धाड

अभिनव प्रकाश जोशी's picture
अभिनव प्रकाश जोशी in जनातलं, मनातलं
20 Apr 2020 - 12:10 am

मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. चिमुलवाड्यावर बहुतेक सर्वच घरांत बायका आपल्या कोवळ्या पोरांकडून ''ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा" बोबड्या आवाजात वदवून घेत होत्या. मॉन्सून पूर्व कामांच्या नावाखाली दिवसातून कमीत कमी ४-५ वेळा लाईट जाण्याचे प्रकार सुरु होते. भरलेले गटार समजून उसपण्याच्या नावाखाली खोदलेल्या चरित १ -२ दारुड्यांनी आपापले पाय मोडून घेतले होते ! "उनासाठी खूप झाला, आता पावसासाठी लवकरच ह्या छत्र्यांचा वापर होउदे रे देवा"- अशी प्रार्थनाच बहुतेक लोक करीत असावे. बाकी मागच्या वर्षीच्या गरमीपेक्षा ह्या वर्षीची गर्मी जरा जास्तच आहे असे प्रत्येकाला वाटत होते. अश्या ह्या उकाड्यापासून बचतीसाठी काका कामत सतत ओला पंचा खांद्याभोवती टाकून उघडे फिरत- जे त्यांचा नातू जुनिअर कामत- म्हणजेच विघ्नेशला बिलकुल आवडत नसे. विघ्नेशचे कॉलेजातील शेवटचे वर्ष होते. नुकत्याच आलेल्या निकालात तो काठावर पास झाल्याचेही सर्वांना कळाले होते. "आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उत्तरपत्रिकेवर सगळ्यात आधी "श्री राम जय राम जय जय राम" लिहिल्यामुळेच तो पास झाला" असे काका कामत सगळ्यांना सांगून कधीच मोकळे झाले होते. २ चाफराबाजी म्हशी विकून आणि अर्धा एकर जमीन गहाण ठेऊन त्यांनी विघ्नेशची कॉलेजिची ३ वर्षे पुरस्कृत केली होती ! कॅम्पस प्लेसमेंट च्या रूपात, कॉलेज मधील कंत्राटी कॅन्टीन वाले, न्यानेश केटरर्स यांनी त्याला दिलेली ऑफर त्याने नाकारली आणि काही दिवस घरी राहून नोकऱ्यांच्या शोधात भटकणे सुरु केले. कित्येक कार्यालयात आत शिरण्याआधीच त्याचा घामाघूम अवतार बघून त्याला सेल्समन समजून सेक्युरिटी वाल्यांनी परत पाठवले होते ! बाकी त्यालाही नोकरी वैगेरे करायची काही इच्छा नव्हती. फक्त काका कामतांच्या मागणीवरून तो नोकरीच्या शोधात फिरत होता. त्याचे एक स्वप्न होते. त्याच्या पणजोबांनी म्हणजेच बाबू कामतांनी एक उपहारगृह सुरु केले होते- हॉटेल रव-साई (रवळनाथ- साईबाबा !). तर बाबू कामत रिक्षातून जाताना ती कलंडून ऑफ झाले आणि हॉटेलहि ऑफ म्हणजेच बंद पडले. काका कामतांनी ते सुरु करण्याचे २ प्रयत्न केले होते. पाहिल्यावेळेस त्यांच्या भांडवलदाराने त्यांचा घात केला आणि उदघाटनाची तारीख ठरून सुद्धा रव- साई सुरु होऊ शकले नाही. दुसऱ्या वेळेस भांडवलदाराने साथ दिली पण भर पावसात छपराने घात केला. रात्रीच्या वेळी जोरदार पावसात वीज पडून काही कौले फुटली तर एका जागी छपराचा अर्धा अधिक भागच खाली आला. ह्याची काहीच माहिती नसलेले कामत दुसऱ्या दिवशी कामत कुलूप काढून आत शिरले आणि छत्री बंद तर केली, पण लाईट न लावताच एवढा उजेड कसा तेच त्यांना कळेनासे झाले. थोडे पुढे सरकताच छपरालाच झर फुटल्यासारखे दृश्य त्यांना दिसले आणि वर बघताच त्यांना झालेल्या प्रसंगाची कल्पना आली. त्या दिवशी लावलेले ते कुलूप काही कोणी आजतायागत काढलेले नाही. तर अश्या जीर्ण अवस्तेथ असलेले पण एकेकाळी अर्ध्या अधिक तालुक्याची भूक भागवलेले "हॉटेल रव- साई पुन्हा सुरु करण्याचे विघ्नेशचे स्वप्न होते. चिमुलवाडा काढून सावरगावच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्याजवळच रव - साई होते. शेवटी कित्येक प्रयत्न करून सुद्धा नोकरी मिळत नसल्याने विघ्नेशने कामत काकूंना आपली इच्छा बोलून दाखवली आणि काका कामतांना बाटलीत घालण्याची जबाबदारी विघ्नेशने त्यांच्यावर सोपवली. काकूंनीही दुसऱ्या दिवशी कामतांच्या आवडीची सुंगटं घातलेली चवळीची भाजी केली आणि बरोबर जेवता- जेवताच विषय काढला.
