||नर्मदे हर ||
"ठरलं...२६ जानेवारी २०१४ ला आपण परिक्रमेला सुरुवात करायची..." नंदू काका (आनंद घाटपांडे), बाबा आणि मी नवीन सायकल घ्यायला आलो असतानाचा बाबांनी बॉम्ब टाकला. मनात विचार आला, अजून १ वर्षापेक्षा जास्त वेळ आहे, आरामात सराव होईल पण त्या वेळी म्हणजेच डिसेंबर २०१२ ला लक्षात नव्हतं आलं कि वर्षभराची प्रक्टिस सुद्धा पुरेशी होणार नाहीये. जे भोग भोगायचे आहेत ते भोगावे लागणार आहेतच.
२ नव्या कोऱ्या Montra जाझ्झा घेऊन ऐटीत दुकानाच्या बाहेर पडलो. सध्या बाबा आणि माझ्यात मिळून १च सायकल घेतली होती आणि दुसरी सायकल चंद्रशेखर काकांसाठी होती. दोघात १ सायकल घेण्याचं कारण म्हणजे बाबांना माझा आलेला पूर्वीचा अनुभव. मी किती आरंभशूर आहे याचा बाबांना चांगलाच अंदाज होता. पण मला काय हे मनापासून पटलं नव्हतं. तसं बोलून सुद्धा दाखवलं. पण “महिनाभर नियमितपणे सराव केलास तर दुसरी सायकल घेऊ” असं उत्तर मिळाल्यामुळे तात्पुरता तरी गप्प बसावं लागलं. लगेचच २ दिवसात नंदू काकांनी पण तशीच सायकल घेतली. चंद्रशेखर काका बेळगावला असल्यामुळे त्यांना लगेच सायकल देणं शक्य नव्हतं. तो पर्यंत आमच्या तिघांसाठी ३ सायकल झाल्या होत्या.
सराव सुरु केला. पहिले २ दिवस ताशी १३-१४ च्या वेगाने ५-६ किलोमीटर अंतर जाऊन आलो तरी घाम फुटला. दम लागला. म्हणलं अवघड आहे. वय झालं आपलं. पण सराव सुरु ठेवायचा असा ठरवलं होतंच. १५ दिवसातच बराच फरक जाणवला. गूगल वर एक सायकल ग्रुप जॉईन केला. त्यांच्या सोबत लोणावळ्याला जायचं ठरलं. बाबा म्हणाले 'कशाला उगाच उड्या मारतोयस, १५ दिवसांच्या प्रॅक्टिसवर ८० किलोमीटर जाणं म्हणजे काय खाऊची गोष्ट नाहीये.' खरच होतं ते. आत्तापर्यंत एका दिवसातलं सायकलवर कापलेलं जास्तीत जास्त अंतर होतं ३० किलोमीटर. आणि त्यानंतर डायरेक्ट ८० किलोमीटर. जाऊ का नको असा विचार चालू होता. शेवटी ठरवलं. आपण जायचं. जे होईल ते भोगायचं. शाळा सोडल्यानंतर सायकलला हात न लावलेला माझा मित्र रोहित पण यायला तयार होता. मग तो येतोय तर मी का नाही. आपण तर त्याला “सिनियर” आहोत. १५ दिवसांची जास्त प्रॅक्टिस आहे आपली. आपण त्याच्या पेक्षा नक्कीच ५-१० किलोमीटर जास्त सायकल चालवू. ठरल्या दिवशी निघालो. आम्ही जवळपास ७-८ लोक होतो. पहिले २५ किलोमीटर त्यांच्या स्पीडने चालवल्यावर लक्षात आले कि आपण काय लोणावळ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. देहू रोड फाट्याला चहा प्यायला थांबलो. तेव्हा बाकी सायकल स्वारांना सांगितले की 'बाबांनो तुम्ही तुमच्या स्पीडने जा. आम्हाला जेवढं आणि जसं जमेल तसं हळू हळू येतो. तुम्ही थांबू नका.’ हळू हळू पुढे जात होतो. शेवटी कामशेतच्या अलिकडे रोहित म्हणाला कि आता परत फिरू. पडत्या फळाची आज्ञा समजून लगेच मागे फिरलो. पोटऱ्या, पृष्ठभाग आणि मांड्यांच्या स्नायूंचा अक्षरशः भुगा झाला. सर्व स्नायू परत नॉर्मलला यायला पुढचे ४ दिवस गेले.
काही दिवसातच बाबांच्या आणि माझ्या पण लक्षात आले कि मी नियमितपणे सराव करतोय. मग आम्ही अजून एक नवीन सायकल घेतली. श्वीन स्पोर्टेरा. Montra पेक्षा खूपच स्मूथ . पण मला Montra च आवडली होती. नवीन सायकल आल्यानंतर चंद्रशेखर काका त्यांची सायकल बेळगावला घेऊन गेले.
आता सरावाला वेग यायला लागला होता. कात्रज घाट सुद्धा सर झाला. गूगल ग्रुप वर माझी अद्वैत जोशीशी भेट झाली. त्याच्याकडे पण Montra च होती. मग बाबा आणि नंदू काकांना खो देऊन मी अद्वैत बरोबर सराव करायला लागलो. सराव करण्याबरोबर एकीकडे सायकलिंगला लागणारी सगळी आयुधं गोळा करणं सुद्धा चालू होतं.
