भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ४ - ध्यान आणि योग: प्रकरण १० - ध्यान आणि एकाग्रता

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
14 Jun 2020 - 5:32 pm

या प्रकरणात ध्यान आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक असणारी एकाग्रता या दोन गोष्टींविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:

रमण महर्षींचे असे मत होते, की जागृती, निद्रा आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमधे ज्यात सातत्य राखता येते तेच ध्यान सर्वश्रेष्ठ असते. असे सातत्य येण्यासाठी 'मी ध्यान करतो आहे' असा विचारतरंगदेखील मनात उमटू नये इतकी उत्कटता ध्यानधारणेत असावी लागते.

योगाविषयी महर्षींचे मत थोडक्यात असे सांगता येईल - नानाविध मानसिक विभ्रमांचे मूळ कारण असलेल्या इंद्रियगोचर ज्ञानाचा पगडा क्षीण होत गेला, त्या पलीकडच्या अनुभूतीची गोडी लागली, आणि त्या योगे सतत उसळून येत असलेली अहंता आणि विषयांचा लळा लागलेल्या मनावर पूर्ण ताबा मिळाला, की साधकाच्या अंतःकरणात 'शब्देविण संवादु' अशा अनाहत नादाची आणि दिव्य अशा तापहीन प्रकाशाची अनुभूती येते. योगाची खरी शक्ती हीच आहे.

द्वैताचा अंतर्भाव असलेल्या एखाद्या ध्यान किंवा उपासनापद्धतीकडे कल असलेल्या आणि आत्मविचाराकडे ओढा नसलेल्या साधकांची श्रद्धा डळमळू नये, त्यांचा बुद्धिभेद होऊ नये या दृष्टीने रमण महर्षी अशा साधकांना त्यांनी निवडलेल्या मार्गावरून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत. ते साधकांना आश्वस्त करत असत की त्यांनी निवडलेला मार्ग देखील त्यांना आत्मसाक्षात्कारापर्यंत घेउन जाईल. दिशाहीन असण्यापेक्षा कुठलीही ध्यान/ उपासना पद्धती स्वीकारणे श्रेयस्कर असते, कारण ती शेवटी आत्मविचारापर्यंतच पोचते असे महर्षींचे ठाम मत होते.

प्रश्नः वैषयिक सुखांपेक्षा ध्यानात अधिक सुख मिळते. असे असूनही मन ध्यानाकडे आकृष्ट न होता विषयांकडेच ओढले जाते. असे का घडते?
रमण महर्षी: सुखसंवेदना आणि वेदना या मनाच्याच दोन अवस्था आहेत. आपला मूळ स्वभाव मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे. देह आणि मनाशी तादात्म्य साधल्याने तेच आपले खरे स्वरूप आहे असा भ्रम झाल्याने आपल्याला मूळ स्वरूपाचा विसर पडलेला आहे. ही हरवलेली ओळखच सगळ्या हालअपेष्टांना जन्म देते. स्वतःचीच ओळख हरवलेल्या या परिस्थितीत ती परत मिळवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मनाची ही प्रवृत्ती खूप पुरातन असते. कित्येक जन्म लोटले तरी विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या माणसाने हातात धरलेल्या पुस्तकाची पाने एक एक करून उलटावी तशी ती मागील पानावरून पुढे सुरू राहते. काळ लोटेल तशी ही प्रवृत्ती अधिकाधिक खोलवर रूजत जाते आणि मजबूत होत जाते. मूळ स्वरूपाने स्पष्टपणे प्रकट व्हावे, त्याची प्रचिती यावी या दृष्टीने मनाच्या या प्रवृत्तीचा येनकेनप्रकारेण अंत करावा लागतो.

प्रश्नः भगवान, मी जेव्हा जेव्हा ध्यान करतो तेव्हा मला मस्तकात आगीचे लोळ उठल्यासारखे वाटते. तिकडे दुर्लक्ष करून अट्टाहासाने तसेच ध्यान करत राहिले, तर माझ्या सगळ्या शरीराची लाहीलाही होते. यावर काय उपाय आहे?
रमण महर्षी: मेंदूचा वापर करून एकाग्रता साधली तर जळजळ होण्याची अनुभूती येते आणि पुढे असह्य डोकेदुखी मागे लागते. अंतःकरणापासून (उपास्य देवतेशी) साधलेली एकतानताच शीतलता प्रदान करणारी आणि उत्साहवर्धक असते. गात्रे शिथील केलीत तर तुमच्या ध्यानात सहजता येईल. सौम्यपणे तसेच कुठलाही तणाव न घेता सतत घुसखोरी करणारे विचारतरंग हळुवारपणे दूर सारत मनाला स्थिर करत रहा. तुम्ही लवकरच त्यात यशस्वी व्हाल.

प्रश्नः ध्यान करत असताना झोप लागू नये या साठी मी काय करायला हवे?
रमण महर्षी: तुम्ही झोप येऊ नये असा प्रयत्न करत असाल तर ध्यान साधताना तुम्ही बौद्धिक विचार करत आहात असा त्याचा अर्थ होतो. ध्यान करताना बौद्धिक विचार करणे थांबवता येणे महत्वाचे आहे. ध्यान करत असताना तुम्ही नकळत निद्रादेवीच्या आधीन झालात तर तुमचे ध्यान निद्रावस्थेत असताना तसेच जागे होत असतानाही सुरूच राहील. तरीही, अखंड सुरू राहिलेला तो एक प्रकारचा विचारच असल्याने जागृत आणि सजग अवस्थेत विचाराचा गोंगाट मागे पडून अंतिम सहजस्थिती प्राप्त करता यावी या दृष्टीने शेवटी अशा योगनिद्रेपासूनही मुक्ती मिळवावी लागते. निद्रा आणि जागृती ही निव्वळ तुमच्या विचारांच्या गोंगाटापासून मुक्त असलेल्या स्वरूपाच्या शुभ्र पडद्यावर उमटणारी चित्रे आहेत. तुम्ही दखल घेतली नाहीत तरी ती तशीच ये जा करत राहतील.

प्रश्नः मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला भावते आणि तुम्ही अन्य गोष्टींपेक्षा तिला सहजतेने प्राधान्य देऊ शकाल.

प्रश्नः शिव, विष्णु आणि गायत्री हे तितकेच प्रभावी आहेत असे म्हणतात. मी कशावर ध्यान करावे?
रमण महर्षी: कुणीही एक ज्यावर तुमचे सर्वाधिक प्रेम आहे. या सगळ्यांचा प्रभाव समतुल्यच आहे. मात्र एकाच इष्टदैवताशी एकनिष्ठ रहाणे तुमच्या हिताचे ठरेल.

पुरवणी:
ध्यान कसे करावे तसेच ध्यानधारणेसाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधावी या दृष्टीने भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायातील ६.१० ते ६.३२ हे श्लोक तसेच या श्लोकांवरचे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत केलेले विस्तृत भाष्य अत्यंत मोलाचे आहे. हे भाष्य शब्दशः न घेता त्यातील भावार्थ समजावून घेणे देखील पुरेसे ठरते. भगवद्गीता तसेच ज्ञानेश्वरी आंतरजालावर सहज उपलब्ध असल्याने तसेच ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय यूट्यूबवर ऑडिओ बुकच्या स्वरूपात सहजगत्या उपलब्ध असल्याने इथे तोच दुवा समाविष्ट केलेला आहे.

धर्मआस्वाद