"बरंका, हो असेच बरे बरे जेवण जर तुम्हाला रोज-रोज खायला मिळाले तर काय होईल नाही !"- काकू
" २ - ३ दिवस मजा आणि चवथ्या दिवशी पित्त"- काका कामत हात चाटत म्हणाले
"अहो तसं नव्हे, म्हणजे- आता बघा त्या कुट्टीकरांची खानावळ आहे किनई- ते कसे रोज उरलेली भाजी, भक्क्मपेढे वगैरे घरी घेऊन येतात तसं तुम्हालाही रोज असं खायला मिळालं तर- तसं म्हणत होते मी"- काकूंनी भाजी वाढत वाढत हळू हळू सांगितले.
"अगं पण आपली कुठे खानावळ आहे ? आपला तर गोठा- "- काका कामत
"तेच तर म्हणतेय ! आपण रव- साई पुन्हा सुरु केले तर ?!"- काकूंनी वाक्य पूर्ण करायच्या आधीच काकांना ठसका लागल्यासारखाच झाला. पाणी पित- पित त्यांनी प्रश्न केला- "तू लहान असताना पाळण्यातून वैगेरे पडली होती का ?! नाही, पडून डोक्याला मार वैगेरे लागलाच असावा - म्हणूनच काहीही बोलतेय, आता ह्या वयात हे रव-साई झेपणार आहे का आपल्याला "
"अहो पण आपण म्हणजे आपण नाही- विघ्नेश ची खूप इच्छा आहे हो, नाही म्हणजे भांडवल वैगेरे सगळे तो बघून घेईल म्हणतोय..आता बिन नोकरीचा रिकामाच आहे तसेही, मी म्हणतेय करुदे ना !"- काकूंनी बाजू मांडली
काका कामतांनी अशीच आपली मान हलवल्यासारखी केली, ज्याला "हो" समजून काकूंनी टाळीच मारली आणि काकांना आणि थोडी भाजी वाढली ! विघ्नेशनेही आनंदाने देवाकडे नारळ वैगेरे ठेऊन शास्त्र केले. विघ्नेश लगेचच तयारीला लागला. कोनाड्यातली जुनी डायरी काढून त्याने वर्धन शेटींना फोन लावला. वर्धन शेट एकेकाळी चिमुलवाड्यावर वस्थीस होते तेव्हा कुठे त्यांची व लहान विघ्नेशची, कशी काय माहित पण दोस्ती जमली होती. वर्धन शेटनी विघ्नेशला पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला, पण त्याचा विचार पक्का असल्याचे वाटताच वर्धन शेटींनी भांडवलाची रक्कम देण्याचे काबुल केले. गर्मी आणि काम दोन्ही वाढले. विघ्नेशने लागणारी कागदपत्रे, प्रमाणपत्र वैगेरे तयार केली. तुळशी लग्नाला तुळस रंगवणाऱ्या आकाश गावडेला हॉटेलाचा बोर्ड रंगवण्याचे कंत्राट दिले. घरात माळीवर असलेली पितळेची मोठी भांडी काढून ठेवली. वाड्यावरील बंद पडलेल्या ' शारदा ट्युशन क्लासेस" मधले बाकडे आणि काही टेबले विघ्नेशने पहिली होती. त्याने वाड्यावरील वजनदार अश्या गावकर काकूंना त्यावर बसण्यास सांगून त्यांच्या मजबूतीची खात्री करून घेतली, आणि कमी किमतीत बाकडे-खुर्च्यांची व्यवस्था केली. आपण रव- साई पुन्हा सुरु करतोय हि बातमी बाळाला सांगितली आणि बाळ्याने ती वाड्यावर ताटातल्या पेजेसारखी पटापट पसरवली ! हॉटेल म्हणजे तसे बसण्यास एक मोठी जागा आणि आत स्वयंपाकाची जागा आणि मोरी अशीच व्यवस्था