मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
13 Jun 2020 - 8:44 pm

अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या ‘मच्छर’ या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा पत्रिकाप्रंपच मांडतो आहे.

आजूबाजूला वाढणा-या मच्छर या आत्मक्लेशास उत्तम संधी असून मनुष्यास स्वतःस चारचौघात नकळत थोबाडीत मारुन घेण्यास मदत करतात. टपरीवरच्या चायवाल्यापासून बडया सूटबूटवाल्या इसमांपर्यंत स्पर्शकरुन देखील आपल्या मूळ जागेशी इमान राखण्याचा गुण अदयाप कोणत्याही प्रवचनात न सांगितल्याचे मला आश्चर्य वाटते. एका नाजूक टिचकीने समोरच्या इसमास ख-या अर्थाने रक्ताचे नाते जोडण्याचे काम मच्छराव्यतिरिक्त अन्य कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. आपला जीव धोक्यात घालून टेनिस या खेळाचा प्रसार रॅकेटच्या माध्यमातून करण्याचे खरे श्रेय सानिया मिर्झा अगोदर मच्छरनां जाते. मात्र काही महाभाग त्या रॅकेटने बॅडमिटंन खेळतात हा भाग वेगळा. आजच्या काळात व्हॉटसअपनंतर ‘गुड नाईट’ची आठवण केवळ आपल्यामुळेच होते. वाचनसंस्कृती वाढावी अन टिकावी, किमान अशिक्षितांच्या हाती पुस्तके यावीत म्हूणन बलिदान दिलेले डास मी स्वतः पाहिलेत तर काही सुशिक्षित नगानी पुस्तक वाचनाचे नाटक करत धपकरुन ती मिटवण्याचा गनिमा कावा घडवून आणून हकनाक मच्छरांचा जीव जाताना होणारे दुःख मी एक खरा रक्त’पिता’च समजू शकतो. सुनसान रस्त्यावर वाटसरुला एकटेपणा वाटू नये म्हणून विजेच्या दिव्याच्या खांब्यावर घोळक्याने असणारे फक्त मच्छरच होते, प्रकाशाशी नाते टिकवून ठेवण्याची आपली तगमग फडफडणा-या आपल्या पंखानाच ठाऊक. वाढत्या व्यवसायासाठी आजूबाजूच्या परिसरात मुददाम वाढीव डबकी तयार करणारी मेडिकल दुकाने, माझ्या पाहण्यात असून त्यासं महानगरपालिकेने खडडा न मिटवण्याचे केलेले योगदान ही मोठे आहे. डास या कीटकाविंषयी तयार झालेली त्यांची भूतदया ही एकणूच समाजात होत असलेल्या ‘सूक्ष्म’जाणीव बदलांचा परिपाक आहे. महानगरपालिका राबवत असलेल्या मच्छरविरोधी ‘धूर’मोहिमा या केवळ नागरिकांच्या डोळयात ‘धूळ’फेक करण्याचा प्रयत्न असून त्यामुळे मच्छरसमूहास कोणत्याही प्रकारचा धोका नसून, धूरपंपचालकाच्या भेसळीची ही कृपा असल्यामुळे त्यांच्या उदंड आयुष्याची कामना मच्छरवर्ग निश्चितच करेल. कामगारक्षेत्रातही ‘डास’ समाजाचे योगदान न विसरण्याजागे! विशेष करुन बॉस नावाच्या व्यक्ती अव्हयातपणे आपल्या ज्युनिअरना केवळ आपल्या नावाचा जप करत त्याच्या कामगिरीचे विश्लेषण “कामावर काय मच्छर मारायला येतो का?” असे म्हणत करतात. परंतु यामागे त्यांचे विशेष प्रेम वैगरे समजण्याचा ‘मनुष्य’पणा चुकूनही करु नका!

वाढत्या स्वच्छता ‘अभिनयामुळे’….. नव्हे माफ करा! अभियानामुळे…. आणि बदलत्या वैदकीय तंत्रज्ञानात देखील स्वतःच्या अस्तित्वाचे आव्हान टिकवून आहोत याचे कौतुक समाजमनास नसावे याचे दुःख होणे साहजिक असून येत्या काळात नवीन जोमाने एखादया नवीन आजाराचे वर्जन डाससमाज मांडेल अशी आशा करु, आणि त्याची दखल हा निरोगी समाज नक्की घेईल. सदयस्थितीत एका मोठया नामी चारचाकी समूहास आपल्या उगवत्या गाडीचे ‘ए टू झेड’ नाव बदलण्याइतपत कॉपीराईट, सामाजिक सेंन्सारशिप आणि सामुहिक प्रभाव अदयापही अबादित असल्याचे दयोतक आहे. थोडक्यात समाजात आपली ‘अजून चालते’ असा अर्थ होत असून यांचा ‘दहशतवाद’ या मनुष्यप्राण्याच्या बालिश कृत्याशी काडीचा संबध नाही.

