माझी आजी

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जनातलं, मनातलं
15 Apr 2020 - 9:53 pm

माझी आजी....आईची आई ....कमलाबाई नारायण हरिश्चंद्रकर!

उंच शेलाटा बांधा! नऊवारी साडी, लख्ख गोरी आणि घारे डोळे, मध्यम.....थोडे काळे, थोडे पांढरे अशा केसांचा बेताचा अंबाडा!

लाल मोठ्ठे कुंकू लावलेले मी तिला क्वचितच पाहिले. आमच्या लहानपणीच आजोबा वारले त्यामुळे कुंकू न लावलेला तिचा चेहरा अधिकच गोरा दिसायचा.

ती भायखळ्याला राहायची. लहानपणी मी तिथे जात असे. आजोबा वारल्यानंतर ती डोंबिवलीला मामाकडे राहायला आली. आम्ही लहान असताना ती आमच्याकडे डोंबिवलीला यायची. बरोबर एक पिशवी...त्यात तिचे कपडे, औषधे इत्यादी सामान असायचे. ती सतत उद्योगात असायची. रिकामे बसणे, आराम करणे तिच्या स्वभावात नव्हते. ती कणकेचा मोठ्ठा गोळा भिजवायची आणि खाली बसून स्टोववर पोळ्या करायची. आम्ही तीन भावंडे....आम्हाला हाका मारायची....गरम गरम पोळ्या खायला बसवायची. तेल-मीठ पोळी गुंडाळी करून द्यायची व पोटभर खाऊन घ्या ..मग सारखं सारखं भूक भूक करायचे नाही, असे म्हणायची. तिच्या पोळ्या चांगल्या मोठ्या असायच्या. आम्ही लहान असून दोन-दोन पोळ्या खायचो. पोळ्या लाटण्यासाठी घेतलेली उरलेली थोडी सुखी कणिक असे, त्याचे धिरडे करून ती व आई खायच्या. आमचा त्यावरही डोळा असायचा...कधी कधी एखादा तुकडा आम्हाला मिळायचा. आम्हालाही ती सतत काहीतरी काम सांगायची. आईला त्रास द्यायचा नाही, असे बजावून सांगायची. स्वतःही सतत काम करत असायची. आईकडून लसूण सोलायला मागून घ्यायची. भाजी घेतली की ती निवडून ठेवायची, कोथिंबीर निवडून ठेवायची. मिरच्यांची डेखे काढून ठेवायची. कढीपत्त्याची पाने काढून एका डब्यात भरून ठेवायची. काम करताना सतत सूचना करायची. मिरच्यांची डेखे काढून ठेवली की ती अधिक दिवस टिकतात म्हणायची...त्याकाळी घरी फ्रीज नव्हता. कडीपत्ता वाळला तरी त्याचा वास टिकून राहतो पण कुसला तर मात्र वास रहात नाही, म्हणून पाने काढून ठेवायची. मिरच्या उभ्या आणि लांब तुकडे अशा चिरायच्या म्हणजे पदार्थात त्या काढून टाकायच्या असतील तर दिसतात आणि तिखटपणा टिकून राहतो. शिवाय उभी चिरल्यामुळे कमी मिरची लागते. अशा तिच्या सूचनांचे मी आजही पालन करते.

तिने केलेली टोमॅटोची आमटी मला फार आवडायची. त्यात ती कढीपत्ता घालायची. आम्हाला गरम गरम आमटी-भात वाढायची. कडे-कडेने जेवा, म्हणजे बाकीचा भात निवेल असे सांगायची. बाहेर अजिबात सांडू द्यायचे नाही, त्या अन्नावर एका चिमणीचे पोट भरेल असे म्हणायची. म्हणजेच अन्न वाया न दडवता ते सर्व प्राणीमात्रांना मिळावे असे तिला म्हणायचे असायचे. पानात काही टाकायचे नाही. जेवण झाले की ताट पण लख्ख व्हायला हवे. तूप, लोणी ज्या ठिकाणी वाढले असेल तो भाग बोटाने चांगला निपटून घ्या, असे सांगायची. म्हणजे फुकट जात नाही आणि तिथे राखाडी चिकटून बसत नाही. अशा तिच्या सूचनांमधून तिची टापटीप, निगुतीने काम करण्याची सवय दिसून यायची. जेवणानंतर भांडी, ताटे धुऊन ठेवायची तिची पद्धत होती. म्हणजे भांडी घासायला कमी वेळ लागतो, साबण कमी लागतो, पाणी कमी लागते. आणि महत्वाचे म्हणजे आपले खरकटे दुसर्यांना साफ करायला लागत नाही. प्रत्येक काम करताना ते असे का करायचे हे ती सांगायची, त्यामुळे तिचे संस्कार मनावर आपोआपच बिंबत गेले. तिला आईची खूप काळजी वाटायची. कधी कामाला बाई आली नाही तर ती आईला भांडी घासू न देता स्वतः घासायची. थोडी असली तर मलाही घासायला सांगायची.

