टरकावलेला चतकोर
तुकडा कागदाचा.
हवातसा वारा आल्यावर
मिजासखोर पतंग झाला.
हक्काचे आकाश
मागायला मोकळा.
---------------
अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा.
उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
रक्ताळला काळानिळा.
आता,
घरभर लंगडी लंगडी.
-------------------------
बारीक दाताच्या फणीनी
आयुष्याची एकेक बट विंचरून
मी विचारलंच ,
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
होमसीक झाल्यावर.
--------------------------------
एकेक वर्षं उसवत गेलं
अंगणापासून चौकापर्यंत
चिंध्यांच्या चेंडूंसारखं.
कृष्णा,पुरे झाल्या का
भरजरी शालूच्या धांदोट्या.?
--------------------------------------
(पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या प्रतिमा वापरून मुक्तक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सुधारणेचे स्वागत आहे.)
प्रतिक्रिया
25 Nov 2008 - 9:33 pm | मुक्तसुनीत
आयुष्याबद्दलची एक प्रगाढ जाणीव कवितांमधून जाणवते. एखादे चित्र पुन्हापुन्हा पहावे , गाणे पुन्हापुन्हा ऐकावे तसेच या कवितांबद्दल वाटते. पुन्हापुन्हा वाचताना काहीतरी नवे सौंदर्य समोर येते. आयुष्याबद्दल काहीतरी नवे "कळते". एखादी महाकादंबरी किंवा एखादे महाकाव्य जर का काळाचा एक आक्ख्खा खंड समोर उघडून ठेवत असेल , तर ही छोटी चित्रे आयुष्यात जाणवलेल्या प्रकाशमान क्षणांना पकडतात.
3 Dec 2008 - 12:27 pm | धम्मकलाडू
अगायायीयायीगं... मिठू काय म्हणतो!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
25 Nov 2008 - 9:46 pm | प्राजु
अतिशय सुंदर आहे मुकत सुनित यांच्यशी सहमत आहे.
वाचताना दरवेळी वेगळाच अर्थ सापडतो आहे. सुंदरच... दुसरी आणि शेवटची खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Nov 2008 - 9:52 pm | विनायक प्रभू
काय मुनिवर्य परत कविता?
कानात स्टेथोस्कोप घालुन मी सांगितलेल्या शिक्षण विदा तपासण्याचे काम बंद केले काय?
असे केलेत तर त्या मराठी मुलांचे काय होणार?
कविता नेहेमीप्रमाणे उत्कृष्ट.
आपला नम्र
विदासिन विप्र
25 Nov 2008 - 9:54 pm | चतुरंग
दोन्हीमधला आयुष्याशी जोडणारा धागा स्पष्ट झाला आणि आनंद देऊन गेला! :)
(मधल्या दोन कविता मला तितक्याशा समजल्या नाहीत. रामदास, नेमका कोणता विचार मांडायचा आहे ह्याबद्दल थोडी टिप्पणी करु शकाल का?)
चतुरंग
25 Nov 2008 - 10:00 pm | लिखाळ
>>रामदास, नेमका कोणता विचार मांडायचा आहे ह्याबद्दल थोडी टिप्पणी करु शकाल का?<<
सहमत आहे.
कविता चांगल्या वाटल्या. ठकूबाईची कविता ती बाहुली आहे असे खालची टीप वाचल्यावर एकदम आवडली..
इतर कविता सुद्धा समजल्या सारख्या वाटल्या पण मुक्तसुनीतांचा प्रतिसाद पाहता असे वाटले की मला तितकेसे समजलेले दिसत नाही..
-- लिखाळ.
26 Nov 2008 - 8:37 am | रामदास
टिक्करबिला खेळण्याचं वय आणि न खेळण्याचं वय यामध्ये येतो घराचा उंबरठा.(निर्बंध) अशा अर्थानी.मन लंगडतच या निर्बंधाचा स्विकार करते आहे.
