कथा - पिवळा गुलाब

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
26 Aug 2020 - 3:32 pm

पिवळा गुलाब

रवी कॉलेज पोर्चमधे पोचला. पोचताक्षणी कोप-यावरच्या गुलाबांनी रवीला वातावरणाची जाणीव करून दिली. कोप-यातल्या टेबलवर गुलाब विकायला एक तरूण बसला होता.
रवी मुख्य आवारात पोचला. पहिला तास सुरु झाला. दुसरा संपला, तिसराही संपला. तासांना त्याचं लक्ष नव्हतं. आज वर्गात ब-यापैकी गर्दी होती. सगळे तास संपले. आज जेव्हा रवी वर्गात शिरला तेव्हा मनालीने त्याच्याकडे पाहिलं होतं. रवीनेही तिच्याकडे पाहिलं होतं.
प्राध्यापक कॉमन रुममधे गेले. मुलंही बाहेर पडली. सगळ्यांची गर्दी त्या गुलाब विकणा-या माणसापाशी झाली. मुलं येत होती, गुलाब घेत होती. काही मुलीही येत होत्या. वातावरणाला हळुहळू रंग चढत होता. घेतलेले गुलाब मुलींना देणं सुरु झालं होतं. काही मुली हसून ते गुलाब स्वीकारत होत्या. काही हसून नकार देत होत्या. मुलामुलींचे खटकेही उडत होते. आवारात पाकळ्यांचा खच वाढत चालला होता. रवी देहभान हरपून हे पाहत होता. तो एकदोनदा त्या टेबलजवळ जाऊनही आला. मनाली व तिचा ग्रुप जवळच होता. त्यांची आपापसात चेष्टामस्करी सुरु होती. मनाली त्या मस्करीत सामील होत होती पण एकीकडे ती रवीचं निरीक्षण करत होती. मनालीला वाटलं, रवी आता एक लाल फूल घेईल, नंतर घेईल...पण रवीनं काहीही केलं नाही.
पाठीवर जोरात थाप पडली तेव्हा रवी दचकला. मागे वळून पाहिलं तर प्रकाश आणि किरण होते. ‘कसल्या विचारात हरवला आहेस ?’ दोघांनी विचारलं. ‘गुलाब दिलास का कोणाला’, वगैरे विचारलं. रवीने प्रश्न टाळला. दोघांनी रवीची खूप खेचली. तिघेही कँटीनला चहा प्यायला गेले. मनालीला रवी दिसेनासा झाला. प्रकाश व किरणच्या गप्पा सुरु झाल्या. रवीचं लक्ष नव्हतं. कँटीनमधल्या खिडकीतूनही बाहेरची देवाण घेवाण दिसत होती. त्या खिडकीतूनही त्याला मनाली दिसत होती.
तिघांनी अजून एक एक चहा घेतला. बाहेरची गर्दी ओसरत चालली. गुलाब दिल्या घेतल्यावर काही जणांचे ग्रुप झाले. नवी मैत्री झाली. कॉलेज आवार सोडून गट खायला प्यायला बाहेर पडले. मनालीचा ग्रुपही म्हणू लागला, ‘चला रे. बाहेर जाऊ.’ ग्रुपच्या विरुध्द जाऊन मनालीला वागता येणार नव्हतं. मी थांबते इथेच, असं ती म्हणू शकत नव्हती. म्हणणार नव्हती. ग्रुप निघाला. मनालीने रवीला शेवटचं शोधून घेतलं. तो कँटीनमधे असणार, हा अंदाज तिला आलाच होता. ती कँटीनमधे पोचली तेव्हा तिघेही बाहेर पडले होते. मनालीचा ग्रुप आपापल्या गाड्यांवरून बाहेर पडला. मनाली खट्टू झाली होती.
मनालीला वाटू लागलं, अचानक रवी मागून येऊन आपल्याला थांबवेल आणि ...
मनालीच्या ग्रुपने एकमेकांना बाय केलं. सगळे आपापल्या घरच्या रस्त्याला लागले. मनालीही घरी पोचली. तिची चाल मंदावली होती. ती फारसं जेवली नाही. हातात एक पुस्तक घेतलं पण वाचनात तिचं मन लागेना. तशीच तिला झोप आली. चार साडेचार ला उठली. चहा करून घेतला. ती बागेत फे-या मारू लागली. पाणी घालण्यासाठी तिने बागेचा नळ सुरु केला. एकेक रोप करत करत ती गेटपाशी आली. तेवढ्यात गेटजवळ एक बाईक येऊन उभी राहिली.
मनाली विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिली. बाईकवरच्या स्वाराने हेल्मेट काढलं. तो रवी होता. पिवळा गुलाब घेऊन तो गेटपलीकडे उभा राहिला. मनाली गेटच्या आत.
“हा माझ्या मैत्रीचा गुलाब. तुझ्यासाठी.”
रवीनं गुलाब पुढे केला.
मनालीला आभाळ ठेंगणं झालं. क्षणभर तिला काही सुचेना.
“थँक्स. पण..तू..कॉलेजमधेच का नाही दिलास ?”
“मला वाटलं की, तुला काय वाटेल? तू माझ्याशी धड बोलशील की नाही. तसे आपण आधी एक दोनदा बोललो होतो वर्गात पण गुलाब देतानाची गोष्ट जरा वेगळी असते. समोरच्या मुलीनं फटकारलं तर... असं वाटत राहतं. धडधड वाढली होती.”
“तरी शेवटी दिलासच. घरी येऊन.”
“हो. ठरवलं की, आज फूल द्यायचंच. भावनांनी भीती पळवून लावली. तुझं घर माहीत होतं मला.”
“पण रोझ डे तर कॉलेजमधे असतो...साजरा तर तिथेच व्हायला पाहिजे.”
“हो. कॉलेजमधला रोझ डे तिथे संपला, हे खरंय पण माझ्या मनातला रोझ डे संपलेला नाही. तुझ्याही मनातला रोझ डे संपलेला नव्हताच. हो ना ?

मनाली देखणं लाजली.

(समाप्त)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

26 Aug 2020 - 4:08 pm | महासंग्राम

पिवळा गुलाब म्हणजे स्वारी फ्रेंड झोन्ड झालेली दिसते. वेळीच सावध व्हा म्हणावं

आनन्दा's picture

26 Aug 2020 - 4:56 pm | आनन्दा

पहिली पायरी..
पोरगा 'देती का' वाला नाहीये :) जर बुजरा आहे.

पण आवडली कथा एकंदरीत.

महासंग्राम's picture

26 Aug 2020 - 5:01 pm | महासंग्राम

या वरून आठवलं शाळेत असतांना फ्रेंडशिप डे ला एक मुलाने वर्गातल्या मुलीला बडीशेप देती का सारख " फ्रेंडशिप देती का ?" म्हणून विचारलं आणि खाडकन मुस्काटात खाल्ली होती.

फ्रेंडशिपच तर मागीतली होती.
मुलींना कुठेही एकटे फीरता येत नाही याचे कारणही त्यांच्या अशा वागण्यात असेल काय?

केदार पाटणकर's picture

29 Aug 2020 - 2:25 pm | केदार पाटणकर

धन्यवाद प्रतिसादकांना.

नीलस्वप्निल's picture

30 Aug 2020 - 3:06 pm | नीलस्वप्निल

:)