परवा एका राजकीय मुखपत्राचे संपादक काहीतरी बोलले आणि त्यावरूनच बरेच विनोद, मिम्स असल्या गोष्टीचं सत्र सुरु झालं. पण त्यांच्या बोलण्याचं मूळ सुद्धा आपल्यात अजाणतेपणी रुजलेल्या समजुतीत आहे असं मला वाटतं. ते म्हणजे “डॉक्टरला काय कळतं?” ह्याचं एक्स्टेन्शन “WHO ला काय कळतं?
का म्हणे? डॉक्टरला काही कळत नाही तर २ दिवस अंगावर दुखणं काढून झालं की रात्री अपरात्री डाक्टर का आठवतो मग? ते राहू दे, त्याबद्दल पुन्हा केव्हातरी बोलू.
पण गेल्या काही महिन्यात जेव्हा जगावर हे महासंकट आलं तेव्हा WHO मध्ये बसलेल्या त्या तज्ज्ञ लोकांवर किती दबाव असेल, जबाबदारीचं ओझं किती असेल ह्याचा विचार केलाय कुणी? अख्खं जग त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पाहतंय, संकटाशी निपटावं की एकेक Conspiracy theories ऐकून त्यावर विचार करावा असले दिवस ते.
एक सकाळ उजाडली आहे आणि समोर रोज हजारो लोकांच्या मृत्यूचं थैमान चालूय. जगात कुणालाच ज्ञात नसलेला एक virus समोर उभा ठाकलाय जो दिसतो कसा माहित नाही, उपलब्ध औषधे त्याला चालतात की नाही, तो मरतो कसा?, पसरतो कसा?, संक्रमणानंतर किती दिवसांनी रुग्णाला त्रास होतो?, किती दिवसांनी रुग्णाला काय काय लक्षणं दिसतात, प्राण्यांकडून संक्रमण होतं की नाही? असे प्रमुख आणि त्यांच्या जोडीने अनेक उपप्रश्न घेऊन.
काय करायचं त्यांनी अशा वेळी? त्यांनी अनेक कोलांट्या उड्या मारल्या म्हणून आज ते टीकेचे धनी झालेत, त्याच्या फंडिंगमध्ये कपात झालीय. आणि कोलांट्या उड्या काय तर म्हणे आता ते म्हणतायत की sanitizer वापरून फायदा नाही!
काय करायला हवं होतं त्यांनी? वर उल्लेख केलेले प्रश्न, statistics पाहून वर्तवलेला रोगाचा पसरण्याचा वेग, रोजचे होणारे मृत्यू आणि संशोधनासाठी अपुरा वेळ; हे हाती असताना जे योग्य तेच केलं ना त्यांनी? रोगाचा प्रसार हवेतून होतो, किती अंतरापर्यंत virus जाऊ शकतो, त्याला मारायला आपल्या जीवन शैलीतील gestures पाहता अल्कोहोल आणि साबण हे जालीम आणि स्वस्तातील उपाय सांगितले, चेहऱ्याला स्पर्श नको हे सांगितलं आणि एकीकडे संशोधन सुरु ठेवलं.
मुळात संशोधन म्हटलं की बदल आलाच. २० वर्षांपूर्वी होतं तसंचं जग असतं तर आज कशाचीच गरज पडली नसती. संशोधन नको अन् काही नको. पण असं नाही ना होत. मग त्या संशोधनातून जे जे निष्कर्ष पुढे आले ते सांगून जगाला सावध केलं, शहाणं केलं तर WHO वाईट? अरे हे काय लॉजिक आहे?
म्हणजे त्यांनी जुन्याच गोष्टी तुमच्या माथी मारल्या असत्या, तर ते चाललं असतं तुम्हाला? तिथेही कितीही उच्च शिक्षित डॉक्टर असले तरी मानव आहेत ना ते? देव नाहीत. Virus त्यांनाही आपल्या इतकाच नवीन आहे. मानव म्हणून आपल्यावर जी बंधनं आहेत, तीच त्यांच्यावरही आहेत. एक इलेक्ट्रोन microscope हाती आला म्हणून virus त्याची कुंडली सांगायला बसत नाही ना? तोही एक जीव आहे, त्याच्या अस्तित्वासाठी जे काही करावं लागतं ते तो सुद्धा करतो. म्हणूनच अनादी काळापासून माणसाला सर्दी होते. सगळ्यावर डॉक्टरांनी औषधे शोधली, बनविली तरी सर्दी होते कारण Antigen म्हणजे ज्याच्या मुळे आपल्याला आजार होतात तेही स्वत:ला बदलत राहतात.
