कार्यकारणभाव (लघुकथा)

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
6 Apr 2020 - 4:55 pm

वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे.
माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ?
आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ?
बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे"
इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही"..
निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्‍यांना न्युमरोलोजीने पछाडले.
तर आईची अजूनच वेगळी तर्‍हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे. तुझ्या काकांनी घेतली होती दोनदा एकदा अपघात झाला , एकदा चोरीला गेली"
मी तर्कशास्त्राचा प्राध्यापक पण माझ्याच घरात हे असले सगळे अंधश्रद्धाळू पात्र. पण ते काही नाही मी सगळ्यांना ठणकावून सांगितलं "मला कार घ्यायची आहे आणि ती मी घेणारच. आणि सध्या ऑफरही चांगली चालू आहे तर दोन महिने थांबून स्वतःचे नुकसान करुन घेणार नाही. आणि मुद्दाम विशिष्ट बेरजेचा क्रमांक मिळण्याकरिता लागणारे चारपाच हजार रुपये पण खर्च करणार नाही. माझ्याकरिता सगळे क्रमांक सारखेच आहेत. आणि हो प्रत्येक गोष्टीला काही कार्यकारणभाव असावा लागतो , तुमच्या अंधश्रद्धा तुमच्यापाशीच राहू द्या."
संसारी पुरुष आयुष्यात फारच कमी वेळा स्वतःचे म्हणणे रेटून तेच खरे करतो. आमच्या बाबतीत "हीच ती वेळ" असल्याने यावेळी मी कुणाचे ऐकणार नाही हे आता घरच्यांना समजून चुकले आणि माझा कार्यकारणभाववाला मुद्दा पटला नाही तरी सगळ्यांनी विरोध/हट्ट आवरते घेतलेत.

------
"काय झाले ? केली का कार बुक ?" बुकींगसाठी म्हणून सकाळी मित्राबरोबर बाहेर पडलो होतो. वाहनांमधल्या जाणकार मित्राळा बरोबर घेतलं होतं. आता दोघे घरी परतलो आणि दारातच सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरांनी आणि प्रश्नांनी स्वागत झाले
मी नकारार्थी मान डोलावली.
"का रे काय झाल ?"
"कार घेण्याचा बेत रद्द झाला का ?"
एक ना दोन अनेक प्रश्न.. उत्तर देणं कठीण होतं.
"नाही. पण एखादा महिना थांबून मग घेईन " मी कसाबसा उत्तरलो "एखाद्या महिन्यात होईल ना रे ?" मित्राकडे बघत मी विचारलं.
"हो होईल बहुतेक तरी.." मित्र उत्तरला
"का बरं काय अडचण झाली ? फायनान्स नाही मिळाले का ?" बाबांचा प्रश्न
मला वैताग आला या प्रश्नांचा पण प्रश्न काही थांबतच नव्हते.
"ते थोडा वाहन क्रमांकाच्या सिरीजचा प्रॉब्लेम झाला काका. महिनाभरात ही सिरीज संपेल बहुधा मग पुढच्या सिरीजमधली गाडी बुक करु" न राहवून शेवटी मित्र म्हणाला.
छ्या.. हे सगळं सांगायची काही गरज होती का ? गप आला तसा चहा ढोसून निघायचं ना ? गाडी बुक झाल्यावर दारु पण ढोसायला दिलीच असती ना. पण आता याने पंचाईत केली माझी.
"सिरीजचा प्रॉब्लेम म्हणजे ? काय झालं ?" आता नवीन प्रश्न चालू झालेत.
एव्हाना मित्राने माझ्या चेहर्‍यावरची नाराजी टिपली होती. त्यामुळे त्याने आता मौन पाळले. पण आता काय उपयोग ? प्रश्न थांबणार नव्हतेच.
"अहो.. जरा कळेल असं काही सांगाल काय ?" पुर्ण गोष्ट न समजता गप्प बसली तर ती बायको कसली.
"काही नाही. सध्या वाहन क्रमांकाची जी सिरीज चालू आहे ती जरा ठीक नव्हती म्हणून थोडं लांबणीवर टाकलंय इतकंच. आता प्रश्न आवरुन थोडा चहा पाजणार का दोघांना?" मी वैतागत म्हणालो.

