अग्निपथ: देख ना फिर से मत, कर शपथ, कर शपथ!

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जनातलं, मनातलं
4 May 2020 - 12:56 pm

अग्निपथ

अमिताभच्या अग्निपथ बद्दल खूप काही ऐकून होतो. पिक्चर कल्ट वगैरे आहे म्हणून. त्यामुळे अखेर नेटफ्लिक्सवर पाहण्याची हिंमत केली. हा चित्रपट कल्ट आहे हे कोणी ठरवलं देव जाणे पण तो रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला असेल हे सांगणं मात्र काही अवघड नाही.

अत्यंत कमजोर कथा जिला अमिताभने फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर तारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाच्या सुरूवातीलाच आलोक नाथ नावाचा (आता 'मी टू' मुळे भग्न झालेला) सौजन्याचा ढोंगी पुतळा येऊन गांधीवाद शिकवायला लागतो आणि पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना येते. कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा हे गांधीवादाबाबात ज्यांचं आकलन आहे असा गांधीवाद (असा प्रसंग चित्रपटात आहे) आणि हरिवंशराय बच्चन यांची

यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है
अश्रु-स्वेद-रक्त से लथपथ, लथपथ, लथपथ
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

इतकी उग्र कर्मवादी कविता यात काय साम्य लेखकाला आढळलं ते माहीत नाही. अशा आणखी किती अतर्क्य आणि असंबद्ध गोष्टी पाहाव्या लागणार याची सुरूवातीपासूनच काळजी वाटू लागते आणि ती खरीही ठरत जाते. मुळात 'अग्निपथ' ही कविता एखाद्या उदात्त ध्येयाच्या मार्गावर कराव्या लागणार्‍या संघर्षाबद्दल आहे. मास्टर दिनानाथ चौहानजवळ गांधीवादाचं उदात्त ध्येय आहे हे एक वेळ मान्य केलं तरी त्याच्या विजय या गुंड मुलापुढे वडलांच्या हत्येचा व अपमानाचा सूड हे सोडलं तर कुठलं ध्येय आहे? त्या ध्येयाला 'अग्निपथ' या कवितेशी जोडून उदात्त ठरवण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा प्रयत्न हाच मुळात वैचारिक अप्रामाणिकपणा आहे. हा खोटा भार वाहून नेण्यात मग विजय हे पात्र प्रसंगागणिक पातळ करत न्यावं लागतं आणि चित्रपट फसत जातो.

सुरुवातीचा बराच वेळ बाल विजयची जडणघडण, आलेली संकटं याद्वारे त्याची व्यक्तिरेखा उभी करण्यात गेला आहे. साधारणत: सलीम-जावेद आणि प्रकाश मेहराचे काही चित्रपट सोडले तर नायकांच्या बालपणाचं इतकं सविस्तर चित्रण करण्याची पद्धत हिंदी सिनेमात दिसत नाही (चूभूदेघे). मनमोहन देसाईच्या चित्रपटातही माफक प्रमाणात नायकांचं बालपण दिसतं पण त्याचा मुख्य उद्देश पात्र रंगवणं हे नसून ताटातूट रंगवणं हे असतं. आता विजयचं बालपण इतकं रंगवलं असताना आणि तो मोठा होऊन काय करणार याची प्रेक्षकाला स्पष्ट कल्पना आली असताना तेच बघण्याची माझ्यासारख्या प्रेक्षकाची अपेक्षा असते. पण ते सोडून लगेच प्युअर गुंड विजयचं कल्याणकारी गुंडात रुपांतर झालेलं दाखवलं आहे. हे अनावश्यकरित्या वेगवान ट्रांझिशन हाताळताना पटकथेची दमछाक होते. कारण पटकथाकाराला फक्त तेव्हढंच दाखवायचं नाही. त्याला मारामारी दाखवायची आहे, नाच गाणीही करायची आहे. ती त्याची व्यावसायिक मजबुरी आहे. त्यामुळे मूळ कथा दुय्यम ठरत जाते.

