प्रियकराला प्रेयसीपासून तोडून दूर कोठेतरी पाठवले... तेव्हा प्रियकरास पक्ष्याकडे पाहून त्याची आणि आपली अवस्था सम वाटली...
त्या अवस्थेचे वर्णन म्हणजे हा पाखरु कवितासंग्रह.... सगळ्या कविता देत नाहिये... पण सुरुवातीच्या ३ कविता देत आहे...
या संग्रहाचे विशेष म्हणजे सर्व कविता या एकाच मनोभूमिकेतून लिहिल्या आहेत....की दूरदेशी प्रियकराच्या मनात कोणते विचार प्रकटतात....
धन्यवाद,
(बर्याच दिवसांतून आतला कवी जागा झालेला) - सागर
पाखरु:
:१:
मी खूप दूर भरारी घेतली गं, पण
तेथून परतायला मला जमेल का?
माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण
त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का?
- सागर
:२:
पाखराला खूप दूरवर नेण्यात आलंय
कसं सांगू तुला?
त्याच्या झेप घेण्याच्या क्षमतेवर
बंधनं आली आहेत.... नव्हे लादली गेली आहेत ...
कदाचित, थव्यामध्ये राहिल्यामुळे,
तुझं मन दुसरीकडे गुंतणं शक्य आहे,
पण, ज्याचा थवा म्हणजे
तुझा सहवास होता,
त्या थव्यापासूनच पाखराला तोडण्यात आलं
आता त्या पाखराला नव्या थव्यात टाकलं,
तरीही ते पाखरू एकटंच राहणार आहे
कायमचंच, कदाचित....
तूच सांग, ज्या सर्वस्वासाठी
त्या पाखराची सर्व धडपड चालली होती
तेच सर्वस्व त्याच्यापासून हिरावून घेतल्यावर
ते पाखरु तरी काय करणार? ...
- सागर
:३:
पाखरु सध्या शांत आहे, स्थितप्रज्ञ आहे
परिस्थितीचा वेध घेतंय...
एक एक क्षण, कित्येक युगांसारखा वाटतोय, अन्
क्षणोक्षणी मन तुझ्याकडे झेप घेतंय
पण अजूनही पाखरु हतबल आहे
तुझ्यापर्यंत झेप घेण्याइतकं बळ
त्याच्या पंखात आहे, पण
कितीही बळ पंखात असलं तरी,
शृंखलांनी बद्ध असलेलं पाखरु
तुझ्यापर्यंत झेप घेऊ शकेल का?
- सागर
प्रतिक्रिया
21 Dec 2007 - 9:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सागरसेठ,
आपल्या काव्य संग्रहामधील ह्या कविता आहेत, आणि त्या वाचून अधिक आनंद झाला.
अरे, मग काव्यसंग्रहाचा पूर्ण परिचय नाही, का द्यायचा. या काव्यसंग्रहात एकूण किती कविता आहेत.
कसे सुचले,मला आवडलेल्या कविता कोणत्या ! माझ्या कवितेच्या प्रेरणा, वगैरे वगैरे.
आणि प्रेमाबद्दल इतके डचकत डचकत का लिहितोय, अरे ती तर चिरंतन भावना आहे.
पाखराची कविता वाचायला आवडेल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
24 Dec 2007 - 5:01 pm | सागर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद डॉक्टरसाहेब,
तशा मी बर्याच कविता लिहिल्या आहेत. पण पाखरु हा एक संग्रह मी एका झूम मधे लिहिला होता....
त्यामुळे हा कविता संग्रह माझ्या खास जवळचा आहे. एवढ्या सलग पणे लिहिलेल्या या एकमेव कविता होत माझ्या आयुष्यातल्या..
ह्या संग्रहातील कविता मी एका दिवशी २-३ कविता केल्या आहेत...
बाकी या संग्रहाव्यतिरिक्त मी जवळपास १०० कविता केल्या आहेत. पण त्या सलग अशा कधीच लिहिल्या नव्हत्या...
यथावकाश त्यातील चांगल्या आणि माझ्या आवडत्या कविता देईनच.
बाकी प्रेमाबद्दल मी डचकत लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे मला या कवितांचे प्रतिसाद पहायचे होते...
तसे प्रेम हे चिरंतन असते ह्यावर माझीही तुमच्याइतकीच श्रद्धा आहे... आणि प्रेरणा म्हणाल तर प्रत्येक कवितेला प्रेरणा तर लागतेच.
आणि ती ज्याच्या त्याच्या मनातच राहिले तरच चांगले होईल असे वाटते... पण या सर्व कवितांसाठी प्रेरणा तर नक्कीच आहे हे मी नाकारत नाही... :)
पण तूर्तास एवढी पार्श्वभूमी तुमचे समाधान करेन असे वाटते...
सागर
26 Dec 2007 - 11:19 am | हरवलेलि स्वाति
हरवलेलि स्वाति
मी खूप दूर भरारी घेतली गं, पण
तेथून परतायला मला जमेल का?
माझे पंख तुझ्या वाटेकडे फडफडताहेत, पण
त्यांना बंधनातून मुक्त होणं जमेल का?
झक्कास !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
परतुन जावस वाटल तरि कुणि थांबलच नसेल आज तिथे वाट पाहणार तर??????
26 Dec 2007 - 1:22 pm | सागर
स्वाती,
खरे आहे तुमचे... जिच्यासाठी परतून यायचं ती जागेवर असणे आजकाल दुर्मिळ झालंय हे मात्र खरं :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
सागर