कथा : जोगवा

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जनातलं, मनातलं
27 Mar 2020 - 12:32 pm

मानसी लग्न होऊन एका गावी आली. तिला चांगले जमीनदाराचे स्थळ मिळाले. सगळ्यांना खूप कौतुक वाटत होते आणि मामा मामींना समाधान!

एका दुर्दैवी अपघातामध्ये तिचे आई वडील गेले, पण ती मात्र वाचली. तेव्हापासून मामा-मामीच तिचे आई-बाबा झाले. ती ही मामाच्या घरात मिसळून गेली. मामाच्या मुलांबरोबर वाढली. मानसी लहानपणापासूनच खूप समजूतदार होत गेली. शाळेत अभ्यासात ती ठीकठाक होती पण तिला खरी आवड होती खेळाची. तिच्या शिक्षकांनी तिची ही आवड हेरून तिला प्रोत्साहन दिले होते. मामानेही तिला दुजोरा दिला होता. खेळ खेळल्यामुळे ती नेहमी उत्साही व प्रसन्न असायची. ती तब्बेतीनेही कणखर व चपळ होती. शाळेत ती कबड्डीची कप्तान होती व तिच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शाळेने आंतरशालेय, तालुकास्तरीय स्पर्धेत अनेक विजय मिळवले होते. तिचा खेळ चालू रहावा असे तिच्या मामालाही वाटत होते, पण खर्चाचा प्रश्न होता, त्याऐवजी मामाने तिला महाविद्यालयात घालणे पसंत केले.

ती बारावी झाली आणि तिला एक स्थळ सांगून आले मुलगा वाणिज्य शाखेचा पदवीधर होता. मराठवाड्यातील एका गावातील स्थळ होते. स्वतःचे घर होते, शेती होती. गुरे होती, माणसे खाऊन पिऊन सुखी होती. मामा-मामी स्वतः जाऊन सर्व बघून आले, सर्व काही योग्य वाटले. तिला मामा-मामींवर विश्वास होता. एका सुमुहूर्तावर तिचे लग्न झाले.

ती शहरातून आलेली, तिला गावातील वातावरण नवीन होते. शहरात घाई, गजबजाट..... इथे मात्र सगळे निवांत होते. संध्याकाळी सात वाजताच रस्त्यावर शुकशुकाट असायचा. तिकडे तिला चाळीत राहायची सवय होती. चाळ सतत गजबजलेली असे, कोणी ना कोणी माणसे दिसत, बोलत,तिच्या मैत्रिणी होत्या.संध्याकाळी फेरफटका मारायची तिला सवय होती. इथे मात्र स्वतंत्र घर, शेजारी लांब, बोलायला कोणीच नाही...! बोलावे तरी कुणाजवळ? नाही म्हणायला सासूबाई बोलायच्या..कधी जेवणे झाल्यावर संध्याकाळी घरातले सगळे बोलायला बसायचे. रात्री १० वाजताच सगळे चिडीचूप व्हायचे... निजानीज व्हायची.

एक दिवस नवर्याने तिला त्यांची बाग, शेत सगळे दाखवून आणले. मळ्यातल्या ताज्या भाज्या, फुले, अनेक प्रकारची झाडे .....हे सगळे बघून ती हरखून गेली. झाडांवर मधूनच पक्षी चिवचिवत होते. फुलांवर फुलपाखरे भिरभिरत होती. ती बागेत एखाद्या लहान मुलीसारखी हुंदडली. पाटातून वाहणाऱ्या पाण्यातून धावली. तिच्या नवर्याने एक सुंदर गुलाबाचे फूल तिला काढून दिले. ते तिने डोक्यात माळले. मळ्यात काम करणाऱ्या माणसांशी तिची ओळख झाली. तिथल्या बाय-बाप्यांशी, मुलांशी ती आस्थेने बोलली. नवर्याने तिला अनेक झाडांची माहिती करून दिली. तिला त्याचा खूप अभिमान वाटला.

काही दिवसांनी त्या दोघांना गावातला एक तरुण भेटला. तो कृषी विद्यापीठात पदवी घेऊन आला होता. त्याने तिच्या नवर्याला शेतीकामाबाबत काही सूचना केल्या. त्या अमलात आणून बघायला काय हरकत आहे, असे तिला वाटत होते. पण तिच्या नवर्याला मात्र ते अजिबात आवडले नव्हते.

“शिकून आला म्हणजे काही सगळे ज्ञान आले नाही. मी एवढे दिवस शेतात काम करतोय. अनुभवाने मला अनेक गोष्टी कळतात.”

“अहो पण, हल्ली बर्याच गोष्टी नव्या आल्या आहेत. आपला फायदाही होऊ शकतो.” तिने सांगायचा प्रयत्न केला.