ठकूबाईच्या कवितेत मनातली बाहुली आणि वय वाढलेली मुलगी असे द्वंद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
(पण मला राहून राहून वाईट वाटतं की शैलेंद्रच्या गाण्यात असा विचार त्यांनी लयबद्ध गेय गीतात मांडला आहे. अजून ते मला जमत नाही आहे.)
26 Nov 2008 - 8:40 pm | चतुरंग
आता मला तुम्ही मांडलेली कल्पना नीट समजली!
(खुद के साथ बातां : रंगा, विचारलंस म्हणून बरं झालं की नाही? उगीच समजले नसताना वा वा म्हणणार होतास आधी! ;) )
चतुरंग
25 Nov 2008 - 11:25 pm | धनंजय
प्रतिसादासाठी मला काही शब्दच सापडत नाहीत.
बारीक दाताच्या फणीची उपमा वापरलेली एक इंग्रजी कविता माझ्या आवडीची आहे :
http://www.misalpav.com/node/4203
25 Nov 2008 - 11:25 pm | नंदन
मुक्तक आवडले. आशाबाईंच्या या गाण्यातल्या 'बैरन जवानीने छिने खिलौने, और मेरी गुडिया चुरायी' ह्या ओळीची आठवण झाली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Nov 2008 - 8:46 am | कोलबेर
मुक्तकं खूप आवडली.
हे सर्वात जास्त आवडले.
26 Nov 2008 - 8:52 am | सहज
मोजक्या ओळीत परिणामकारक काव्य. नेहमीसारखेच.
अर्थात निदान शहरी भागात आताच्या जमान्यात [लिव्ह इन] अश्या कवितांचे शेल्फ लाईफ संपत आले आहे का? का अँटिक म्हणुन जास्त किंमत?
ह्या "फक्त जेष्ठांसाठी" कविता तर नव्हेत?
शंका आहे टिका नाही.
26 Nov 2008 - 1:51 pm | रामदास
तसा विचार माझ्या मनात आला होता. या प्रतिमा आता थोड्या कमी वापरातल्या आहेत.
नविन अनुभव जमा करायची वेळ झाली.चला कामाला लागू या.
26 Nov 2008 - 12:29 pm | दत्ता काळे
सगळ्याच कविता केवळ अप्रतिम आहेत.
हे तर फारच आवडलं :
टरकावलेला चतकोर
तुकडा कागदाचा.
हवातसा वारा आल्यावर
मिजासखोर पतंग झाला.
हक्काचे आकाश
मागायला मोकळा.
मी स्वत: लाच विचारलं, बाळ्करामा, तुला किमान इथपर्यंत पोहोचायला आलं तरी खूप झालं
26 Nov 2008 - 1:58 pm | जयवी
अतिशय मोजक्या शब्दात.... पण जबरदस्त काव्य !! मनापासून आवडेश !
26 Nov 2008 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते
मला फक्त पहिलीच कविता बर्यापैकी कळली, आवडली पण. बाकीच्या कविता कळल्या कळल्या सारख्या वाटता वाटता निसटून गेल्या. पण नंतरची चर्चा वाचून थोडं थोडं कळतं आहे. एकंदरित प्रकार मनात घर करून राहिला आहे.
मुक्तसुनीत, रामदास, धनंजय, नंदन वगैरेंना पेश्शल विनंति. अजून थोडं चर्चात्मक विवेचन येऊ द्या.
बिपिन कार्यकर्ते
26 Nov 2008 - 7:33 pm | मुक्तसुनीत
कवितेचा कंद उलगडवून दाखवता येत नाही म्हणतात. पण मला जे काही जेमेतेम समजले ते सांगतो. पहिली कविता वगळता , बाकीच्या तीन स्त्रीच्या वेगवेगळ्या मनोवस्था रेखाटतात असे मला वाटले.
