शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
12 Sep 2020 - 12:14 pm

आधीच्या भागाची लिंक
शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

"बेगमसाहीबा, अंदर आनेकी ईजाजत है ?" अलीने महालाच्या दाराबाहेर उभा राहून प्रश्न केला.
"हां, अंदर आवो! तशरीफ रखो" महालात करडा आवाज घुमला. बुरख्याच्या आडचे तिक्ष्ण बदामी डोळे अलीवर रोखले गेले. अली बैठकीवर बसला आणि महालातील ती करारी बाई ताडकन उठली आणि फेर्‍या मारु लागली. कोण होती हि राजस्त्री ? हि होती मरहुम महमद आदिलशहाची बीबी, बडी बेगम. वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते. हिचे नाव ताज उल मुखद्दीरात किंवा उलिया जनाबा असे होते.पण विजापुरात तीला बुबुवाजीखानम बेगम किंवा सरळ बडी बेगम म्हणत. या पाताळयंत्री बाईला विजापुरचे सर्व सरदार टरकून असत. अलीशहाची हि सख्खी आई नव्हती, पण आपल्या या सावत्र मुलावर तीचा विलक्षण जीव होता.तीन सालामागे महमदशहा पैगंबरवासी झाल्यानंतर कम उम्रच्या अलिला सांभाळत तीने विजापुरची सल्तनत समर्थपणे सांभाळली होती.शहाजहानचा मुलगा औरंगजेब आणि कुतुबशाहीचा वजीर मीर जुमला दोघे आदिलशाहीच्या उत्तर सीमेवर हल्ला करुन मुल्क कुरतडत होते. त्यांनी बिदरच्या किल्ला घेउन कल्याणीच्या म्हणजेच बसवकल्याणचा किल्लाही घेतला.मात्र विजापुरातून अफझलखान आणि सेनापती खान महमद कल्याणीचा किल्ला वाचावायला त्याला वेढा घालून बसले.अफझलने तर औरंगजेबाला मारायचे ठरविले.मात्र धुर्त औरंगजेबाने खान महमंदला खलिता पाठवून, 'मला काही दगा झाल्यास मुघल सल्तनतीचे बादशहा शहाजहान विजापुरवर स्वारी करुन आदिलशाही साफ बुडवतील' असा निरोप दिला.आदिलशाहीच्या हिताचा विचार करुन खान महमंदने औरंगजेबाला वेढ्यातून बाहेर जाउ दिले.हि बातमी समजताच अफझल वेढ्यातून उठून तडक विजापुर दरबारात पोहचला. दाण दाण पाय आपटत आलेला अफझल पाहून याच बडी बेगमेने त्याला विचारले, "क्या हुआ ? ईतने गुस्सा क्यों हो?"
"बेगमसाहिबा खासा औरंगजेब हात आया था,मै उसे हमेशा के लिये जहन्नुममे पहुचानेवालाही था की खान महमदने उसे छोड दिया.असे दुष्मन सोडले तर आदिलशाही सल्तनत सुरक्षित राहील का ?" अफझल धुमसत होता.
"ठिक है, खानको वापस बुलाओ" बेगमेचा आदेश गेला.बिचारा खान विजापुरच्या वेशीतून आत येतो न येतो आहे तोपर्यंत त्याच्या पालखीवर दोन्ही बाजूनी तलावारी घुसल्या आणि जागेवर तो ठार झाला. प्रत्यक्ष सेनापतीच्या जीवाचाही भरवसा नव्हता.
तर अशी होती हि बडी बेगम.
आता बडी बेगम आणि अलीशहाचे खलबत सुरु झाले.
