हॅलो मंडळी,
या, उरा उरी भेटूया. नको म्हणताय? नाहीतरी आजकाल तुम्ही एकमेकांना उरा उरी कुठे भेटता ! समस्त मंडळी छान ढेरी बाळगून असतात त्यामुळे उरा उरी च्या ऐवजी ढेरा ढेरी भेटणेच होते, नाही का? कमीत कमी हस्तांदोलन तरी करूयात. तेही नको? लांबूनच नमस्कार करताय? म्हणजे तुमचे नाव सुशील दुष्यंन्त सिंग आहे वाटते? हरकत नाही, तुमच्यात एकी नाही काहीतरी कारण काढून घराबाहेर पडताय त्यामुळे या ना त्या मार्गाने मी येईलच मी तुम्हाला भेटायला.
तशी तुमच्या जगाशी आमच्या जगाची लढाई ही अनंत काळापासून चालत आलेली आहे, अगदी आपण दोघे अस्तित्वात आल्यापासून आणि पुढे देखील ती आपले अस्तित्व असे पर्यंत अनंत काळापर्यंत चालू राहील यात शंका नाही. कधी तुम्ही जिंकाल तर कधी आम्ही. तुमचे दुर्बल, अशक्त, कुपोषित सैनिक तर आमचे अतिशय लाडके. तुम्ही प्रगत, उत्क्रांत होत आहात त्याप्रमाणे आम्ही देखील परिस्थितीशी जुळवून घेत बदलत आहोतच की. आमचे सर्व ज्ञाती बांधव तुम्हाला कुठे माहीत आहेत अजून? आमच्याशी लढायला तुम्ही नवनवीन शस्त्र अस्त्र शोधून काढत आहात तर आम्ही देखील स्वतःमध्ये बदल करत ह्या शस्त्रास्त्रांचा प्रतिकार करत आहोतच. आणि मुख्य म्हणजे तुमच्यातलेच काही आम्हाला मदत करत आहेत. हे तुमचे घरभेदी हीच आमची मोठी ताकत आहे.
ह्या सृष्टीतील सजीव जगातील अगदी खालच्या स्तरावर आम्ही उभे आहोत. इतक्या खाली की जणू सजीव, निर्जीव ह्या सीमारेषेवरच आहोत. सजीव म्हणाल तर आम्हाला स्वतंत्र अस्तित्व नाही आणि निर्जीव म्हणाल तर अनुकूल परिस्तिथी मध्ये आम्ही पुनरुत्पादन करू शकतो. त्यामुळेच तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला आहे.
तुज सजीव म्हणो की निर्जीव रे
सजीव निर्जीव ऐकू कोविंद रे
आपली लढाई खरंतर एकांगी आहे. एकतर सध्या तुमच्या कडे माझ्या बरोबर लढायला शस्त्रात्रे नाहीत आणि मी तुम्हाला दिसतच नाही. मग सारखे हात धुवा, गर्दी करू नका, एकमेकात अंतर ठेवा आणि तुमच्या नैसर्गिक प्रतिकार शक्ती वर मदार ठेवा इतकेच तुम्ही करू शकता. हे म्हणजे डोळे बांधून तलवार बाजी करण्यासारखे आहे.
तू सूक्ष्मातिसूक्ष्म अति सूक्ष्म रे
कोरोना घराण्याचा तू वारस रे
तुम्ही प्रत्यक्ष तर माझ्या बरोबर लढू शकत नाही मग अप्रत्यक्षपणे मला शह द्यायचा प्रयत्न चालू आहे. खोकला, शिंक आली तर टिशू पेपर वापरा आणि नसेल तर तळहात न वापरता हाताचा कोपरा वापरा असे तुमचे उद्योग सुरू आहेत परंतु मी नक्की कसा प्रवास करतो हे कुठे उमगलं आहे?
तुज कोरोना म्हणू की कोविद रे
कोरोना, कोविद ऐकू विषाणू रे
तुम्ही लॉक डाऊन केलंत. लोकांना घरी बसवलंत तरी लोकं तुमचं ऐकताहेत का? नाही ना, मग आम्हाला काळजी नाही. जिथं लोकं गर्दी करतील, वैयक्तिक स्वच्छतेची वानवा असेल तेथे आमचे फावेल. अशा परिस्थितीचा आम्ही फायदा घेऊच घेऊ.
घरबंदी, जमाव बंदी ना प्रवासबंदी ना
अंतिम उपाय नाही म्हणती आम्ही रे
कर्व्ह फ्लॅट करताय का? लस शोधायचा प्रयत्न चालू आहे का? करा, करा. परंतु तुम्ही किती दिवस लोकांना घरी बसवणार आहात? त्यांना त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग करावा लागणारच ना. हर्ड इम्युनिटी येईल म्हणताय ? बघूया कधी येतीय ते ! तो पर्यंत आमच्या कचाट्यात किती लोकं येतात ते बघूया.
शास्त्र प्रसादे शास्त्रज्ञ बोले
लस अन औषधे नक्की शोधू रे
उद्या तुम्ही आमच्यावर विजय मिळवाल परंतु पुढे आमचे इतर भाऊबंद येतील आणि ही लढाई अनंत काळापर्यंत चालूच राहील.
कोरोनास करुणा येईल तुझी !
प्रतिक्रिया
17 Aug 2020 - 4:30 pm | आनन्दा
मस्त