आनंद बक्षी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी अनेक चित्रपटात पाट्या टाकल्या आहेत. पण या चित्रपटात त्यांनी जितक्या तन्मयतेने व कार्यक्षमपणे पाट्या टाकल्या आहेत ते पाहता पाट्या टाकणे या 'अनस्किल्ड वर्क'चा समावेश 'स्किल्ड वर्क' मध्ये करायला कामगार मंत्रालयाला काही हरकत नसावी. कॉमेडियनला अजिबातच जागा नसल्याने तेव्हढा भाग टाळला आहे (नशीब!). तरी मिथुनने थोडा आचरटपणा करण्याचा प्रत्यत्न केलेला आहेच.

विजयच्या पात्राचं नेमकं काय करायचं याबाबत दिग्दर्शकाच्या मनात शेवटपर्यंत गोंधळ असावा. काही वेळेला तो निर्दयपणे गोळ्या झाडत सुटतो. मध्येच अर्धनग्न अर्चना पुरणसिंगला लाज झाकण्यासाठी अंगावरचा ओला कोट उतरवून देतो. मध्येच विदेशी गुंडांना (व समोरच्या प्रेक्षकांना) 'एक चुटकी सिंदूर की कीमत' काय असते यावर प्रवचन देतो. तो हॉस्पिटलातून बरा होऊन बाहेर येतेवेळी त्याचे शेकडो चमचे तिथे हजर असताना त्यांना न सांगता, एका मुसलमान बाईच्या मुलाला (की नवर्‍याला?) स्वत: खांदा देणे, तो गणपतीचा भक्त असणे किंवा त्याच्या प्रेयसीचे ख्रिश्चन असणे (तेवढीच एका चर्च मधल्या सीनची सोय होते. या चर्चचं हिंदी सिनेमावाल्यांना कोण कौतुक. पण त्याबद्दल नंतर कधीतरी) असले अनावश्यक प्रसंग तर फक्त 'पॉलिटिकल करेक्टनेस' साठी जोडलेले आहेत. त्यावरून अर्थात विजय हा सेक्युलर आहे हे सिद्ध होतं आणि सेन्सॉरकडून थोडी उदार वागणूक मिळण्याची आशा राहते हा उद्देश असावा. यात आपला सहनायक मिथुनही काही मागे नाही बरं का? तो सुद्धा एखाद्याचा पेहराव (पक्षी: लुंगी) आणि त्याचं कर्तृत्व यांचा संबंध कसा नाही, आंतरजातीय विवाहाचं महत्त्व, एम.ए. शिक्षण घेऊनही नारळपाणी विकण्यात लाज न वाटून घेणे आदीतून श्रमप्रतिष्ठेचं माहात्म्य अशा गोष्टी आपल्याला शिकवताना आपल्यावर नकळतच पुरोगामित्वाचे संस्कार करत असतो.

विजयची बहीण हे एक अनावश्यक पात्र दाखवून तो किती कुटुंबवत्सल आहे हे बापुड्या प्रेक्षकाला कळतं. मिथुन चक्रवर्तीचं क्रिश्नन अय्यर हे आणखी एक अनावश्यक पात्र. आता मिथुन आहे म्हणजे एक नाच दाखवणं आलं. १९९० च्या हिशेबाने खूप हिंसाचार दाखवल्याने प्रेक्षकांना थोडा रिलिफ म्हणून मिथुन-नीलमचा साईड ट्रॅक टाकला गेला असावा. हा अमिताभच्या पडत्या काळातला चित्रपट. अमिताभ एकटा पिक्चर ओढून नेऊ शकणार नाही असा संशय कदाचित निर्मात्यांच्या मनात असावा. म्हणूनही सहनायकाची सोय केली गेली असावी असा माझा अंदाज आहे. तसंही अमिताभचे गाजलेले चित्रपट बहुतकरून बहुनायकी आहेत उदाहरणार्थ: आनंद - नमक हराम (राजेश खन्ना), जंजीर (प्राण), शोले (धर्मेंद्र, संजीव कुमार), दीवार- नमक हलाल- कभी कभी- त्रिशूल- काला पत्थर (शशी कपूर), मुकद्दर का सिकंदर- अमर अकबर अ‍ॅंथनी- हेरा फेरी- परवरिश (विनोद खन्ना‌), कुली (ऋषी कपूर) आदी अनेक. अमिताभ सोलो हिरो असलेल्या रास्ते का पत्थर, सौदागर, संजोग, एक नजर, बंसी बिरजू अशा चित्रपटांबद्दल तर स्वत: अमिताभच बोलत नाही तेव्हा आपण कशाला बोला? हा एक वादग्रस्त विषय आहे त्यामुळे ते एक असो.

