पहिल्या महायुद्धाने तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अवयव प्रत्यारोपण, सुश्रुषा शास्त्र, उड्डयन तंत्र अशा अनेक शास्त्रीय क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवले तसेच व्यापार दळणवळण आर्थिक व्यवहार, अंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि राजकारणह्या क्षेत्रावरही प्रभाव आणि दबाव टाकला. बरेचदा ह्यापैकी एका क्षेत्रातले बदल दुसर्या क्षेत्रावर परिणाम करत . प्रचार तंत्र किंवा प्रोपोगंडा हे एक असेच तंत्र ज्याला पहिल्या मह्युद्धात नावेच आयाम प्राप्त झाले. ह्या प्रचार तंत्राचा आणि ब्रिटीश नर्स एडिथ कॅवेल हिचा फार घनिष्ठ संबंध आहे तर आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने तिची हि हकीगत.
तसे पाहू जाता दोन्ही बाजूकडच्या सैनिकांप्रमाणेच सर्वसामान्य जनता ते युद्धाकरता सहाय्य करणार्या इतर अनेकांनी(म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, मजूर, शेतकरी कष्टकरी,स्वयसेवक म्हणून पडेल ती कामे करणारे लोक, सर्वसामान्य जनता ह्यांनी कमी हाल अपेष्टा सोसल्या नाहीत, अनेकांनी जीव ही गमावला पण ह्या नर्स कॅवेलला तिच्या बलिदानानंतर जो राष्ट्रनायिकेचाच नव्हे तर राष्ट्रीय संत किंवा देवदूताचा दर्जा आणि सन्मान मिळाला तो मात्र सर्वथैव ह्या प्रचारातन्त्राचाच महिमा, तर तिची हि कहाणी
नर्स एडिथ कॅवेल
एडिथ लुईसा कॅवेल हिचा जन्म पूर्व इंग्लंडच्या नोर्फ्लोक नावाच्या परगण्यात स्वार्डस्टन नावाच्या गावी ४ डिसेंबर १८६५ रोजी झाला तिचे वडील रेवरंड फ्रेडेरिक कॅवेल हे तिथल्या चर्च मध्ये पादरी कम लेखनिक होते. चार भावंडात ती सगळ्यात मोठी तिची आईचे नाव लुईसा सोफिया वार्मिंग तर फ्लोरेंस मेरी आणि जॉन फ्रेडरिक ही तिची भावंड. तिचे शालेय शिक्षण नॉर्वीच तसेच क्लीवडन आणि पीटरबरो इथे झालं.नंतर तिने काही वर्ष ( साधारण ५ वर्षे) गवर्नेस म्हणजे दाई म्हणून काम केले . हेच काम करण्याकरता ती बेल्गीयामाचे राजधानी ब्रुसेल्स इथे ही काही काळ होती. १८९५ साली ती वडील आजारी झाल्याने परतली आणि तिने वडिलांची सुश्रुषा केली. हे काम तिला खूप आवडल्याने तिने लंडन हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचे ओउपचारिक शिक्षण घेतले.नंतर तिने लंडनमधील अनेक हॉस्पिटल्स मध्ये नर्स म्हणून काम केले तसेच काही काळ खाजगी नर्स म्हणून स्वतंत्र व्यवसाय ही केला. अशी १२ वर्षे तिने नर्सिंगचा अनुभव कमावल्यावर तिला ब्रुसेल्स इथे नव्यानेच सुरु झालेल्या बर्कान्डेल वैद्यकीय संस्थेत मेत्रण म्हणून नेमणूक मिळाली. तेथे ती १९०७ ते १९१० होती.