टिक टिक

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
21 Jun 2020 - 10:55 pm

मेकॅनिकल घड्याळ म्हणजे मोठा कुतूहलाचा विषय.
माझ्या बालजिज्ञासेत भर पडली ती वडिलांना घड्याळाची सर्जरी करताना पाहून. सर्जरीच म्हणावी लागेल त्याला.
डोक शांत ठेवून आयग्लास मधून एकटक पाहत धारदार चिमट्याने घड्याळातील स्प्रिंगच्या डबीतून स्प्रिंग जराही न वाकवता अलगद वेगळी करणे आणि दुरुस्त करून परत जशीच्या तशी ठेवणे ज्याला जमले त्याला कदाचित एखादी मेंदूची शस्त्रक्रियाही लीलया जमून जाईल.

मनगटी घड्याळ म्हणजे गुंतागुंतीचं मशीन अगदी त्यांच्या इंग्रजी ब्रँड नावांसहित... एचमटी, हँडो सांडो, राडो, फावर लुबा, इत्यादी.
हे कानावर शब्दशः 'पडलेले' शब्द, लहानपणी जेवढे वेचून ऐकले तेवढेच लक्षात राहिले.

ही वरील नावे म्हणजे शुद्ध इंग्रजीतील खालील शब्दांचे मराठीतील अप-उच्चार.
एच एम टी (HMT), हेनरी सँडोझ (Henri Sandoz), रॅडो (Rado) , फॅबर ल्युबा (Favre Leuba)

कधीकाळी मीही घड्याळ दुरुस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण घड्याळाचे पार्टस वेगवेगळे केल्यानंतर सर्व परत कसे जोडायचे याचा शंभर वेळा प्रयत्न करूनही थांगपत्ता लागला नाही. तेव्हापासून मग उगीचच एखादा साइडबार बसवणे, पट्ट्याचं बक्कल दुरुस्त करणे अशा इंटर्नशिपच्या प्रोजेक्ट् मध्ये होतं त्याप्रमाणे काहीतरी शिकल्याचं समाधान मानून मी मनगटी घड्याळाच्या वाटेला आता परत जायचं नाही असं ठरवलं. आणि वेगवेगळ्या घड्याळातील पार्ट्सपासून आपण एखादं नवीन घड्याळ आरामात बनवू शकू असं दिवास्वप्न मात्र अपूर्णच राहिलं.

एकदा तर आपण असं घड्याळ बनवलं अशा पहाटस्वप्नात असताना ट्रिंग ट्रिंग करत गजराच्या घड्याळाने माझी झोप मोडली. गजरचं बटण काही केल्या काम करेना. शेवटी गजरचा काटा मोठ्या मुश्किलीने पुढे ढकलून गजरची चावी कोणी दिली असेल असा विचार करत परत झोपी गेलो. क्षणभर टेबलावर ठेवलेल्या त्या टाईमपिसचे पिसे काढावीत असा विचारही मनात येऊन गेला.

बाकी इतर वेळी मात्र गजरची घड्याळं आम्हां लहान मुलांकडून खेळणी म्हणूनच वापरली जायची. टिक टिक आवाज, तुरुतुरु पळणारा सेकंद काटा, अंधारात रेडिअममुळे चमकणारे तास आणि मिनिट काटे आणि आकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रिंग ट्रिंग आवाज. त्याचा इतका वापर व्हायचा की काही दिवसातच गजरची स्प्रिंग मान टाकायची. या घड्याळाची दुरुस्ती तुलनेने सोपी, तरीही आमचं कौशल्य पार्टस स्वच्छ करण्याइतपतच मर्यादित राहिलं.

