छ्या! आता डोकं ऊठणार!
या कमलेश आणि शिरीषचं भांडण कसं मिटवावं बुवा?
अरेरे... पलिकडच्या गायन क्लासातही आज पोरं नुसती विव्हळतायत..
एकाचा सूर धड लागेल तर शपथ.. आजचा दिवसच बेकार दिसतो...
ए, थांबारे जरा.... कमलेश आणि शिरीष.. जरा धिरानं घ्या की... तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे काय बडबडताय?
ए गप...गप्प बस जरा... हे काय? गायनक्लासवाल्या मॆडमनी हा कुठला सूर लावला?
हिरना....हिरना... अरे ही तर कबिराची रचना दिसते....बरेच दिवसांपूर्वी कधीतरी कुमारजींच्या आवाजात ऐकलं होतं हे निर्गुणी भजन... साली सिडी कुठेतरी मिळते का एकदा पहायला पाहिजे... आ.. हा... मॆडम जियो... काय सूर लावलात हो... कुमारजी काय काळीज चिरून टाकणाऱ्या रचना करायचे... कशा करता या रचना एका मुलाखतीत म्हणे कुमारजींना मुलाखत घेणाऱ्यानं विचारलं होतं... त्यांच उत्तर अरे मला सूर पुढे चाललेला दिसतो, मी फ़क्त तो गळ्यातून उतरवतो... आयला हे म्हणजे हॆल्युसिनेशन झालं... सुराचं वेड! सालं आपल्याला का लागत नाही असं सुराचं वेड?...बाकी दुनिया आपल्याला सर्किट म्हणतेच...पण मग असं चांगल वेड का नाही आपल्या नशिबी? तो सा की प हे काही आपल्याला नाही कळत यार... पण काही काही सूर दिल चिरत अगदी आत जाऊन कुठेतरी काळोखात घर करून बसतात... अस्वस्थ करतात... नजरेसमोर चित्र येतं...रात्रीची वेळ.... ओटीवर मंद तेवणारा कंदील......त्याच्या अंधारलेल्या उजेडात आरामखुर्चीत पहुडलेला आपला देह.... कुठूनतरी दूरवरून ते सूर कानावर येतायत.... हिरना....हिरना.... सुरांची जादू मनावर पसरतेय...अरे हे काय होतय? कंदिलाचा प्रकाश कमीकमी का होत चाललाय?.... आणि समोरचं दॄष्य नाहीसं होत काळोख का गडद होतोय?....हा मिट्ट काळोख का?... आणि हे काय...ही माणसं का आपल्या आरामखुर्चीभोवती जमलीयत? काय चर्चा करतायत ही?..... चला तयारी करायला हवी... कसली तयारी?..... आत्ता न्यायचं की सकाळी?.... म्हणजे?...आपण मेलो?...चला सुटलो म्हणा... ते बघा... पुन्हा सूर ऐकू यायला लागले.... हिरना.... हिरना... ते पहा...मला दिसतायत ते....आता त्यांच्या पाठोपाठ जायला हवं...स्वर्गीय सूरांशी एकरूप व्हायला...निघतो मी आता.....बाय...
प्रतिक्रिया
19 Nov 2008 - 10:05 pm | वाटाड्या...
निर्गुणी भजन...कुमारजींच एक अनोखं रुपच....
सुनता है गुरु ग्यानी....किती पारायणं झाली पण मन भरतचं नाही....
हे स्फुट छानच...
मुकुल...
21 Nov 2008 - 10:03 am | विसोबा खेचर
हिरना.... हिरना... ते पहा...मला दिसतायत ते....आता त्यांच्या पाठोपाठ जायला हवं...स्वर्गीय सूरांशी एकरूप व्हायला...निघतो मी आता.....बाय...
वा! सुंदर स्फूट..!
तात्या.
21 Nov 2008 - 11:58 am | मनीषा
"तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे" मस्तच
21 Nov 2008 - 7:50 pm | सुमीत भातखंडे
रात्रीची वेळ.... ओटीवर मंद तेवणारा कंदील......त्याच्या अंधारलेल्या उजेडात आरामखुर्चीत पहुडलेला आपला देह.... कुठूनतरी दूरवरून ते सूर कानावर येतायत.... हिरना....हिरना.... सुरांची जादू मनावर पसरतेय...
क्या बात है यार. मस्तं.