तेव्हा ब्रुसेल्स मध्ये नर्सिंग शिकवणाऱ्या संस्था नव्हत्या आणि एकूण रुग्ण सेवा सुश्रुषा चारच मधील नन्स आणि पदरीच करत ज्यात जिव्हाळा असला तरी त्याना त्याचे शास्त्र शुद्ध ज्ञान नव्हते आणि ते कमवायची फारशी इच्छाही नव्हती म्हणून मग तिने स्वत: पुढाकार घेऊन नर्सिंग विषयी माहिती देणारे ल इंफर्मियेर(फ्रेंच शब्द- म्हणजे नर्स – परिचारिका ) ह्या नावाचे एक नियतकालिक सुरु केले.ते भलतेच लोकप्रिय झाले आणि वर्षभरातच तिला ब्रुसेल्स इथल्या पहिल्या वाहिल्या नर्सिंग स्कूल मध्ये मुख्य अधिक्शिकेची नेमणूक मिळाली. तिच्या कडे तीन हॉस्पिटल्स , २४ शाळा आणि १३ अंगणवाड्यातील नर्सेसना नर्सिंग शिकवण्याची जबाबदारी होती..१९१४ साली तिचे वडील वारले म्हणून ती इंग्लंडला सुटीवर परतली असतानाच पहिले महायुद्ध सुरु झाले अन जर्मनीने पाहतापाहता बेल्जियम पादाक्रांत केले.अशा परिस्थितीत आपली आपल्या कौशल्याची गरज बेल्जियम मधील जखमी सैनिक आणि नागरिकाना आहे म्हणून घरच्यांचा विरोध डावलून ती घाइघाइने परत ब्रुसेल्स इथे परतली.तेथे तिच्या अखत्यारीतील हॉस्पिटल्स आणि नर्सिंग स्कुलही रेड क्रॉस ह्या संस्थेकडे वर्ग करण्यात आले.ती देखील रेडक्रॉस तर्फे ब्रुसेल्स क्लिनिक मध्ये मेट्रन म्हणून काम करू लागली. हे हॉस्पिटल रेड क्रॉस कडे असल्यामुळे तेथे शत्रू मित्र असा भेदभाव न करता सर्व ब्रिटीश फ्रेंच जर्मन सैनिकांवर उपचार केला जाई. २८ ऑगस्ट १९१४ रोजी ब्रुसेल्स जर्मनांच्या हाती पडले आणि त्यानी ब्रुसेल्स मधील जवळपास ६० एक ब्रिटीश नर्सेस, डॉक्टर्सना परत पाठवले पण अनेक प्रयत्न करून कॅवेल मात्र तेथेच राहिली.ब्रुसेल्स जर्मनांच्या हाती पडल्याने साहजिकच जखमी बेल्जियन, ब्रिटीश आणि फ्रेंच सैनिक त्यांचे युद्ध कैदी झाले.जेवढे शक्य होईल तेवढे आपले सैनिक लपवणे जे थोडेफार बरे असतील त्यांना ब्रिटन मध्ये पळून जायला मदत करणे असे उद्योग तिने सुरु केले. खरेतर असे करणे हे रेडक्रॉसच्या नियमात बसत नव्हते तसेच जिनिव्हा करारा प्रमाणे रेडक्रॉसमार्फत वैद्यकीय सेवा पुअरवनर्या लोकांना संरक्षण होते पण जर ते कोणत्याही प्रकारे सैनिक माहिती किंवा शस्त्रास्त्रे अवजारे वगैरे वाहुब्न नेण्याचा किंवा हेरगिरीच्या कामात सहभागी होत असतील तर त्यांना मिळालेले हे संरक्षण काढून घेतले जाई. जर्मनांनी देखील अशा प्रकारे शत्रू सैनिकांना पळून जायला मदत करणार्या नर्सेस आणि डॉक्टर्सना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा वेळोवेळी दिला होता पण अर्थात तिने गुपचूप हे काम सुरूच ठेवले आणि जवळपास २०० ब्रिटीश आणि दोस्त सैनिकांना यशस्वीपणे इंग्लंड मध्ये धाडले.हे करतना तिचे नर्स म्हणून कामही चालू होते आणि ते करताना मात्र तिने आप पार भाव न ठेवता शत्रू किंवा दोस्त दोन्हीकडच्या जखमी सैनिकांची उत्तम बडदास्त ठेवली त्यामुळे जर्मनांना तिचा काही काळ तरी संशय आला नाही.