होती. काहीसा खर्च करून विघ्नेशने संपूर्ण वास्तूची गरज होती तिथे तिथे डागडुजी करून घेतली. अनंत मेस्तास सांगून छप्परही शिवून घेतले. सावरगावच्या देवी सातेरीच्या देवळातील कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या भावे आचारी आणि त्याच्या सोबत २ वेटरांना हॉटेलात नोकरीची गळ घातली आणि अश्या प्रकारे सगळी व्यवस्था करून उदघाटनाची तारीख देखील ठरवली. तो एक रविवार होता. वर्धन शेट आणि प्रसिद्ध उद्योगपती, जय शिवशक्ती फरसाणचे संस्थापक श्रीयुत बर्वे यांनी फित कापताच लोकांनी फुकटचे वडे आणि चहा घेण्यास एकच झुंबड केली. काका कामत खुद्द वडे वाटत होते; वाटता वाटता अधून मधून खातहि होते. देवळात खडीसाखर वाटणाऱ्या चिमणे आजोबांस चहा वाटण्याचे कंत्राट दिले होते. ते एवढ्या धीम्या गतीने चहा पेल्यात ओतत कि पेला भरण्याआधीच चहा थंड होऊन जाई ! हे बघून विघ्नेशने लगेचच बाळ्याला चहाचे काम हातात घेण्यास सांगितले. गजबजलेला असा तो दिवस होता. सगळे काही आलबेल सुरु होते. हॉटेल सुरु होऊन साधारण काही दिवसच लोटले असावे. दुपारची वेळ होती. अचानक चांगली फॉर्मल विजार आणि शर्ट वगैरे घातलेले ४ -५ लोक आत शिरले. विघ्नेशने त्यांना या, बसा वैगेरे म्हणायच्या आत ते स्वयंपाकघरात शिरले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विघ्नेश व कर्मचाऱ्यांना त्यांनी आपली "अन्न आणि प्रशासन" खात्याची ओळखपत्रे दाखवली आणि गप्प केले. काहीच सेकंदात त्यांनी कसल्या तरी चाचण्या वैगेरे केल्या आणि कागदपत्रांवर विघ्नेशची सही घेतली. त्यांच्या मुख्याने हॉटेल रव-साई देत असलेल्या पदार्थांत लोकांच्या आरोग्याला अत्यंत अपायकारक ठरू शकतील असे काही घटक आढळल्याची माहिती दिली. विघ्नेशने तर त्या घटकांची नावे देखील वाचली नव्हती. काहीच मिनिटात त्यांनी कागदपत्रे तयार केली व सगळ्यांना बाहेर जायला सांगत हॉटेल रव-साई सील केले. फक्त १० मिनिटात होत्याचे नव्हते झाले होते. वाड्यावर पुन्हा पेजेसारखी बातमी पसरली. हॉटेल रव-साई विक्रमी तिसऱ्यांदा बंद पडले होते - अगदी हॅट्ट्रिकच !

दिवस अगदी पंख लावून उडले. खिडकीबाहेरील पन्हाळीवर कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजानेच विघ्नेशला जाग आली. ९ वाजून गेले होते. आवडत्या अश्या धो-धो पावसात आपण घरा बाहेर पडू शकत नाही याचा त्याला आनंदच होता ! पावसाच्या सरींनी विघ्नेशचे मन शांत करून टाकले होते. काहीसा वेळ त्याने विचाराधीन होत खिडकीजवळ राहून पावसाच्या सरी बघितल्या. काही वेळ जाताच समोर दिसणाऱ्या देवळाच्या दिशेने नमस्कार करीत त्याने न्यानेश केटरर्स चा नंबर डायल केला !

कथालेख