अशा वेळी आपण ज्यांच्या ज्ञानावर विसंबून आहोत त्यांच्या डोक्यावर टपला मारून त्यांना विचलित न करता त्यांच्या मागे उभं का राहू नये? मी तर म्हणतो नतमस्तक का होऊ नये? आपली आहे का तयारी संशोधनाची, संसाधने आहेत का आपल्याकडे? मग ज्यांच्याकडे आहेत त्यांना करू दे ना काम? टीका कशाला करत बसायचं? आपण कोण आहोत, आपली पात्रता काय?, हे विसरून दर वेळी बोलण्याची खरंच गरज आहे का?.
बघा पटतंय का. बाकी इंदुरीकर महाराज म्हणतात तसं की आधी एक देव फिक्स करा. म्हणजे तो येईल तरी तुमच्या मदतीला. नाहीतर कुणाचाच कुणावर विश्वास नाही. जगात हे संकट किती काळ राहणारे आपल्याला नाही माहित. म्हणून WHO नव्हे तर एकुणातच सगळेच आरोग्य कर्मचारी आपल्या ह्या असल्या कमेंट्समुळे नाउमेद होऊ नयेत ही इच्छा आहे.
प्रतिक्रिया
19 Aug 2020 - 7:47 pm | देवांग
आजारी पडल्यावर काँग्रेस काळात तयार झालेल्या रुग्णालयात उपचार घेऊन काँग्रेसने ७० वर्षात काय केले असे विचारण्याऱ्यांवर एखादा लेख येऊ दे कि .....
ल्या वर्षी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान मोदी यांनी बोलताना असे म्हटले की, ‘बड्या औषधी कंपन्या भारतीय डॉक्टरांना लाच म्हणून महागड्या भेटवस्तू, परदेशी सहल व महिला पुरवतात.’ पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर आयएमए (इंडीयन मेडीकल असोशिएशन) या डॉक्टरांच्या संघटनेने पंतप्रधान कार्यालयाला नाराजीचे पत्र दिले. शिवाय एएमसी (मुंबई असोशिएशन ऑफ मेडीकल कन्सल्टंट) या संघटनेने दर्शवलेली नाराजी वगळता देशभरात एकाही डॉक्टर संघटनेला या वक्तव्याचा निषेध करावेसे वाटले नाही. यावर सुद्धा लेख येऊ दे कि ......
19 Aug 2020 - 7:56 pm | Rajesh188
डॉक्टर ना विदेशी कंपन्या गिफ्ट देतात,ठराविक महिन्यांनी पार्ट्या देतात (किती ही खर्च करा पार्ट्या साठी नो लिमिट)कमिशन देतात हे त्रिवार सत्य आहे .
19 Aug 2020 - 8:12 pm | शा वि कु
एकूण आजार नवीन असणे आणि त्यावर काही खात्रीलायक बोलू न शकणे हे WHO ला लागू होतेच.
+१११११११
अगदी सुरुवातीला, एप्रिल मध्ये हा सिद्धार्थ मुखर्जीने (एम्परर ऑफ ऑल मॅलडीज: कॅन्सरचे चरित्र नावाच्या अगदी अभ्यासपूर्ण पुस्तकाचा लेखक) हा लेख लिहिलेला, त्यातूनही माहिती पुरेशी नाही, हेच अधोरेखित झाले होते.
19 Aug 2020 - 9:07 pm | Rajesh188
Who hi जागतिक संघटना आहे तिचे कार्य काय आहे .
नवीन साथी ची माहिती मिळवणे,जगाला सावध करणे,लसी निर्माण करण्यासाठी फंड जमा करणे.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य हे who चे सदस्य असतात.
पण who ही संघटना फंड गोळा करण्यासाठी राजकीय भूमिका पण घेते त्या मुळे त्यांच्या भूमिके विषयी शंका निर्माण होते.
त्याचाच परिणाम म्हणून अमेरिका त्यांच्या विरूद्ध गेली आहे.
Who वर अवलंबून राहण्ापेक्षा प्रतेक देशांनी स्वतःची यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.
संजय राऊत काही वेगळे बोलले नाहीत.
फक्त ते समजून घ्यायला अवघड जाते आहे.
सीबीआय का तलवार केस सोडवत आली नाही त्या सीबीआय चा काय दर्जा आहे.
दाऊद ल सीबीआय कैद करू शकली नाही.
मल्ल्या पासून निरव मोदी पर्यंत सर्व करोडो रुपये बुडवून गेले देशाबाहेर.
सीबीआय काही करू शकली नाही.
कसाब ला महाराष्ट्र पोलीस नी जिवंत पकडले नसते तर तो हल्ला कोणी केला हे पण सीबीआय शोधू शकली नसती.
हे सर्व सत्य आहे फक्त कडवट आहे.
20 Aug 2020 - 11:10 am | आनन्दा
म्हणून WHO ला काहीच कळत नाही असे म्हणायचे?
