मोगँबो -१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
17 Mar 2020 - 9:10 am

ए मोगँबो आला रे……….. मोगँबो आला रे.
मागच्या बेंचवरून आवाज आला. वर्ग एकदम शांत झाला.
आत्तापर्यंत चाललेली गडबड एकदम खेळताना दोन बोटे रोखून कोणीतरी स्टॅच्यू म्हणावे आणि ऐकणाराने जागीच आहे त्या अवस्थेत थिजून जावे तशी थिजून गेली.
म्हणजे मीना आणि संध्या हातात कसलेसे कागद घेऊन एकमेकींचे पाठांतर तपासत होत्या. संजना बॅग मधून रंगीत कागदाचे तुकडे काढून चिकटवत होती. झिपर्‍या उर्फ पक्या प्लेअरवर गाणी मागे पुढे करत क्रम लावत होता. गण्या वहीत खर्चाची बिले आणि हिषेब जुळवत होता. हिषेब लावताना कसलीशी आकडेमोड करत होता. मधूनच तो कोणालातरी प्रश्न विचारत होता. महेश , यूसूफ आणि जित्या ," झन झन झन झन झनाक झन जुई जुई जुई टुपाक टीप टीप हुई " असले काहीतरी अनोखे बोल कोरस मधे गात होते. ज्युनीयर ची दोघे जण भिंतीकडे तोंड करून त्यांचे मोनोलॉग्ज म्हणत होते.
वर्गाच्या बाहेरून जर कोणी त्यावेळेस जात असते तर त्याला " हम काले है तो क्या हुवा दिलवाले है….. मांसाहेब आज आम्ही शपथ घेऊन सांगतो की...… अय्या खरंच इश्श्य आम्ही नाही जा. … कुणी घर देता का घर तुफानाला घर हवंय… आठशे खिडक्या नऊशे दारं कुण्या वाटेनं बा गेली ती नार…… आज सर्वत्र एक्च घोष , एकच निनाद एकच आवाज…. या आभाळ पाठीवर पेलणार्‍या हत्तींआ विचारून पहा ते सांगतील तुम्हाला….. आवड मला ज्याची त्यालाच मी आणलं… झन झन झन झन झनाट झन झन……. हां तो दोस्तो आज की ये शाम. यादगार बनाने जा रहे है. हमारे फर्स्ट ईयर के स्टुडंट्स अपने अनोखे डान्स से….. सांग सांग भोलानाथ……
ए पक्या हे कुठलं गाणं लावलंस रे. ते साम्ग सांग भोलानाथ नाहिय्ये. कजरारे कजरारे आहे. कुठनं काढलंस हे गाणं……..
हे असलं काहितरी ऐकू आलं असते.
या गोंधळात " कांदे वीस रुपये,,,, वीस रुपये. लिंबू दहाला दोन दहाला तीन….. ओ दादानू रावस घ्या बोंबील घ्या एकदम ताजा आहे. पापलेट तर एकदम फडफडीत. ओ मास्तर….. किंवा दहीवडी तारकपूर … दहीवडी तारकपूर… गाडी नंबर एम एच ३१३२ दहीवडी तारकपूर ….. ओ दादा अंबील पाड्याला जाते का ही गाडी….हं बग्या घूस की . ओ ढकलताय काय…. चष्मा फुटेल की. … ओ डबा रुमाल टाकलाय की मी खिडकीतून इथे.....
किंवा प्लंबर प्लंबर .....गवंडी काम करणारका…. याचीच कमी होती ते असते ना तर आठवडी बाजार , मासळी बाजार मजूर अड्डा अशा कोणत्याही ठिकाणच्या सीन साठी बॅग्राउंड म्युझीक म्हणून सहज फिट्ट बसला असता.
या सगळ्या आवाजांवर मात करत मागच्या बाकावरून आलेल्या " मोगँबो आला रे …" च्या आरोळीने सगळ्यांनाच एकदम गप्प केले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. इतक्या गदारोळात त्या आरोळीचा जनक कोण हेच कोणाला ठरवता येत नव्हते. कुठलाश्या हिंदी चित्रपटात चक्कर येवून बेशुद्ध पडलेल्या "बीन ब्याही "हीरॉईनला डोक्टरने तपासून " तुम मा बनने वाली हो." असे सांगितल्यावर हीरॉईनच्या बापाने तिथे जमलेल्या सात आठ जनाम्कडे ज्या नजरेने पाहिले होते त्या नजरेने सगळे एकमेकांकडे पाहू लागले.
