हल्लीचे काही वार्ताहर

रणजित चितळे's picture
रणजित चितळे in जनातलं, मनातलं
25 Aug 2020 - 2:56 pm

सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे.
हल्लीचे वार्ताहर जर्नालिझमचा कोर्स करतात व कोणत्या न कोणत्या माध्यमातून किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्यांतून आपली कारकीर्द सुरू करतात. तरुण, हातात लेखणी व जनमानसांकडून माध्यमांना मिळणारा प्रतिसाद त्यामुळे हुरळून जाऊन बातम्या सोडून कोणत्याही विषयावर स्वतःचे अपरिपक्व मत लादण्यापलीकडे ते काहीच करत नाहीत. अश्यांना कोणत्याच विषयाचे विशेष ज्ञान नसते, अभ्यासू वृत्तीही नसते पण काहीतरी मत नोंदवायचे म्हणून लेखणीच्या जोरावर कोठच्याही विषयावर स्वतःचे मत खरडायला सतत तयार असतात. छापील किंवा डिजीटल प्रसिद्ध माध्यमांच्यामुळे वार्ताहर स्वतःला स्पेशल समजायला लागतात. त्यातले काही फेसबुकवर किंवा ट्विटरवर त्यांच्या पर्सनल प्रोफाइल वर राजकारणावर लेख लिहून आपल्या मित्रांकडून लाईकस् उकळतात. त्यांनी राजकारणावर लिहिलेल्या त्यांच्या मतांना फेसबुकवाले पावसाळी मित्र लाइक किंवा शेअर करायला उपयोगी पडतील म्हणून काही वार्ताहरांचा फेसबुक फ़्रेंड्स वाढवण्याचा उद्देश असतो. तेवढीच त्यांच्या नोकरीत पुढची पायरी गाठायला मदत म्हणायची. त्यातले काही वार्ताहर बेताचे असतात. त्यातून जर का काही कारणाने अशा वार्ताहरांना पंतप्रधान मोदी आवडत नसल्यास (संघ आवडत नाही म्हणून मोदी आवडत नाहीत म्हणून म्हणा किंवा त्यांना काही कारणाने दुसरा पक्ष निकटचा वाटतो किंवा मोदींविरुद्ध लिहिले की आपले TRP वाढते म्हणून म्हणा) त्यामुळे मोदींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर फेसबुक व तत्सम सोशल मीडियावर उपहासात्मक किंवा वाईट काहीतरी गरळ ओकल्या सारखे खरडायचे. मग करोनाच्या लॉकडाऊन दरम्यान मोदींनी केलेल्या टाळ्या ठोका, थाळ्या बडवा किंवा दिवे लावा अशा विनंतीचा उपहास असो किंवा PM CARES फंड असो काही तरी टिंगल टवाळी करायची व आपल्या फेसबुकच्या मित्रांकडून लाईकस् ओरपायचे. फेसबुकच्या पर्सनल वॉलवर राजकारण लिहायचे, मतं मांडायची शिव्या घालायच्या व कोणी मित्राने विरुद्ध कमेंट केली की रुसायचे व म्हणायचे की आमची पर्सनल वॉल आहे. फेसबुकचे लाईकसाठी जमवलेले मित्र व खरे मित्र ह्यात फरक हाच. पर्सनल वॉल पब्लिक केल्यावर असे काही तरी होणारच. अशा बेताच्या वार्ताहरांचे अजून एक लक्षण म्हणजे जर त्यांच्या आवडत्या नेत्याकडून किंवा त्यांच्या आवडत्या सरकारकडून ढिसाळ कारभार (कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त किंवा साधूंना पिटून मारण्यासारख्या बातम्या) आढळून आला तर त्यावर काणाडोळा करून आपल्या पर्सनल वॉलवर एकदम पर्सनल आयुष्याचे काहीतरी पोस्ट करून वेळ मारून न्यायची. अशा अपरिपक्व वार्ताहरांचे सध्या खूप पीक आले आहे. त्या पासून सर्व सुज्ञांनी सावधान राहणे जरूरीचे आहे.

समाजमत

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

25 Aug 2020 - 3:59 pm | प्रकाश घाटपांडे

यावर उपाय काय?

शाम भागवत's picture

25 Aug 2020 - 4:24 pm | शाम भागवत

उपाय कशाला पाहिजे. जे चाललय ते ठीकच चालले आहे की!!!!!
२०२४ ला मोदी निवडून येणार याचा तो पुरावाच आहे :)

कुठलाही राजकारणी आपण लोकांच्या डोळ्यासमोर सतत राहावे यासाठी प्रयन्त करीत असतो. मोदी जर यानिमीत्ताने सतत लोकांच्या डोळ्यासमोर राहात असतील तर मोदी विरोधकांना प्रोत्साहनच दिले पाहिजे. ;)
गेली २० वर्षे मोदी विरोधक हे काम सातत्याने करत असल्याने आज मोदी पंतप्रधानपदी पोहोचले आहेत.