"अली, पिछले दस साल आपल्याला फार कठीण गेले.मरहूम महमदशहा बीमार होते, त्याचा फायदा घेउन ईकडे बेरीद मुलुखात मोघलांनी कब्जा केला तर तिकडे मावळात सिवाने रोज आमचा मुलुख ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत. अपने नसीबने साथ दिया जो शहजादा औरंगजेब मुघल सल्तनीचा बादशहा होण्यासाठी दिल्लीला रवाना झाला. आता फक्त सिरदर्द उरला आहे त्या शहाजीच्या बेट्याचा , सिवाचा. आम्ही शहाजीला खत लिहीले कि बेट्याला आवर.त्यावर त्याचा जवाब काय यावा ? बेटा बगावतखोर आहे, तो माझेही एकत नाही.तुम्ही काय ते बघून घ्या'.काय याचा अर्थ ? जरुर या दोघा बाप-बेट्याची हि मिलीभगत आहे. आता आपल्यालाच काहीतरी करावे लागणार.मागे महमदशहानी फत्तेखान्,मुसेखानाला या सिवावर पाठविले होते.आपल्याच ताब्यातील पुरंदरावर बसून सिवाने मुसेखानाला मारले,फत्तेखान कसाबसा पळून आला.ईकडे आम्ही त्या शहाजीला जिंजीला कैद केले.अफझलखान हत्तीवर साखळदंडाने शहाजीला बांधून घेउन आला. मोघल दरबाराचे आपल्यावर दडपण आणून सिवाने शहाजीला सोडविले. पण आपण सिंहगड मागून त्या सिवाला शह दिला.पण पिछले साल सिंहगड भी सिवाने ताब्यात घेतला.जावली हा आमचाच मुलुख.आमचा सरदार तिथे चंद्रराव होणार हे ठरलेले.पण सिवाने त्यात नाक खुपसले आणि आपल्या मर्जीच्या यशवंतरावाला चंद्रराव केले.त्यावेळी अफझलला वाईला सुभेदार नेमून जावळी ताब्यात घेण्याचा हुक्म दिला होता.मात्र आपलाच सरदार कान्होजी जेधेने अफझलला मदत केली नाही,हमारेही लोग गद्दार निकल रहे है. आगे कर्नाटकमे बगावत हुई तो अफझल को उधर भेजना पडा.तेवढ्यात सिवाने जावळी घेतली.फक्त आपलाच मुलुख नाही तर मुघलांचे जुन्नर और अहमदनगर भी उसने लुटा.कोकणमे उतर कर कल्याण्,भिवंडीपर भी उसने कब्जा जमाया है. इतकेच नव्हे तर आपला कुडाळ्,सावंतवाडी परगणासुध्दा सिवाने ताब्यात घेतला.अब हम एसेही हात पे हात धरे बैठे रहे तो एक दिन सिवा विजापुरच्या वेशीवर उभा असल्याची खबर येईल. आता त्याचा बंदोबस्त करायला हवा आणि तो ही कायमचा."
एका दमात बडी बेगमेने मसला सांगितला.
अलिही चिंतेत पडला "तो अम्मीजान किसको सिवा पे भेज देना चाहीये ?"
"बेटा, आपली दरबाराची तबियत बडी नाजुक झाली आहे. महमदशहा गुजर गये आणि दरबारात दुफळी माजली आहे. तु महमदशहाचा वारिस मुलगा नाही असा काही सरदारांचे मत आहे. आपल्यासमोर फार पर्याय नाहीत.मला वाटते आपण अफझलला सिवावर पाठवू.तो आपल्याशी एकनिष्ठ आहे.मागे चंद्रराव मोरेकडून जावळी ताब्यात घ्यायला आपण त्यालाच पाठविले होते.त्या मुलुखाचा तो जाणकार आहे. शिवाय याच सिवाच्या थोरल्या भावाला संभाला यानेच कनकगिरीच्या वेढ्यात मारले.शहाजीला यानेच जिंजीला पकडले.अब सिवा कि बारी है.अफझल धाडसी आहे.एकबार हात मे ली हुई मुहिम वो जी जानसे पुरी करेगा. और सबसे बडी बात वाई हि अफझलची जहागीर आहे.तीचा सांभाळ करणे त्याची जबाबदारी आहे"