तर या सगळ्या खोगीरभरतीत विजयचा नेमका धंदा काय ते काही कळत नाही. तो फक्त ड्रगचा धंदा करत नाही (म्हणजे ते सोडून इतर सर्व करतो असं आपण समजावं अशी कायद्याची एक्स्लुसिविटीची भाषा वापरली आहे) असं आपल्याला कमिश्नर गायतोंडेकडून कळतं (कदाचित विजयचा 'जमीर' त्याला या गोष्टीची 'इजाजत' देत नसावा किंवा गेलाबाजार सेन्सॉर तरी) तसंच त्याचे बॉस दीपक शिर्के, अवतार गिल आदी चांडाळ चौकडीशी विजयचे व्यावसायिक संबंध कसे होते तेही कळत नाही. इथे सलीम-जावेदनी 'दीवार' मध्ये केलेल्या डिटेलिंगची आठवण होते.

तसंही या 'अग्निपथा'वर चालताना दीवारची वारंवार आठवण येत राहते. 'मेरा बाप चोर है' सारखंच बापाला खोट्या गुन्ह्यात फसवलं जाणं; 'फेंके हुये पैसे' ऐवजी कारची काच पुसणं (बूट पॉलिशचा उल्लेख मात्र आहे); गुन्हेगारी कृत्यांमुळे आईची नाराजी असणं; शेवटी पश्चाताप होत आईच्या मांडीवर जीव सोडणं इत्यादी. तेव्हा हे सगळं अमिताभने पडद्यावर एकदा केलेलं असताना पुन्हा नवीन नावाखाली तेच पाहायला पदरमोड का करायची असा प्रश्न त्या काळच्या एखाद्या प्रेक्षकाला पडला असल्यास त्याचं काय चुकलं?

दीवारमध्ये जसा सलीम-जावेदनी चहूबाजूंनी विचार केला असावा असं वाटतं तसा इथे जाणवत नाही. उदाहरणार्थ, दीवार मध्ये विजय वर्माचा इन्स्पेक्टर भाऊ आणि आई दोघंही त्याच्या गुन्हेगारी कामावर नाराज असतात. इथे मात्र विजयच्या बहिणीला तर जणू काही माहीतच नाही की आपला भाऊ किती मोठा बदमाष आहे ते. सगळी काळजी फक्त त्या माऊलीला! म्हणजे एकीकडे मुंबईतल्या झोपडपट्ट्या, तिथलं अंडरवर्ल्ड, भ्रष्ट पोलीस वगैरे दाखवून वास्तववादाचा दावा करायचा आणि दुसरीकडे असली तकलादू पात्रं, स्टेनगन घेऊन राजरोस फिरणारे कांचा चीनाचे गुंड आदी दाखवून सिनेमॅटीक लिबर्टीही एंजॉय करायची ही लबाडी झाली.