“कसल्या नव्या? तुला काय त्याचं बरोबर वाटतं का? तुला काय कळतंय?”

ती गप्प झाली. कळत नव्हते हे खरे, पण प्रयोग करून बघायला हवा, असे तिला वाटत होते.

नव्याची नवलाई सरली. हळूहळू सगळ्यांचे आखलेले दिनक्रम सुरु झाले. तिच्या गावात ओळखी होत होत्या. ती कबड्डीची खेळाडू आहे, हे तेथील शाळेतील मुख्याध्यापकांना कळले. एक दिवस ते घरी आले. त्यांनी तिच्या सासर्यांना व नवर्याला विनंती केली, की तिने शाळेतील मुलांना कबड्डीच्या सामन्यांसाठी मार्गदर्शन करावे. त्या दोघांनी लगेच परवानगीही दिली. तिचा आनंद गगनात मावेना... तिच्या आवडीच्या क्षेत्रात तिला काम करायला मिळणार होते.

पण सासूबाई मात्र जरा नाराज होत्या. “कबड्डी??? हुतूतू खेळणार तू? “

“ खेळणार नाही हो, मी त्यांना डावपेच शिकवणार, त्यांना मार्गदर्शन करणार.”

सासूबाई काहीच न बोलता कामाला लागल्या.

ती मनातून जरा खट्टू झाली, पण आपण सासूबाईंची समजूत काढू असे तिला वाटत होते.

ती खूप खुश होती. उद्या सकाळी ९ वाजता तिला शाळेत हजर राहायचे होते. ती लवकर उठली. तिने झटपट सर्व कामे केली. सगळा स्वयंपाक तयार केला.
तिने गेली ७-८ महिने बॅगेतच ठेवून दिलेली ट्रॅकपॅँट आणि टी शर्ट तिने बाहेर काढला. तो हातात घेऊन ती त्या ड्रेस कडे बघत थोडा वेळ त्याच्यावर हात फिरवत राहिली. तिला आठवले ते खेळाचे दिवस, तिने व टीमने मिळून जिंकलेले सामने! मिळवलेल्या ट्रॉफीज... ती हर्षभरित झाली. मनातल्या मनात एकेका डावपेचांची ती उजळणी करू लागली.

कपडे करून ती तयार झाली व बाहेर आली. सासूबाईंचे डोळे तिच्याकडे बघून विस्फारले,” हे कपडे घालून तू शाळेत जाणार आहेस? चांगली साडी किंवा झालंच तर पंजाबी ड्रेस नाही का तुझ्याकडे?”

“साडी?” असे म्हणून ती हसू लागली. “ अहो, मी खेळ शिकवायला जात आहे. साडी नेसून मोकळ्या हालचाली कशा करता येणार? आणि पंजाबी ड्रेस सुद्धा नाही चालत. असाच ड्रेस घालावा लागतो.”

“असेल, असेल .... आम्हाला काय कळतंय?” असे म्हणून सासूबाई रागाने आत निघून गेल्या. सासरे काहीच बोलले नाहीत, नवरा तरी काही प्रतिक्रिया देईल, असे तिला वाटले होते... पण त्याने तर चक्क दुर्लक्षच केले. त्याची समजूत नंतर काढू, असे मनाशी म्हणत तिने खांद्याला स्लिंग बॅग लटकवली व ती निघाली. लग्न झाल्यापासून प्रथमच तिला इतके मोकळे वाटत होते.

ती शाळेत पोचली. मुख्याध्यापक तिची वाटच बघत होते. त्यांनी मोरे सरांशी तिची ओळख करून दिली. “ तुला यांच्याबरोबर काम करायचे आहे,” असेही तिला सांगितले.

मोरे सरांशी ओळख झाली. ती, सर व मुले पटांगणात आले. तिने व सरांनी खेळाचे नियम, काही युक्त्या मुलांना समजावून सांगितल्या. पहिला दिवस पार पडला. ती खूप समाधानी होती. आता उद्याच्या दिवसाची ती मनातल्या मनात ती उजळणी करत होती.

घरी आल्यावर तिने सर्वाना काय घडले ते सांगितले. मोरे सरांबद्दलही सांगितले. पुन्हा सासरे व नवरा काहीच बोलले नाहीत. सासूबाई मात्र नाराजच होत्या, “पुरुषांबरोबर राहून तू असला पुरुषी खेळ खेळणार?”

“अहो आई, खेळ हा खेळ असतो, बायकांचा, पुरुषांचा असा काही नसतो.”

“बायकांनी असले खेळ खेळायचेच कशाला? घरात काय कमी कामे असतात का?”