आमच्या मुलांच्या खाण्यापिण्याची सुद्धा तिला खूप काळजी असायची. त्यावेळी हातगाडीवर चुरमुरे विकायला यायचे. आवाज ऐकला की ती लगेच भावाला चुरमुरे आणायला पाठवायची. मग कांदा चिरायची. चुरमुर्यांमध्ये तेल, तिखट, मीठ व कांदा घालून आम्हाला खायला द्यायची. खाण्यासाठी वर्तमानपत्राचे कागद आम्हाला फाडायला सांगायची, त्याचबरोबर निट चौकोनी फाडा, वेडेवाकडे फाडू नका. मग आम्हीही मन लावून नीट कागद फाडायचो. अशी प्रत्येक बाबतीत तिची टाप-टीप असायची. कधी मामाकडे जायचो आम्ही. मामी नोकरी करायची. मग ती भावाला जवळच्या दुकानातून ब्रेड आणायला सांगायची. भरपूर चहा करायची आणि ‘पोटभर खाऊन घ्या’ असे सांगून आम्हाला चहा ब्रेड खायला घालायची.

बसल्या बसल्या ती कपड्यांच्या घड्या करायची. कधी आईला सांगायची... शर्टाची गुंडी तुटलेय ..सुई-दोरा आण, मी लावून देते. ती बटणाला गुंडी म्हणायची. तांब्याला लोटी म्हणायची. ‘तुझ्या परकारची कड उसवलेय...मी शिवून देते.’ असे तिचे बारकाईने सगळीकडे लक्ष असे.

ती बसल्या बसल्या आमच्याकडून कामे करून घ्यायची. उभी आहेस तर मला लसूण आणून दे, उभी आहेस तर पाण्याची तोटी बदल, उभी आहेस तर दुधाकडे लक्ष दे ... असे म्हणता म्हणता ती माझ्याकडून पाच-दहा कामे करून घ्यायची. मग मोठी झाल्यावर मी मनातल्या मनात म्हणायचे.. तू बसूनच देत नाहीस तर उभीच राहणार ना!’ पण मोठ्याने असे म्हणायची प्राज्ञा नव्हती. दुधाची पातेली घासताना ती खाली लागलेली साय अगदी निपटून चाटून खायची. अन्न वाया न घालवणे, स्वच्छता, काटकसर, टापटीप,चटपटीतपणा ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

तिला खूप गरमा व्हायचा. सतत पंखा चालू लागायचा. लाईट जाताक्षणी ती दोन्ही हातांचे पंजे पंख्यासारखे हलवायची व तोंडाने शुssssss असा आवाज करत हाताने वारा घ्यायची. तिच्या या सवयीला सगळे हसायचे. मोठे झाल्यावर आम्हीही तिची नक्कल करून हसायचो.

आम्ही भायखळ्याला तिच्याकडे जायचो. दोनच खोल्यांचे तिचे घर, तिने अगदी स्वच्छ ठेवलेले असायचे. तांब्या-पितळेची भांडी, डबे लख्ख घासलेले असायचे. मोरी स्वच्छ घासलेली, जराही कुठे घाण नाही. स्वयंपाकघरात कुठेही पसारा नाही, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे. तिथे पाणी कमी यायचे. ती वाट्या भांड्यांपासून सगळ्यात पाणी भरून ठेवायची आणि ते कमालीच्या काटकसरीने वापरायची. तरीही स्वच्छता कमी पडायची नाही. तिथे गॅस शेगडी खाली ठेवलेली असायची. ती खाली बसून स्वयंपाक करायची. बोट दाखवून ती मला एखादा डबा द्यायला सांगायची. मी इकडेतिकडे बघू लागले की ‘माझ्या बोटाकडे बघ..’, असे सांगायची, व तिला हवा असलेला डबा किंवा वस्तू माझ्याकडून काढून घ्यायची.

आम्ही मुलांनी अधेमध्ये आडवे झालेले तिला अजिबात आवडायचे नाही. आजकालच्या मुलांना बुडं नाहीत, असे म्हणायची. तिला टूथपेस्टने दात घासत तिच्यासमोर गेलेले अजिबात आवडत नसे. ती राखुंडीने दात घासायची. ती साबण न लावता अंघोळ करायची. ‘बघा, माझ्या अंगावर मळाची पुटं चढली आहेत का,’ असे म्हणायची.