जर मोदी विरोधकांनी मोदींना विरोध करणे बंद केले तर डमी विरोधक तयार करून त्यांना तावातावाने मोदींना विरोध करण्याचे कंत्राट दिले पाहिजे. त्यांना बातम्यांची तोडफोड करून मोदींविरूध्द गरळ ओकायला सांगितले पाहिजे. सोबत ही बातमी कशी खोटी आहे हे सिध्द करण्याचा खटाटोपही केला पाहिजे. जेणे करून माध्यमे कशी खोटे बोलतात हे लोकांच्या समोर येईल. :))))

जनतेचा माध्यमांवरील अविश्वास ही मोदींची मोठी जमेची बाजू आहे असे मला वाटते.

नेपोलिअन म्हणतो की, जर शत्रू स्वतःहून आत्महत्या करत असेल तर त्याला कधीही सावध करायला जाऊ नका. :))))

कपिलमुनी's picture

26 Aug 2020 - 12:34 am | कपिलमुनी

अर्णब गोस्वामी हाच एकमेव निर्भीड , निष्पक्ष , सत्यवचनी वार्ताहर राहिला आहे.

कोहंसोहं१०'s picture

26 Aug 2020 - 1:15 am | कोहंसोहं१०

आधी मेनस्ट्रीम मीडिया न्युज पोहोचवायचे चांगले आणि प्रभावी माध्यम होते. पण आता फेसबुक, ट्विटर, युट्युब, आणि व्हात्साप्प मुळे ज्या मोदींच्या चांगल्या गोष्टी मेनस्ट्रीम मीडिया दाखवत नाहीत त्याही प्रभावीपणे लोकांसमोर पोहोचतात. त्यामुळे मेन मीडियावर कितीही टीका झालेली असली तरी फार फरक पडत नाही. लोकांना सत्य ठाऊक झालेले असते.
हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. हल्ली मोदींचा वापर सर्वंकडून होतोय. त्यामुळे मोदींच्या बाबतीत you can love him or hate him but you cannot ignore him असे झालेय. पण या सर्वात मोदींचे एक गुणवैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही टीकेला ते फारशी भीक न घालता स्वतःचे काम करत आहेत. त्यामुळे विरोधक आणखीन चवताळून अजून जास्त टीका करायच्या मागे लागतात. परंतु त्यांचे फासे उलट पडतायेत. एकतर मोदींना विरोधी पक्षात सक्षम पर्याय नाही. त्यात २०१९ मधील निकाल दर्शवतो कि खरेच तळागाळात काम चांगले झालेले असणार जे करण्यात एवढी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने केले नाही.
त्यामुळे टीकेने फार फरक पडेल असे वाटत नाही. फक्त पुढची ४ वर्षे दुप्पट वेगाने काम केले पाहिजे आणि सर्व सरकारी बाबूंनी याला मदत केली पाहिजे.

रणजित चितळे's picture

26 Aug 2020 - 11:16 am | रणजित चितळे

ट्विटर व सोशल मेडीया मुळे हल्ली सगळेच वार्ताहर झाले आहेत. पण जे जर्नालिझमचा कोर्स वगैरे करून वार्ताहराचे करियर करण्याच्या उद्देशाने येतात त्यांनी जास्त जबाबदारीनी बातम्या देणे योग्य नव्हे का. बातमी व मत ह्यात अंतर आहे ते विसरले जाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2020 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोदी मिडियाने सर्व पत्रकारिता, माध्यमं, यांचं स्वरुप बदलून टाकलं आहे. आजच एक बातमी होती की फेसबूकने सरकार प्रणीत पक्षाची टीका फेसबूकवरुन काढण्यास नकार दिला. सर्वात जास्त उत्पन्न ज्यांच्याकडून मिळतं त्याला दुखावून चालणार नाही, माध्यमांनी काय दाखवायचं, काय दाखवायचं नाही, हे सर्व ही व्यवस्था ठरवत आहे.

उदा. द्यायचं झालं तर, सुशांतसिंग प्रकरण. दिवसभर विकलेली माध्यमं त्यावर बातम्या फेकत असतात. आज यव झालं आणि आज त्यव झालं. तो सामान्य माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे का ? पण, सरकारमधील प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, याकरिता अशा गोष्टी जाणीवपूर्वक वाजवल्या जातात. सामान्य माणसांच्या अन्याय अत्याचाराला, त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमतेने येणारी माध्यमं आता इतिहास जमा होत आहेत. कालाय नमः म्हणून गप्प बसायचं नाही तर चौफेर दृष्टी ठेवून विवेक जागा ठेवण्याची जवाबदारी सामान्य नागरिकांची आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे