रितेपण

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
18 Nov 2008 - 4:11 pm

श्वासांचं गुदमरणं काही नवीन नाही आताशा
तू मनात नुसता डोकावलास जरी..
तरी एक मोठ्ठा आवंढा घशात...
आणि मनाची उलाघाल थेट डोळ्यांपर्यंत.
...
वर्तमानातल्या प्रत्येक गोष्टीला
तुझ्याशी रिलेट करणं....
आपसूकच !!
पण तू कुठेच नसल्यामुळे आलेलं रितेपण...
असंच गुदमरतं....व्यक्तच होता येत नाही त्याला.
अधून मधून स्वप्नांचं खेळणं येतं मदतीला
खेळत बसते तास्‌ न्‌ तास
अगदी भान हरपून....
तुझ्याशीच असतो डाव मांडलेला
पण जिंकणार तूच...
मी मात्र तुझ्या विजयावर कायम खुश...
तुझ्या जिंकण्याचं मला नेहेमीच कौतुक वाटतं.
तुझ्यावर विजय मिळवावा असं कधी वाटलंच नाही मला
पण....
एकदा तरी मलाही जिंकू दे ना....
मी जिंकल्यावर कधी तरी टाळ्या वाजव...
अगदी मनापासून...
मलाही आवडेल रे ते....!!
...
राहिलं....
असू दे.
पण खेळ नको संपवूस रे...
मला खेळायचंय तुझ्यासोबत.
तुझ्या प्रत्येक विजयी खेळीचा भागीदार व्हायचंय
प्लीज...
...
कंटाळलास का रे...
नाही त्रास देणार मी तुला...
नाही बोलावणार खेळायलाही
पण.... मला सांग..
तुला मी आठवेन ना रे....
खूप खूप दूर गेल्यावरही...
कधी तरी...
एकदा तरी...

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

पूजादीप's picture

18 Nov 2008 - 4:22 pm | पूजादीप

खरोखरच मनाची उलाघाल थेट डोळ्यांपर्यंत. मनाला स्पर्श करणारी कविता

शितल's picture

18 Nov 2008 - 5:23 pm | शितल

जयवी ताई,
नेहमी प्रमाणे खुप सुंदर काव्य रचना केली आहे :)
एकदम भावस्पर्शी काव्य.

राघव's picture

18 Nov 2008 - 5:37 pm | राघव

कंटाळलास का रे...
नाही त्रास देणार मी तुला...
नाही बोलावणार खेळायलाही
पण.... मला सांग..
तुला मी आठवेन ना रे....
खूप खूप दूर गेल्यावरही...
कधी तरी...
एकदा तरी...

खूप हळवा.. अलवार भाव!
शुभेच्छा!
मुमुक्षु

मीनल's picture

18 Nov 2008 - 7:16 pm | मीनल

नेहमी सारखी हाय क्लास कविता.

मीनल.

जयवी's picture

22 Nov 2008 - 2:51 pm | जयवी

पूजादीप, शितल, मुमुक्षु, मीनल.... मनापासून धन्यवाद :)

अनंत छंदी's picture

22 Nov 2008 - 9:07 pm | अनंत छंदी

जयवीताई
कविता मनाला भिडली
धन्यवाद!

प्राजु's picture

22 Nov 2008 - 10:17 pm | प्राजु

जयूताई..
ही कविता कधी लिहिलीस?? खूपच सुंदर झाली आहे. किती नेमक्या शब्दात भाव मांडले आहेस!! शेवट तर फारच सुंदर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/