मोगँबो - ४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
28 Mar 2020 - 10:30 pm

तीने हात जोडले थ्यांक्यू दादा. दोन दिवस झाले काहीतरी खाऊन . गावाहून आले. हातातली पर्स कुणीतरी चोरली. येताना आणले होते ते थोडेसे पैसे होते तेही नाहीसे झाले. काल दिवसभर तशीच बसून होते. पोटात अन्नाचा कण नव्हता. तुम्ही देवासारखे आलात.
ती काय म्हणत होती ते आम्हाला अर्धवटच ऐकायला येत होते. तीची अवस्था बघवत नव्हती.आम्हालाच कसेतरी होत होते. भरपूर आजारी असावी . अंगात ताप जाणवत होता. डोळ्यातून पाणी वहात होते मधूनच हुंदके देत रडत होती. रडतारडताच बोलत होती.

मागील दुवा : http://misalpav.com/node/46300
घरात मी, धाकटा भाउ लाला. आई आणि बाबा. बाबाची थोडीशी शेती. गेली चार वर्षे कधी कापसाला भाव मिळाला नाही तर कधी अवकाळी पावसाने दाळीचे हाता तोंडाशी आलेले पीक काढून नेले. शेती साठी बँकेचे कर्ज थकीत झाले. खाजगी सावकाराचे कर्जही घेतले. इतक्यात धाकट्या भावाच्या र्‍हदयाला भोक आहे हे समजले. त्याच्या इलाजासाठी गहाण टाकायला ही घरात काही नव्हते. आख्खे घरच गहाण होते. समोर दिसणारा सख्खा मुलगा रोज थोडा थोडा मरणाच्या तोंडात जाताना दिसतोय आणि आपण असहाय्य हतबल आहोत हे जाणवून बाबांनी शेतातल्याच बाभळीच्या झाडाला फास लावून घेतला. विम्याचे पंचवीस हजार आले आणि आले तसेच गेलेही.
चार एक महिने झाले असतील. या धक्क्याने आई ही खचली. तीला अर्धांगवायू झाला. काय करावे सुचत नव्हते. आकाश फाटावे आणि शिवायला हातात सूताचा तुकडाही नाही.अशी परिस्थिती. एक महिना शेजारपाजारच्या कोणी ना कोणी काहितरी शिजवून घातले. पण ते ही आमच्या सारखेच. कुठवर पोसणार आम्हाला. आईचा उपचार करायचा की धाकट्या भावाला पहायचे तेच समजत नव्हते. मी कशीबशी एफ वाय पर्यंत कॉलेजात गेलेले. पातुरसारख्या गावात नोकरी कसली मिळणार ? इतर कुठे नोकरी पहायची तर अकोले तरी गाठायचे किंवा खामगाव तरी. मग यांच्या कडे कोण लक्ष्य देणार. तेथेही रहाण्याचा प्रश्न . आणि तेथेही असे कितीसे पैसे मिळणार.
मग शेजारच्या रत्ना मावशींनी सांगीतले मुंबईत नोकरी मिळू शकते. कुठल्यातरी दवाखान्यात किंवा कारखान्यात. त्यांच्या भावाच्या ओळखीचे कुणीतरी मुंबईला आहे. नोकरी शोधेपर्यंत त्यांच्या कडे रहायची सोय होईल म्हणून . घरा शेजारी रहात असलेल्या हणमंत मामांची चुलत बहीण पण मुंबईत रहाते असे कळाले. दोघांचे पत्ते घेऊन मुंबईला यायचे ठरले. तशी पत्रेही त्या दोघांना पाठवली. खरे तर आईला आणि भावाला रत्ना मावशींच्या भरोशावर ठेवून घर सोडायचे जीवावर आले होते. घरातून बाहेर पडताना पाय मणा मणाचा झाला होता. पण मग चांगली नोकरी लागल्यावर मुंबईतच भावाचा उपचार करता येईल या भरवशावर घर सोडले.
किती आशेने आले होते मुंबईत. येताना रत्ना मावशीने चिवड्याचा पुडा दिला वाटेत भूक लागेल म्हणून. तोही घरीच ठेवून दिला. लाला साठी. "
आशा बोलत होती. सगळे जीवाचा कान करून ऐकत होते. मघाच्या दंग्याचा मागमूसही कुठे दिसत नव्हता. त्यांच्याच वयाची बरोबरीची एक मुलगी एक आत्तापर्यंत केवळ वर्तमानपत्रात वाचून किंवा टीव्ही वर बातम्यात पाहून माहीत असलेले दूरचे काहितरी अचानक समोर उभी रहात ते तीचे वास्तव म्हणुन सांगत होती.