हिंदी चित्रपट पाहताना काही प्रश्न विचारायचे नसतात म्हणून मी ते विचारत नाही. जसं की मास्टर दिनानाथला रात्री, भरपावसात, कंदील लुकलुकवत वेश्येच्या घरी जाऊन तिचा 'धंदेका टाईम' खराब करत तिला एबीसीडी शिकवायची काय गरज होती? जायचंच होतं तर दिवसा भरउजेडी जाता येत नव्हतं का? भरपावसात मास्तरच्या घराला आग कशी लागते? अखेरीस कांचा चीना तळपत्या उन्हात मांडवा गावात विजयची वाट पाहात असताना विजय येतो त्या शॉटमध्ये अंधारी संध्याकाळ कशी असते? एकाच सीनमध्ये दुपार आणि संध्याकाळ हे मिश्रण मी तरी प्रथमच पाहिलं. कांचा चीना सरळ विजयला गोळ्या मारायच्या सोडून आजूबाजूची घरं बॉम्बने का उडवत बसतो? ही असली दृश्ये फक्त सिनेमेटॉग्राफिकली चांगली दिसतात म्हणून टाकली असावीत.

दोन दुष्मनांना विजय पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारतो तेव्हा तो हॉस्पिटलबाहेर केव्हा व कसा पडतो? हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन यात अंतर किती, ते शेजारी-शेजारीच आहेत काय? विजय जेवायच्या टेबलावर दुसर्‍या पात्राला सांगतो की माझ्या (सख्ख्या) आईला कसं बरोबर माहीत आहे पाहा मला जेवणात काय आवडतं ते! इथे आपल्याला गुरुवर्य शिरीष कणेकरांची आठवण आल्यावाचून राहात नाही. (आणि मुख्य म्हणजे निरुपा रॉय हयात असताना रोहिणी हट्टंगडी का? रोहिणी हट्टंगडीला 'ते' जमलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे.)

विजय बारा वर्षांचा बालक असताना इंस्पेक्टर असलेला गायतोंडे (वय अंदाजे ३०-३५), विजय ३६ वर्षांचा होईतोवर कमिश्नर वगैरे बनतो इथपर्यंत ठीक आहे. पण २४ वर्षांनंतरही गायतोंडेंला इतका लहानसा मुलगा कसा? मला वाटतं विजयच्या हृदयपरिवर्तनाची सुरूवात एक लहान मुलगा त्याला "गुंडा" म्हणून हिणवतो या प्रसंगातूनच करायची असं आधी ठरलं असावं. पण मग हा लहान मुलगा पटकथेत ऐनवेळी कसा घुसडायचा हा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याला गायतोंडेचा मुलगा म्हणून दाखवलं असावं. त्यानंतर एका पंचतारांकित उपाहारगृहातले लब्धप्रतिष्ठित बुभुक्षित ग्राहक विजय नावाच्या एका नामचीन गुंडाला आपल्या पंगतीला बसलेलं पाहून भरल्या पानावरून उठून जाऊ लागतात हा हृदयपरिवर्तनातला दुसरा महत्त्वाचा प्रसंग. हे दोन्ही प्रसंग कथा- पटकथाकार संतोष सरोजच्या कल्पनेतले नसून संवादलेखक कादर खानच्या डोक्यातून निघालेले असावेत असा मला संशय आहे. परंतु कोणताही 'मुजरिम' हा 'पैदाईशी' मुजरिम नसतो. 'वक्त और हालात' त्याला तसं बनण्यास 'मजबूर' करत असतात हे हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकाला माहीत असल्याने तो काही या लहान सहान गोष्टी मनावर घेत नाही. हृदयपरिवर्तन महत्त्वाचं. असो.

बाकी एका गोष्टीबाबत मात्र हा चित्रपट कल्ट ठरला, ती म्हणजे अमिताभच्या नकलाकारांना डावा हात बाहेर काढत 'आंय.. आंय' करत नकला करायचा एक कायमस्वरूपी आयटम या चित्रपटाने पुरवला हे खरं.

(पूर्वप्रसिद्धी इथे)

(चित्रसौजन्य- द इंडियन एक्स्प्रेस)

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रियाभि..'s picture

5 May 2020 - 12:51 pm | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

5 May 2020 - 12:52 pm | प्रियाभि..

हा सहनायकाचा मुद्दा यापूर्वी लक्षात नाही आला. या चष्म्यातुन पाहायला पाहिजे एकदा.