टिक्कर-बिल्ला म्हंणजे अंगणात मुलींनी खेळायचा खेळ. एक दगड घ्यायचा नि एकेका चौकोनात टाकायचा. खेळ खेळण्याचे वय चालू असतानाच परिस्थिती "अंगठ्याला ठेचेवर ठेच पोचविते". या ठेचांमधे मूळचे "अल्लाद" बालमन "रक्ताळून काळेनिळे" पडते. बालपणीचा "उंबरठा" ओलांडताना लवकरच (बहुदा लग्न करून, गृहप्रवेश करून) घराची जबाबदारी येते. ही जबाबदारी सांभाळताना मन मात्र लंगडी-लंगडी घालत फिरते.
"बारीक दातांची फणी" म्हणजे संसारी स्त्रीला संसाराच्या धबडग्यात मिळणारी अर्ध्या घटकेची मैत्रीण. बाई आपले मन फणीपाशी मोकळे करते. "आयुष्याची एकेक बट विंचरणे " म्हणजे जणू आयुष्यातल्या व्यथांचा एकेक पापुद्रा सुटा करून पहाणे. "होमसीक" होणे याला बर्यापैकी वेगवेगळे अर्थाचे पदर असू शकतात. माहेर सुटले असेल तर संसारी बाई कुठे जाईल ? किंवा आयुष्याचाच सासुरवास झाला तर "स्वगृही" परत जायचे म्हणजे .....इथे काळ कठोर वाटत नाही , इहलोक सोडल्यानंतरचा प्रदेश म्हणजे "होमसीक" झाल्यावर परत जायचे एक विश्रांतीस्थळ वाटते.
"अंगणापासून चौकापर्यंत" एकेक वर्ष उसवत जाते. संसारी स्त्रीला जेव्हा मोकळा श्वास घ्यायला मिळत नाही तेव्हा तिचे कार्यक्षेत्र ठराविकच. अशा आयुष्यात मूळचे आयुष्याचे रेशमी वस्त्र उसवत जाते, त्या चिंध्यांचा चेंडूच जणू बाळगोपाळ अंगण्-परसदारी खेळतात असा एखादीला भास होतो. आणि नकळत ती "कृष्णा"शी पुटपुटून जाते : "पुरे झाल्या का भरजरी शालूच्या धांदोट्या.?"
एका संसारी स्त्रीचा पर्पेक्टीव्ह बाजूला ठेवला तरी , आयुष्याबद्दल कुणालाही खोलवर जाणवेल असेच हे चिंतन आहे ; आणि मुख्य म्हणजे ते चितारले गेले आहे त्रोटक शब्दांच्या छोट्या छोट्या समूहांनी.
26 Nov 2008 - 7:47 pm | बिपिन कार्यकर्ते
मुक्तसुनीत, सर्वप्रथम विनंतिला मान दिल्याबद्दल (धन्यवाद नाही म्हणत :) ) बरं वाटलं.
कवितेचा कंद उलगडवून दाखवता येत नाही म्हणतात.
हे पूर्ण खरे आहे. हे ज्याचे त्यालाच कळावे लागते. किंबहुना कळवून घ्यावे लागते. तरी पण तुम्ही खरंच छान लिहिलं आहे.
आधी म्हणल्यासारखं, खूप काही आहे तिथे पण सापडत नाहिये नेमकं पण ते आहे हे मात्र नक्की, अशी काहीशी अवस्था झाली होती या कविता पहिल्यांदा वाचल्या तेव्हा. तुमच्या विवेचनानंतर मात्र वाट दिसते आहे असे वाटते आहे. तरी अजून परत परत वाचून मुरवाव्या लागतील.
आयुष्याबद्दल कुणालाही खोलवर जाणवेल असेच हे चिंतन आहे
पूर्ण सहमत.
आणि मुख्य म्हणजे ते चितारले गेले आहे त्रोटक शब्दांच्या छोट्या छोट्या समूहांनी.