" हा नक्की जोत्याच असणार , मी नक्की सांगते. " मीनाच्या मते जितू हा सर्वात जबाबदार इसम होता. बहुतेक सगळ्या गोंधळाला जितूच जबाबदार असायचा.
" ए मी कुठे काय म्हणालो. मी तर यम्मा यम्मा …. गाणे म्हणत होतो." जितूने बचावात्मक पावित्रा घेतला.
" तेच म्हणतेय मी . त्यातल्या व्हीलनचं नाव आहे ना मोगँबो. म्हणजे तूच ओरडला असशील. "
" ए येडपट . यम्मा यम्मा चा सिनेमा शान त्यातल्या व्हीलनचे नाव शाकाल. आणि मोगँबो होता मिस्टर इंडीयामधे. नॉलेज वाढव नॉलेज " कधी नव्हे ते जितूला मीनाची चूक सापडली.
हे असले नॉलेज वाढवून काय करायचं आहे. इकॉनॉमिक्स च्या पेपरात प्रश्न येणार आहे का .. भारतीय अर्थ व्यवस्थेतील सुधारणांचे टप्पे लिहा.... गब्बरसिंग .. शाकाल ते मोगेंबो. " म्हणून.
"त्यात काय.! बरोबरच आहे ते. गब्बर सिंग गुहेत रहायचा घोड्यावरून फिरायचा .. शाकाल एका निर्जन बेटावर रहायचा. मोटार बोटीतून फिरायचा. मोगँबो ची स्वतःची आर्मी होती. हेली कॉप्टरमधून फिरायचा. गब्बरसिंग साधी गाय छाप तम्बाखू हातावर मळून खायचा. शाकाल सिगरेट ओढायचा , मोगँबो चिरुट वापरायचा. ही भारतीय अर्थव्यस्थेची प्रगतीच म्हणायची की. इंडीया इज डेव्हलपिंग कंट्री. लोकांच्या रहाणीमानातील बदल असण्याचे निर्देशक आहेत."
जितू काय म्हणाला हे लक्ष्यात यायला क्षणभर गेला असेल. पण त्या नंत र्भरतीच्या लाटा याच्यात तसे सगळॅ हसायला लागले. अरे काय चाललंय काय . इकॉनॉमिक्स काय गब्बरसिंग काय. शाकाल काय ! , बदलती अर्थव्यवस्था काय! काय लावलंय काय!
" ही बदलती अर्थव्यवस्था त्या केवळ व्हीलन वरुनच दिसत नाही तर ती चित्रपटातल्या हीरॉईनवरूनही समजून येते. शोलेतली हीरॉईन अशिक्षीत आहे. रामगड ते बेलापूर टांगा चालवत रुपया दोन रुपये भाडे घेते. शान चित्रपटातल्या दोन्ही हीरॉईन्स थोड्याफार कॉलेज शिकलेल्या आहेत. गाड्या चोरून विकण्याचा व्यवसाय करत हजारो रुपये मिळवतात. तर मिस्टर इंडीया मधली हीरॉईन सुशिक्षीत आहे. पत्रकार आहे. लाखो रुपयांचे गैरव्यवहार बातम्या छापून उघडकीस आणते.हे ही शिक्षणामुळॅ समाजाच्या आजच्या झालेल्या प्रगतीचे द्योतक आहे" जितू त्या इनोसंटली बोलला.
आता तर हसण्याची सुपर हाय टाईड लाट आली. हसण्याचे फस्स फुस्स खुसु खुसु खी खी खुदु खुदु वगैरे सगळे प्रकार मागे पडून तिथे आता फक्त तोंडातून आवाज फुटत नाही असे काहीसे झाले होते. पक्याने तोंडावर हात ठेवल अहोता. त्याचे फक्त पोटच हलताना दिसत होते. महेशचे तोंड उघडे आहे पण जबडा हलायच्या ऐवजी आख्खे डोकेच हलतेय. संध्या आनि मीना एकमेकीना टाल्या द्यायचा प्रयत्न करताहेत पण त्यांचे नेम चुकून हात हवेतच हलताहेत. त्या दोघी तर खुर्चीतून पडायच्या बाकी आहेत इतकेच.