ही मात्रा लागू पडली. प्रश्न थांबलेत. जरा वेळ शांत गेला.
पंधरा मिनटात पोहे, चहा, बिस्कीट असं सगळं समोर आलं.
पण गरमागरम पोह्यांसोबत थांबलेले प्रश्नही पुन्हा चालू झालेत
"नाही म्हणजे मला तुमच्या इतकं कळत नाही हो.. पण सिरीज चांगली नव्हती म्हणजे काय ? "
"म्हणजे चांगली नव्हती..बसं" मी वैतागून.
"असं कसं सगळे अंक तुमच्याकरिता सारखे तर मग सगळी अक्षर पण सारखीच असतील ना हो? नवर्‍याला कोंडीत पकडायचा एखादा कोर्स करुन आलेल्या असतात का बायका ?
"पोहे छान झालेत गं.. अजून असतील तर आण ना" माझा विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न.
"नाही म्हणजे फक्त सिरीजमुळे बुकींग लांबणीवर टाकलंत तर त्याचा काहीतरी कार्यकारणभाव असेलच ना ?"पोह्यांची तारिफ करुनही काही फायदा झाला नाही.
"ते तुला नाही कळायचं. तु पोहे आण" पुन्हा वैतागास्त्राचा प्रयोग

बायकोने आतुन पोहे आणून दोघांना वाढलेत.
"थोडं विस्ताराने सांगितलंत तर कळेल ना.. म्हणजे मी काही तर्कशास्त्राची प्राध्यापक नाही पण तेवढीच थोडी माझ्या ज्ञानातही भर.. "साम-दाम-दंड ई सगळे अस्त्र जिच्यासमोर निष्प्रभ ठरतात ती म्हणजे बायको.
"अहो वहिनी ती सिरिज त्याला आवडली नाही.. म्हणजे आवडण्यासारखी नाहीच म्हणा ती.. आता लोकं घेतात गाड्या नाईलाजानं. पण याची आयुष्यातली पहिलीच कार ना ?" मी लपवू पहात होतो हे महाशय उलगडत होते.. वहिनींच्या खाल्या पोह्यांना जागत होता बहुधा. असो आपलीच बायको नी आपलाच मित्र. काय बोलणार आता.
"पण असं होतं तरी काय त्यात न आवडण्यासारखं ?" तसा मी स्त्री सक्षमीकरणाचा समर्थकच आहे पण कधी कधी या भुमिकेचा पश्चाताप व्हावा असे प्रसंग घडत राहतात.
"अरे पण होती तरी काय ती सिरीज ?" कधी बायको तर कधी आई.. कुणी ना कुणी प्रश्न विचारतच होते.
"जी यू" ..प्रश्नांचा अतिरेक सहन झाल्याने मी उत्तरलो आणि मी सोडून सगळे हास्यकल्लोळात बुडाले.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

जानु's picture

6 Apr 2020 - 9:48 pm | जानु

हा हा हा झकास!!!

सुचिता१'s picture

6 Apr 2020 - 11:03 pm | सुचिता१

मस्त!

कुमार१'s picture

7 Apr 2020 - 3:34 pm | कुमार१

मस्तच.

मराठी कथालेखक's picture

9 Apr 2020 - 4:00 pm | मराठी कथालेखक

जानु , सुचिता, कुमार
धन्यवाद..

राघव's picture

9 Apr 2020 - 4:21 pm | राघव

मस्त! भारीये.. :-)

मराठी कथालेखक's picture

12 Apr 2020 - 4:49 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद राघव

माझिया मना's picture

16 Apr 2020 - 11:49 pm | माझिया मना

मस्तच

मराठी कथालेखक's picture

17 Apr 2020 - 11:03 am | मराठी कथालेखक

धन्यवाद माझिया मना