रिया दिसू लागली. यशवंतने फाईल बंद केली व तो स्वप्नरंजनात गुंतला. एकाएकी ती तरूणी त्याला आवडू लागली.
यशवंतचे स्वप्नरंजन सुरु होते पण दृष्टी तरूणीकडे होती. समोरचा तरूण आपल्याकडेच पाहत आहे, हे एव्हाना त्या महिलेच्या लक्षात आले होते. ती अस्वस्थ झाली. ’ ''जगात बहुतेक स्त्रिया जे करतात तेच आपण करतोय. बाळाला दिवसात केव्हाही भूक लागू शकते. डॉक्टरांकडे तपासणीकरता आलेले असताना तर बरेचदा पाजावे लागते. कारण तिथे लाईन असते. खूप वेळ जातो म्हणून नाइलाजाने तिथे पाजावे लागते. सगळ्यांसमोर पाजण्याची कोणत्याही तरूणीला हौस नसते. या तरूणाने कधी पाजणारी तरूणी पाहिली नाही का ?’ या विचारांनी तिचे मन भरून गेले.
तिची अस्वस्थता यशवंतच्या लक्षात आली. आता त्याने तिच्यावरची नजर काढून खोटी खोटी इकडे तिकडे वळवली. तो भिंतीवरची वैद्यकीय विश्वाशी संबंधित पोस्टर्स पाहू लागला. त्याला वाटले, आज आपण दोघेच कसे ? एकही नवा पेशंट नाही ? तरूणीला वाटू लागले, अजून किती वेळ वाट पाहावी लागणार आहे डॉक्टरांची ? जोपर्यंत बाळाचे पोट भरत नाही, तोवर स्तनपान बंदही करता येणार नाही.
दोघांनाही तो एकांत चमत्कारिक वाटू लागला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले व संकोचाने दृष्टी दुसरीकडे वळवली.
यशवंत आत जाऊन रिसेप्शनिस्टशी बोलू लागला. तेवढ्याने तरी त्या तरूणीलाला बरे वाटेल, असे त्याला वाटले. बोलून झाले व तो बाहेर आला. तरूणीची अस्वस्थता तशीच होती. अखेर तिने बाळाला स्तनापासून दूर केले. आत जाऊन तिही रिसेप्शनिस्टशी काही बोलू लागली. बोलणे झाल्यावर ती बाहेर आली. रिसेप्शनिस्टशी बोलल्यावर तिला बरे वाटले पण वातावरणातला तणाव तसाच राहिला.
काही मिनिटे गेली आणि आणि अचानक ती अस्फुट हुंकार देऊ लागली. तिचा चेहरा त्रासिक झाला. हात मागे नेऊन पाठ चोळू लागली. हातात बाळ असल्याने तिला काही करता येत नव्हते. कसेबसे बाळाला सांभाळत ती हाताने पाठ चोळू लागली. तिला कसलातरी त्रास होत आहे, हे यशवंतला समजले. त्याने मिनिटभर जाऊ दिला.रिसेप्शनिस्टला बोलवावे की, आपणच पुढे होऊन काहीतरी मदत करावी, असा पेच यशवंतला पडला पण क्षणभरात त्याने स्वतःला सावरले व रिसेप्शनिस्टला हाक मारली.
रिसेप्शनिस्ट पार्टीशनमागून धावत आली. ह्या तरूणीला कोठेतरी वेदना होत आहेत हे जाणून तिने बाळ हातातून घेतले. यशवंतने प्रसंगावधान राखून पाणी कुठे आहे विचारले. तो पाणी घेऊन आला व तरूणीशेजारी ठेवले. तरूणीने पाठ दाखवत ‘खूप दुखतंय, असे सुचवले. रिसेप्शनिस्टने पेन किलर गोळ्या कुठे ठेवतात ते यशवंतला सांगितले. तो त्वरेने धावत गेला व गोळ्या घेऊन आला. गोळी घेतल्याने तरूणीला बरे वाटले. काय झालं अचानक, असे रिसेप्शनिस्टने विचारले. त्यावर तरूणीने माहीत नाही, अचानक पाठ दुखू लागली, असे सांगितले.रिसेप्शनिस्ट मुलीने बाळाला यशवंतकडे दिले. त्याने बाळाला खूप काळजीपूर्वक घेतले. तेवढ्यात रिसेप्शनिस्ट मुलीने तरूणीच्या पाठीला बाम लावून दिला. थोडे बरे वाटल्यावर तरूणीने बाळ रिसेप्शनिस्टच्या हातून घेतले व ती शांतपणे भिंतीला टेकून बसली. डोळे मिटले.यशवंतही स्वतःच्या जागेवर गेला. रिसेप्शनिस्टही स्वतःच्या जागेकडे गेली.
तेवढ्यात डॉक्टर आले. यशवंत व रिसेप्शनिस्ट, दोघांनीही घडलेली घटना डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी तरूणीला आत बोलावून तिची तपासणी केली. बाळालाही तपासले. काही गोळ्या लिहून दिल्या. रिसेप्शनिस्टशी बोलून तरूणी बाहेर पडली. बाहेर पडताना तिने यशवंतला धन्यवाद दिले.
“रिक्षा बघून देऊ का ?” त्याने विचारले.
“नको. जाईन मी. थँक्स.” तरूणी हसून उत्तरली.
तरूणीच्या पाठमो-या आकृतीकडे यशवंत पाहत राहिला. काही मिनिटात घडलेल्या अनपेक्षित घटनेने त्याची मनस्थिती बदलून टाकली होती. त्याच्या मनातून प्रिया निघून गेली होती. मदतीची गरज असलेली एक व्यक्ती शिल्लक राहिली होती.
(समाप्त.)
प्रतिक्रिया
4 Dec 2020 - 12:34 pm | केदार पाटणकर
दीपावलीच्या काळात बहुधा कथेकडे दुर्लक्ष झाले असावे.
6 Dec 2020 - 6:37 pm | कानडाऊ योगेशु
हा लेख एक अनुभव म्हणुन वाचला तर वाचनीय वाटतोय पण कथा म्हणुन वाचली तर कथेतला पंच मिसिंग वाटतोय. म्हणजे कथा पहिल्याप्रथम बोल्ड असावी असे वाटते व शेवटी मध्यमवर्गीय वळण देऊन संपविल्यासारखी वाटतेय. पण तरीदेखील वाचनीय आहे.
26 Jan 2021 - 11:16 pm | केदार पाटणकर
धन्यवाद.
27 Jan 2021 - 6:28 am | बाप्पू
अकु काकांची आठवण आली. ....
29 Jan 2021 - 11:57 am | केदार पाटणकर
धन्यवाद
30 Jan 2021 - 3:10 pm | केदार पाटणकर
धन्यवाद कानडाऊ योगेशु.