युसूफ ऑलरेडी बाकावरून खाली पडून दोन ओळींच्या मधल्या जागेत गुढगे वर करून गडाबडा लोळत होता. संजनाचे कागद अस्ताव्यस्त झालेत. महेश बसल्याजागीच बाकावर उड्या मारत होता. गण्या हिषेबाच्या कागदांवर हात ठेवून कसाबसा उभा होता.
सगळ्यांची तोंडे उघडी होती पण आवाज कोणाचाच येत नव्हता. फास्ठ मोशनमधे आवाजाशिवाय फिल्म पहात आहोत असे वाटावी अशी अवस्था.
" ए बास....ए बास.... थांब आता आणखी नको" या अर्थाने ज्युनीयरची ती दोघे एका हाताने पोट दाबत दुसर्‍या हाताने हातवारे करत होते.
हा प्रकार अडीच ते तीन मिनीटे चालूच होता. टाकीतले पाणी संपताना नळाची धार बारीक होत जावी तसे हसणे हळू हळू कमी कमी झाले. त्याम्ना एकमेकाम्कडे पाहिले तरी हसू येत होते.
तोंडाचा चंबू करून जितू या सगळ्यांकडे प्रश्नार्थक चेहर्‍याने पहात होता. त्याच्या त्या चेहेर्‍याकडे पाहूनही मीनाला हसू आवरत नव्हते. कसेबसे तीने हसू आवरले.
" ए काय झाले. असे येडपटासारखे का हसताय? का हर्षवायू झालाय सगळ्यांना" आपण थोडे वेगळॅ बोललो पण त्यात इतके हसन्यासारखे काय आहे हेच जितूला समजत नव्हते.
" तुझी काही चूक नाही रे. आमचीच आहे . आम्ही इतक्या महान अर्थतज्ञाबरोबर बसलोय हेच आम्हाला ठाऊक नव्हते. डॉक्टर मनमोहनसिंग आणिआसित सेन यांच्य अनम्तर तूच." महेश हात जोडत म्हणाला.
" असित सेन नाही रे, अमर्त्य से" संध्याने महेशची चूक दाखवायची संधी सोडली नाही.
" तेच ते रे . शेवटी सेन आहे ना….
"असं कसं असं कसं..... उद्या मून मून सेन म्हणशील आम्ही चालवून घ्यायचं का ते."
" ए बास करा . थांबा जरा. आपला मूळ प्रश्न आहे मोगँबो आला हे कोण म्हणाले?" मीनाने संध्या आणि महेशला थांबवले.
' आणि त्यापेक्षाही महत्वाचे आहे ते म्हणजे मोगँबो अजून आला का नाही" पक्याची लॉजीकल शंका.
" हो ना अजून रीहर्सल ची वेळ सम्पली नाही. आणि तसेही मोगँबो ऑफिसमधे साडेपाच नंतर थाम्बत नाहीत."
खरेतर कॉलेजमधे प्रोंसिपॉल सरांना मोगँबो का म्हणायचे हे कोणालाच माहीत नव्हते. मागच्या कोणत्यातरी बॅचच्या वेळॅस स्पोर्ट्स डे ला एन सी सी कॅडेटकडून के जी पाअटील प्रिंसिपॉल सर मानवंदना स्वीकारत होते. त्या कॅडेतने सॅल्यूटसाठी हात वर केला असेल तेवढ्यात प्रेक्षकातल्या विद्यार्थ्यांमधून कोणीतरी जोरात " हेल मोगॅम्बो: अशी आरोळी ठोकली होती. तेंव्हापासून प्रिंसिपॉल सराम्ना मोगँबो म्हणायचे सगळॅ. के जी पाटील बदलून गेले त्या नंतर त्याम्च्या जागी एन एस केळकर , एम एच खोत, जे एस ब्रिगांझा , आय एह मलीक सगळ्यांनाच मोगँबो हे नाव अगदी जणून वारसा हक्काने मिळावे तसे येऊन चिकटले होते. नशीब हे सगळे पुरूष होते. स्त्री प्रिंसिपॉल असत्या तर त्याम्नाही मुलाम्नी मॅडम मोगँबो म्हणायला कमी केले नसते. प्रिम्सिपॉल ब्रिगांझा एक जिंदादील माणूस, त्यानी कॉलेजच्या फुटबॉल टीम ने विद्यापीठ कप जिंकल्यावर टीमचे अभिनंदन करताना टीमच्या पाठीवर थाप मारताना जोरात" मोगँबो खुष हुवा " अशी आरोळी दिली होती. तेंव्हापासून मोगँबो हा शब्द प्रिंसिपॉल या शब्दाला समानार्थी झाला होता. नशीब तरी दुसर्‍या कॉलेजच्या मुलांना तुमच्या कॉलेजचे नवे मोगँबो कोन असे विचारत नव्हते.
मोगँबो पाठक सर एकदम शिस्तप्रिय माणूस. मुलांनी अ ह्यासाबरोबर इतर अ‍ॅक्टिव्हीटी पण कराव्यात यासाठी ते आवर्जून प्रयत्न करत. मात्र शिस्तीच्या बाबतीत कुठेच तडजोड चालत नसे. मुलांना कॉलेजच्या श्रावण फेस्टिव्हलच्या तयारीसाठी दिलेलेल्या वेळेतच प्रॅक्टीस करावी मुले कुठे उगाच रेंगाळणार नाहीत याची आवर्जून खात्री करून घेणार. खास करून मुली. उशीर होणार असेल तर कोणी न्यायला येईपर्यंत कॉलेजच्या शिपाईमामाना प्रॅक्टीस हॉल मधे सोबतीला पाठवणार.. पण जे काही करायचे ते प्लॅन नुसार ठरलेल्या वेळेतच , दोन मिनीटे जरी कुणी यायला उशीर केला की त्याला तिथल्यातिएहे फैलावर घेणार. खेळकर आणि कडक . त्याम्च्या कडकपणाला मुले बिचकून असायची.
रीहरसल सम्पायला तसा अजून अर्धा तास बाकी. सारंग , ढोलकीवाल्याला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला होता तो अजून यायचा होता. त्यामुळॅ गाण्याची रिहरसल होऊच शकत नव्हती. नुसती बीन वाद्यांची गाणी तरी किती वेळा म्हणायची. कोरस मधे गाताना काळी एक ते काळी तीन सगल्या स्केलचे आवाज यायचे. त्याची पाट पहान्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. परवा कार्यकम अजून फारतर एकदा तालीम करता येणार. उद्याची सकाळ सगळी कपड्यांची जमवाजमव करन्यात जाणार.
हा सारंग ना नेहमी असेच करतो. ढोलकीवाल्याला आणायला दुसर्‍या कोणाला पाठवलं असते तर निदान तो तरी मिळाला असत अगिटारवर.
हा कार्यक्रम होऊन जाऊदेत मग बघु या त्याला.
"अरे हे आपण दरवेळी ठरवतो आनि होत्म काय! कार्यक्रम झाला की सारंगसाहेब अभिनंदन स्वीकारत बसतात. आणि आपण लोकांना दिसतही नाही. " मीनाच्या बोलण्यात तक्रारीपेक्षाही कौतूकाचाच सूर होता. तीच काय पण सारंग बद्दल कोणीही तसेच बोलायचा. होताच तसा तो.
क्रमश :

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

17 Mar 2020 - 10:04 am | प्रचेतस

मस्त सुरवात.
वाचत आहेच.

खिलजि's picture

18 Mar 2020 - 5:20 pm | खिलजि

मस्त सुरुवात विजुभौ .. मजा येणार है वाटतं पुढं

शशिकांत ओक's picture

18 Mar 2020 - 7:59 pm | शशिकांत ओक

वाचायला आवडले...

बांवरे's picture

18 Mar 2020 - 11:04 pm | बांवरे

वाचतोय .. विजूभाउ .. दोस्तार आणि आता मोगँबो .. वा वा !

विजुभाऊ's picture

19 Mar 2020 - 11:33 am | विजुभाऊ

धन्यवाद प्रचेतस , खिलजी भौ. शशिकांत काका.
बावरे ,दोसतार कादंबरी आहे .
ही कथा आहे. दोसतार इतके दीर्घ चालणार नाही अशी आशा आहे.

बांवरे's picture

27 Mar 2020 - 11:56 pm | बांवरे

विजुभाउ दोन्ही आवडलेत !! लिहीत रहा.
मी वाचत आहे.