हे तिचे काम बिनबोभाट वर्षभर चालले. ह्या कामात तिला प्रिन्स रेजिनाल्ड दे क्रॉय सारख्या बेल्जियन राजघराण्यातल्या लोकांनी मदत केली होती . अनेक मदतनिस आणि हेरांचा ह्या कमी तिला पाठींबा आणि सक्रीय मदत मिळत होती. (पण एक तर ती प्रशिक्षित-कसलेली हेर नव्हती आणि तिची एक सहकारी गेस्तन क्वीन जर्मनांना फितूर झाली-म्हणजे असे म्हटले जाते- तिला पुढे फ्रेन्चानी जर्मनीबरोबर संधान साधून फितुरी केली असा आरप ठेवून यमसदनी धाडले ) पण जसजशी जर्मनांची बेल्जियम वरची पोलादी पकड वाढत गेली आणि त्यांचे हेरांचे जाळे ब्रुसेल्स मध्ये पसरू लागले तसतसे त्याना तिच्या बद्दल खबरा मिळू लागल्या.त्यांचा संशय बळावला अन अखेर ऑगस्ट १९१५ रोजी तिला त्यानी संशयाच्या आधारावर अटक केली.तिला १० आठवडे सेंट गिलेन येथील तुरुंगात ठेवले गेले आणि तिची कसून चौकशी(!) केली गेली. तिने आपले सगळे गुन्हे(?) कबुल केले. तिने आपण मदत केलेल्या सैनिकांच्या नावांच्या नोंदी एका डायरीत लिहून ती डायरी उशीत लपवली होती ती देखील जर्मनांच्या हाती पडली.तिच्यावरचे आरोप शाबित झाल्याने तिला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली गेली.ब्रुसेल्स मध्ये हजर असलेल्या तटस्थ स्पेन आणि अमेरिकन राजदुतांनी आणि इतर राजनयिक अधिकार्यांनी तिचे सुश्रुषेचे काम पाहून तिची शिक्षा सौम्य करायची विनवणी जर्मनी कडे केली.ब्रुसेल्स मधील अमेरिकन परराष्ट्र सचिव ह्यु गिब्सन ह्यांनी आधीच बेल्जियम जनतेवर जर्मनांनी केलेल्या अत्याचाराने आणि नुकतेच ल्युसिटानिया ह्या अमेरिकन जहाजावर हल्ला करून अनेक अमेरिकन नागरीकांचा बळी घेतल्याने(४ मार्च १९१५) त्यांची मलीन झालेली प्रतिमा ह्या सगळ्याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला. नर्स कॅवेलला सोडून देऊन किंवा शिक्षा सौम्य करून ते त्यांची प्रतिमा थोडी उजळ करू शकतात असेही सुचवून पहिले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.१२ ऑक्टोबर १९१५ रोजी ती आणि तिच्या इतर ४ सहकार्याना सकाळी ७.३० वाजता गोळ्या घालून मारले गेले. ११ तारखेला रात्री साडेआठ वाजता तिला उद्या सकाळी मृत्युदंड देण्यात येणार असल्याची बातमी दिली गेली. साधारणत: मृत्युदंड फर्मावल्यावर त्याच्या अम्मलबजावाणीची तारीख कमीतकमी १५ दिवस आधी जाहीर करतात पण एडिथ बाबतीत फक्त एक दिवस आधी तारीख सांगून लगेच दुसर्या दिवशी सकाळी तिला मृत्युदंड दिला गेला. अशी त्वरेने शिक्षेची अंमलबजावणी केल्याने बाहेर फार बभ्रा होणार नाही असे जर्मनांना वाटले असावे. शिवाय तिने अनेक जखमी जर्मन सैनिकांचीही सुश्रुषा केली होती त्यामुळे अनेक जर्मन सैनिकही तिला सोडून द्यावे किंवा सौम्य शिक्षा करावी अशा मताचे होते त्यांच्या कडूनही विरोध होणे सहज शक्य होते. ब्रुसेल्स इथे तैनात असलेला जर्मन मिलिटरी गवर्नर फॉन शाबरस्पाईन ह्यानेतिला मृत्युदंड देण्यात अशी घाई केली. पण अशी घाई करून काही फायदा झाला नाही.