फावल्या वेळात ती लोकरीची व क्रोशाची तोरणे व रुमाल करायची. मण्यांची तोरणे व पानाभोवती मांडण्यासाठी मेहरपी करायची. माझ्या लग्नात पंगतीत तिने केलेल्या मेहरपींनी पाने सजली होती. माझ्या सासरची मंडळी खुश झाली होती. तिने मला दिलेला क्रोशाचा रुमाल व मण्यांचे तोरण आजही माझ्याकडे आहे.

तिचे पाय खूप दुखायचे. पोटर्यांपर्यंत क्रेप बॅंडेजने पाय बांधून घ्यायची. कधी कधी आम्हां मुलांना ती पायावर पाय द्यायला सांगत असे. आम्ही आलटूनपालटून पाय द्यायचो. ती म्हणायची, तुम्हाला कंटाळा आला की बंद करा, तुम्ही द्याल तितके मला गोडच वाटते आहे. पण कंटाळा आला असे आम्ही कधी म्हणायचो नाही. मग तिच पुरे करायला सांगायची. मोठ्यांना नमस्कार केलाच पाहिजे याबाबत ती आग्रही असायची. ‘नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा’, असे सांगायची.

माझा साखरपुडा होता तेव्हा इडली-चटणी व पन्हे करा असे तिने सांगितले, इडली सगळ्यांना आवडते, तेल-तूप पण नाही. तेव्हा इडल्या वाफवून काढायला ती स्वतः बसली होती. ती स्वतः नीटनेटके काम करायची व बाकीच्यांकडून पण तसेच करून घ्यायची. पन्ह्यासाठी लागणारा कैर्यांचा गर तिने स्वतः तासभर बसून काढला होता. माझ्या बाबांना प्रेशर कुकर मधला भात आवडत नसे. त्यामुळे त्यांनी आईला कुकर घेऊ दिला नव्हता. पण प्रेशर कुकर सोयीचा असतो म्हणून माझ्या लग्नात आजीने तो आईला भेट दिला. लग्नानंतर ती माझ्याकडे मंगळागौरीला आली होती. तेव्हासुद्धा सकाळी लवकर उठून तिने सर्व भाज्या चिरून दिल्या होत्या. माझ्या बाळंतपणाच्या वेळी सुद्धा ती आईच्या मदतीला हजार होती. तिने माझ्यासाठी डिंकाचे लाडू केले होते. त्यात खूप पदार्थ घातले होते. त्यावेळी ते पदार्थ सहजी मिळत नसत. माझ्या बाबांनी ते मुंबईहून आणून दिले होते. वयाच्या सत्तरी-पंचाहत्तरी पर्यंत ती एकटीने प्रवास करायची.

तोंड घट्ट असावे, उगाच जास्त बोलायचे नाही, इकडचे तिकडे करायचे नाही, असे ती सांगायची व तसेच वागायची. तिच्या या स्वभावामुळे तिने कदाचित त्रास सहन केला असेल पण तो ही कधी सांगितला नाही. स्वभावाने ती खूप भित्री आणि सहनशील होती.

तिचे माहेर नागपूरचे. तीन भावांची ती एकुलती एक लाडकी बहिण होते. माहेरची श्रीमंती, पण सासरची परिस्थिती मात्र बेताची. आजोबा रेल्वेत होते. सरकारी नोकरी या एका निकषावर तिचे वयाच्या तेराव्या वर्षी लग्न झाले. तिच्या व आजोबांच्या वयात सोळा वर्षाचे अंतर होते. तिला अकरा मुले झाली. त्यापैकी सहा जगली. तीन मुले व तीन मुली. तिने आयुष्यात खूप दु:ख सहन केले. माझ्या आईच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांची आत्या होती. ती बालविधवा होती. लाल साडी नेसायची. केशवपन करायला न्हावी यायचा. तिचे सोवळे खूप कडक होते. तिला आजोबांनी व पर्यायाने आजीने सांभाळले. आजोबा लवकर वारले. माझ्या एका मावशीचे तरुणपणातच देहावसान झाले, एका मामीची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पण घट्ट तोंड मिटून ती सर्व काही सहन करायची. तिला निद्रानाशाचा विकार होता. त्याचे कारण काळजी, चिंता, भीती हेच असणार.

पोट बिघडल्याचे छोटेसे निमित्त होऊन ती गेली, त्यावेळी वयाची ऐंशी तिने पार केली होती. पण संस्कार रुपात अजूनही ती माझ्या आठवणीत आहे.

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

17 Apr 2020 - 5:54 am | ज्योति अळवणी

खूपच उत्तम वर्णन आहे आजीचे

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा

वाह, अतिशय ह्रुद्य व्यक्तिचित्रण !
माझ्या आजीची आठवण झाली. ७१-७२ च्या दुष्काळी वेळे छोट्या-छोट्या गोष्टींअध्ये काटकसर करून संसार रेटला तिने.
त्या पिढीतल्या स्त्रीया होत्याच तशा कष्टाळू !

