मनगंगेच्या काठावर

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
16 Mar 2020 - 12:31 pm

कुमार १ यांचा

कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद

धाग्यातील ‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’ ह्या पु.ल. देशपांडे ह्यांच्या विधानाशी ठेहराव झाला. वाचता वाचता असा ठहराव हा निव्वळ आनंदाचा क्षण असतो. असे क्षण मिळणे हे कोणत्याही हाडाच्या वाचकाला परिपूर्ती ची अनुभूती देतो.
मनगंगेच्या काठावर हे सबिता गोस्वामी ह्यांचे आत्मकथन नुकतेच वाचले. सबिता गोस्वामी ह्या भारतामधील BBC च्या पत्रकार. आसाम आणि ईशान्य भरात जेंव्हा भयंकर दहशतवादाच्या काळातून जात होता त्याकाळात सबिता पूर्ण ईशान्य भारतातून वृत्त संकलन करीत होत्या. बोडो आणि उल्फा ह्या उग्रवादी संघटनांचा उच्छाद , आसाम मधील स्वार्थी मुख्यमंत्री , हताश आणि निष्प्रभ झालेली पोलीस यंत्रणा , व्यावसायिक स्पर्धा , ह्या बाह्य संघर्षा बरोबर एकत्र स्वार्थी कुटुंब , सासुरवास , स्किझोफ्रेनिक नवरा , पदरात दोन मुली आणि सतत ची अस्थिर आर्थिक परिस्थिती ह्या कौटुंबिक झगडाच्या कात्रीत सापडलेली लेखिका आपल्या व्यावसायिक निष्ठांचे जतन आणि मुलींचे भरण पोषण कसे करते ह्याची चित्तथरारक आणि प्रेरणादायी कथा मनगंगेच्या काठावर ह्या आत्मकथेत उलगडत जाते. वासंती दामले ह्यांनी ह्या मूळ असामी भाषेतील पुस्तकाचा उकृष्ट अनुवाद केला आहे. पत्रकार असून लेखिकेने ( पुस्तकच्या खपावर डोळा ठेवून) कोणततीही सनसनाटी मजकूर टाकला नाही हे ह्या आत्मकथेचे विशेष. तसेच अनुवाद करताना वासंती यांनी मूळ संहितेचा गाभा पकडून असामी संस्कृती , भूगोल , राजकारण ह्यांचे मस्त दर्शन घडवले आहे.

सबिता तरुण वयात प्रेमात पडते आणि तिच्या दुर्भाग्याची सुरवात होते. माहेरचे उदार आणि वाचन , शिक्षण , कलेला पोषक वातावरण सोडून लेखिका एकत्र कुटुंबात येते. खाष्ट सासू , स्वार्थी दीर , कजाग नणंदा ह्यांच्या कचाट्यात सबिता सापडते. ज्याच्या भरवशावर घर सोडले तो नवरा ह्या सगळ्या परिस्थिती मध्ये लेखिकेला कोणतीही साथ देत नाही. कालांतराने तर तो ही ह्या कौटुंबिक जाचात सहभागी होतो. काव्य प्रेमी , बुद्धिमान प्रियकरा मधील नवरा म्हणून झालेला बदल लेखिकेला हादरवून टाकतो. दोन मुलींचा जन्म होतो आणि लेखन आणि वक्तृत्व ह्या गुणांच्या बळावर ती बंडाचा झेन्डा उंच उभारते. मातृत्व स्त्रीला किती आणि कसे बळ पुरवत राहते ह्याही बाजूने ह्या आत्मकथनाचा विचार होवू शकतो.

