जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच कोरोना व्हायरस जगभर पसरू लागल्याच्या बातम्या मन्याने पेपरमध्ये वाचल्या होत्या. ऑफिसमध्येही दबक्या आवाजात या विषयावर चर्चा सुरु झाली होती. मन्या तिकडे दुर्लक्ष करायचा. कारण ऑफिसमधल्या लोकांना चर्चेसाठी कायमच विषय हवा असतो. आणि एकंदरीत चर्चा,बातम्या वगैरे बघता, कोरोना हा श्रीमंतांचा रोग आहे अशी मन्याची समजूत झाली होती. साधारण परदेशवारी वगैरे केलेल्या लोकांना हा रोग होतोय अशी चर्चा होती. आता मन्याने उभ्या आयुष्यात विमानतळसुद्धा एकदा आणि तेही बाहेरून बघितलं होतं. त्यामुळे कोरोना काही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असे म्हणून मन्या बऱ्यापैकी बिनधास्त होतं. पण कोरोना नाही पोहोचला तरी कोरोनाची झळ नक्कीच पोहोचेल असा विचार त्याने केलाच नव्हता.
मार्च महिन्यात देशातल्या केसेसची संख्या वाढू लागली. ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमचे आदेश निघाले. मन्याला घरी बसून काम करण्यासाठी लॅपटॉप मिळाला. मन्याला कुठेतरी हे खटकत होतं. घरी बसून आपल्याकडून काही काम होणार नाही ह्याची त्याला खात्री होती. याआधीही शनिवार-रविवारी घरी बसून ऑफिसचं काम करण्याचा असफल प्रयत्न त्याने केला होता. पण सुट्टीच्या दिवशी घरातलेच दुष्काळी कामं संपायचे नाही. त्यामुळे "हो! आता एवढं झालं की बसू फायली घेऊन" असं म्हणता म्हणता रविवार रात्र उगवायची.
याही वेळेस तेच घडलं, पहिल्याच दिवशी मन्या लॅपटॉप घेऊन बसला. ते लॉगिन, नेट कनेक्शन ,सर्व्हर डाऊन वगैरे सोपस्कार आटपेपर्यंत तासभर गेला. कामं सुरु करणार तेवढयात बायकोने किराण्याची यादी दिली मन्याच्या हातात!
"अहो, हे एवढं सामान घेऊन या बरं पटकन!"
"अगं मी कामात आहे. नंतर आणतो."
"कामं नंतर करा. आधी हे घेऊन या. किराणा दुकानात माल कमी येतो आहे असं शेजारच्या काकू सांगत होत्या. दुकानं बंद होऊ शकतात म्हणे कधीही. घरी किराणा असलेला बरा. तुम्हाला काय ! कधीही भूक लागते!घरी सामान तर हवं ना करायला."
विषय भलतीकडे जातोय म्हटल्यावर मन्या लगेच उठला. त्याने यादी वाचली.
यादीतला पहिला पदार्थ,
सर्फ एक्सेल -- ६ किलो !!
आपण काय सर्फ एक्सेल खातो का हा प्रश्न मन्याने महत्प्रयासाने गिळला. पण तीन लोकांच्या कुटुंबाला सहा किलो सर्फ एक्सेल का लागतंय हे त्याला कळत नव्हतं. तसेही किराणा यादीतले बरेच जिन्नस घरात नेमके कुठं वापरतात हा प्रश्न त्याला नेहमीच पडायचा. तो गुपचूप दुकानाकडे निघाला. दुकानात, "आज जगाचा शेवटचा दिवस आहे. उद्या पृथ्वी आणि पृथ्वीवरचा किराणा नष्ट होणार आहे. पण त्यातून जर आपण वाचलो तर काय खाणार?" असा विचार करून प्रचंड गर्दी जमली होती. दोनेक तासानंतर मन्याला किराणा मिळाला. घरी येऊन जेवण वगैरे करून मन्या झोपला.आणि वर्क फ्रॉम होमचा पहिला दिवस सार्थकी लागला.
