वीर चक्र

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
1 Apr 2020 - 8:24 pm

वीर चक्र
हि एक कहाणी आहे वीराची त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलेली.
१९९१ मध्ये मी एम डी करायला ए एफ एम सी मध्ये गेलो. तेथे आम्हाला असलेले सहयोगी प्राध्यापक(associate professor) कर्नल एन एन राव ( नळगोंडा नरसिम्ह राव) यांच्या खोलीच्या बाहेर पाटी होती
COL N N RAO
कर्नल एन एन राव
Vr C , SM
वीरचक्र सेना मेडल
(associate professor)
सहयोगी प्राध्यापक

ते आमच्यासाठी व्याख्याते शिकवणारे प्राध्यापक आणि (थिसीस)प्रबंधासाठी माझ्या मित्राचे मार्गदर्शक (गाईड) होते त्यामुळे त्यांच्या खोलीत रोज जाणे येणे असेच. महिन्या दोन महिन्यांनी भीड चेपली तेंव्हा मी त्यांना विचारले कि सर तुम्हाला वीर चक्र मिळाले त्याची कहाणी काय आहे?
त्यांनी अरे वो कुछ नही है म्हणून टाळले. हा माणूस अतिशय विनम्र होता आणि स्वतःबद्दल कधीच काही बोलत नसे.

असे करता करता एक वर्ष व्हायला आले आणि राव सरांच्या मुदतपूर्व निवृत्तीचा अर्ज मंजूर झाल्याची बातमी आली. अशा परिस्थितीत एकदा आम्ही त्यांच्या खोलीत कॉफी पित असताना मी सरांच्या खनपटीसच बसलो कि सर आज काही झालं तरी तुमची वीर चक्र मिळाल्याची कहाणी ऐकल्याशिवाय मी जाणारच नाही. फार आढेवेढे घेत त्यांनी आपली कहाणी सांगितली.

१९९१ साली ऐकलेली कहाणी आहे. जेवढे आठवते आहे त्याप्रमाणे लिहिले आहे. तपशिलात काही चूक होण्याची शक्यता आहे तेंव्हा अगोदरच क्षमस्व.

हि १९७१ च्या युद्धातील कहाणी आहे. सर ए एफ एम सी मधून एम बी बी एस करून आर्मीत कॅप्टन एन एन राव म्हणून तैनात होते. युद्ध झाले तेंव्हा ते ५ (किंवा ६) जाट रेजिमेंटमध्ये रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते. प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटले तेंव्हा ते अमृतसर जवळ खेमकरणच्या पुढे सीमेवर आपल्या रेजिमेंट बरोबर होते.

रेजिमेंट मध्ये डॉक्टरच्या दवाखान्याला RAP (REGIMENTAL AID POST) म्हणतात. युद्ध चालू असताना त्यांच्या रेजिमेंटच्या काही तुकड्या आपली सरहद्द ओलांडून पाकिस्तानात घुसल्या होत्या तेंव्हा त्यांच्या पुढे एक कालवा आडवा आला होता. या कालव्याच्या अलीकडे एका टेकाडाच्या मागे सरानी आपले ADS( ADVANCED DRESSING STATION) स्थापित केले होते. त्यांच्या तुकड्या कालव्यावर दोन तीन तात्पुरते पूल उभे करुन पलीकडे चढाई करत होते. सर्वत्र गोळीबार आणि रणगाड्यांचा धुमाकूळ चालूच होता. सर आपल्या ADS मध्ये बसून जखमी होणाऱ्या सैनिकांवर उपचार करत होते आणि ज्यांना अधिक उपचाराची गरज होती त्यांना रुग्णवाहिकेत टाकून मागे RAP (REGIMENTAL AID POST)किंवा लष्करी रुग्णालयाकडे रवाना करत होते.

मध्येच एकदा सरांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पोखरीयाल आपल्या जीपमध्ये येऊन अत्यन्त घाईघाईत तयारी आणि स्थिती पाहून गेले.
जाताना त्यांनी (कर्नल पोखरीयाल) सरांना स्पष्ट शब्दात सुनावले होते कि तू ADS सोडून कुठेही जायचे नाहीस.