त्यांच्याशी वाद न घालणेच शहाणपणाचे आहे, हे तिला समजून चुकले. ती जास्तीत जास्त आपली कामे उरकून जाऊ लागली.
एक दिवस सासूबाईंनी जाहीर करून टाकले, माझा मंगळवारचा उपास असतो, तू ही करायचास. तिने उपास करायला सुरवात केली. दिवसभर उपास, मग रात्रीची आरती मग जेवण! काय करणार? तिच्या बाजूचे कोणीच नव्हते. सासरे फारसे काही बोलत नसत. हल्ली नवराही गुश्श्यात दिसू लागला होता. तो बोलत नव्हता, पण तिचे जाणे त्याला खटकत होते, हे दिसत होते.

एकदा तिची पाळी आली. बाजूला बसावे लागत होते, ते ही तिने मान्य केलेच होते. पण आज मात्र नवीच तक्रार होती. “लग्नाला आठ महिने झाले! अजून कशी पाळी येते तुझी? एकदा दोघांनी डॉक्टरांकडे जाऊन या.” तिने मूकपणे मान हलवली. ती जेमतेम वीस वर्षाची होती, तिला इतक्या लवकर मुल नको होते, पण काय बोलणार आणि कसे बोलणार? नवरा काही बोलायलाच तयार नव्हता.

स्पर्धा तोंडावर आल्या होत्या आणि मुलांना चांगले प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडून चांगला सराव करून घेणे, आवश्यक होते. तिला थोडे लवकर जावे लागत होते व यायलाही उशीर होत होता. यामुळे घरातील वातावरणही तापत होते. सासूबाई तोंड सोडायच्या, सासरे न बोलता जेवून निघून जायचे. सासूबाईंना तिचे खेळ शिकवायला जाणे आणि पँटशर्ट घालणे अजिबात पसंत नव्हते. त्यात मोरे सरांबरोबर , एका पुरुष माणसाबरोबर काम करणे तर त्याहूनही पसंत नव्हते. त्या गावात असे कपडे घालून लेकी-सुना राजरोस फिरत नव्हत्या. त्यात तिने खेळ खेळावा, हे ही त्यांना पटत नव्हते. लोक तिला व आपल्याला नावे ठेवत असणार, हे त्यांच्या मनाने घेतले होते.

त्या दिवशी संध्याकाळी ती थोडी उशीराच घरी आली. अर्थातच घरचे सगळे रागावले होते. तिने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हते.

“आता मात्र हद्द झाली. घर नाही, दार नाही, बाहेर भटकायचे, परपुरुषाबरोबर राहायचे, पुरुषी कपडे घालायचे आणि पुरुषी खेळ खेळायचे... ! काही शिस्त, पद्धत आहे की नाही? चुकायचे ते चुकायचे आणि वर स्पष्टीकरण द्यायचे! हेच शिकवले आहे का तुला मामा मामीनी? अहो, तुम्ही तरी काही बोला तिला.” सासूबाई सासर्यांना उद्देशून म्हणाल्या.

“अहो आई..........” , तिने बोलायचा प्रयत्न केला, तेवढ्यात सासरे गरजले, “ हे पहा सुनबाई, हे असले वागणे इथे चालायचे नाही, शिस्तीत वागले पाहिजे आणि वेळेवर घरी आले पाहिजे. नसती थेरं केलेली अजिबात खपायची नाहीत.”

थेरं???? ती अवाक झाली. गोंधळली, कावरीबावरी झाली, तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. तिचा नवरा कुठेच दिसत नव्हता. ती आपल्या खोलीत गेली, दु:खाचे कढ तिला आवरत नव्हते. मामी-मामीचे नाव घेतल्यामुळे ती अधिकच दुखावली होती. तिच्यावर त्यांचे ऋण होते, त्यांचा असा अपमान तिला सहन होत नव्हता. आपण काय चुकीचे वागलो? कसली थेरं केली? एका खेळाकडे व त्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याची निकोप दृष्टी तिच्या सासरच्या माणसांकडे नव्हती. राग, दु:ख, अपमान, अवहेलना या भावनांनी तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते.

तेवढ्यात तिचा नवरा आला. तो तरी आपल्याला समजून घेईल अशी तिची अपेक्षा होती. पण त्याला तिचे अश्रू दिसलेच नाहीत. तो चक्क दारू पिऊन आला होता. लग्न झाल्यापासून तिने त्याला दारू प्यायलेले बघितले नव्हते. तिने काही बोलायचा प्रयत्न करताच तोच बरसला....” काय कब्बडीपटू? तुम्ही खेळता नाही का? तुला काय येतं खेळता? बायका कधीपासून खेळ शिकवायला लागल्या? तू त्या मोरेसाठी जातेस ना? काय फालतू माणूस आहे! शाळा झाली की गावभर फिरत असतो, मुलांमध्ये तो लाडका आहे, तसा तुझाही लाडका झाला का?”