हे खरंच ग्रेट आणि कठिण आहे. रामदासांच्या गद्य साहित्याबद्दल पण हेच म्हणता येईल. छोट्या छोट्या वाक्यांनी खूप काहीतरी बोलून जातात ते.
बिपिन कार्यकर्ते
27 Nov 2008 - 12:51 pm | राघव
अगदी सहमत!
मला स्वतःला पण नीट समजले नव्हते ते तुमच्या विवेचनामुळे नीट स्पष्ट झाले.
रामदासराव, एक नंबर लिहिलेत! शुभेच्छा!
मुमुक्षु
26 Nov 2008 - 8:50 pm | चतुरंग
तुमच्याकडे कवितेचा कंद उकलण्याची कला आहे खरी! आता पुढचे खोबरे आमचे आम्हालाच काढून खायचे आहे! :)
चतुरंग
26 Nov 2008 - 2:18 pm | धोंडोपंत
क्या बात है!! क्या बात है!!
अतिशय सुंदर. अप्रतिम.
खरे तर आमचा मुक्तछंदाचा पिंड नाही. आम्ही छंदबद्धतेच्या एसटी मधले. तसे असतांनाही या कविता थेट काळजाला भिडल्या. खूप खूप आवडल्या.
आता लिहायचे थांबू नका. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
फारच सुंदर लिहिलाय. अभिप्राय पूर्ण झाल्यावरही पुन्हा लिहावेसे वाटले.
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)
26 Nov 2008 - 2:59 pm | विसुनाना
सर्वच कविता आवडल्या
26 Nov 2008 - 7:38 pm | श्रावण मोडक
म्हणतो. सर्वच कविता आवडल्या आणि भिडल्यादेखील.
26 Nov 2008 - 10:24 pm | धनंजय
बिपिन यांच्या विनंतीला (टोचणीलाच म्हणा ना - माझ्या तोंडात शब्द राहिले नाहीत असे कधी झाले आहे?) मान देऊन थोडे लिहितो आहे.
छंदाबद्दल : मुक्तछंद हा फारच कठिण प्रकार असतो. मी स्वतः छंदोबद्धच लिहितो, त्याचे कारण असे, की मुक्तछंदासाठी लागते तितकी तालबद्ध स्फूर्ती मला क्वचितच होते. मुक्तछंद म्हणजे पूर्ण अनियमित असणे, शब्दांच्या लयीकडे दुलक्ष केले तरी चालते, अशी चुकीची कल्पना अनेक प्रारंभिक कवींना असते. मुक्तछंदातील लयीचा नियम वाचकाला पूर्वज्ञात नसतो, कवी कडव्याकडव्यात नवीन "नियम" बेमालूम बनवत असतो, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.
त्यातल्या त्यात मला जाणवलेला लयीचा एक खेळ.
कडव्याच्या लिखित ओळीच्या शेवटी आपोआप वाचक क्षणार्धासाठी थांबतो. साधारणपणे कवितांच्या ओळींची लांबी अशी असते की यतींची लय कालबद्ध येते - वृत्तबद्ध काव्यात हीच गंमत असते.
आता यती अशाच सम-काला-नंतर आणायच्या असतील तर दुसरे कडवे कसे लिहिले असते?
पण लिहिलेले आहे वेगळेच, आणि अधिक परिणामकारक :
पहिल्या चार ओळीत यती सारखी अपेक्षेपेक्षा लवकर-लवकर येत जाते, त्यामुळे लय वाढत-वाढत वेगवान होत जाते, आणि चवथ्या ओळीत उच्च शिखरावर पोचते... मग लय दुप्पट-चौपट-आठपट खेळल्यानंतर धीम्या लयीत न्यासापर्यंत पोचवावे तशी पाचवी ओळ कथेचा शेवट सांगते. लयीशी केलेला हा खेळ शब्दार्थालाही पूरक आहे. टिक्करबिल्ला खेळणारे पाऊल सारखेसारखे उंबरठ्याशी अडत असते ते "आता" या लयीच्या शिखरावर उंबरठ्याला पार करत असते.
