लिही तू..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
14 Jun 2020 - 11:51 am

https://www.maayboli.com/node/75035
(सदर लेख मी, वरील धाग्यावर, मायबोलीवर पूर्वप्रकाशित केला आहे. )

लिही तू..
एवढे सगळे जण लिहितायत.
आणि तू कशाला लाजतोयस येड्या?
पण तुझ्यापुरतं, तुला आत्ता जे खरं वाटतंय ते लिही.
किंवा तेच लिही.

आत्ता दुनियेबद्दल दाटून दाटून येणारे प्रेमाचे उमाळे जसे फोलकट आहेत तसेच नंतर कधीतरी, स्वत:बद्दल चहूबाजूंनी चालून येणार्‍या घृणेच्या लाटाही बोगसच असतील, हे लक्षात घेऊन लिही.

सेक्सबद्दल डायरेक्ट नकोस लिहू.
आदिम भावनांचा शोध घेत असल्याचा आव आणत, आडून आडून, पण नेम धरून त्याच मुद्द्यावर घसरत जाण्याची एक नवीन पद्धत काढलीय आपल्या काही चॅप्टर लोकांनी...
तुझा पण तसलाच काही डाव आहे की काय...?
नाही ना..?

मग एखाद्या रात्री, ढगांच्या गडगडाटासकट आलेला वादळी सेक्स ओसरल्यानंतर, साकळून आलेल्या प्रशांत गहिर्‍या
संपृक्त मूडबद्दल किंवा नंतरच्या मन उडून गेलेल्या टेंपररी
विरक्तीबद्दल लिही.

फक्त 'कशात काही अर्थ नाही' असं वाटायला लागलं की लिहिण्यातही काही अर्थ नाही म्हणून पोस्टपोन नकोस करू...

उलट तोच धागा घट्ट पकडून आणखी खोलवर कुरतडत जाता आलं तर बघ..
जेवढा आत आत जाशील तेवढा सुटा सुटा तरी होत जाशील किंवा एकदाचा काय तो निकाल तरी लागेल.

लिहिताना त्या थोर-थोर, ग्रेट वगैरे लिहिणार्‍या लोकांचा लोड घेऊन लगेच भारावून नकोस जाऊ नेहमीसारखा किंवा
हातपाय गाळूनही बसू नकोस..
जसजसा वाढत जाशील तसं हे ही कचरापट्टी वाटायला लागणार आहे एखाद्या दिवशी.
सो चिल मार..

ते सामाजिक जाणिवा किंवा मानवी नातेसंबंधांचे गूढ पदर वगैरे तर पहिलं बाजूला सारून ठेव.
तुला ते झेपणारं नाही.

आणि तुझी भाषा तथाकथित अशुद्ध असल्याचा खुळा गंड लपवण्यासाठी त्या तथाकथित शुद्ध भाषावाल्यांना ऊठसूठ बोचकारे काढण्यात कशाला ऊर्जा वाया घालवायची उगाच?

तुझी भाषा हजारो पिढ्यांचे गुणधर्म घेऊन खळाळत प्रवाहीत होत, आपोआप विनासायास तुझ्या डीएनएमध्ये उतरलेली आहे आणि त्याचमुळे ती अस्सल चवीची आहे, हे अंतिम सत्य उमजून तुझा तुझा रस्ता सुधार.

आणि शेवटचं म्हणजे अजून किती दिवस-रात्री हे असं
अधांतरी उलटं लटकायचं आहे, हे एकदा नीट बसून कॅलक्युलेट करून ठरवून घे.
(तुझ्याच्यानं होत नसेल तर मला सांग... माझाही सेम प्रॉब्लेम आहे.)

अर्थात ह्याचेही काही फायदे दिसत असतीलच म्हणा तुला...
फांदी घट्ट पकडून सुरक्षित असल्याचं फीलींगही येतं आणि लोक मला उंच उंच उडू देत नाहीत म्हणून, अन्याय झाल्याची बोंबही ठोकता येते अधूनमधून...
पण लाँगटर्मसाठी हे काही बरं नाही.

आता लगेच,
"ह्या अनादि अनंत पसरलेल्या ब्रह्मांडात माझ्यासारख्या क्षुद्र जीवासाठी कसलं आलंय लाँगटर्म आणि कसलं शॉर्टटर्म!!!"
असली बाबागिरी चालू करू नकोस..

झोप त्यापेक्षा.
आणि मला पण झोपू दे.

दुपारची झोप मोडली की वस्सकन अंगावर धावून जायची सवय लागायला लागलीय मलापण इथं राहून राहून..!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

16 Jun 2020 - 8:09 am | अर्धवटराव

झकास.

पाटिल's picture

16 Jun 2020 - 8:46 am | पाटिल

@अर्धवटराव... धन्यवाद..!