ज्याक्षणी कॅवेल ही नर्स जर्मन फायरिंग पथकाच्या गोळीला बळी पडली त्याक्षणी हुतात्मा, संत, देवदूत कॅवेलचा जन्म झाला. स्वत: तिने मरण्याच्या आधी आपण फक्त एक ब्रिटीश नर्स असून आपल्या देशाच्या सैनिकाप्रती तसेच जखमी सैनिकांप्रती असलेले आपले कर्तव्य केले असून त्यात महान, अलौकिक असे काहीही नाही अशाच भावना व्यक्त केल्यात पण ह्याचा देखील परिणाम उलट तिला देवत्व संतत्व बहाल करण्यातच झाला आणि तिच्या चरित्राला एक वेगळीच नि:स्वार्थ त्यागाची झळाळी प्राप्त झाली. ज्यांच्या तिच्या शिक्षा कमी करण्याच्या विनवण्या रदबदलीच्या आवाहनांना जर्मनीने केराची टोपली दाखवली त्या अमेरिकन सरकारने जर्मनांच्या ह्या कृतीला एका निर्घृण हत्येचे स्वरूप दिले. ब्रिटीश उघड उघड जर्मनीचे शत्रू असल्याने ते कॅवेल्च्या सुटकेसाठी काही करू शकले नाहीत पण त्यानी नर्स कॅवेलच्या मृत्युदंडाचे व्यवस्थित भांडवल केले. जगभरात विशेषत: अमेरिकेत तिला हुतात्मा, देशभक्त आणि मानवतावादी म्हणून रंगवले गेले तर तिला मृत्युदंड देणारे जर्मन नृशंस क्रूर खुनी म्हणून. ह्याचा फार प्रतिकूल परिणाम जर्मनांना पुढे भोगावे लागले आणि ही त्यांची एक राजनैतिक घोड्चुकच होती असे म्हणावे लागते.तिच्या मृत्युनंतर जर्मन विरोधी संतापाची लाट इंग्लंडमध्ये उसळली. युद्धात भारती होणार्यांचे प्रमाण चक्क दुपटीने वाढले.
आश्चर्याची गोष्ट अशी कि रेड क्रोस मध्ये राहून आपापल्या देशांच्या जखमी सैनिकाना पळून जाण्यात मदत करणार्यात एकटी कॅवेल नव्हती. त्याच ऑगस्ट मध्ये फ्रांस मध्ये अशाच जखमी जर्मन सैनिकाना मदत करणार्या दोन जर्मन नर्सेसना फ्रेंच सरकारने मृत्यदंड दिला होता पण त्याचे कोणतेही भांडवल जर्मनांनी केले नाही परदेशातही आणि स्वदेशातही. ज्या फ्रेंच सरकारने हे केले त्यांची ही कसली निंदा निर्भर्त्सना जर्मनांनी केली नाही उलट तो फ्रेन्चान्चा कायदेशीर हक्कच होता असेच मानले.
असो कॅवेल्चा मृतदेह त्यानी इंग्लंड कडे सोपवला हि दुसरी चूक त्यानी केली. ती लष्करी सेवेत नसतानाही तिला पूर्ण लष्करी इतमामात तिच्या जन्मगावी म्हणजे नोर्वीच इथे दफन केले. सगळे शिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: राजा पंचम जॉर्ज तिच्या दाफानाला उपस्थित होता.तिच्या नावाने सर्व इंग्लंडभर स्मारके उभारली गेली अनेक नर्सिंग स्कूल्स ना तिचे नाव दिले गेले तिचची छबी असलेली ५ पौंडाची चांदीचे नाणी पडली गेली कॅनडात तर तिचे नाव एका पर्वत शिखराला दिले गेले.तिच्यावर अनेक चित्रपट निघाले ज्यांची नावेच नर्स कॅवेल्चे हौतात्म्य किंवा अशी भावनांना हात घालणारी होती. तिच्या सारखे काम करून मृत्यूदंड मिळालेल्या त्या दोन जर्मन नर्सेस बद्दल आपल्याला आज फार काही माहिती नाही पण नर्स कॅवेलची स्मृती मात्र आजही टिकून आहे.तिने रुग्णांची सेवा-सुश्रुषा ह्या क्षेत्रात किती भरीव काम केले ह्यावर वाद होऊ शकतो कारण ती युद्धाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांच्या काळातच मृत्यू पावली पण तिला मिळालेली प्रसिद्धी आणि वलय मात्र वादातीत आहे.
१२ सप्टे २०१५ रोजी दैनिक टेलिग्राफ मध्ये एक लेख प्रसिद्ध झाला ज्यात ह्या संबंधाने नवीन माहिती उजेडात आली. ब्रिटीश लेखिका आणि माजी MI5 संचालिका (ब्रिटीश गुप्ताचर यंत्रणा) ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार ती म्हणजे नर्स कॅवेल हि प्रत्यक्षात एक ब्रिटीश गुप्तहेर होती आणि सैनिकांबरोबरच जर्मन लष्करासाम्बंधी माहितीही ब्रीतीशाना पुरवत होती.तिच्या देहान्त शासनाच्या आदेशावर सही करणारा बेल्जियम मधील जर्मन लष्करी मुख्याधिकारी जनरल मोरीत्झ फोन बिसिंग ह्याच्याकडे तिच्या हेर असण्याचे पुरावे होते. पण जर्मनांचे आपली बाजू मांडण्याचे आपले कौशल्य ह्यात कमी पडले हेच खरे.
https://www.telegraph.co.uk/news/bbc/11861398/Revealed-New-evidence-that...
