राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात!
***
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वक्तृत्व म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य होते. त्याच्या भाषणात कधी काव्य दिसायचे, कधी राजकारण दिसायचे. कधी कनवाळू ममतेची झाक दिसायची तर कधी धारदार कठोरपणा दिसायचा. विद्वत्ता हा तर त्यांच्या वक्तृत्वाचा गाभाच होता. त्यांच्याही वक्तृत्वात शब्दांची सुंदर अनुप्रासयुक्त गुंफण असायची. ‘गंभीर’पणातही विश्वसनीय व आश्वस्त ‘खंबीर’पणा भरलेला असायचा. वाजपेयींच्या अशा बहुपेडी वक्तृत्वाला व्यासपीठाचे मात्र पुरेपूर भान असायचे. कोणत्या मंचावर वक्तृत्वाचा कोणता पदर अलगदपणे उलगडायचा याची त्यांना नेमकी जाण असायची. म्हणूनच, आपल्याला काय बोलायचे आहे यापेक्षा, काय बोलले म्हणजे श्रोत्यांना ते आपलेसे वाटेल हे ओळखून आपल्या भाषणास नेमकी वळणे देत आपले मत श्रोत्यांच्या गळी उतरविण्याचे कसब त्यांच्या शैलीत होते. म्हणूनच वाजपेयी हे यशस्वी व पक्षभेदांपलीकडचा ‘लोकनेता’ ठरले. त्यांच्या नेतृत्वाची कमान उंचावण्यात त्यांच्या विचारवंत वक्तृत्वाचा मोठा हिस्सा होता.
मात्र, ते पंतप्रधान झाले आणि त्यांच्या वक्तृत्वास प्रशासकीय शिष्टाचाराची बंधने आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी काय बोलायचे, आणि कितीही मनात असले, तरीही काय बोलायचे नाही, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयातील संबंधित यंत्रणेकडे गेला, आणि ‘पंतप्रधान वाजपेयी’ व ‘लोकनेता वाजपेयी’ यांच्यातील संघर्षात वाजपेयी नावाचा संवेदनशील कवीची, वक्त्याची आणि ‘माणसा’ची घुसमट होऊ लागली. कुठेतरी अनौपचारिक गप्पांत त्यांची ही घुसमट त्यांनी बोलूनही दाखविली आहे.
पण पदाच्या जबाबदारीचे भान त्याहूनही कठोर आहे हे ओळखून वाजपेयींनी त्या जबाबदारीला महत्व दिले.
... म्हणून पंतप्रधानपदावर असतानाही, एका राजकीय पक्षाचे नेता असतानाही, अटलबिहारी वाजपेयी हे ‘लोकनेता’च राहिले!!