धरतीच्या लेकराला कसं आभाळ नडलं..
होतं सपान येगळ सारं इपरित घडलं..
होती कष्टाची पावती , सारी उभी शेतामधी..
आलं आभाळाच्या मनी, उभं पाणी डोळ्यामधी..
शेत पाण्यात भिजलं , मन जागीच थिजलं..
रान सपनाच उभं, एका क्षणात विझलं..
कधी बाजारात धाक , काय मिळेल हो दाम..
पेरी मोत्याचं बियाणं, वाही अनमोल घाम..
कर्ज व्याजनं ते काढी , रानी हिरवळ शृंगारी..
व्याज फेडी दर साली, तरी फिटेना उधारी..
दरसाली पेरतो , नव्या सपनाच बियाणं..
तरी भरेना घरात, कधी खरं सोनं नाणं..
दिस सणाचे हे आले, देवा आता उंबऱ्यावर..
करी उपकार थोडे ,जगाच्या पोशिंद्यावर..
थोडी उसंत जगण्याची,त्याच्या नशिबी मिळू दे..
सपनं छोटी छोटी त्याची, थोडी झळाळी मिळू दे..
सण दिवाळीचे दीप, त्याच्या घरिबी उजळू दे..
पीक जोमात येऊ दे , भाव सोन्याचा मिळू दे..
नावं आहे बळीराजा, मान राजाचा मिळू दे..
दरबारी जनावरं पीक,आभाळी भिडू दे..
प्रतिक्रिया
29 Oct 2020 - 10:01 am | पाषाणभेद
छान आशादायक काव्य!
29 Oct 2020 - 10:13 am | सुबोध खरे
चान चान
29 Oct 2020 - 2:34 pm | गोंधळी
वास्तविक.