थंडी संपून उन्हाळ्याचे संकेत देणाऱ्या थोड्याश्या गर्मीचे दिवस होते. कामतकाकांच्या जुन्या घड्याळाने दहाचा टोला दिला आणि तेवढ्यातच बरोब्बर १०:३० ला होणाऱ्या देवकीकृष्णाच्या आरतीला सुरुवात झाली. वास्तविकतः कामत काकांचे अर्धा तास पाठी असलेले पिढीजात घड्याळ कोणाचाच हात पोचणार नाही अश्या उंचीवर त्यांच्या आज्याने लटकवले होते. ते निखळवून सारखे करण्यास म्हणून खास अनंत मेस्तास स्टूलाची आर्डर दिली होती. पावसात दार उघडताना व बंद करताना खालून लागत होते ते नीट करण्यास जो अनंत आला नाही त्याचे स्टूल इतक्यात कुठे पोचणार ! दाराचे सांगायचे झाल्यास मग शेवटी जमिनीला आणखी ओरखडे पडू नये ह्या अनुशंघाने कामत काकांनीच खरवत दाराच्या खालच्या खाचेत घालून, दाराचे लाकूड किसून त्या समस्येचे निवारण केले होते ! असो. तर साडेदहा वाजले होते. तेवढ्यात,
"अहो तो शेजारचा काळा बोका ह्या २ -३ दिवसांत आला नाही न्हवे दूध प्यायला- मेला ह्याच वेळेंत यायचा"- कामत काकू
"तो येणारही नाही !"- कामत काका
"शिव शिव शिव शिव, कोणाच्या घश्यास लागला काय बिचारा- उंदरांस धाक होता बाकी-
अन काकूंनी वाक्य पूर्ण करायच्या आत वेशीवरच्या लायटीच्या टोवरकडून कसलासा आवाज झाला आणि लाईट गेली. बाकी लायटीचे जाणे हे तसे हे मासिक झाले होते. महिन्यांतून कमीत कमी एकदा तरी रात्रभर लायटीची परवड असायची. दुसऱ्या दिवशी सूर्य डोक्यावर येऊन, मग डिपार्टमेंट चे लोक येऊन शिडी लावून काय तरी करायचे व मग कुठे वाड्यावरल्या बायका मिक्सरवर वाटणाच्या कामास लागायच्या.
"सत्य खरे ! - कोणाच्या घश्यास लागला रे देवा- कामत काकूंनी वाक्य पूर्ण केले.
"त्याला मी आणि जोश्याने साकाच्या पिशवीत घालून नदीपार, पार तडीपार केले- पलीकडल्या सारगावात सोडूनच आलो मेल्यास - सांगशील कोणास तर खबरदार हा !
"अहो पण कशाला- बिचारा हो बिचारा"- आणि काकूंनी पुन्हा वाक्य पूर्ण करायच्या आत पुन्हा कसलासा आवाज झाला व लाईट आली. काकांनी नुकतीच लावलेली घडवंचीवरली मेणबत्ती विझवली, आणि "खाणे आणि पोट साफ करणे तेवढे आमच्या घरात-आणि बाकी वेळ त्यांच्या घरात - ह्याला काय अर्थ आहे ! असुदे. तू कुठे बोलू नको हे. माझ्या आवडती चटणी वाट जरा , चार घास जास्त जातील कदाचित. कामत काकांनी प्रत्युत्तर देत, ऑर्डर देऊन देवाकडे दिवा-बत्ती केली तर काकू चटणीच्या कामाला लागल्या. वाड्यावरील काही लोकांची जेवणे होऊन गाणी, नाच इत्यादींचे कार्यक्रम टीव्हीवर चालू होते. कामत काका, काकू आणि त्यांचा १२ वर्षांचा नातू विघ्नेश जेवायला बसले. पहिला घास घेणार तोच वेशीवरच्या लायटीच्या टोवरकडून कसलासा आवाज झाला आणि पुन्हा लाईट गेली. काकांनी आमटी वाढून घेतली व २ मिनिटे वाट पहिली.