आपण आजीच वर्णन इतक सुंदर केले आहे की कुणालाही आपल्या मायाळू आजीची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. आपली निरक्षण शक्ती खूपच चांगली आहे. मी पण अशाच भरलेल्या परीवरात वाढलो, त्या मुळे कदाचित हा लेख वाचल्यावर मला जुन्या भावविश्वात घेऊन गेला. संध्याकाळी बाबा आपल्याला रागवणार असे वाटले की आम्ही आजीच्या पदरात लपून बसत असत. घरगुती अनेक औषदे तीला माहीत असायची. दोन बहिणीच्या मध्ये भांडण झाली की त्यांच्या मध्ये ती झोपायची.
खूप सुंदर वर्णन.

ऋतु हिरवा's picture

21 Apr 2020 - 6:38 pm | ऋतु हिरवा

आपण माझा लेख वाचलात व प्रतिक्रिया दिल्यात त्यासाठी मनापासून धन्यवाद! सुचानंचेही स्वागत आहे

चांदणे संदीप's picture

21 Apr 2020 - 6:51 pm | चांदणे संदीप

आजीचे व्यक्तिचित्रण आवडले. अशी माणंस जातातच का मुळी असा मला नेहमीच प्रश्न पडत आलेला आहे.

सं - दी - प

ऋतु हिरवा's picture

22 Apr 2020 - 5:08 pm | ऋतु हिरवा

आपली माणसे नेहमीच आपल्या जवळ असावीत असे आपल्याला वाटते, पण इथे आलेल्या प्रत्येकाला कधी न कधी तरी जायचेच असते. मी लेखात म्हटल्याप्रमाणे संस्कार रुपात ती आपल्या आठवणीत राहतात.

गामा पैलवान's picture

5 May 2020 - 6:08 pm | गामा पैलवान

चांदणे संदीप,

अशी माणंस जातात ती तुम्ही त्यांच्यासारखं व्हावं म्हणून.

आ.न.,
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

26 May 2020 - 9:40 am | चांदणे संदीप

खरंय तुमच.
विंदा म्हणतात तसे,

देणार्‍याने देत जावे;
घेणार्‍याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे !

असं केलं तरंच सर्वांना असह्य वाटणारं हे जीवन, काहीजणांना सुसह्य होऊ शकेल.

धन्यवाद!

सं - दी - प

चलत मुसाफिर's picture

22 Apr 2020 - 2:17 pm | चलत मुसाफिर

लेख अतिशय आवडला. अशा कुटुंबसमर्पित व्यक्तींची शब्दचित्रे प्रेमाने व तपशीलवार लिहून ठेवणे व ती निदान सर्व आप्तेष्टांपर्यंत तरी पोचवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

ऋतु हिरवा's picture

22 Apr 2020 - 5:08 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद __/\__

वामन देशमुख's picture

22 Apr 2020 - 4:20 pm | वामन देशमुख

एकूण शब्दचित्र आवडलं. आजीचं व्यक्तिमत्व बरंचसं डोळयांपुढे उभं राहिलं. तथापि, लिखाणाच्या मांडणीत सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. म्हणजे, हा लेख दुसऱ्या एका व्यक्तिचित्राच्या नोट्स काढल्या आहेत असं वाटतं.

दुसर्या व्यक्तिचित्राच्या या नोट्स नक्कीच नाहीत. आजी जशी माझ्या आठवणीत आहे, तसे मांडले आहे. मांडणीत नेमकी काय सुधारणा हवी आहे याचे कृपया मार्गदर्शन करावे. नक्कीच अमलात आणीन.

माझ्या आजीच्या आठवणीने कधी डोळे पाणावले कळालंच नाही.. तुमच्या आजीबद्दल वाचताना मला माझ्या आजीसोबत परत एकदा जगता आलं.. मनापासुन धन्यवाद! :)

अश्विनि नरेन्द्र जोशि's picture

5 May 2020 - 5:49 pm | अश्विनि नरेन्द्...

मझि आजि पन अगदि सेम अशिच आहे

गामा पैलवान's picture

5 May 2020 - 6:09 pm | गामा पैलवान

ऋतु हिरवा,

व्यक्ती व व्यक्तिचित्रण फक्कड जमलंय.

आ.न.,
-गा.पै.

Prajakta२१'s picture

26 May 2020 - 11:19 pm | Prajakta२१

खूप छान लिहिलेय पु ले शु

डोळ्यापुढे उभी राहिली आजी तुमची, छान व्यक्तिचित्रण !!!