- - -
अर्थगर्भ मिताक्षराबद्दल :
कवितेतील मिताक्षरी वाक्यांत वरवर नेमकेपणा दिसतो, पण अनेक अर्थ काढता येतात. वर मुक्तसुनीत यांनी पैकी एक-एक अर्थ खुलवून सांगितला आहे. पण अर्थ नीट समजावून सांगणार्या स्पष्टीकरणात्मक वाक्यांचा एक मोठा तोटा असतो : आता त्या वाक्याला दुहेरी अर्थ राहात नाही.
पूर्णोपमा असलेल्या कवितेत दोन अर्थ तर निघतातच :
पहिल्या कडव्याचे दोन पूर्ण अर्थ निघतात : (१) पतंगाचे वर्णन; (२) व्यक्तीचे वर्णन
पण व्यक्तीची उपमा कशी लावून घ्यावी? वेगवेगळे अर्थ लावता येतात. म्हणूनच ही कविता पुन्हा पुन्हा वाचता येते, आणि प्रत्येक वेळी अर्थाचा वेगवेगळा पैलू चकाकू शकतो.
पहिल्या वाचनात "मिजासखोर"चा अर्थ "गर्विष्ठ" असा घेतला, तर तुकड्याचे वर्तन "फाटका म्हणून लाज वाटायची, तर आकाशावर हक्क मागायला निघाला" "चड्डीत राहा ना भौ" सारांशाने घेता येते.
दुसर्या वाचनात असे वाटू शकते की "होय आकाशाएवढे स्वातंत्र्य फाटक्यातुटक्यांचा हक्क आहेच, 'मिजास' ही व्यंगोक्ती आहे, हे तर दुर्दम्य सबळ होणे आहे - भले शाब्बास!"
तिसर्या वाचनात "हवा तसा वारा" याच्याकडे लक्ष केंद्रित करून "आजूबाजूच्या प्रचंड घटनांनी आपण कसे वाहावले जातो, आपण कधी कपट्यासमान असतो, तर कधी पतंगासमान..." असा काही सारांश काढता येईल.
...
याच्यापैकी कुठलाच अर्थ "चुकलेला" नाही. कवीच्या मनात शब्द लिहिताना दोनच अर्थ का असेनात (पूर्णोपमा असल्यामुळे दोन तरी अर्थ होतेच!) पण सूचक शब्दांनी अर्थाचे खूप पदर असायला जागा कवीने सोडली आहे. या अर्थगर्भ मिताक्षरी पद्धतीत कवी वाचकाला "ही घे एक सुंदर कल्पना" असे मर्यादित दान देत नाही. "हे घे कल्पनाबीज, आणि त्यातून तुझ्याच कल्पनाशक्तीने खूप खूप सुंदर कल्पना निर्माण कर!" असे अमर्याद दान देत आहे.
- - -
असो. कवितेत कायकाय श्रीमंती आहे असे सांगताना आपलेच दारिद्र्य नागवे करत असल्यासारखे मला वाटले. माझा पहिला प्रतिसादच बरा होता...
26 Nov 2008 - 10:44 pm | ऋषिकेश
सुंदर कवितांचे सुंदर विवेचन!
रामदासजी, कवितांच्या मेजवानीबद्दल अभिनंदनआणि आभार!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
26 Nov 2008 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते
धनंजय, माझ्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. आणि तुम्ही टोचणी पण नेमकी पकडलीत.
मुक्तछंदातल्या लयीबद्दल तुम्ही नेमकेपणाने लिहिलं आहे. पटलं.
मुक्तछंदातील लयीचा नियम वाचकाला पूर्वज्ञात नसतो, कवी कडव्याकडव्यात नवीन "नियम" बेमालूम बनवत असतो, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल.