"ठिक है.उद्या दरबारात अफझलवर हि मोहीम सोपवली जाईल" अलीच्या चेहर्‍यावर एक प्रश्न सुटल्याचे समाधान होते.
---------------------------------------------------------------
"बा अदब बा मुलाहिजा होशियार ! सल्तनते आदिलशाही अलिशहा बादशहा पधार रहे है! होशिय्यार! खडी ताजीम" हुजुर्‍याने ललकारी दिली आणि दरबारातील कुजबुज एकदम थांबली.
अली आपल्या तख्तावर बसला. उजवीकडच्या पडद्यामागे सळसळ झाली. बडी बेगम आसनस्थ झाली होती.सगळ्यानी अलिला आणि बडी बेगमेला कुर्निसात केला.
"आज एक खास वजहसे इस दरबार को बुलाया गया है" चिकाच्या पडद्या आडून कणीदार आवाज उमटला.बडी बेगमेचा तो स्वर एकून सगळे सरदार चपापले आणि माना खाली घालून काय एकायला मिळते आहे,त्याची वाट पाहू लागले.
"सगळे सरदार आणि हि आदिलशाही सल्तनत जानते कि गेल्या काही वर्षापासून आपले सरदार शहाजी भोसल्यांची कर्यात मावळाची जहागीर त्याचा बेटा सिवा सांभाळतो आहे. सिवा बेंगळूरावरुन पुण्याला गेला,तिथल्या डोंगरदर्‍यात रहाणार्‍या त्या गंवार मावळी लोकात मिसळला आणि त्याने शाही सल्तनतीचे किल्ले घेतले. आपले निशाण वेगळे केले. आमच्या जहागिरीचा महसुल आम्हाला मिळायला पाहिजे,पण तो सिवा आम्हाला देत नाही.स्वताचा शिक्का मोर्तब चालवतो आहे. हि बगावत आहे.दरबार जाणतो आहे कि आम्ही त्याच्यावर घाटगे, निंबाळकरना पाठविले, लेकीन वो शिकस्त खा के वापस आ गये.उसके बाद फत्तेखान और मुसेखान का भी वही हाल हुआ.शहाजीला कैद केले म्हणुन आम्हाला कोंढाणा तरी मिळाला. मध्ये काही वर्ष सिवा शांत होता.पण आता जावळी आणि आमचा कोकणचा मुलुख घेउन त्याने पुन्हा आमच्याविरुध्द बगावत केली आहे. अब हम चुप रहे नही सकते.सिवाची हि सल्तनते बगावत आम्ही हमेशा के लिये खत्म करणार आहोत. यासाठी माबदौलत या मोहीमेवर या दरबाराचे एक नगीना सरदार अफझलखान बिन महमंदशाहीको नामजद करती है".
हे एकून छाती फुलवलेला अफझल एखादया नागासारखा उसळी घेउन सरदाराच्या गराड्यातून पुढे आला. साडे सहा फुटी भव्य देहाचा आणि आडव्या अंगाचा हा दांडगा ईसम चालु लागला म्हणजे माजावर आलेल्या हत्तीची आठवण होई. समोरचा आपसूक मागे सरे. वास्तविक हा कोणी सरदार घराण्यातील नव्ह्ता.याच्यामागे पुर्वजांचा कोणताही पराक्रमाचा इतिहास नव्हता. साध्या स्वयंपाकीन बाईचा हा हुड मुलगा.अब्दुल्लाखान हे याचे मुळ नाव.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत. तो गर्वाने स्वताला कुफ्रशिकन आणि बुतशिकन म्हणवून घेइ. बुतशिकन म्हणजे मुर्तीचा विध्वंस करणारा आणि कुफ्रशिकन म्हणजे मुर्तीपुजकांचा नाश करणारा.त्याला एक स्वतंत्र शिक्का होता त्याच्या शिक्क्यात मजकूर असा
"गर अर्ज कुनद सीपहर अअला फजल फुजला व फजल अफजल अझ हर मुलकी बजाए, तसबीह आवाझ आयद अफजल अफजल."