म्हणजे माझ्या बायकोची नोर्मल डेलिवरी करू शकला म्हणजे तो डोक्टर मुर्ख असला पाहिजे हा युक्तिवाद आहे... मग बोलवा दाई आणि करा बाळंतपणे. (पूर्वी दाईच करत असत, आणि काही सुईणी देखील निष्णात होत्या, पण माता आणि बालम्रुत्युचे प्रमाण पण मोठे होते हे लक्श्यात घ्या).
बाकी, WHO ने राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांना आज कोणी विचारत नाही याबाबत काही शंका नसावी. त्याबाबत सहमत आहे. पण म्हणून सरसकट त्यांना काही कळत नाही असे विधान करू नका. "डॉक्टर मुर्खआहेत्त" आणि "तो डॉक्टर खिसेकापू आहे" ही दोन वेगळी विधाने आहेत.
आम्ही "तो डॉक्टर खिसेकापू आहे" या अर्थाचे विधान करत आहोत. राऊत सरसकट "डॉक्टर मुर्खआहेत" असे बोललेत.
20 Aug 2020 - 10:49 am | माहितगार
संजय राऊत असोत की राज ठाकरे या वाचाळवीरांचेही भक्त आहेत, दुसरीकडे माध्यमे सुद्धा माणसांनीच बनलेली असतात त्यामुळे इतरवेळी मोठे पॅनेल डिस्कशन घडवतील पण वाचाळवीरांची विधानांची वैज्ञकीय तज्ञांकडून चर्चा करून घेणार नाहीत.
वाचाळवीरांचे बाजूस ठेऊ. आरोग्य विषयक समन्वयाच्या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेची किंवा राष्ट्रीय राज्य जिल्ह्या ते पालिका पंचायत स्तरीय तज्ञ समन्वय समित्यांची गरज नाकारता येत नाही. प्रश्न समन्वय साधला जात असताना गरज असलेल्या कॉमनसेन्स, जनरल नॉलेज , आणि तर्कशास्त्रीय सक्षमता आणि स्मार्टनेसच्या आणि प्रासंगिकता लक्षात घेऊन निर्णय क्षमता कमी अधिक असण्याचा होता आणि आहे. या सर्वगोष्टी घर ते दिल्ली , अविकसित देश ते विकसित देश , गल्ली ते जागतिक आरोग्य संघटना कोणत्या न कोणत्या पातळीवर या गोष्टी कमी पडतात आणि जिथे साशंकता आहेत त्या व्यक्त केल्या शिवाय एक शंका चुक असेल किंवा ज्या बद्दल साशंकता आहे त्यात उणीव असेल त्याची चर्चा झाल्याशिवाय निरसनही शक्य नसते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दिरंगाईचे सगळ्यात ताजे उदाहरण शहाणी मंडळी दंतवैद्यकांनी घ्यायची काळजी साथ चालू होऊन सहा महिने उलटल्यावर आता जाहीर करत आहेत. मास्क वापराच्या बाबतीतला त्यांचा घोळ आणि कालापव्यय कॉमनसेन्स, जनरल नॉलेज , आणि तर्कशास्त्रीय सक्षमता यांच्या अभावाचे लक्षण होते.
मानवी व्यवहार करताना जोखीम कमीत कमी ठेवेल अशा भूमिकांची मांडणी करण्यासाठी फार बुद्धीची आवश्यकता नसावी पण वापरली जात नाही ही समस्या आहे.
एक उदाहरण म्हणून द्यायचे झालेतर -मला इम्रान खान असो की पाकीस्तान मुळीच प्रेम नाही- पण इम्रान खानने एक कॅन्सर हॉस्पीटल चालवले आहे हे आम्ही सोईस्कर विसरलेले असतो . इम्रान खान स्मार्ट लॉकडाऊन या संकल्पनेला चिटकून राहीला. इतर देशातल्या एक्सपोर्ट थांबलेल्या असताना पाकीस्तानला एक्सपोर्ट वाढण्याचा आणि अर्थव्यवस्था पांगळी न होण्याचा फायदा झाला.
अधिकतम शारिरीक अंतर, अंतर कमी होईल तिथे मास्क, आणि प्रत्येक स्पर्षा आधी आणि नंतर निर्जंतुकीकरण या गोष्टी प्रचंड अवघड गोष्टी नाहीत या गोष्टीकरूनही समाज व्यवहार अगदीच अशक्य नसतात. जि गोष्ट केवळ गर्दीच्या वेळा बंद ठेऊन बाकी वेळा लोकव्यवहारास वाढवून आणि वाटून देणे अशक्य नव्हते आणि नाही पण जोखीम घेतलीतर काय होते असा हलगर्जीपणा झाला की हजारो लाखो जीव होत्याचे नव्हते होतात. आणि हजारो लाखोजीव होत्याचे नव्हते होऊनही टिका करू नये असे म्हणणे श्रेयस होत नसावे किंवा कसे.