दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

वाढदिवस आणि समाज माध्यमे

Primary tabs

मृगतृष्णा's picture
मृगतृष्णा in जनातलं, मनातलं
23 Aug 2020 - 10:53 am

त्या दिवशी " लेखा" चा वाढदिवस होता , दिवस नेहमीप्रमाणेच उजाडला, पहाटे ५.३० वाजता लेखा उठली , मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा , सासु-सासाऱ्यांच्या चहा ची तयारी , दूध तापविणे, नाश्त्याला कोण काय खाणार असे सगळे नेहमीचेच विचार डोक्यात सुरू होते .
स्वतः चे आटोपून लेखाने चहा चा कप हातात घेतला आणि तेवढ्यात तिचा फोन वाजला , आई चा फोन होता , " लेखा बाळा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो, तुला पुढच्या आयुष्यातही असेच आनंद आणि सौख्य लाभो , सुखी राहा बाळा. " आई म्हणाली . लेखाच्या डोळ्यात टचकन पाणी आले . खरंतर असा आशीर्वाद आई नेहमी देते पण दर वाढदिवशी त्याची किंमत मला नव्याने समजते , असे विचार आणि खूप भावना लेखाच्या मनात त्यावेळी येत होत्या. नंतर बाबांनी फोन घेतला " हॅलो लेखा बाळा , तुझ्या चाळिसाव्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा " लेखाही म्हणाली "थँक्स यू बाबा " .
आणि चटकन तिच्या लक्षात आले की आज मी 40 वर्षांची झाले . तितक्यात बाबा म्हणाले " बाळा मुद्दामच तुला ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या , तू जरी ४० वर्षांची झालीस तरी आमचं मन तुझ्या बालपणीच्या आठवणीत रमत " बाबा म्हणाले . लेखाचे डोळे पाणावले होते, ती म्हणाली " बाबा लग्नानंतर ची वर्षें कशी गेली समजलंच नाही, " लेखाच्या डोळ्यासमोर बालपण, शिक्षण, कॉलेज, लग्न, बाळंतपण,मुलं, संसार सारं काही एका क्षणात येऊन एखाद्या चित्रपटासारखं उभं राहिलं. त्यावेळी तिच्या मनातील भावना फार संमिश्र होत्या , त्यात आनंद, मजा, भांडणं, गम्मत, अभ्यासाचा ताण, लग्नाच्या वेळची घरातील गडबड, त्यानंतर फुलत गेलेली नवीन नाती,नवऱ्यासोबत चे सुंदर क्षण, पहिली मुलगी सानिका झाली त्यावेळी तिचं लहानगा जीव पाहून प्रेमाने भरून आलेलं मन, सासू-सासाऱ्यांच्या सोबत दृढ झालेलं नातं, धाकटा मिहीर झाला तेव्हा पुन्हा लहान बाळ घरात आल्याने सगळ्यांना झालेला आनंद ... हे आणि असे कित्येक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेले , लेखा मनोमन खूष झाली, तेवढ्यात मिहीर आणि सानिका उठून बाहेर आले , जोरात आनंदाने ओरडु लागले "हॅप्पी बर्थडे आई" आणि आईला आधी कोण स्वतः बनविलेले ग्रीटिंग कार्ड देणार यावरून भांडण पण सुरू झाले, तितक्यात लेखाचा नवरा अमोल हातात सुंदर गुलाबाचं फुल , सोनेरी कागदात पॅक केलेले गिफ्ट घेऊन बेडरूम मधून बाहेर आला , लेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सासू-सासरे आवरून येताच लेखा त्यांच्यासाठी चहा घेऊन गेली, त्यांनी शुभेच्छा देताच तिने त्यांना वाकून नमस्कार केला , त्यांनीही तिला अनेक आशीर्वाद दिले आणि रोजच्या सारखा दिवस सुरू झाला, सगळे आपापल्या कामाला, शाळेत, देवळात गेले..
जरा निवांत झाल्यावर लेखाने मोबाईल पाहायला सुरुवात केली ,पाहते तर 98 मेसेजेस आलेले होते, शाळेचा ग्रुप, कॉलेज चा ग्रुप, सोसायटीचा महिला ग्रुप, नातेवाईक सगळ्यांचे खूप मेसेजेस आले होते. तिने सगळ्यांना" थँक्यू " असा मेसेज केला, त्यादिवशी तिचे सर्व नातेवाईक आणि मैत्रिणी यांच्या स्टेटस ( व्हाट्सएप, फेसबुक) वर लेखाचे फोटो होते. हे सगळं पाहून लेखा खूष झाली. त्यातच जवळच्या 2 मैत्रिणींचा फोन आला , खूप गप्पा झाल्या.
संध्याकाळी केक कापण्याचा कार्यक्रम , सुग्रास जेवण झाले.. काम आटोपून लेखा जेव्हा शांत विचार करत होती , त्यात तिला आठवले ते "आज माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला " पण आठवणीत राहिले ते ज्यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या आणि ज्यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. मग ती विचार करू लागली असं का ??
सध्या "सोशल मीडिया " मुळे तुम्ही जगात कुठेही बसून कोणाशीही सहजपणे , क्षणाचाही विलंब न करता संपर्क साधु शकता हे जितके सुखद आहे तितकेच त्यामुळे लोकांचा एकमेकांशी प्रत्यक्ष अथवा संभाषण हे दुर्मीळ होत चालले आहे. आजकाल वाढदिवसाच्या शुभेच्छा "HBD"असतात, कोणाला श्रद्धांजली तर "RIP" मग जर इतक्या तोकड्या भावना तुमच्या मनात असतील किंवा तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही असे लिहून मेसेजेस करत असाल तर करायची गरज आहे आहे का?? तुमच्या या भावना खरंच समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचतील??आणि चुकुन पोहोचल्याच तर त्याच्या आयुष्यात त्याने फरक पडेल ?? या ऐवजी 2 मिनिटे , ४ वाक्ये फोन वरून संभाषण झाले तर मनाला खूप बरं वाटतं, कदाचित संभाषणाने समोरच्या व्यक्तीच्या सुख-दुःख , संकट, उत्सव, समारंभ या सर्व गोष्टीत तुम्ही सहभागी आहात याची त्याला ही खात्री पटते.
असो, एकूण काय आजकाल आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या माणसांपासून लांब आहोत, संपर्क- संभाषण हेच आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणार आहेत , तर आपण सोशल मिडिया चा देखील योग्य वापर करून एकमेकांशी सतत संपर्क ठेवूया आणि आपल्या नात्यांचा अनमोल ठेवा जपुन ठेवूया.....