"आता काही लाईट यायचे लक्षण दिसत नाही" असे म्हणत त्यांनी मेणबत्ती पेटवली. त्या अंधुक प्रकाशात त्यांना आपण भाताऐवजी लोणच्यावर आमटी वाढून घेतल्याचे लक्षात आले ! त्यांनी तशीच जेवणे उरकली. बिना फॅनची झोप काही पडणार नाही हे लक्षात घेऊन कामत, शेजारचे धुपकर, देवळाकडले साधले, नाईक, उघडे व गावकर काका एकमेकांची तासायला देवळाकडे जमले. बायका मंडळीही कामतकाकांच्या पडवीत गप्पांना बसल्या. विघ्नेश काही पुरुष मंडळींत घोळला नाही. त्याने कामत काकांची विजेरी उचलली व गावात फेरफटका मारण्यास तो निघाला. त्याच्या मागेमागे सावंतांचा गावठी कुत्रादेखील निघाला. वाटेवरील ३ -४ घरांतील लोकांची ओळख करून घेऊन विघ्नेश पुढे सरकला.कुळाघरातील पाट ओलांडून विघ्नेश सीमेजवळील टॉवरच्या कुंपणाकडे पोचला. तिथून मागे वळणार इतक्यात त्याला टॉवरकडे कसली तरी हालचाल दिसली. इतक्या रात्री डिपार्टमेंटचे लोक तिथे असणे शक्यच नव्हते. ४ लोक दबक्या आवाजात काही तरी बोलत होते.विघ्नेशने लगेच विजेरी बंद केली व टॉवरच्या कंट्रोल बॉक्समागे येऊन तो पाहू लागला. बॉक्सचे दार उघडेच होते- आतला मुख्य स्विच बंद करण्यात आला होता. काही सेकंदांतच त्यांच्या हालचालींनी वेग घेतला व तिथे असलेल्या टॉवर व लाईटच्या ३-४ खांबांवर त्या लोकांनी शिड्या लावल्या.हलक्याश्या चंद्रप्रकाशात त्यांचे काम चालू होते. त्यांच्या वेश्यावरून ते डिपार्टमेंटचे लोक नसल्याची विघ्नेशची खात्री पटली. कमालीच्या शांततेत त्यांनी आपली आयुधे बाहेर काढली व खांबांवरील वायर्स कापण्यास त्यांनी सुरुवात केली. विघ्नेशने पुढचा मागचा विचार न करता मुख्य स्विच चालू केला व क्षणात बंद केला ! चारही जण विजेच्या झटक्याने जायबंदी होऊन खाली कोसळले ! विघ्नेशने वेळ न घालवता अख्खा गाव जमवला.मुख्य स्विच चालू करताच लाईट आली व कधी नव्हे ते वेळेवर पोचलेल्या फौजदाराने चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्या जबानीवरून ते करीत असलेली विजेच्या वायर्सची व इतर उपकरणांची चोरी हेच गावातील अनियमित वीज पुरवठ्याचे कारण असल्याचे निष्पन्न झाले.काही वेळ टॉवरच्या कुंपणाला लॉक लावणे, इत्यादी सुरक्षा विषयांवर औपचारिक चर्चा झाली. शेवटी झोपेपुढे सगळेच हरले व सगळे घरी परंतु लागले. घरी परतत असताना सगळी मंडळी एन टेन प्रकारेन फक्त विघ्नेशच्या धाडसाचे कौतुक करीत होता. आपापल्या घरी पोचता- पोचताच गावकरी झोपी गेले. आजोबांच्या पोटाभोवती हात टाकून विघ्नेशहि झोपी गेला. आजीच्या चेहर्यावर एक हलकेसे हसू होते. वाड्यावर शांतता पसरली होती.फक्त एका रात्रीसाठी चिमुलवाड्यावर शांततेचे पांघरुण ओढले गेले होते !
समाप्त
प्रतिक्रिया
17 Apr 2020 - 4:37 am | सोन्या बागलाणकर
चांगली जमलीये कथा. पुलेशु.
17 Apr 2020 - 8:53 am | अभिनव प्रकाश जोशी
खूप खूप धन्यवाद !
17 Apr 2020 - 7:21 am | जव्हेरगंज
सुरेख लेखन! आवडले!!
17 Apr 2020 - 8:53 am | अभिनव प्रकाश जोशी
खूप खूप धन्यवाद !
17 Apr 2020 - 10:57 am | कंजूस
कसली घातकी कथा!
17 Apr 2020 - 1:16 pm | सुचिता१
चांगली आहे!!!