याचा अर्थ- उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं कि, या पृथ्वीतलावरचा श्रेष्ठ माणूस कोणय ? तर सगळीकडून आवाज येईल "अफजल" "अफजल."
विजापुरजवळचे तोरवे हे गाव त्याने वसवले आणि त्याला नाव दिले अफझलपुर. विशेष म्हणजे हाच ईसम कर्तव्यकठोर मात्र होता.परमेश्वर मानवाला जन्म देताना त्याच्यात सदगुण आणि दुर्गुण यांचे आश्चर्यकारक मिश्रण करतो. अफझलची सातारा जिल्ह्यातील बोरखळ व किन्हई येथील ब्राम्हणांना दिलेले खुर्दखत उपलब्ध आहेत. अली आदिलशहाच्या कारकीर्दीत कोकणातील संगमेश्वरजवळ केसो व रंगो सरदेसाई यांचे ईनाम अब्दुल नबी फक्रुद्दीन पटीदार याने बळकावले होते.हा अन्याय दुर करुन ते पुन्हा सरदेसाई यांना मिळावे असे आदिलशाही फर्मान अफझलच्या शिफारसीवरुन दिले गेले. अर्थात हि वागणुक सहिष्णुतेची आणि न्यायाची असली तरी त्याला कारण बहुधा राज्यकर्ते मुसलमान असले तरी बरेच लढणारे सरदार हिंदू होते आणि मुख्य म्हणजे बहुसंख्य प्रजा हिंदु होती.त्यांना दुखावून चालणार नव्हते.
असा हा अफझल सरदारांच्या गराड्यातून दरबाराच्या मध्यभागी एखादा बुरुज खडा रहावा तसा उभा राहीला. तातडीने पानाच्या विडा आणि शुभशकून म्हणुन कट्यार ठेवलेले तबक पुढे आणले गेले.तबकातील विडा उचलून अफझल आपल्या घंमेडीखोर स्वरात म्हणाला, "वो पहाडी चुहा सिवा अपने परबत और घने जंगल भरे मुल्क का घमंड करके माबदौलतसे बगावत कर रहा है. मी मागेच त्याला धडा शिकवणार होतो, पण कर्नाटकची मोहीम मध्ये आली. आता त्या शहाजीच्या बेट्याला मी पकडून ईथे या विजापुर दरबारात उभे करेन, जिल्हे सुभानी त्याचा फैसला करतील. जर सिवाने पळण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जिंदा पकडता आला नाही तर त्याला ठार मारून ईथे विजापुरात आणेन. सिवाला जिंदा या मुर्दा पकडायचा विडा आज हा अफझलखान बिन महमंदशाही उचलत आहे".अफझलने विडा उचलला आणि दरबारातून एकच आवाज उमटला "ईन्शाल्ला --- सुभानल्ला-----वाहवा ! जीते रहो,उम्र दराज हो,मरहब्बा".
"अफझल हम तुम्हारे साथ बारा हजार घुडसवार, दस हजार पायदळ,पचहत्तर बडी तोफे और चारसौ छोटी तोफे जो उस पहाडी मुल्क मे इस्तेमाल कर सकते हो. तुझ्याबरोबर अंबरखान्,याकुतखान्,मुसेखान,हसनखान पठाण,अब्दुल सैय्यद्,बडा सैय्यद्,तुझा पहिलवानखान,सैफ खान, सिद्दी हिलाल, अंकुशखान,घोरपडे, पांढरे नाईक, खराटे नाईक, काटे,झुजांरराव घाटगे, कल्याणजी यादव्,शिवाजी देवकांते, शहाजीचा चुलतभाउ मंबाजी भोसले,पिलाजी व शंकराजी मोहीते हे सगळे सरदार तुझ्या सोबत येतील.वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असेल.आणखी कोणी तुला सोबत हवे आहे का ?" बड्या बेगमने सवाल टाकला.