गोव्यामधील नवर्याची एक अधिकाराची नोकरी सोडता नवरा कोणतीही नोकरी धड करत नाही हे पाहून लेखिका शिक्षकाची नोकरी पत्करते. त्यात अनंत अडचणी येतात. नवरा दारूच्या व्यसनात गुरफटत जात आहे , अधिकारी पुरुष असहाय स्त्रीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात , सतत चारित्र्यावर संशय घेणारा नवरा , पैशाची तंगी , मुलभूत सोयींचा आभाव ह्या विपरीत परीस्थित केवळ मुलींना शिकवण्याच्या ध्यासापायी सबिता झिजत असते. दरम्यान रूसी करंजिया यांचे ब्लिट्झ आणि द विक ह्या नियतकालिकांना ती आपले वृत्त लेखन पाठवत राहते. ईशान्य भारत हा दुर्दैवाने तसा दुर्लक्षित प्रदेश. त्यामधील बातम्यांना कोणताही TRP नाही हे वास्तव सबिता पचवत असते तोच आसामचे आंदोलन सुरु होते. सतीश जेकब आणि मार्क टुली ह्या BBC च्या अधिकाऱ्यांना प्रथम ईशान्य भारतामधील बातम्यांचे महत्व समजते आणि ते साबिताला BBC ची अधिकृत वार्ताहर नेमतात. येथून कौटुंबिक झगडा संपून व्यावसायिक संघर्ष सुरु होतो.
आसाम मधील बंगला देशी घुसखोरी इतकी वाढली होती कि मूळ आसामी लोकांना असुरक्षित वाटू लागले होते. आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल महंत आणि नेते ह्या समाज आंदोलनावर आरूढ झाले. ह्या एका विस्तीर्ण संघर्ष्याचे अचूक आणि समर्पक वार्तांकन आणि विस्लेषण लेखिकेने केले आहे. सवंग आणि स्वार्थी नेते आंदोलनाचा वापर स्वार्थासाठी कसा करतात ह्याचे तिने वर्तवलेले भाकीत पुढे खरे ठरले. प्रफुल्ल महंत ह्यांनी उल्फा अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचारावर महंत पांघरूण घालत होते हे वाचून देशप्रेमी वाचक व्यथित होईल. पुढे बोडो आंदोलन अतिरेकी बनते आणि भयंकर नरसंहार सुरु होतो. बोडो आणि उल्फा अतिरेकी हे मध्यम वर्गिय घरामधील सामान्य मुले ! त्यांचे वैचारिक परिवर्तन आणि हिंसाचाराचे समर्थन कसे होत जाते हे जाणवत राहते. प्रादेशिक अभिमान आणि व्यावसायिक अलिप्तता ह्या सीमारेषेवर हे कथन पुढे जाते. निवडणुकांवर बहिष्कार आणि समर्थन ह्यामधून हिंसाचाराचा आगडोंब उसळतो. साबिताचे सगळ्या अतिरेकी आणि राजकारणी नेत्यांशी वैयक्तिक परिचय होतो. त्यासाठी लेखिका अनेक साहसे करते , धोके पत्करते. ह्यामधून तिला व्यावसायिक प्रतिष्ठा आणि निर्वाहासाठी पैसे मिळू लागतात तोच नवरा हट्टाने साप्ताहिक सुरु करतो त्याच्या लेखनात आणि कर्जात सबिता बुडून जाते.
लष्कर तैनातीत निवडणुका होतात हितेश्वर साकीया मुख्य मंत्री होतात. अत्यंत सहृदय , संयमी तरीही धूर्त आणि कावेबाज अशी त्यांची प्रतिमा आहे. दोघेही एकमेकांचा खूप वापर करतात. लेखिकेचा भाचा त्यांचावर गोळी झाडतो आणि एक नवे आव्हान साबितापुढे उभे राहते.
आता लेखिका सिनिअर पत्रकार झालेली आहे. ह्या जेष्ठते बरोबर गंडाने ग्रासलेले पत्रकार कारस्थाने रचतात. नवरा दिवाळखोरी करतो आहे आणि लेखिका ह्या सगळ्यांना पुरून उरते आहे. मुली घराबाहेर पडतात आणि चांगल्या शिकतात. पुढे लेखिका दिल्लीत नोकरी करू लागते. मोठी मुलगी शिक्षण आणि नोकरी करता पुण्यात स्थाईक (!) होते. लहान मुलगी दिल्ली मधील बंगाली मुलाशी प्रेमविवाह करते. पुढे तिचा काडीमोड होतो आणि सबिता खंबीरपणे तिच्यामागे उभी राहते.
नवर्याला हाडाचा कर्करोग होतो आणि पुण्यात त्याचे निधन होते. पुण्यातील वैद्यकीय व्यवसायातील निष्ठा तिला भावतात. मराठी शेजार्यांनी ह्याप्रसंगी केलेली मदत आणि मराठी पद्धतीने केलेले अंत्यसंस्कार हा एक आपल्या प्रदेशाशी दुवा हाती लागतो.
सबिता गोस्वामी ह्यांची लेखणी , वासंती दामले यांचा अनुवाद ईशान्य भारताच्या संघर्षशी आपला परिचय करून देते. राजहंस प्रकाशनाचे हे पुस्तक अवश्य वाचावे.

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

16 Mar 2020 - 1:15 pm | कुमार१

कोळी, दिग्गज आणि सुरेख अनुवाद
धाग्यातील ‘भाषांतर एक आकर्षक तरी असते, नाहीतर एकनिष्ठ तरी – दोन्ही असणे कठीण !’ ह्या पु.ल. देशपांडे ह्यांच्या विधानाशी ठेहराव झाला.

एक सुधारणा.
हे वाक्य पुल यांचे नाही.
ते एका फ्रेंच लेखकाचे आहे.