काही वेळाने एक सैनीक नाईक बलबीर सिंह सरांकडे येऊन म्हणाला सर मेरा साथीदार (बडी) नाईक भंवर सिंह बहुत बरी तरह से घायल हुआ है और उसका काफी खून बह गया है, लेकिन वो अपनी हिम्मत नही हारा है! वह मुझे बोल रहा था तुम सिर्फ डॉक्टर साहब को बुलावा भेज दो, वो मुझे जरूर बचायेंगे. डॉक्टर साहेब आप जल्दी चलीये!
इतक्यात सरांच्या सहाय्यकाने त्याला सांगितले कि तुम उसको इधरहि ले आओ! सरको यहांसे कहीं भी जाने के लिये "सी ओ साहब" ने सख्त मन किया है! वो नहीं आयेंगे!
यावर बलबीर सिंह म्हणाला "सर कैसे तैसे भी उसका रक्त बहना हमने रोका है, थोडीसी भी हलचल होने से फिर खून बहना चालू होता है! अगर आप आयेंगे तो हम उसको वापस ले आ सकते है!

यावर कॅप्टन राव ताबडतोब आहे त्या स्थितीत तयार झाले सहाय्यक मना करत असतानाहि ते आपली जीप घेऊन कालव्याच्या काठापर्यंत पोहोचले. आपल्या तोफखान्याला कव्हर फायर देण्यास सांगून त्यांनी रांगत कालवा पार केला. त्याच्या पलीकडे जाऊन एक चिंचोळा मार्ग होता. त्यातून सरपटत लपत लपत हे त्या सैनिकांपर्यंत पोहोचले. तो सैनिक त्याच्या साथीदारांसकट एका छोट्याशा टेकडीच्या मागे लपलेले होते. परंतु मधला मार्ग फार धोक्याचा होता आणि त्यावर सतत गोळीबार चालू होता.

सर तिकडे पोहोचले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले कि त्याच्या पायाची शीर(नीला) गोळीमुळे कापली/ फाटली गेली आहे आणि पायाच्या एक विशिष्ट स्थितीत फक्त रक्त स्त्राव होत नाहीये.

त्यांनी पटकन आपल्या गणवेशातून एक आर्टरी फोरसेप काढला आणि ती नीला बंद केली तेथे तात्पुरते बँडेज लावून त्याचे ड्रेसिंग केले. आता त्या सैनिकाला(भंवर सिंह) आपल्या पायातून रक्तस्त्राव होत नाही हे पाहून हुरूप आला. तो बलबीर सिंह ला म्हणाला देखा मैने कहा था तुम्हे डॉक्टरसाहेब मुझे बचा लेंगे!

या वेळेपर्यंत डॉक्टर राव हे कालवा ओलांडून पलीकडे गेले आहेत हि बातमी सी ओ कर्नल पोखरीयल पर्यंत पोहोचली होती. त्यांनी आपला मोर्चा कालव्यावर वळवला आणि गोळ्यांच्या प्रचंड भडीमाराच्या आडोशा खाली कॅप्टन राव, भंवर सिंहला घेऊन कालवा पार करून परत मागे आणण्यास कुमक दिली .
सरांनी भंवर सिंह ला ए डी एस मध्ये व्यवस्थित ड्रेसिंग करून बँडेज बांधले. सलाईन लावून त्याची सोय लावली गेली.

एवढ्या वेळात कर्नल पोखरीयल आले आणि त्यांनी कॅप्टन रावना न भूतो न भविष्यती अशा शिव्या घातल्या आणि सांगितले डॉक्टर तुला स्पष्ट सांगितले होते कि तू ए डी एस सोडून कुठेही जायचे नाहीस. युद्धाचे काही आडाखे असतात. डॉक्टर नसेल तर हजारात ३० कॅजुअल्टी होतात आणि डॉक्टर असेल तर १० म्हणजे डॉक्टरच्या आयुष्याची किंमत हि २० सैनिकांच्या आयुष्य इतकी आहे. एक सैनिक गेला तर मला ते परवडू शकते. डॉक्टर गेलेला नाही. एवढं असून तू का गेलास?

त्यावर कॅप्टन राव म्हणाले कि सर त्या सैनिकाचा माझ्यावर इतका भरवसा होता तो मी कसा तोडू शकतो?

त्यावर कर्नल पोखरीयल यांनी परत शिव्यांचा भडीमार केला आणि म्हणाले कि मुर्खा तू ज्या भागातून गेलास तो शत्रूचा भाग होता आणि कालव्याच्या अलीकडे शत्रूने स्वसंरक्षण म्हणून भूई सुरुंग पेरून ठेवले होते. तुझी जरा जरी चूक झाली असती तर तुझ्या चिंधड्या उडाल्या असत्या तुला माहिती नव्हतं का? कॅप्टन राव यांनी नकारार्थी मान हलवली.

त्यावर कर्नल पोखरीयल यांनी परत शिव्या देउन कॅप्टन रावला जागचे न हलण्याचा हुकूम दिला.