प्रवासात रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. डोळे मिटले की आई आणि लाला डोळ्यासमोर उभे रहायचे. कल्याण स्टेशन येता येता कधीतरी झोप लागली. दादरला कुणाचा तरी धक्का लागला म्हणून जाग आली. ट्रेन मधून लोक उतरत होते. लोकांची इतकी गर्दी कधीच पाहिली नव्हती. इथे उतरायचे म्हणून सांगीतले होते. सामान घ्यायला गेले तर माझी बॅग दिसत नव्हती. पिशवीतले जे काही होते ते सामानही अस्ताव्यस्त झाले होते. पिशवीतून मुख्य म्हणजे पर्स गायब झालेली होती. माझे अवधानच गेले. त्या पर्समधे रत्नामावशींनी सांगीतलेल्या काकांचा पत्ता होता. हणमंत मामांच्या बहीणीचा फोन नंबर होता. आता जाणार कसे त्यांच्या कडे? अगोदरच इतकी गर्दी पाहून घाबरून गेले होते. कशीबशी ट्रेनमधून उतरले. स्टेशनावरच मटकन खाली बसले. कुठे जायचे तेच कळत नव्हते. सगळा दिवस स्टेशनावरच काढला. तिथेच नळावरचे पाणी प्याले. रात्र झाली तशी तगमग वाढली. आत्तापर्यंत वाटली नव्हती अशी भीती वाटायला लागली. भूकेने जीव कासावीस झाला होता. थोड्या थोड्या वेळाने पाणी पिऊन येत होते आणि पुन्हा बाकावर बसत होते. तिथे एक बाई पण बसली होती. बाई कसली म्हणायचे साडी नेसलेला वेणी फणी केलेला कोणी बाप्याच होता. ती एक बिस्कीटचा पुडा घेवून माझ्या शेजारी आली. म्हणाली . मै रंजन ताई ये ले ये खा. सुबहसे भूकी है ना! मला तीच्या त्या विचीत्र रूपाची भसाड्या आवाजाची भीतीच वाटली. बिस्कीट घेऊ नये असे खूप वाटत होते. पण पोटात भूकेचा आगडोंब पेटला होता. हात आपोआप पुढे झाला बिस्कीटचा पुडा घेतला. खाउ लागले.तशी ती बाई पुढे म्हणाली तू ये खा तबतक मै तेरे लिये चाय लाती.
तीने चहावाल्या एका पोराला बोलावले दोन ग्लासात चहा मागितला. एक ग्लास माझ्या समोर करत म्हणाली. ये ले. पैले ये पी.
मघाशी त्या शिसारी येईल अशा भडक चेहेर्‍याची मला भीती वाटली होती. आता ती कमी झाली होती. माझा चहा पिऊन झाल्यावर तीने मला दोन केळीही खाऊ घातली. तीचे ते प्रेमळ डोळे पाहून मला रडू आले. हमसून हमसून रडावेसे वाटले. मी तीला माझी पातूरपासून निघाल्यापासूनची कथा सांगीतली. पत्ते आणि फोन नम्बर हरवल्याचे ऐकून ती म्हणाली ये बंबई है बेटा. तू अच्छे घरकी दिखती है. मै इधर प्लॅटफॉर्म पर रैहेती हुं . मै ऐसी हुं ना इसलिये चल जाता है. पर अकेली लडकी प्लॅटफॉर्म पर… मुश्कील होगा. आज के दिन रह जा मेरे साथ. कल देखेंगे. कलवा से बात कर दुंगी. वो पैसे मांगेगा रहनेका इंतजाम करने के लिये.
माझ्या कडे पैसेही नाहीत. जे काही होते ते त्या पर्समधे होते.
फिर तो मुश्कील है. चलो आज तो सो जा इधर . कल का देखेंगे कल सुबह.
कोण कुठल्या नात्याची ना गोत्याची . तीने मला त्या दिवशी तीच्या शेजारी झोपायला जागा करून दिली.
सकाळी भल्या पहाटेच जाग आली. रंजन ताई समोर आरसा ठेवून दाढी करत होती. मी बराचे वेळ त्या कडे पहातेय हे लक्ष्यात आल्यावर ती डोळे मिचकावून हसली. माझ्या चेहेर्‍यावर दोन्ही हात फिरवून बोटे मुडपली. बेटी तेरेको आज वो तू जहां जानेवाली थी ना वोल लोग का पता मिल जायेगा. मै बोलती हुं ना. सुबह सुबह का पैला बोला हुवा झूट नही जाता. आज तू पोस्ट हापीस मे जा उधर चौकशी कर .तेरेको मिल जायेगा जिधर जानेका है वो पत्ता.
पोस्ट हापीस उधर है. सकाळी चहा पाव खायला घालून रंजन ताई निघून गेली. स्टेशनवरच तोंड धुवून तीने दाखवलेल्या रस्त्याने पोस्ट ऑफिस मधे गेले. तेथे हणमंत मामा नी सांगीतलेले त्यांच्या बहिणीचे नाव आठवू लागले. रंगनशेट्टीवार की असलेच काहिसे नाव होते. तिथल्या माणसानेअगोदर मला जवळजवळ हाकलूनच दिले. बराच वेळ थांबल्यावर त्याला माझी दया आली असावी. त्याने आतल्या एका माणसाला विचारले आतल्या माणसाने परळ च्या पोस्ट ऑफिसात विचारा परळचे पोस्ट ऑफिस उद्या सकाळी उघडेल म्हणून सांगीतले.
मी पुन्हा दादर स्टेशनवर आले. त्याच प्लॅटफॉर्मवर रंजन ताईची वाट पहात राहिले.
रंजन ताई जीना उतरत कोणाबरोबर तरी येत होती.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Mar 2020 - 10:31 pm | विजुभाऊ

मागील दुवा मोगँबो ३ http://misalpav.com/node/46300

विजुभाऊ's picture

30 Mar 2020 - 4:48 pm | विजुभाऊ

पुढील दुवा
मोगॅम्बो - ५ http://misalpav.com/node/46314