सरावामध्ये कराड, कोल्हापूर, चिपळूण, सातारा अशी १०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असलेली गावे सुद्धा सर झाली. average स्पीड वाढला. लागणाऱ्या सगळ्या सामानाची जमवा जमव सुरु होतीच. आणि अशात आमच्या मोहिमेचा दिवस जवळ कधी येऊन ठेपला ते कळलेच नाही. आनंद घाटपांडे, चंद्रशेखर इती, अनिकेत सुतार, उपेंद्र शेवडे (बाबा) आणि मी हे मोहिमेचे सदस्य पक्के झालो. परिक्रमा ओमकारेश्वर पासून सुरु करण्याचे ठरले. त्यासाठी पुणे ते इंदूर बसने आणि इंदूर ते ओमकारेश्वर खाजगी गाडीने करायचे ठरले. सायकली बॉक्स मध्ये बांधून झाल्या आणि ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी २०१४ ला नीता वोल्वो मध्ये बसलो. २७ तारखेच्या पहाटे इंदूरला पोचलो तिकडूनच एक महिंद्रा गाडी मिळाली. तिच्या टपावर सायकली बांधल्या आणि ओमकारेश्वरच्या दिशेने निघालो. साधारण ९.३० वाजता तिकडे पोहोचलो. आता सायकल कुठे उतरवाव्या या विचारात असतानाच एक गुरुजी भेटले. परिक्रमेचा यथासांग संकल्प विधी पार पडायला गुरुजींची गरज लागतेच. त्यांना आमच्या सायकलींची अडचण सांगितल्यावर लागलीच त्यांनी त्यांच्या घरी बॉक्सेस ठेवायची संमती दर्शवली. त्या प्रमाणे आम्ही त्यांच्या घरी बॉक्सेस ठेवून संकल्प विधींसाठी नर्मदा मैय्याच्या किनारी गेलो. प्रथमतः सर्वांनी क्षौर (चमन गोटा) केला आणि मैय्या मध्ये स्नानासाठी गेलो. स्नान झाल्यावर संकल्प विधी झाले आणि त्या नंतर जेवण. हे सर्व विधी होईपर्यंत दुपारचे ३.३० – ४ वाजले. त्यानंतर गुरुजींच्या घरी येऊन सायकली जोडल्या. मग सर्वानुमते असे ठरले कि सायकली जोडायला उशीर झाल्यामुळे परिक्रमेचा श्री गणेशा उद्याच करूया. मुक्कामी गजानन महाराज संस्थानाच्या धर्मशाळेत राहिलो. दिवसभर दगदग झाली असल्यामुळे परिक्रमेच्या विचारात झोप कधी लागली कळलेच नाही.
दुसया दिवशी पहाटे लवकर उठून शौचमुखमार्जन केले आणि खाली येऊन सायकलींवर खोगीरं चढवली. "नर्मदे हर" च्या घोषात आम्ही सायकलला टांग मारली आणि नर्मदा परिक्रमेचा शुभारंभ केला.
प्रतिक्रिया
30 Apr 2020 - 8:53 pm | महामाया
नर्मदा परिक्रमा...वाह, सुरवात तर झकास...
30 Apr 2020 - 11:59 pm | विंजिनेर
वा! नमर्दे हर!
फोटो, नकाशे सगळं व्यवस्थित टाका बरंका.
1 May 2020 - 12:36 am | माझिया मना
आवडले, पुभाप्र
1 May 2020 - 10:45 am | ऋतु हिरवा
फारच छान! पुढील भाग आले आहेत की येणार आहेत? वाचायची उत्सुकता आहे
1 May 2020 - 3:13 pm | वेदांग
दर शुक्रवारी एक भाग टाकायचा विचार आहे. काल पहिला भाग टाकला. आज पुढचा टाकतो. आणि पुढच्या आठवड्यापासून दार शुक्रवारी एक भाग .
1 May 2020 - 3:17 pm | Prajakta२१
छान
पु भा प्र
1 May 2020 - 8:31 pm | Nitin Palkar
पु भा प्र
1 May 2020 - 10:12 pm | जेम्स वांड
काही प्रश्न
१. इंदूर बरोबर का इंदौर ?
२. ओमकारेश्वर बरोबर का ओंकारेश्वर ??
अन सगळ्यात महत्त्वाचं
पुणे ते कन्याकुमारी अन
जम्मू ते पुणे सायकल मोहिमेतील दिग्गजांपैकी सुसाट ग्रुप पैकी असणारे वेदांग तुम्हीच का हो ?
1 May 2020 - 11:49 pm | वेदांग
नमस्कार,
माझ्या माहितीनुसार मराठीमधे इंदूर तर हिंदीमधे इंदौर म्हणतात. तसेच ओंकारेश्वर हा योग्य शब्द आहे असे मला वाटते. तुमचे मत जरुर सांगा.
आणि तुम्ही दिलेल्या सुसाट ग्रुपचा संदर्भ लक्षात घेता...होय मी त्या दोन्ही मोहिमेत सहभागी होतो. पण सुसाट ग्रुप ही संकल्पना आमच्या ह भ प आशीषजी यांची आहे. तुम्ही बरोबर ओळखले. धन्यवाद.
2 May 2020 - 9:43 am | जेम्स वांड
वेगळे असे काहीच नाही, दोन्ही नावे थोडी वेगळी वाटली म्हणून विचारता झालो बस. :)
बाकी आशुचॅम्प उर्फ तुमचे ह भ प आशिषजी ह्यांनी लिहिलेली तुमची उत्तर दक्षिण दिग्विजयाची गाथा जालीय लेखनात अजरामर आहे, व्हर्च्युअली आम्ही ती यात्रा केली आहे तुमच्या सगळ्यांसोबत, आता तुम्ही परत नर्मदा मैया घेऊन आलात, ते अजूनच बेस्ट, तुमच्या लेखांची आता आतुरतेने वाट पाहणे आले आम्हाला
पुभालटा
(फॅन बॉय) वांडो
2 May 2020 - 1:59 pm | सिरुसेरि
सुरेख प्रवास वर्णन . पुभाप्र .