"जी बेगम साहीबा.माझा मुलगा फाझलखान व आणखी दोन मुल सोबत येईल. पुतण्या रहिमखानाला बरोबर घेतो.शिवाय जावळीचा प्रतापराव मोरे मला बरोबर हवा आहे.त्या जावळीचा मुलुखात सिवा जाउन बसेल असा माझा अंदाज आहे,त्यावेळी प्रतापराव मोरे बरोबर असलेला चांगला" अफझलने मागणी केली.अर्थात अली आदिलशहाने त्याला ताबडतोब मंजुरी दिली. लगेचच मोठ्या उत्साहाने मोहीमेची तयारी सुरु झाली.
विजापुरच्या बाहेर मोठी छावणी औरसचौरस पसरली होती. हत्ती, उंट यांची लगबग सुरु होती.तोफा गाड्यावर लादून त्यांची साफसफाई आणि तेलपाणी सुरु होते. फौजांची दिवसा नियमित कवायत तर असायचीच पण रात्री कलावंतीणीचे गाणे,मुजरे,कव्वाल्या यांचा जल्लोष सुरु असायचा. व्यापारी,बाजरबुणगे,खोजे यांचा छावणीतील वावर वाढला होता. एकदा दुपारी अफझल मोहीमेचा आढावा घेत फाझल आणि अंकुशखानाबरोबर बोलत बसला होता, तितक्याच हुजर्‍या आत आला आणि मुजरा घालून बादशहाचा रात्री भेटायला येण्याचा निरोप सांगून गेला.
---------------------------------------------------------------
"देखो अफझल हमने बडा हौसला है तुमपर.सिवापे जाना आसान नही. हम बस तुमपर यकीन कर सकते है.कर्नाटकातून तुला घाईघाईने बोलावून घेतले ते तुच हि मोहीम यशस्वी करु शकतोस या भरवश्यावर,तुझा पराक्रम आम्ही जाणतो.कर्णपुर्,कांची,मदुराई, श्रीरंगपट्टण ही शहर तु याआधी सहजगत्या जिंकली आहेस. तुझा पराक्रम औरंगजेब आणि दिल्लीचा बादशहा शहाजहान ही जाणून आहेत.समुद्रापर्यंत माझे राज्य विस्तारले ते तुझ्यामुळे.अगदी समुद्रापलीकडे सिंहलद्वीपात माझ्या नावाची भिती वाटते ती तुझ्यामुळे.तुझा सारखा असा पराक्रमी सरदार आपल्या दरबारात असताना तो शहाजीचा बेटा बगावत करतो.आपला मुलुख तोडून घेतो.जो प्रदेश मी तह म्हणून औरंगजेबाला दिला तो हि या सिवाने बळकावला.अचानकपणे सिवा माझ्या शहरावर छापे घालून लुटतो. सिवाशी मुकाबला करणे सोपे नाही.पंधरवड्यात, एका महिन्यात जी मजल आपले सरदार मारतात ती मजल हा सिवा क्षणभरात करतो. शहाजीलाही तो सिवा जुमानत नाही.तेव्हा तुच या सिवाचा आता कायमचा बंदोबस्त करावा असे आम्हाला वाटते." अलीने अफझलची स्तुती केली.
छाती फुगलेला अफझल म्हणाला, "माबदौलत को मुझ पे ईतना यकीन है तो मै पुरी जी जान कोशिश करके उस सिवा को पकड कर आपके सामने लाउंगा. सिवाला मी पकडून आणू शकलो नाही तर कर्नाटक प्रांतात मी जो विजय मिळवला ते व्यर्थ होईल."
"सिवा को जिंदा पकडने कि कोइ जरुरत नही है." एखादा चाबुक कडाडावा तसे बडी बेगमेचे शब्द हवेत घुमले.
"दरबार मे शहाजीचे जासूस असू शकतात, ईस लिये उस दिन मैने जादा बात करना मुनासिब नही समझा.लेकीन थोडे स्पष्ट सांगायला तुला मी ईथे बोलावून घेतले आहे.सिवाला जिंदा ठेवायची गरज नाही.तो आपला मुलुख बळकावून एक दिवस हे विजापुर ताब्यात घेणार हे नक्की आहे. तेव्हा गोड बोलून सिवाला आपल्या जाळ्यात अडकव आणि सरळ संपवून टाक"
