(अ)अपूर्ण

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
16 May 2020 - 7:10 pm

संपूर्ण समाधान किंवा आनंदाची आशा मनुष्याने धरूच नये. किंबहुना त्याची पूर्णत्वाची अपेक्षाच सर्वतया निरर्थक म्हणता येईल. कितीही पैसा असला तरी त्याच्या खर्चाच्या मर्यादा समाजाच्या नैतिक नियमनासमोर उघड्या पडतात. जे भौतिकाला लागु तेच भावनांनाही. प्रेम या प्राथमिक भावनेचा अनुभव कित्येकांना आयुष्याच्या शेवटापर्यंत येत नाही. ज्यांना योग्य वेळी आला त्यांना तो पचवता येतोच असे नाही. दररोज भूक शमवणारं अन्न कधीतरीच, 'व्वा! आज काय मस्त जेवण झालं' असं व्यक्त व्हायला भाग पाडतं. म्हणजे रोजच्या पोटभर जेवणातही या 'मस्त'पणाचा अभाव असतोच! आपल्याला ते सवयीने अंगवळणी पडलंय इतकंच. विश्वचषक जिंकूनही अमुक खेळाडूचं शतक नाही झालं वगैरे हुरहूर का लागत असेल. ते विजयाच्या अपूर्णतेचं द्योतक. अगदी आपल्या नवजात बाळाचं नाक असंच नाही म्हणून मन खट्टू करून घेणाऱ्या आयाही असतातच की. बाळावर जीव असतोच त्या माऊलीचा, पण ... हा पण पिच्छा सोडत नाही.

जीवन सागरासारखं विस्तीर्ण आणि तितकंच अपूर्ण गुढ असतं. सागराला पूर्णत्व बहाल करायचे म्हटले तर त्या पूर्णत्वाला काय परिमाण द्यावे असा प्रश्न पडतो. कारण कोणत्याही एका स्वरूपात तो परिपूर्ण नसतो. बाहेर दिसणारी त्याची अवाढव्य निळाई तरी कुठे फक्त पाण्याची असते. तळहाताएवढ्या खेकड्यापासून ते महाकाय देवमाशापर्यंत सारेच या निळाईला घनत्व देतात. आकारमानाची मालकी तेवढी पाण्याची. आपणही तसेच आहोत. सबंध पण संपूर्ण नाही. सगळं तुकड्यांनी सांधलेलं (की साधलेलं?). मला जीवनातल्या उणेपणावर बोट नाही ठेवायचं. तुमचा त्यावर हात ठेवून झाला असेल! अपूर्णातही अधुरं का होईना पण समाधान प्रत्येकाला गवसावं. इतकंच.

मांडणीविचार

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

16 May 2020 - 8:04 pm | अनिंद्य

स्फुट आवडले.

अपूर्णतेची गोडी अनुभवलेला,
अनिंद्य

आंबट चिंच's picture

17 May 2020 - 4:16 pm | आंबट चिंच

अतिशय छान मुक्तक.