~ मृगतृष्णा

समाजविचार

प्रतिक्रिया

पैलवान's picture

23 Aug 2020 - 11:50 am | पैलवान

मिपा हेच माझं सोमि
बाकी सगळे पाच सहा वर्षांपासून बंद करून टाकलेत.

नात्यात, विशेषतः बायकोच्या माहेरी, कुणाचा वाढदिवस असला तर ती बळेच माझ्या whatsapp वर स्टेटस ठेवायला लावते. कारण तिच्या , माझ्या , लग्नाच्या वाढदिवसाच्या लोकांनी स्टेटस ठेवून शुभेच्छा दिलेल्या असतात.
आजकाल लोक स्वतःचे आईवडील वारल्यावर whatsapp स्टेटस ठेवतात.
पहिले दोन तीन दिवस श्रद्धांजली.
मग दहाव्याच्या दोन दिवस आधीपासून रोज दशक्रिया विधी.

आपण लोकांना नाही समजावत. आपलं आपण सोमि पासून लांब राहायचं.
WhatsApp वर ज्या ग्रुप मध्ये गुड मॉर्निंग, गुड नाईट, आल्याचा काढा पासून पोहे खाल्ल्याचे फायदे येतात, तिथून मी बाहेर पडतो. कुणाचा का असेना.

मृगतृष्णा's picture

23 Aug 2020 - 11:54 am | मृगतृष्णा

खरं आहे , आजकाल जग करतं म्हणून तोंड देखलं करण्याचे प्रकार जास्त आहेत

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2020 - 1:23 pm | चौथा कोनाडा

माझ्या मते सुरवातीला सोमि तुम्हाला झपाटून टाकते, नंतर हळूहळु तोच तो पणा येऊ लागला की उत्साह मावळायला सुरुवात होते,
सोमि वर वावरणे, कमेंट्स टाकणे, रिप्लाय देणे हे थकवायला लागते.
दुसरी प्राधान्यकामे आली की सोमिला वेळ देणे जमत नाही, मी ही याच मारगाने सोमि पासून दुर होतोय हळूहळु !
महत्वाचे असेल तर फोन वर आवर्जून बोलतो.