अथांग आकाश's picture

7 May 2020 - 1:01 am | अथांग आकाश

एकदम फालतू लेख.
१९८० सालचा हा चित्रपट २०२० साली बघितल्यावर अशाच भावना होणार! मलाही गुरुदत्त, देव आनंद सारख्या त्याकाळी गाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट आज पहाताना फार चमत्कारिक आणि सगळी तद्दन फालतूगिरिच वाटते.

पण तो रिलीज झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप का झाला असेल हे सांगणं मात्र काही अवघड नाही

त्यात अवघड काहीच नाही. आमच्यासारख्या अमिताभच्या पंखा असलेल्या प्रेक्षकांना अमिताभच्या धीरगंभीर आवाजाच्या बदलात दुसऱ्या कोणाचा आवाज सहन करण्याची हिम्मत नसल्याने पहिल्यांदा रिलीज झाल्यावर हा चित्रपट फ्लॉप झाला होता. दिग्दर्शक अभिनेता टीनु आनंदने ही चूक सुधारल्यावर हाच चित्रपट सुपर हीट झाला होता हे आपल्या गावी नसावे बहुतेक. बाकी मिथुनचे पात्र अनावश्यक वाटणे, अकारण सेक्युलर शब्दाचा वापर अशा बाबींवरून काहीही करून या चित्रपटाला कमी लेखणे पक्षी आपला अमिताभ द्वेष व्यक्त करणे सहज लक्षात येतंय. चालुडयात आपले भंकस विचार प्रसवणे, आम्ही ते फाट्यावर मारायला बसलोच आहोत.
i dont care

जेम्स वांड's picture

7 May 2020 - 7:06 am | जेम्स वांड

१९८० का १९९० चा म्हणायचं सिनेमा ?

ए ए वा, लेख आवडला हो, एकदम फर्मास प्रकरण आहे, कणेकरी स्टाईल तुम्हाला जबरी जमते असे दिसते एकंदरीतच. तुम्ही आणि चिनरभाऊ जोशी ह्यांनी एकत्र काहीतरी कोलॅबोरेशन करून लिहा राव एकदा, वर्ष झालं असेल मनसोक्त हसून.

तुषार काळभोर's picture

7 May 2020 - 1:05 pm | तुषार काळभोर

माझ्या टेबलाच्या दोन टेबल पलिकडं एक देव नावाचा अर्धमनुष्य-अर्धराक्षस प्राणी बसतो. त्याने आज सकाळी डबा बाहेर काढला. त्यात होता चपातीचा भुगा. (रात्रीच्या शिळ्या चपात्या मिक्सर मध्ये बारीक करून त्याला खमंग फोडणी द्यायची). मी त्याच्या शेजारी जाऊन दोन घास खाल्ले. एच्चार ला ते अज्जिबात आवडलं नाही! एकतर सोशल डिस्टन्शिंग पाळून मी त्याच्या डब्यातला भुगा खाल्ला. वरती ते शिळं अन्न प्रकॄतीला घातक वगैरे असतं. देव भरलेला चमचा हवेत अधांतरी पकडून ऐकत होता. एच्चारची पाठ फिरल्यावर त्याने चमचा तोंडात टाकला. मला म्हणाला अजून एक डबा आहे, काढू का. मी म्हणालो, इथं नको, पॅण्ट्रीत जाऊन खाऊ!

अवांतर - अग्निपथ मधल्या आवडलेल्या गोष्टी - १) अमिताभ बच्चन, २) गायतोंडे, ३) कांचा चिना, ४) मॉरीशस, ५) मॉरिशस मध्ये एण्ट्री करताना बॅकग्राउंडला वाजणारा येके येके गाणं (ते नंतर बप्पी लाहिरी ने थानेदार च्या तम्मा तम्मा साठी उचललं), ६) दीपक शिर्के. (७) २०१२ मध्ये रौफ लाला!)
न आवडलेल्या गोष्टी - विजयचे नातेवाईक - आई-वडील-बहीण-टु बी दाजी.

जव्हेरगंज's picture

7 May 2020 - 1:51 pm | जव्हेरगंज

चिरफाड आवडली!