हळूहळू हाच मन्याचा दिनक्रम झाला. दिवसभरात जास्तीत जास्त तासभर मन्या ऑफिसचं काम करायचा. अश्यातच एक दिवस पंतप्रधानांनी देशात एकवीस दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. बराच वेळ तर मन्याला लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय तेच कळत नव्हतं. त्यात बायकोने परत एक किराण्याची यादी दिली. सुदैवाने यावेळी त्यात सर्फ एक्सेल नव्हतं. नाहीतर पुढचे एकवीस दिवस चालणाऱ्या महायुद्धाची ठिणगी आजच पडली असती !
लॉकडाऊन मध्ये घरी बसून वेळ जाण्यासाठी मन्याने घरातल्या बऱ्याच कामांची जबाबदारी स्वतःकडे घेतली. पण सगळं करूनही बराच वेळ उरत होता. मग मित्रांनी काही वेब सिरीज बघण्याचं सुचवलं. त्याविषयी मन्या तसा फार उत्साही नव्ह्ता.तरीही एक दिवस आलेली लिंक उघडून मन्या कुठलीशी वेब सीरिज बघत बसला. आता त्याला काय माहिती की, वेब सीरिजमधला नेमका "तो" प्रसंग सुरु होण्याची आणि मागून बायको येण्याची एकच गाठ पडेल ! आणि काहीही झालं तरी "तश्या" प्रसंगात माणूस जरा मग्न होतोच ना ! झालं! बायकोला तो प्रकार दिसताच," ह्याचसाठी दिवसभर मोबाईलमध्ये डोकं घालून बसता ना? चालुद्या तुमचं" हे उद्गार ऐकून मन्या भानावर आला. त्यादिवशी रात्रीचा स्वयंपाक आणि भांडेसुद्धा मन्याला घासावे लागले.
मन्या हळूहळू लॉकडाऊनला कंटाळला होता. ते थाळ्या वाजवून अन दिवे लावून स्वतःचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न त्याने केला. पण तो प्रकार ऑफिसमधल्या एचआर ऍक्टीव्हीटीज इतकाच क्षणभंगुर आहे हे त्याला लक्षात आलं. आता उगाचच त्याला मॉर्निंग वॉक अन जिम वगैरे आयुष्यात न केलेल्या गोष्टी करायची इच्छा होतं होती. पण "बाहेर पडता येत नाहीये ना,नाहीतर गेलो असतो" अशी तो स्वतः ची समजूत घालायचा. याकाळात लेकीशीही भरपूर खेळून झालं. आपली लेक आपण तिच्या वयात होतो तेवढी बावळट नाहीये हे बघून मन्याला बरं वाटायचं.
बघता बघता एकवीस आणि एकोणीस दिवसांचे दोन लॉकडाऊन संपले. तिसरा लॉकडाऊन सुरु झाला. चौथाही लॉकडाऊन येणारच अशी चर्चा सुरु झाली. हे किती दिवस चालणार ह्याच उत्तर कोणाजवळच नव्हतं. आजवर नुसतं पैश्याच्या मागे पळणं व्यर्थ आहे वगैरे गोष्टी मन्या ऐकून होता. पण आज एका ठिकाणीच बसून राहिलो तर उद्या पोटातली भूकसुद्धा लॉकडाऊन पाळेल का हा प्रश्न कायम आहेच. मुळात "सगळंच व्यर्थ आहे अन सगळीच मोहमाया आहे" हे सांगणाऱ्यांची दुकानं तरी किती दिवस लॉकडाऊन पाळू शकतील हाही प्रश्न मन्याला पडायचा.
या सगळ्यावर मन्यानी स्वतःपुरतं एक उत्तर शोधलं होतं,
"संपूर्ण जगाला लागलेल्या या कुलुपाची किल्ली ज्याच्या हातात आहे, त्याच्याच दुसऱ्या हातात एक दुसरं मोठ्ठ अन कायमस्वरूपी कुलूपसुद्धा आहे. पहिली किल्ली मिळायची तेंव्हा मिळेलच पण दुसरं कुलूप लागलेलं परवडणार नाही!"
समाप्त
प्रतिक्रिया
8 May 2020 - 11:48 pm | Prajakta२१
छान लिहिलेय
पु ले शु
9 May 2020 - 10:14 am | चांदणे संदीप
मन्या लैच्च हसवितो राव.
सं - दी - प
9 May 2020 - 12:58 pm | टवाळ कार्टा
भारी