आता मात्र तिचा संताप अनावर झाला. “काय बोलताय तुम्ही? अहो मी तिथे कामाला जाते. उगाच जात नाही. आणि त्या सभ्य माणसाला का बोलताय?”

“कोण सभ्य? शाळेत नोकरी केली, म्हणून तो सभ्य झाला?” असे आणि इतरही तो खूप बोलू लागला. आता मात्र तिची सहनशक्ती संपली. अंथरुणावर पडून ती मुसमुसून रडू लागली. तेवढ्यात नवरा तिच्याजवळ आला, आणि मग जे काही झाले ते तिच्या मनाविरुद्ध होते. ती अख्खी रात्र तिने जागून काढली.

सकाळी लवकर उठणे भाग होते. तिने कामे आवरायला सुरवात केली. आज ती गप्पगप्पच होती. सासू-सासरेही काही बोलत नव्हते. नवरा तर अजून उठलाच नव्हता. तिने आरशात पाहिले. तिचे डोळे सुजले होते. तिने काही एक विचार केला. तिने पँटशर्ट एका बॅगेत भरला व पंजाबी ड्रेस घालून ती बाहेर पडली. शाळेत जाऊन ड्रेस बदलूया असा विचार तिने केला.

आता ती असेच करू लागली. ती सर्वांच्या टीकेचे लक्ष्य झाली होती. तिच्यातला मोकळेपणा पार नाहीसा झाला होता. मोरे सरांच्याही हे लक्षात आले होते. ती कामापुरतच बोलत होती. पूर्वीचा उत्साह नाहीसा झाला होता. मोरे सरांशीही जास्त बोलत नव्हती. पण त्यांनी तिला काही विचारायचे टाळले.

सासूबाईंनी फर्मान काढले. मंगळवारी देवीची पूजा करून व नैवेद्य दाखवूनच जायचे. सर्व काही आवरताना तिची तारांबळ उडू लागली. ही नोकरी करणे तिला नकोसे होऊ लागले, पण स्पर्धा संपेपर्यंत थांबणे भाग होते.

त्यादिवशी मंगळवारी रात्री देवीची आरती होती. काही शेजार-पाजारचे लोकही जमले होते. आरती करता करता ती अचानक घुमू लागली. तिला आजूबाजूचे भान राहिले नाही.
‘देवी अंगात आली, देवी अंगात आली.....’, आजूबाजूच्यांनी गलका केला. बायकांनी येऊन तिला कुंकू लावले. कोणीतरी जोगवा म्हणायला सुरवात केली,

अनादी निर्गुण प्रगटली भवानी
मर्द महिषासुर, मर्दना लागुनी
त्रिविध तापाची करावया झाडणी
भक्तांलागोनी पावसी निर्वाणी
आईचा जोगवा, जोगवा मागेन|

तिचे त्रिविध ताप नाहीस होणार होते का? रात्री उशिरापर्यंत आरती चालली. सकाळी तिला जरा उशीराच जाग आली. ती दचकून उठून बसली. तोच नवरा तिच्याजवळ आला.’कसे वाटतेय आता? बरे आहे ना?’

तिला काय झाले होते? तिला काही आठवत नव्हते. खूप अशक्तपणा वाटत होता. अंग दुखत होते. तेवढ्यात नवरा चहा घेऊन आला. हे पहिल्यांदाच घडत होते. ती चकित झाली होती.

चहा घेऊन ती स्वयंपाक घरात गेली. सासूबाई जवळ आल्या, ‘बरी आहेस ना ग? फार त्रास होतोय का? थांब मी तुला खायला देते.’

काय झाले होते मला? काल रात्री आरती सुरु होती, मधेच तिचे अंग जड झाल्यासारखे झाले होते, पुढे तिला काही आठवत नव्हते.

सासूबाई खाणे घेऊन आल्या,” तुझ्या अंगात देवी आली होती. देवी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे.”.... सासूबाई आणखीन काही सांगत होत्या.

सासरेही आले,”कसे आहे सुनबाई? बरे आहे का? आराम कर.”

सगळेजण आज आपल्याकडे अधिक लक्ष का पुरवत आहेत, ते आता तिच्या लक्षात आले. आपल्या अंगात आले होते?? असे कसे झाले? तिचा तर या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण या निमित्ताने का होईना, सगळे आपल्याकडे लक्ष पुरवत आहेत, हे पाहून तिने सुटकेचा निश्वास सोडला.

स्मिता वैद्य

कथाविचार