"देखो अफझल, सिवा हा आदिलशाहीचा कट्टर शत्रु आहे,त्याच्याशी गोड बोल किंवा काहीही युक्ती कर्, तो शरण येण्याचे नाटक करेल पण त्याला भुलू नकोस.मृत्युचा अग्नी त्याच्या जीवनरुपी शेतावर पडला पाहिजे" अलीने निर्वाणीचा सल्ला दिला.
"जी हुजुर!जी बेगम साहेबा.ईन्शाल्ला" अफझल मान तुकवून म्हणाला. त्यावर अली आणि बडी बेगम दोघांचेही चेहरे उजळले. बडी बेगमेने टाळी वाजवली, त्यावर एक दासी तबक घेउन पुढे आली, त्यामध्ये रत्नांची शिरोभुषणे, मोत्यांचे हार,हिर्‍याची बाहुभुषणे, कडी, नाना रंगाच्या रत्नजडीत अगंठ्या, पानसुपारीचे डबे,तस्त हे सर्व होते.तितक्यात अलीने रत्नजडीत म्यानात ठेवलेली स्वताची कट्यार अफझलला नजर केली.
बडी बेगम पुढे म्हणाली, "याशिवाय तुला विवीध प्रकारची चिलखते,पालख्या,वस्त्रे,बिरुदे,हत्ती, सोन्या चांदीचे पलंग हे सर्व भेट दिले आहे".
आपला हा सन्मान पाहून अफझल भारावून गेला.पुन्हा पुन्हा मुजरा घालून तो मोठ्या अभिमानाने आणि निश्चयाने महालाच्या बाहेर पडला.
---------------------------------------------------------------
प्रचंड उन तावत होते.हवेतील गरमी असह्य होत होती तरीही अफझल अश्या उष्म्यात आपल्या तंबूत बसून फौजेचा हिशेब घालत होता. ईतक्यात फाझल त्याच्या तंबुत आत आला आणि शेजारच्या बिछायतीवर दबकून बसला.अस्वस्थपणे त्याच्या हाताची हालचाल होत होती.बोलावे कि नाही, अश्या द्विधा मनस्थितीत तो चुळबुळ करत होता. त्याचा अस्वस्थपणा अफझलच्या ध्यानी आला, "क्या हुआ बेटा फाझल ? कुछ तकलीफ है?"
"अब्बुजान्,काही सांगायचे आहे,आप गुस्सा न होगे तो बता सकता हुं" फाझल अजूनही मोकळेपणाने बोलत नव्हता.
"बेशक बोलो" अफझलला काय मसला आहे समजेना.
"अब्बु, आपल्या फौजेत गोंधळ उडाला आहे. सगळे सैनिक कुजबुज करत आहेत कि गेले काही दिवस खुप अपशकून होत आहेत.छावणीवर सारखे कावळे ओरडत असतात.मागच्या आठवड्यात भर दुपारी सुर्य दिसेना झाला,परवा तर आकाशात बादल नाहीत तरी मोठा आवाज झाला, उल्का पड्ली म्हणतात, रात्री अपरात्री छावणीजवळ कोल्हे ओरडत आहेत, दोनदा आपल्या निशाणाची काठी मोडली. खडे,धूळ उडवणारा वारा छावणीला नुकसान करुन गेला. मागे एक हत्ती अंकुश लावून ही उलटा पळत सुटला.फौजेतील सरदारांचे म्हणणे आहे, असे यापुर्वीच्या मोहीमेत कधी झाले नव्हते,हि लक्षणे चांगली नाहीत.फौज मनातून गोंधळली आहे" फत्तेखानाने सगळे एकदाचे सांगून टाकले आणि श्वास घेतला.
"सब मनघडत कहानिया है.अश्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम चिंता मत करो मै फौजीयोसे बात करुंगा" अफझल वरकरणी आत्मविश्वासाने म्हणाला खरा पण मनातून तो हि अस्वस्थ झाला.