मी कर्नल रावना विचारले कि सर तुम्हाला खरंच माहिती नव्हते कि तेथे भुई सुरुंग आहेत तेंव्हा सर म्हणाले कि मला माहिती होती पण आपल्या सैनिकाचा एवढा प्रचंड विश्वास आपण धुळीला कसा मिळवणार?

यावर मी सरांना विचारले कि मग याबद्दल तुम्हाला एखादे वेळेस कोर्ट मार्शल झालं असतं, ते वीरचक्र कसं मिळालं ?

त्यावर ते म्हणाले हे जाट लोक फार आडमुठे असतात. त्यांना कळलं कि डॉकटर साहेब आपली जीवावर उदार होऊन आपल्या सैनिकाला वाचवायला आले ते पाहून त्यांनी न भूतो न भविष्यती असा प्रतिहल्ला चढवून तीन दिवसात जिंकण्याची योजना असणारे ठाणे एका दिवसात जिंकून घेतले.

मी सरांना विचारले कि कर्नल पोखरीयल काय म्हणाले.

सर म्हणाले -- युद्ध संपल्यावर कर्नल पोखरीयलनि मला नोटीस दिली कि तू माझ्या आदेशाचे उल्लंघन केलेस तेंव्हा मला भेटायला ये. मी गेलो तेंव्हा त्यांनी मला स्वतःचा जीव धोक्यात घातल्याबद्दल भरपूर शिव्या दिल्या. परंतु त्याच वेळेस वीर चक्र देण्यासाठी शिफारस केली आणि मी जाताना म्हणाले डॉक्टर मला माहिती होतं कि तेथे भुई सुरुंग आहेत हे तुला माहिती आहे आणि त्यासाठीच तुला जागेवरून हलू नकोस सांगण्यासाठी मी स्वतः आलो होतो.

पण जाट रेजिमेंट मध्ये काम करून तू पण फार आडमुठा झाला आहेस.

हि कहाणी ऐकून मी आणि माझे दोन वर्गमित्र अवाक आणि सुन्न झालो होतो. डोळ्यात पाणी तरळले होते.

सर आम्हाला म्हणाले आता तुम्ही जा आणि हि कहाणी कोणालाही सांगायची नाही. तुमच्या नादाला लागून मी पण उगाच वाहवत गेलो.

आम्ही तिघे उठलो. एक कडक सॅल्यूट ठोकला आणि मागे फिरलो.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

1 Apr 2020 - 9:12 pm | सौंदाळा

प्रेरणादायी प्रसंग

रषातु's picture

1 Apr 2020 - 10:35 pm | रषातु

जाट बलवान, देश भगवान..
डॉ राव ना सॅल्युट

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2020 - 3:20 am | श्रीरंग_जोशी

कर्नल एन एन राव यांच्या शौर्यापुढे मी नतमस्तक आहे.
लेखन भावले. या लेखनासाठी धन्यवाद.

यावरुन कारगिल युद्धात कामगिरी बजावलेले कॅ.डॉ. राजेश अढाऊ यांचे प्रत्यक्ष ऐकलेले अनुभवकथन आठवले.

आपण ते अनुभव कथन जरूर लिहावे. आम्ही वाचायला उत्सुक आहोत.

चांदणे संदीप's picture

2 Apr 2020 - 9:47 am | चांदणे संदीप

आपल्यावरचा विश्वास ढळू न देण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या कर्नल एन एन राव यांना कडक सॅल्यूट!
प्रेरणादायी प्रसंग आणि लेखन.

सं - दी - प

प्रसंगच अत्यंत रोमांच आणणारा आहे..! हे असेच लोकं युद्धाची स्थिती पालटतात..!!
डॉ. राव यांना त्रिवार नमन _/\_
आणि कर्नल पोखरीयाल यांचा देखील खूप खूप अभिमान वाटला. आपल्या एका माणसावर त्यांचाही किती विश्वास!! त्यांना माहित होते, डॉ. राव जीवाची पर्वा न करता नक्की जातील.

अनुभव सांगीतल्याबद्दल शतशः धन्यवाद.

काय कमिट्टेड असतात ना हे लोक.
असे लोक आहेत म्हणून आपण सुरक्षीत राहू शकतो

धर्मराजमुटके's picture

3 Apr 2020 - 2:28 pm | धर्मराजमुटके

तुम्ही मागेपुढे अशा लेखनाची एखादी शृ़ंखला चालू करावी.