नर्स कॅवेलच्या त्यागाला आणि तिच्या एकूण कहाणीला पहिल्या महायुद्धाच्या मुख्य इतिहासात आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळणे हा खरोखर प्रचारतंत्राचा महिमा...
आदित्य
#पहिले_महायुद्ध
प्रतिक्रिया
12 May 2020 - 2:26 pm | टीपीके
रोचक आणि उत्तम माहितीपर लेख
12 May 2020 - 8:35 pm | शेखरमोघे
माहितीपूर्ण लेख!!
12 May 2020 - 9:43 pm | Prajakta२१
चांगला लेख आणि माहिती
इतिहास हा नेहमी जेत्यांकडूनच लिहिला जातो ह्याचे फारच चांगले अजुन एक उदाहरण
प्रचारतंत्रही आहेच
13 May 2020 - 2:24 am | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
लेख रोचक आहे. युद्धकैद्यांना पळून जाण्यास मदत करण्यासाठी केवळ तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हायची. मग एडिथ कावेलची हत्या का केली? खरं कारण वेगळंच आहे.
ब्रिटिश प्रस्थापनेस (एस्टाब्लिशमेंट) युद्ध १९१५ साली संपायला नको होतं. एडिथच्या हाती अत्यंत स्फोटक माहिती लागली होती. ती म्हणजे ब्रिटनमधून बेल्जियमला जी मदत जात होती ती सगळी रसद पुढे जर्मनीत वितरीत होत होती. त्यामुळे १९१५ साली संपुष्टात येऊ शकलेलं युद्ध १९१९ पर्यंत लांबलं. (शिवाय १९१६ साली अमेरिकाही युद्धात उतरली ते वेगळंच.)
त्यामुळे विलियम वाईजमन (ब्रिटीश हेरखात्याच्या प्रमुख) याने मॅक्स वॉरबर्गला (जर्मन हेरखात्याच्या प्रमुख) एडिथचा काटा काढायला सांगितलं.
जर्मनीस ब्रिटीश रसद कशी मिळायची याचं वर्णन The Triumph of Unarmed Forces (1914-1918) नावाच्या पुस्तकात आहे : https://www.amazon.co.uk/Triumph-Unarmed-Forces-1914-1918/dp/B001OPHK3A
या पुस्तकाचा लेखक रियर अॅडमिरल कॉन्सेट हा ब्रिटीश नागरिक असून स्कँडेनेव्हियात नेव्हल अटाचे होता. त्यानं ब्रिटीश रसद जर्मनीकडे जातांना स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
13 May 2020 - 12:17 pm | आदित्य कोरडे
तुम्ही फार वेगळीच आणि खळबळजनक माहिती दिल्ये , पुस्तक वाचून मगच काय ते भाष्य करत येईल.
13 May 2020 - 12:52 pm | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
ही माहिती वेगळी असेल, पण खळबळजनक नाही.
दोन्ही महायुद्धे झाली ती वेगळ्याच कारणामुळे झालीयेत. दाखवायला जर्मनी पण प्रत्यक्षात कर्तेकरविते वेगळेच होते. आणि त्यांचे हेतूही निराळे होते.
आ.न.,
-गा.पै.
13 May 2020 - 7:17 pm | टीपीके
थोड सविस्तर सांगता का?
14 May 2020 - 10:00 am | आदित्य कोरडे
एक लेख लिहित आहे मी बेल्जियमच्या तटस्थतेचा प्रश्न , तुम्हाला पाठवतो , त्यापेक्षा काही वेगळे असेल तर नक्की संदर्भ द्या . तुमचा EMAIL सांगाल का?
23 Aug 2024 - 11:09 am | diggi12
आपले लिखाण अत्यंत वाचनीय आणी महितीपूर्ण आहे
कृपया लिहीत रहा.
पहिले महायुध्द ही लेखमाला पूर्ण करा ही विनंती
13 May 2020 - 3:30 pm | वामन देशमुख
ऐकावे ते नवलच!