नंदादीप..!!
सकाळपासून माझी गडबड सुरू होती. आठवेल तशी पूजेची तयारी, हार, माळ, एकेक नेऊन एकत्र ठेवत होते. खरतर देवीची कापसाची वस्त्रं करणं, भिजवलेल्या फुलवाती बघणं, पितळेची मोठी समई उजळून ठेवणं, असं काही ना काहीतरी गेल्या आठवड्यापासून उत्साहानं चालू होतंच. काही मनात आलं, आणि सासूबाईंना विचारायला गेले, की त्या म्हणत,.. गेली पंधरा वर्ष करतेस ना.. काळजी करू नकोस, देवी करून घेईल सगळं...!!
यांचा डबा भरून तयार होता. ते ऑफिसला गेले, की लगेच अंघोळीला जायचं, असा विचार मी करत असताना, बेल वाजली. दार उघडलं तर शेजारची प्रिया रडत उभी...!! आत ये. बस इथे. काय झालं ते सांग.. मी म्हणाले. तशी प्रिया डोळे पुसत पुसत म्हणाली.. काय सांगू वहिनी, काल रात्रीपासून बाळाची हालचाल जाणवत नाही. अजून तर नववा महिना लागायला तीन दिवस आहेत. हे पण जर्मनीहून यायला दहा दिवस आहेत. मला तर रात्रभर झोप नाही. आता बहुतेक पित्त वाढून, उलटी पण झाली. काय करू खूप भीती वाटतेय, टेन्शन आलयं आणि माझ्याजवळ इथे दुसरं कुणीच नाही.... अगं वेडी आहेस का..? पुन्हा असं बोलू नकोस. आम्ही आहोत ना सगळे... हे बघ आपण तुझ्या डॉक्टरांना आता फोन करू. हे ऑफिसला जाताना आपल्या दोघींना सोडतील तिथे. आणि काय ते बघू... घरी आई बाबांजवळ सोनू आहेच. आणि हो, आता सोनूला घेऊन लगेच तुझ्या घरी जा आणि तुझे थोडे कपडे मात्र इथे घेऊन ये. आपण पंधरा मिनिटात निघूया.
मी तयारी करताना पाहून यांनी पाच हजार हातावर ठेवले. असू देत जवळ असं म्हणाले. आईंना सांगायला जाणार तोच, त्याच एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात ताटलीत पोळीचा रोल घेऊन समोर आल्या. आई, माझा उपास आहे हो आजपासून... असूदे.. अष्टमीला किंवा मध्ये जमला तर एक दिवसाचा कर. आता शांतपणे जा. इथली काळजी करू नकोस...!! "हिचं काय ते बघून, येतेच दीड-दोन तासात.." असं म्हणून मी चहा घेतला. प्रियाचा आठवा महिना, म्हणून घरी अंबाबाईला प्रार्थना केली. तोवर प्रिया आलीच. आईंनी तिला हळदी कुंकू लावलं. देवाला नमस्कार करून नीघ म्हणाल्या.. तिनही त्यांचं मनापासून ऐकलं..
ह्यांच्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये सुखरूप पोहोचलो. तिला तपासताना डॉक्टरीणबाई सचिंत दिसल्या. सोनोग्राफी केल्यानंतर,.. कदाचित लगेच सिझेरियन करावे लागू शकेल अशी मोघम कल्पनाही मला दिली. अर्ध्यातासात प्रियाचे ऑपरेशन करावे लागेल या निर्णयाप्रत आम्ही आलो. ह्यांना आणि घरी फोनवर कळवलं आणि संमतीपत्रा वर सही केली.. मी बाहेरच आहे असं सांगून प्रियाला आश्वस्त केलं. क्षण केवढा मोठा असतो. ही गोष्ट, उगाचच ती अवघड प्रतिक्षा मला शिकवून गेली.. मी प्रार्थनेला डोळे मिटले...
प्रिया आणि अमोल दोघंही अनाथाश्रमात वाढले. अमोल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर तर प्रिया गणितात एम्. एस्सी... दोघांची नोकरी.. प्रिया लाघवी तर अमोल समंजस आणि प्रेमळ स्वभावाचा..!! लग्न करून बायकोला नव्या घरीच आणण्याचं त्याचं स्वप्न होतं. आमचा शेजारचा फ्लॅट अमोलनी घेतल्यापासून, इंटिरिअर ते नववधूचा गृहप्रवेश.. सगळीकडे आमचा सहभाग होताच. असा हा चिमणा-चिमणीचा संसार..!! प्रियाला संसाराची आवड. त्यामुळे सतत आईंच्या मागेमागे राहून, नवनवीन गोष्टी शिकायची. माझ्या लेकीला, सोनूला, तर तिच्या शिवाय चैनच पडायचं नाही. एक दिवस प्रिया म्हणाली, येत्या एक तारखेला नोकरी सोडते कायमची... आणि मग ही गोड बातमी लाजत सांगितली. त्यात गेल्या महिन्यात अमोलला बढती मिळाली आणि ट्रेनिंगसाठी महिनाभर जर्मनीला जायचं ठरलं. द्विधा मनस्थितीत होता. पण हेच म्हणाले, संधी गमावू नकोस. प्रिया बरोबर आम्ही सगळे आहोतच. आणि आज हे असं झालं.....