मच्छरांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान ही आकरामानापेक्षा नक्कीच जास्त असून, येत्या काळात आपली वाढीव भुणभुण संगीतकारास एखादी चांगली धून बनवण्यास कारणीभूत ठरेल यांची आम्हांस आशा आहे. नियमित मौन राखण्या-या इसमास त्यांच्या कानाजवळ काही मच्छरांचे नुसती गुणगुण सहज चेह-यावर ‘राग’ उमटवून देण्यास कारणीभूत झाल्याचं मी पाहिले आहे. मच्छरांच्या साध्या गुदगुदल्या ही पचवू न शकणारा हा समाज आता पूर्वीपेक्षा किती असहिष्णू बनत चालल्याचे दिसून येतयं. देशातल्या वाढत्या आर्थिक विकासवाढीत हेल्थकेअर सेक्टरमध्ये मच्छर संप्रदायाचा असलेला वाटा विसरुन चालणार नाही, मात्र त्या प्रमाणात वाढीव प्रतिमासंपादन प्रकिया होत नसून अजूनही एखादया प्रमुख नटीला घेऊनच ही उत्पादने विकली जातात, यातच आपल्यावरील अन्यायाचं शल्य दिसून येत. एखादं ‘कीटकसमानता’ नावचं आदोलंन हाती घेतल्याशिवाय एकूणच डास समाजास कस्पटासमान समजण्याची प्रकिया बंद होणार नाही. वाढत्या धकाधकीच्या आयुष्यात सतत कामास गुंतून घेण्या-या, निव्वळ विरंगुळयासही वेळ न काढणा-या लोकांस जवळ-जवळ महिनोनमहिने एका खाटीवर बांधून ठेवण्याचे, अबडधोबड खाण्याने खालावलेल्या जीवनपद्धतीला पुन्हा एकदा पथ्यपाण्याकडे आण्याचे कार्ये अन्य कोणी करीत असल्याचे ऐकीवात नाही. देवाचा धावा करण्याचे प्रकार हे किमानवरुन ‘कमाल’ करण्याचे कामही मंदिराशेजारी ‘हारवाल्या’च्यां दोन-दोन दिवस फुले टवटवीत ठेवण्यासाठी वापरलेल्या पाण्यात वाढणा-या आमच्या भविष्यकालीन पिढयाच्या अंडयात आम्हाला आम्हाच्या देवावरील श्रध्देचा विजय वाटतो. तसेच काही प्रसारमाध्यमें ही निव्वळ स्वतःच्या फायदयासाठी आणि वाढीव टी.आर.पीच्या नादात आमच्यावर चोवीस तास निगराणीचे पाप करु पाहत आहेत यामागे ते नेमंके कोणती ‘डिस्कवरी’ करतात हे समजण्यास वाव नाही मात्र काही आपल्या जातभाईचे छायाचित्रे माझ्या निर्दशंनास पडली असून यामुळे आपल्या दूरवर पसरलेल्या समाजास सतर्क होण्याचे आव्हान करत असून, निव्वळ प्रसिदध होण्याच्या भानगडीत न पडता आपले वैयक्तिक आयुष्य मनुष्यप्राण्यासमोर मांडण्याचे टाळावे जितके ‘गूढ’ बनून राहाल तितके शहाणे ठराल. मागच्या काही काळापासून आमच्या भोवती कॅमेरा घेऊन फिरणा-या मनुष्यांनी आमच्या खासगी जीवनातील प्रसंग टिप्पणाचा प्रयत्न करत असून यांचे गंभीर परिणाम येत्या काळात पाहण्यास मिळतील. काही प्रयोगी मंडळीनी आमच्या काही मच्छरांना एक्सपरींमेंटच्या नावाखाली परीक्षानळी, लॅब अश्या जोखडयात अडकवून ठेवले असून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या नैसर्गिक परिवासात सोडण्याचं साधं सौजन्य तरी दाखवंव. ‘पेटवा कॉईल अन पळवा मच्छर’ म्हणणा-या या समाजास धडा शिकवण्याचा हा योग्य काळ असून झिकाच्या पाठीशी तुम्ही सगळे उडाल यांची मी आशा करतो. नव्या उत्साहाने स्वतःस तयार करण्याची ही वेळ असून तुम्ही आदेशाची वाट न बघता ‘होम टू होम’ पोचाल अशी आशा करतो.

-चावा संघटनेचा प्रमुख “ना. ना. काटेदार”

-लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

विनोदलेख

प्रतिक्रिया

कंटाळा आला या मच्छर पुराणाचा.
इतके रटाळ लिहिण्याचे पेशन्स मात्र मानले पाहिजेत

लेखनवाला's picture

17 Jun 2020 - 10:32 am | लेखनवाला

तुमच्या आळसाला दाद द्यालाच हवी.