( क्रमशः )

इतिहासलेख

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

12 Sep 2020 - 12:43 pm | महासंग्राम

आता वाचतो :)

महासंग्राम's picture

12 Sep 2020 - 1:02 pm | महासंग्राम

बेरार हा शब्द आधीपासूनच वापरात होता कि इंग्रज काळात वापरात आला

गामा पैलवान's picture

12 Sep 2020 - 7:01 pm | गामा पैलवान

महासंग्राम,

मला ही इंग्रजी काळातली मोडतोड वाटते. अर्थात हा एक कयास आहे.

आ.न.,
-गा.पै.

कानडाऊ योगेशु's picture

12 Sep 2020 - 1:15 pm | कानडाऊ योगेशु

अफजलखानवधाची गोष्ट कितीदा वाचली/पाहिली तरी मन भरत नाही.

तुषार काळभोर's picture

12 Sep 2020 - 6:55 pm | तुषार काळभोर

उत्तम लेखमाला चालू आहे!

तुम्ही डोंगर-किल्ल्यांचे तांत्रिक लेख जितके सुंदर लिहिता, तितकेच हे ललित लेखन उत्तम करताय. प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती अन ऐतिहासिक दस्तऐवजांचा तुमचा दांडगा अभ्यास असल्याने, ललित लेखनातूनही तुम्ही ऐकीव कहाण्या वगळल्यात, हे उल्लेखनीय!

आणि हो.. लेखाच्या लांबीची काळजी नाही. एकदा वाचायला घेतला की कधी संपतो, ते कळतही नाही.

बेकार तरुण's picture

13 Sep 2020 - 1:43 pm | बेकार तरुण

मस्त लेख.....

तुम्ही डोंगर-किल्ल्यांचे तांत्रिक लेख जितके सुंदर लिहिता, तितकेच हे ललित लेखन उत्तम करताय. प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती अन ऐतिहासिक दस्तऐवजांचा तुमचा दांडगा अभ्यास असल्याने, ललित लेखनातूनही तुम्ही ऐकीव कहाण्या वगळल्यात, हे उल्लेखनीय!

आणि हो.. लेखाच्या लांबीची काळजी नाही. एकदा वाचायला घेतला की कधी संपतो, ते कळतही नाही. >>>> ह्या संपूर्ण प्रतिसादाला +१००

बबन ताम्बे's picture

12 Sep 2020 - 7:22 pm | बबन ताम्बे

तुमची भाषाशैली खूपच ओघवती आहे. इतिहास आणि त्या जोडीला तुमचा भौगोलिक परिस्थितीचाही प्रचंड अभ्यास असल्यामुळे ही ललित कथा वाटतच नाही. प्रत्यक्ष घटना अशीच घडली असावी याचा प्रत्यय येतो. संवाद तडाखेबाज आणि कथाअनुरूप आहेत. पुढच्या कथेची खूपच उतकंठा लागून राहिली आहे.

शा वि कु's picture

12 Sep 2020 - 7:47 pm | शा वि कु

पुभाप्र...

दुर्गविहारी's picture

12 Sep 2020 - 11:10 pm | दुर्गविहारी

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.

बेरार हा शब्द आधीपासूनच वापरात होता कि इंग्रज काळात वापरात आला

बहुधा गडबडीत माझ्याकडून झालेली चुक असु शकते.कदाचित बेरीद प्रांत हा योग्य शब्द होईल.ईथे स्वसंपादन नसल्यामुळे साहित्य संपादकांनी योग्य तो बदल करावा अशी विनंती.

गामा पैलवान's picture

14 Sep 2020 - 1:03 am | गामा पैलवान

दुर्गविहारी,

ही बेरीदशाही बीदरची ना? मला आधी बेरार हे बीदरचा अपभ्रंश वाटायचं. बऱ्याच नंतर कळलं की ते वऱ्हाडचा इंग्रजी अपभ्रंश आहे.

महाराष्ट्रात बेदरकर हे आडनाव बीदरवरनं आलं असावं.

आ.न.,
-गा.पै.

pspotdar's picture

14 Sep 2020 - 4:02 pm | pspotdar

बरार या वरहाड (वऱ्हाड) नाम की उत्पत्ति ज्ञात नहीं है। इसके पहले प्रामाणिक रिकॉर्ड से पता चलता है कि यह आंध्र या सातवाहन साम्राज्य का हिस्सा रहा होगा। 12वीं शताब्दी में चालुक्यों के पतन के बाद, बरार देवगिरि के यादवों के अधीन आ गया, और 13वीं शताब्दी के अंत में मुस्लिमों के आक्रमण तक उनके कब्जे में रहा।

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A...

मागच्या लेखमाला, व मागच्या भागासारखाच उत्तम झालाय

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Sep 2020 - 4:23 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही मस्त झाला

लहान भाग लिहायचे तुम्ही मनावर घेतलेले दिसते. पण त्या मुळे वाचताना लागलेली लिंक तुटून जाते.

असे करु नका संपूर्ण भाग लिहा.

पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 Sep 2020 - 9:28 am | प्रचेतस

निव्वळ उत्कृष्ट.