पण अर्थ नीट समजावून सांगणार्या स्पष्टीकरणात्मक वाक्यांचा एक मोठा तोटा असतो : आता त्या वाक्याला दुहेरी अर्थ राहात नाही.
या अर्थगर्भ मिताक्षरी पद्धतीत कवी वाचकाला "ही घे एक सुंदर कल्पना" असे मर्यादित दान देत नाही. "हे घे कल्पनाबीज, आणि त्यातून तुझ्याच कल्पनाशक्तीने खूप खूप सुंदर कल्पना निर्माण कर!" असे अमर्याद दान देत आहे.
सहमत. ही वाक्ये (त्यातला अर्थ) विशेष वाटली. कवितेकडे कसे बघावे आणि तिचा आस्वाद कसा घ्यावा याचे उत्तम विवेचन केले आहे तुम्ही. बरंच काही शिकलो. :)
याच अनुषंगाने या विषयाशी पूर्णपणे निगडीत नाही आणि पूर्णपणे विपरितही नाही असा एक प्रश्न आहे मनात. इथे अवांतर होईल. व्यक्तिशः बोलतो.
बिपिन कार्यकर्ते
26 Nov 2008 - 11:08 pm | भाग्यश्री
हे असं कसं सुचू शकतं?? :|
बिपिन सारखीच अवस्था झाली होती.. काहीतरी अपूर्ण कळतंय.. भार्री आहे हे ही कळतंय पण पूर्ण नाही..
मुक्तसुनित, धनंजय तुमचे लाख आभार!
रामदासकाका, खूप सुंदर अर्थपूर्ण कविता.. मला मोजक्या शब्दांत अर्थ मांडणार्यांची नेहेमीच कमाल वाटते! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
29 Nov 2008 - 4:26 pm | विसोबा खेचर
पहिल्या दोन कविता लै भारी..!
29 Nov 2008 - 4:45 pm | स्वाती दिनेश
कविता वाचल्या, थोडं कळलं ,थोडं नाही.. तरीही खूप आवडल्या होत्या.
पण सुनीतराव,धनंजय यांचे प्रतिसाद आणि रामदासजींचे विवेचन वाचल्यावर स्पष्ट झाले आणि जास्तच आवडल्या.
स्वाती
29 Nov 2008 - 5:24 pm | मृगनयनी
अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा.
उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
रक्ताळला काळानिळा.
आता,
घरभर लंगडी लंगडी.
एका संसारी प्रतिमेत बसवलेली, एक पारम्पारिक स्त्रीची कहाणी!!
खूप सुन्दर! लहनपणी खेळायला "टिक्करबिला" फक्त तेव्हा आयुष्याची सोबतीण होते, तेव्हा रक्ताळलेल्या अंगठ्याचीही सवय होऊन जाते.
सुपर्ब!!!
एकेक वर्षं उसवत गेलं
अंगणापासून चौकापर्यंत
चिंध्यांच्या चेंडूंसारखं.
कृष्णा,पुरे झाल्या का
भरजरी शालूच्या धांदोट्या
आपल्या तथाकथित संन्यस्त वृत्तीचे गोडवे गाऊन, परमार्थावर आणि अध्यात्मावर (?!?) भाषणे देणार्यांना एक जबरदस्त चपराक!!
स्वतःच्या भरजरी आयुष्याच्या चिन्धीसारख्या धांदोट्या होत असतानाही, आयुष्याकडे त्रयस्थ वृत्तीने पाहुन, कृष्णाची आठवण येणारी स्त्री खरोखरच बावनकशी सोनं च म्हटलं पाहिजे. गंजलेल्यांचं पितळ उघडं पाडणारं सोनं!!!
एकदम मस्त लिहिलंत... रामदासजी!
:)
29 Nov 2008 - 6:28 pm | मदनबाण
मला पतंगवाली कविता फार आवडली. :)
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर