२ चाकं, पेडल आणि नर्मदा परिक्रमा - पुर्वार्ध
http://www.misalpav.com/node/46640
आजच परिक्रमेचा श्रीगणेशा केला असल्यामुळे अंगात प्रचंड उत्साह सळसळत होता. आम्ही सर्वच रस्त्यांच्या बाबतीत अडाणी असल्यामुळे रस्त्यातच एका गुरुजींना रस्ता विचारला असता लक्षात आले कि आम्हाला सनावाद – बडवाह मार्गे जायचे आहे. थोड्याच वेळात ओमकारेश्वर गाव सोडले आणि सनावाद च्या रस्त्याला लागलो.
तत्पूर्वी, नर्मदा परिक्रमेसंबंधी असलेल्या काही महत्वाच्या बाबी मी आपल्याला सांगू इच्छितो जेणेकरून पुढील गोष्टींचा संदर्भ लागण्यास सोपे होईल.
१. मार्ग – नर्मदा हि पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तसेच ती मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या ३ राज्यांमधून वाहते. मध्यप्रदेशमधील अमरकंटक येथून मैय्याचा (नर्मदा) उगम होतो आणि गुजरात मध्ये भडोच च्या जवळ कठपोर येथे ती समुद्राला मिळते ज्याला रेवासागर असे म्हणतात. उगमापासून समुद्रापर्यंत मैय्याची लांबी अंदाजे १५०० कि मी आहे म्हणून परिक्रमेच्या मार्गाची लांबी हि साधारण ३००० कि मी आहे.
२. परिक्रमेची सुरुवात कुठूनही करता येते पण परिक्रमेची विधिवत सांगता करण्यासाठी ओमकारेश्वर ला जावे लागते म्हणून साधारण सर्व परिक्रमावासी परिक्रमेची सुरुवात तिथूनच करतात. अमरकंटक पासून परिक्रमा सुरु करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढू लागली आहे.
३. देवळात प्रदक्षिणा घालताना जसे आपण देवाला उजव्या हाताला ठेवून प्रदक्षिणा घालतो, तसेच परिक्रमेत सुद्धा मैय्या आपल्या उजव्या हाताला ठेवून परिक्रमा पूर्ण करायची असते.
४. परिक्रमेत असताना कोणत्याही परिस्थिती मध्ये मैय्या ओलांडायची नसते. तसे केल्यास परिक्रमेचा भंग होतो आणि परत पहिल्यापासून परिक्रमा सुरु करावी लागते.
५. परिक्रमा सुरु करण्याआधी आणि पूर्ण झाल्यानंतर क्षौर-म्हणजेच डोक्यावरचे केस आणि दाढी काढायची असते. तसेच परिक्रमेच्या काळात दाढी, केस आणि नखे कापणे वर्ज्य असते.
वरील काही मुद्दे मला महत्वाचे वाटले म्हणून आवर्जून नमूद केले.
तर ओमकारेश्वर ते सनावाद हे अंतर साधारण २५ कि मी आहे. पहिलाच दिवस असल्याने अंगात प्रचंड उत्साह होता त्यामुळे हे २५ किलोमीटरचे अंतर अगदी जोशात पार केले. सनावाद ला पुढच्या रस्त्याची चौकशी करून लगेचच निघालो. बडवाह पर्यंत पोहोचायला अपेक्षेप्रमाणे फार कष्ट पडले नाहीत. तिकडे ५-१० मिनिटे पाणी पिण्यासाठी थांबलो आणि पुढे रावेरखेडीला निघालो.
रावेरखेडी चे ऐतिहासिक महत्व म्हणजे येथे पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. असे सांगतात कि पहिल्या बाजीरावांच्या अखेरच्या काळात ते इकडेच होते आणि "लू" (फ्लू) या आजाराने गेले. मुख्य रस्त्यापासून हे गाव ८ किलोमीटर आत आहे आणि रस्ता प्रचंड खराब आहे. पण ज्या मराठी योद्ध्यानी अटकेपार झेंडा फडकवला, ज्या योद्ध्यामुळे आज पुण्याला वेगळी ओळख आहे आणि ज्या पुणेरी घराण्याचे अनुकरण करून मी भिकबाळी घातली आहे त्या योध्याच्या समाधीचे दर्शन घ्यायला जायलाच पाहिजे नाहीतर पुण्याचा आणि समस्त मराठी जनतेचा अपमान केल्या सारखे होईल म्हणून रस्त्याची पर्वा न करता आम्ही "आड" वाटेनी मार्गस्थ झालो. फाट्यावर एकानी सांगितल्याप्रमाणे रस्ता खरोखर प्रचंड खराब होता. २ - ३ ठिकाणी तर चक्क सायकल वरून उतरायची वेळ आली. समाधीच्या आसपासचा परिसर शांत आहे आणि जवळूनच मैय्या वाहते. सायकली लावून आम्ही मुख्य दरवाज्यापाशी गेलो तेव्हा लक्षात आले कि समाधी परिसरचा मुख्य दरवाजा बंद आहे आणि चौकीदार (नेहमीप्रमाणे) कुठेतरी बाहेर गेला आहे. आता काय करावे या विचारात असतानाच गावातली २ मुलं आली आणि म्हणली कि ‘दरवाजावरून चढून जा कारण चौकीदार यायला वेळ लागेल.’
लहानपणी आवळे, कैऱ्या, चिंचा झाडावर चढून खाल्ल्यामुळे तो १५ फुटी दरवाजा अगदी लीलया ओलांडला व आत गेलो आणि समाधीपुढे आपोआप नतमस्तक झालो. बाजीरावांच्या पराक्रमाचा इतिहास पटकन डोळ्यासमोरून गेला. अजिंक्य असणाऱ्या एकमेव बाजीराव पेशव्यांच्या समाधीचे दर्शन होणे हि कोणत्याही मराठी माणसासाठी आणि खासकरून एका पुणेकरासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट. पहिल्या बाजीराव पेशवेबद्दल थोडक्यात सांगायचे तर पहिला बाजीराव पेशवे हा एकमेव योद्धा होता ज्यानी त्याच्या कारकिर्दी मध्ये साधारण ४१ लढाया केल्या आणि त्यातली एक सुद्धा लढाई हरली नाही. अशा या पराक्रमी आणि अजिंक्य राजाचा विजय असो.
समाधीच्या आजूबाजूचा परिसर प्रशस्त आहे आणि अगदीच शांत आहे. फक्त मैय्याच्या वाहण्याचा काय तो आवाज. मन अगदी प्रसन्न झालं. व्यवस्थित दर्शन घेतलं आणि भटकायला लागलो.
परिसर बघून होईपर्यंत सूर्य डोक्यावर आला. मग ठरले कि मैय्या च्या काठावर स्नान करून देह थंड करून घ्यावा. मस्त पाणी होते. अगदी ताजे तवाने वाटले. कपडे वगैरे घालून झाल्यावर बरोबर होतं ते थोडं खाल्लं आणि परत निघालो. दुर्दैवानी परत त्याच रस्त्यानी जायचे होते. अगदी जीवावर आले, पण पर्याय नव्हता. मुख्य रस्त्याला लागेपर्यंत जीव गेला पण कसबसं पोचलो आणि पुढच्या मार्गाला लागलो. थोडं पुढे गेलो तर वाटेत काही शेतकरी पेरू विकायला बसले होते. मनात आलं पेरू घ्यावेत, कारण भूक लागली होतीच पण मनात येऊन विचार करेपर्यंत ते पेरुवाले मागे पडले. मनातल्या मनात चडफडत सायकल मारणे चालूच ठेवले. तेवढ्यात बाबांनी मागून हाक मारून सांगितले कि 'पुढे पेरुवले दिसले कि थांब आपण पेरू घेऊ.' 'ठीक आहे' म्हणत पेडल मारणं चालूच ठेवलं. तेवढ्यात आसपासच्या गावातील एक माणूस दुचाकी वरून माझ्या शेजारी आला. बराच वेळ माझ्याकडे टक लावून बघत होता. मी विचार केला कि माझ्या चेहेऱ्याला काही लागलं तर नाही ना....हा असा का बघत असेल? मी दुर्लक्ष केलं. शेवटी त्यानी विचारलं 'कहांसे आये हो?' मी म्हणलं 'पुणे से'. मग म्हणला 'कहां जा राहे हो?' मी 'नर्मदा परिक्रमा कर रहे है' असं सांगेपर्यंत तो पसार झाला. मी विचार केला कि हा असा तडकाफडकी का निघून गेला असेल? आपण टिपिकल "पुणेरी" ष्टाईल नि तर उत्तर दिलं नाही?. हा विचार चालू असताना बाबांनी मागून हाक मारली आणि म्हणले कि 'उजव्या बाजूला पेरुवाले दिसतायत.' सायकल थांबवली आणि एका टपरी वर गेलो. पेरू बघेपर्यंत मागून बाकी मंडळी आली. पेरूचा भाव विचारून अर्धा किलो पेरू द्यायला सांगितले. पेरू विकणाऱ्या मुलीनी पिशवी मध्ये पेरू भरेपर्यंत तो मगाचचा तडकाफडकी निघून गेलेला माणूस परत आला आणि म्हणला 'रुको रुको....मै अमरूद लाया हूँ आपके लिये, ये लीजिये' असं म्हणत त्यानी १ किलो पेरूची पिशवी बाबांच्या हातात दिली आणि निघून गेला. मग ते विकत घेण्यासाठी काढलेले पेरू मुलीला परत ठेवायला सांगून आम्हाला त्या माणसाने दिलेले पेरू चिरून द्यायला सांगितले. मला खात्री आहे त्या मुलीनी दुचाकीवरील माणसाला मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली असणार. पेरू खातखात विचार मनात आला...आपण पेरू खायची इच्छा व्यक्त केली आणि मैय्यानी ती लगेचच पूर्ण केली. मी एका पुस्तकात वाचलं होतं ते खरच होतं तर. मैय्या आपल्या भक्तांना कधी काही कमी पडू देत नाही.
पोटभर पेरू खाल्ल्यानंतर नर्मदे हर च्या घोषात सायकल ला टांग मारून पुढे निघालो. आत्तापर्यंत ५० - ६० किलोमीटर झाले होते. अजून जवळपास अर्धा टप्पा राहिला होता. पुढे थोड्याच वेळात आम्हाला पिपलकोन नावाचे गाव लागले. या गावात सियाराम बाबांचा आश्रम आहे. अर्धा - एक किलोमीटर आत जावे लागते. पोटात खड्डा पडला असल्याने सर्वानुमते आत जायचे ठरले. तुम्ही म्हणत असाल कि किती खा-खा करतात हि लोकं. पण सायकल चालवताना भूक खूप लागते. आत्ता जरी पोटभर खाल्ले तरी तासाभरानी परत पोटात खड्डा पडतो. तर बाबांचा आश्रम मैय्याच्या काठावरच आहे. आम्ही आमची सगळी आयुधं (हेल्मेट, ग्लोवज, गॉगल, रुमाल आणि शूज) बाहेरच काढून ठेवली आणि आत गेलो. आत रामाचे मंदिर आहे आणि बाहेरच्या बाजूला वडाच्या झाडाच्या बुंध्याला टेकून अगदी छोटे मारुतीचे मंदिर आहे. तिकडूनच जवळपास २० - २५ फुट खालून मैय्या वाहाते. एक सेवेकरी आम्हाला आत घेऊन गेला आणि चटया टाकल्या होत्या तिकडे बसायला सांगून पाणी प्यायला दिलं. लगेचच सियाराम बाबा आले आणि काही न बोलता पटकन चहा करायला ठेवला. चहा ठेवला आणि तिकडेच काहीतरी करत बसले. आमच्याकडे बघायला पण तयार नाहीत. मग आम्हाला एका सेवेकऱ्याने सांगितले कि ते कधीच कोणाशी बोलत नाहीत. बाबा अंगानी अगदीच सडपातळ आहेत आणि १२ महिने फक्त लंगोटीवर असतात. चहा होईपर्यंत आम्हाला प्रत्येकी बिस्किटाचा एक-एक पुडा आणि शेव-चुरमुरे एकत्र केलेलं पाकीट दिलं. भूक प्रचंड लागली असल्याने बका बका खायला सुरुवात केली. तोपर्यंत चहा आला. एका मोठ्या वाडग्यात चहा दिला होता. तो वाडगा म्हणजे अंदाजे २-३ कप एवढा असेल. बाबांच्या हातचा अप्रतिम बासुंदी चहा आणि बिस्किटाचा अख्खा पुडा संपवल्यावर भुकेची आग कुठे शांत झाली. लगेचच नमस्कार करून निघतो म्हणलं तर बाबांनी सेवेकाऱ्याला खुणेनेच सांगून आम्हाला राहण्याचा आग्रह करायला लावला. खूप आग्रह झाला पण दिवसाचं १०० किलोमीटरचं टार्गेट पूर्ण झालं नव्हतं म्हणून नाईलाजाने नाही म्हणालो आणि सायकली काढून निघालो. आता मात्र ठरवलं कि १०० किलोमीटर होईपर्यंत कुठे थांबायचं नाही.
आणि ठरवल्याप्रमाणे खरंच २५ किलोमीटर कुठेही न थांबता सायकल मारली. दिवसाचे १०० किलोमीटरचे टार्गेट पूर्ण झाले होते. आता राहायची व्यवस्था बघायला हरकत नव्हती. पण त्यासाठी आम्हाला एखादं गाव गाठणं आवश्यक होतं. म्हणून आम्ही गाव लागेपर्यंत पुढे जायचं ठरवलं. लगेचच २ किलोमीटरवर आम्हाला एक गाव लागलं. गावाचं नाव कसरावद. तिकडे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टोळक्याला विचारलं कि इकडे राहण्याची सोय कुठे होईल. त्यांच्यातला एक माणूस म्हणला कि इकडून पुढे ५०० मीटर वर एक बडी माता मंदिर आहे तिकडे विचारा. नर्मदे हर म्हणून पुढे गेलो. थोडे पुढे गेल्यावर एका चहाच्या टपरी मधून एक माणूस धावत धावत आला आणि आम्हाला अडवलं. कुठे चालला आहात वगैरे विचारपूस झाली. त्यांचं नाव श्री. राजेश पाटीदार. आम्ही सांगितलं कि आम्ही एक मंदिर शोधतोय जिकडे आमची राहण्याची सोय होऊ शकेल. तो म्हणला हे काय समोर ते मंदिर आणि मी त्या मंदिराचा ट्रस्टी आहे. मी रोज इकडे संध्याकाळी असतो आणि कोणी परिक्रमावासी येत आहेत का ते बघतो जेणेकरून त्यांची मंदिरात राहण्या खाण्याची सोय करता येईल. मनातून आनंद झाला. मैय्यानी आपली सोय केली. त्यांनी आम्हाला आधी चहा पाजला आणि मंदिराकडे घेऊन गेले. छान मंदिर होतं.
मग आम्ही आसन (बसण्याची/ झोपण्याची जागा) लावून आमचे स्पोर्ट्स वेअर काढून बंडी-लेंगा घातला आणि हात पाय धुवून घेतले. श्री. पाटीदार पण आमच्या सोबत होतेच. श्री. पाटीदार म्हणाले कि तुम्हाला जेवायला काय चालेल? बाहेर हॉटेल मधुन मागवू का? आम्ही म्हणालो ‘आमचं तसं काही नाही. तुम्ही द्याल ते आम्ही मैय्याचा प्रसाद समजून खाणार.’ ठीके म्हणून ते बाहेर गेले. आम्ही दर्शन घेतले. मूर्ती सुंदर होती. थोड्याच वेळात पाटीदार साहेब परत आले आणि म्हणाले "मैने होटल में खाना बताया था पर हमारे गांव के लडके बोल रहे है की हम इधर ही दाल बाटी बनाते है, आपको चलेगा?” मी म्हणलो "बहुत चलेगा...वैसेभी मैने दाल बाटी कभी खायी नही है और खाने कि इच्छा तो बहुत है.” असं म्हणल्यावर पाटीदार साहेब खुश झाले. "आज मै आपको सबसे बढीया दाल बाटी खिलाता हुं.” असे म्हणून गावातल्या मुलांना दाल बाटी करायला सांगितली. तो पर्यंत आम्ही मैय्याची आरती केली आणि मग सोबत आणलेल्या स्पंज च्या चटया घालून आडवे झालो. थोड्यावेळानी दाल चा खमंग वास यायला लागला म्हणून जाऊन बघितलं तर दाल तयार झाल्यातच जमा होती आणि बाटी पण तयार होतच होती.
थोड्याच वेळात आम्हाला जेवायला वाढले. अप्रतिम जेवण होते. दाल आणि बाटी दोन्ही उत्तम झाले होते. पोट तुडुंब भरले. मग पाटीदार साहेबांनी आमचा निरोप घेतला आणि 'सकाळी मी आल्याशिवाय जाऊ नका' असे सांगून गेले. आम्हीसुद्धा आमच्या स्लीपिंग bags काढून निद्रादेवीच्या शरण गेलो.
प्रतिक्रिया
1 May 2020 - 8:41 pm | Nitin Palkar
परिक्रमेचा प्रवास छान चालला आहे. प्र चित्रे दिसत नाहीत. पु भा प्र.
1 May 2020 - 9:37 pm | वेदांग
मला सुद्धा जाणवले. पुढच्या भागात छायाचित्रे दिसतील असे बघतो. धन्यवाद.
1 May 2020 - 10:38 pm | जेम्स वांड
मैया एकंदरीत सगळ्या इच्छा पूर्ण करतेच म्हणायचे, एमपीच्या हवेत, एमपीच्याच सिहोर गव्हाचे "दाल बाफले" खूप मागे एका थंडीच्या हंगामात खंडवा गावाजवळ आमच्या एका कॉलेज मित्राच्या शेतात खाल्ले होते ते आठवले एकदम.
पहिल्या बाजीरावांच्या अखेरच्या काळात ते इकडेच होते आणि "लू" (फ्लू) या आजाराने गेले.
मला वाटतं फक्त नाव सारखे आहे पण फ्लू आणि लु वेगळे आता फ्लू म्हणजे साधा ताप सर्दी खोकला वगैरे आणि लू म्हणजे उष्माघात किंवा सनस्ट्रोक, उत्तरभारतात उन्हाळ्याच्या काळात प्रचंड गरम वाऱ्याचे झोत फिरतात त्याला म्हणतात लू आणि त्याने उष्माघाताचा फटका बसला की त्याला म्हणतात "लू लगना"