Nitin Palkar's picture

3 Apr 2020 - 4:09 pm | Nitin Palkar

कर्नल एन एन राव यांच्याबद्दल स्तुतीपर लिहिण्यासाठी शब्दच नाहीत... डॉक. तुमच्या लेखनाचा मी पूर्वी पासूनच पंखा आहे, अधिक काय लिहू...?
_/\_

चौकटराजा's picture

4 Apr 2020 - 12:42 pm | चौकटराजा

काल एक व्हिडीओ पाहिला एका लाचखोर ट्रॅफिक पोलिसला नोटा घेताना त्याचा हात घट्ट धरून ठेवणारऱ्या भारतीय सैनिकाचा . " तो म्हणाला पोलिसांचा हात धरणे वगरे गुन्हा आहे हे विचार देखील त्यावेळी माझया मनात आला नाही .एका गरीबाचे पैसे स्वतः:च्या खिशात भरणाऱ्या त्या हाताचा मला राग आला !

रविकिरण फडके's picture

4 Apr 2020 - 6:59 pm | रविकिरण फडके

"कहाणी ऐकून मी आणि माझे दोन वर्गमित्र अवाक आणि सुन्न झालो होतो. डोळ्यात पाणी तरळले होते."

किल्लेदार's picture

5 Apr 2020 - 5:14 am | किल्लेदार

93-932133_soldiers-silhouette-sa-soldier-salute-silhouette-png

जिथे जिथे मला असे असामान्यत्व दिसते दिसते, तिथे तिथे मला देव दिसतो. त्यामुळे
नेहमीप्रमाणे डोळे व नंतर नाक पुसत पुसत वाचले.
_/\_

त्यानंतर
साबणाने हात २० सेंकद धुतले आहेत हो.
काळजी नसावी.
:)

एकनाथ जाधव's picture

25 Apr 2020 - 3:03 am | एकनाथ जाधव

आहेत ही लोक

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 6:35 am | जेम्स वांड

काय तर जबरी जीवन, नाहीतर आम्ही उठा पाट्या टाका ४५ नंतर डायबेटिस आंदण घ्या अन मरणाची वाट पाहत खुरडत जगा, काय पण जीवन

सहज सुचलं म्हणून विचारतो,

खेमकरण पलीकडे असलेला कालवा - इच्छोगील ? कारण खेमकरण, असल उत्तर वगैरे १९६५-१९७१ च्या लढायांचे संदर्भ वाचले की त्यात एकदम ठळक ही नावे आठवतात.

सुबोध खरे's picture

25 Apr 2020 - 8:06 pm | सुबोध खरे

खेमकरण पलीकडे असलेला कालवा - इच्छोगील

खरं सांगायचं तर मला खेमकरणच्या पलीकडे काहीच आठवत नाहीये. त्यामुळे स्थळाबद्दल चूक होऊ शकते.
१८ वर्षे झाली या गोष्टीला.

क्षमस्व

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 9:53 pm | जेम्स वांड

लाजवताय कश्याला डॉक्टर तुम्ही, क्षमा वगैरे नको हो, मला तरी कुठलं काय माहिती आहे, पण त्या काळातली युद्ध म्हणाली की खेमकरण, असल उत्तर, इच्छोगील कालवा, डोगराईतला जाट पराक्रम, ९ डेक्कन हॉर्स, जनरल अरुणकुमार वैद्य आणि त्यांचं एमव्हीसी अँड बार इतके कीवर्ड तरी आठवतातच आठवतात.

बाकी कुठला का तो कालवा असेना, जाटांच्या संगतीने आडमुठा झालेला तेलगू डॉक्टर हेच मला वाटतं भारतीय सेनेचं मर्म आहे.

Prajakta२१'s picture

25 Apr 2020 - 10:51 pm | Prajakta२१

खूपच प्रेरणादायी
हे वाचताना लष्करी वातावरण आणि कॉर्पोरेट , सिव्हिलिअन वातावरणातील फरक अधोरेखित होतो
अवांतर - लष्करातील सेवेसाठी पत्रिकेतील रवी आणि मंगल ग्रह बलवान पाहिजेत थोड्या फार प्रमाणात गुरु ग्रह सुद्धा generally मेष,वृश्चिक ,धनु ,सिंह अशा राशींची माणसे लष्करात जातात का असे वाटते

जेम्स वांड's picture

26 Apr 2020 - 8:54 pm | जेम्स वांड

पण मला वाटते जो "एसएसबी" नावाची चाचणी पार करेल तो प्रत्येक जण फौजेत निवडला जायला पात्र असेलच.

कृपया हल्के घेणे.

गामा पैलवान's picture

26 Apr 2020 - 12:05 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

जिवावर उदार होणे याचा नेमका अर्थ समजला.

कथेबद्दल धन्यवाद.

नरसिंह रावांना कडक अभिवादन.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

27 Apr 2020 - 9:49 am | मृत्युन्जय

अश्या लोकांमुळेच देश अजुन तरुन आहे. कड्डक सॅल्युट डॉक्टरसाहेबांना