मुलगा झाला..!! बाळ वजनाने कमी आहे, पण दोघं सुखरूप असल्याचं, नर्स सांगून गेली... आणि मी मनोमन देवीला हात जोडले... नळकतच डोळे पाझरले.. ताबडतोब मी घरी आणि ह्यांना ही गोड बातमी कळवली. डॉक्टरांच्या परवानगीने, दोन तासासाठी घरी निघाले. बापरे, साडेबारा कधी वाजले, हे समजलंच नव्हतं...
घरी आले तर कटाच्या आमटीचा गोड दरवळ जाणवला. आई, अहो..... थांब तू. काssही बोलू नकोस. छान अंघोळ करून ये. देवीचा नैवेद्य झाला आहे. आपण सगळे एकत्रच बसू. बाबाही जेवायचे थांबलेत आज..!!
आई प्रियासाठी ज्वारीची भाकरी, खसखशीची खीर, अळीवाची खीर, मुगाची खिचडी, जमेल तसं देत राहिल्या. ह्यांनीही आठ दिवस कॅन्टीनला जेवणार, असं सांगून आमची साथ दिली. केशरी दूध, शिकरण, दाण्याचा लाडू, तर कधी फक्त तूप साखरेवर आई अंबाबाई तृप्त झाली. एक वेगळचं रुटीन घरात सुरू झालं..
सोनूला त्या बाळाला कधी पहातेय असं झालं होतं. पण तिसऱ्या दिवशी त्याला कावीळ झाली आणि थोडी जास्त वाढू लागली. बाळ सिरीयस होतंय हे पाहून, आम्ही सारेच हबकलो.... हे काय नवीनच उद्भवलं...! एक तर कमी दिवसाचे बाळ, अमोल इथे नाही. मीही मनातून घाबरले होते. पहिलटकरीण म्हणून प्रियाची अवस्था तर बघवेना. कधीकधी नुसतं मला बिलगून, हात हातात घेऊन बसायची. बाळाला ट्रीटमेंटसाठी दुसरीकडे नेलं, तेव्हा तिचं रडू आवरेना... या परिस्थितीत सुद्धा घरी येऊन, मी सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास जमेल तशी, आईंना मदत करत होते. पण शेवटी त्या म्हणाल्या,.. तू आता बाळ बरं होईपर्यंत प्रिया जवळच रहा....
आठ दिवस कॅलेंडर मधून उडून गेले की काय असं वाटलं. देवीच्या कृपेने, बाळबाळंतीण सुखरूप घरी आले. पेढ्यांची लयलूट झाली... तरी मनाला काहीतरी खात होतं. सगळं नवरात्र जवळ-जवळ आईंनीच केलं. सोनूची खारीची मदत झाली. पण मी घरची सून असून यंदा काहीच करायला जमलं नाही. मनातलं शल्य आईंना हळूच सांगितलं. तेव्हा त्या म्हणाल्या,.. अगं, जित्याजागत्या देवीची निरपेक्ष सेवा घडली आहे तुझ्या हातून.. तिच्या घराण्याचा नंदादीपही छान तेवत राहील, याची तू मनापासून काळजी घेतलीस.. आणखी भाग्य ते कोणतं..!! आईंच्या कुशीत शिरताना नवरात्र संपन्न झाल्याचं एक वेगळच समाधान मिळालं. आम्हा दोघींच्या आनंदाच्या अश्रूधारांचा मानस अभिषेक, अंबाबाईच्या चरणांवर काहीवेळ असाच होत राहिला.. आणि नंदादीपाच्या त्या मंद प्रकाशात, कुलस्वामिनी मात्र समाधानाने हसत राहिली.....
जयगंधा..
१७-१०-२०२०
प्रतिक्रिया
19 Oct 2020 - 2:12 pm | नयना माबदी
खुप सुंदर.डोळे भरुन आले वाचताना.
19 Oct 2020 - 3:26 pm | सनईचौघडा
छान लेख.
19 Oct 2020 - 5:52 pm | पॉइंट ब्लँक
मस्त _/\_