भिंतीवरचं घड्याळ मात्र सर्वांपासून अंतर ठेवून (भिंतीवरचं) राहिलं. दुरुस्तीसाठी कधीतरी एखादं घड्याळ यायचं. पण त्याचा मुक्काम मात्र खूप दिवस लांबायचा. आम्ही सर्व लहान मुलं मोठ्या उत्सुकतेने त्यावर वॉच ठेवून असायचो. भिंतीवरच्या घड्याळाला चावी देणे म्हणजे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, चावी तुटण्याचीच शक्यता अधिक असायची. त्या घड्याळात लंबक बहुधा शोभेसाठी असावा, नाहीतर फक्त स्प्रिंग वर घड्याळ चालायला काय हरकत आहे टेबल क्लॉक सारखं...असा निष्कर्ष आम्ही लहान मुलांनी बऱ्याच निरीक्षणाअंती काढला होता.

आमच्या घरात खूप जुनं भिंतीवरील घड्याळ होतं. त्यातील रोमन आकड्यांतील चार (IIII, जुन्या पद्धतीनुसार) असलेलं घड्याळ परत पाहायला मिळालं नाही. त्या घड्याळाची आठवण आणि IIII आणि ।V चा गोंधळ मात्र कायमचा मनात राहिला.

एक गांधीजींचं घड्याळ होतं. अगदी त्यांनी दिलं नव्हतं पण ते त्याच प्रकारचं घड्याळ वापरायचे. ते घड्याळ इतकं सुंदर असूनही नेहमी बंद असायचं म्हणून हुरहूर वाटायची. आज तर बहुतेक सर्वच घड्याळं कायमची थांबली.
काळाच्या ओघात काळयंत्रही निष्प्रभ झालं.

_____________________________________
२१/०६/२०२० लेखक: गणेश ईश्वरदास पांडे

कथालेख

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

22 Jun 2020 - 2:33 pm | प्रमोद देर्देकर

घड्याळ्याबद्दलची तुमची ( लेखनाची )टिकटिक आवडली.

येवु दे अजुन.

श्रीगणेशा's picture

22 Jun 2020 - 8:53 pm | श्रीगणेशा

धन्यवाद /\

मराठी_माणूस's picture

22 Jun 2020 - 3:12 pm | मराठी_माणूस

पुर्वीच्या जुन्या घड्याळात एक तास झाल्यावर एक मेलडी वाजायची, ती संपल्यावर मग ठोके पडायचे. मग पुढच्या १५ मिनिटां नंतर त्या मेलडीचा १/४ भाग वाजायचा, ३० मिनिटांनंतर १/२ भाग , मग ३/४ आणि एक तास झाल्यावर पुर्ण मेलडी अशी व्यवस्था असायची. ती मेलडी कोणाला माहीत आहे का ?

श्रीगणेशा's picture

22 Jun 2020 - 8:58 pm | श्रीगणेशा

ही आठवण राहून गेली.
तांब्याच्या तारांवर आपटणारा हॅमर, त्यातून येणारा आवाज म्हणजे कुठल्याही संगीत वाद्यापेक्षा तसूभरही कमी नव्हता :-)

सिरुसेरि's picture

22 Jun 2020 - 4:07 pm | सिरुसेरि

घड्याळांच्या सुरेख आठवणी . हा लेख वाचुन सालारजंग म्युझीअम , हैदराबाद इथला दर तासाला घड्याळामधे ठोका देणारा ठोकेदार आठवला .

श्रीगणेशा's picture

22 Jun 2020 - 9:03 pm | श्रीगणेशा

आणि सालार जंग संग्रहालयातील घड्याळांचा संग्रह अप्रतिम!

सामान्यनागरिक's picture

22 Jun 2020 - 6:24 pm | सामान्यनागरिक

कितीतरी वर्षे अजंता च्या भिंतीवरच्या घड्याळाच्या जाहिरातीत वाजणारं संगीत आठवणीत आहे. आजही ती अनेकांच्या स्मरणांत असेल.

श्रीगणेशा's picture

22 Jun 2020 - 9:10 pm | श्रीगणेशा

या इथे ऐकता येईल ती धून:
https://youtu.be/IN4hmM14mKU

छानच!