हातावरील पोट

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
22 Mar 2020 - 10:52 pm

तसं पाहिलं तर मिपावरून जवळपास मी रजाच घेतली आहे. माझ्या दोन लेखांवरील काही आक्रस्ताळ्या, मुजोर आणि हीनतेचा तळ गाठणारी एक प्रतिक्रिया यामुळे मी लिहिणं आणि प्रतिसाद देणं थांबविलं आहे. सहसा प्रवाहाविरुध्ध मतं मांडताना अवहेलना हि अपेक्षितच असते. परंतु कधी कधी आब राखणं आपल्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. त्यामुळेच असा निर्णय मी घेतला आहे. आता या लेखाच्या निमित्ताने मी प्रकट होत आहे त्याचे कारणच तितके महत्वाचे आहे.

कष्टकरी लोकांची आपल्याला आठवण सर्वसाधारण पावसाळ्यात होतेच होते. नदी नाल्यांचे पाणी घरात घुसून संसार उघड्यावर येणं, चार दिवस त्यांच्यासाठी उसासे टाकणं हे सर्व जणूकाही ठरून गेलं आहे. त्याजोडीला संप, दंगल, आग लागणं या आणि तत्सम कारणामुळे अधून मधून त्या लोकांची आपल्याला आठवण येते. बस्स एव्हडंच. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून आपली गाडी जेंव्हा पोटातलं पाणी देखील न हलता सुळकन जाते तेंव्हा हे या कष्टकरांच्या श्रमामुळे हे शक्य झाल्याचे कदाचित आपल्या खिजगणतीत पण नसते.

आज जगातील एकही श्रीमंत माणूस नसेल जो कोरोना विषाणूमुळे हवालदिल, लाचार झाला नसेल. आपल्याला मिळणारे अन्न, पाणी, वीज या सर्व गरजा कुठल्याही क्षणी दुरापास्त होऊ शकतात हा विचार कुणालाही शिवू शकतो. आणि याच्या मुळाशी आहे ती कष्टकऱ्यांना त्यांच्या आयुष्यात किमान गरजा भागवता येतात कि नाही याची आपण बाळगलेली अनास्था. त्या अनास्थेमुळेच आपल्या आजूबाजूला अस्वछता आणि अनागोंदी पसरलेली असते. आज या अस्वछतेने आपल्याला जखडून टाकले आहे. हि तर निव्वळ सूचना आहे. कदाचित यापुढे होणार उद्रेक आपल्याला वेळ आणि साधन सामुग्री गोळा कारण्याचीपण संधी देणार नाही.

या जगात प्रत्येकाला दुपारचे जेवण कामवावेच लागते हा स्वकर्तृत्वातून येणार दर्प बाजूला ठेवण्याची, समाजवादातील चांगल्या कल्पनांचा स्वीकार करण्याची हि वेळ आहे.

समाजप्रकटन