समारोप - कूर्ग डायरीज
इतके दिवस छान झालेला हा प्रवास आता संपणार म्हणून मन थोडे नाराज झाले असले तरी सकाळी उठून आमच्या रिसॉर्ट च्या बाजूलाच असलेले कावेरी नदीचे सुंदर पात्र पाहून खूप मस्त वाटले. सकाळी चहा घेऊन आम्ही सगळे नदीवर गेलो. थंडी होतीच तरीही मुली मात्र पोहोण्यास उत्सुक होत्या. मग काय त्यांना पाण्यात सोडले आणि मस्त डुंबू दिले. बाहेर आल्यावर खूप कुडकुडत होत्या. मग चहा घेऊन सर्व विधी आटोपून नाश्त्यासाठी असलेल्या दालनामध्ये गेलो. तिथेच रिसॉर्टच्या मालकांशीही भेट झाली.
श्री. सुब्रमणि के. हे खरेतर एक नावाजलेले कृषी संशोधक. कर्नाटक सरकारने अनेकविध पुरस्कार देऊन त्यांना सम्मानित केले आहे. हे मूळचे मराठीच आणि मराठी भाषाहि छान बोलतात. एकदम प्रसन्न व्यक्तिमत्व. योग धाम हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. त्यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी श्रीरंगपट्टण येथे ५ एकर जमीन घेऊन या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.
येथे गरीब मुलींना दहावी नंतरचे शिक्षण मोफत देण्यात येते. खरेतर सुब्रमणि सरांची हि संस्था म्हैसूर विश्वविद्यालयाशी संलग्न आहे. त्यामुळे दहावी नंतर येथे बारावी आणि पदवी परीक्षा वाणिज्य शाखेतून देता येते. तसेच याबरोबर सर्व मुलींना वेद, उपनिषद, योग यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येते.
हे रिसॉर्ट पूर्णतः संस्थेतील मुलीच चालवतात. येथे मुलींना इंग्लिश आणि संस्कृतमध्येच बोलणे बंधनकारक आहे. या सर्व मुलीसुद्धा खूप छान पद्धतीने रेसॉर्टचे व्यवस्थापन सांभाळतात. खरेच श्री सुब्रमणि यांचे कार्य खूपच स्तुत्य आणि मोठे आहे. इतक्या उदात्त हेतूने संस्था चालवताना त्यांचे कृषी संशोधन सुद्धा चालू असते.
अश्या या मोठ्या पण विनम्र व्यक्तिमत्वाशी परिचय झाला, त्यांच्याशी बोलता आले हेही नसे थोडके.
इथे येणारे पर्यटक मुख्यतः योगाभ्यास करण्यासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे टुमदार रिसॉर्ट योगाभ्यासाइतकीच मन:शांती देते. कावेरीची खळाळते पात्र आणि योगविद्या यांची अभूतपूर्व सांगड घालणाऱ्या सुब्रमणि सरांना खरेच साष्टांग दंडवत.
छानपैकी मस्त इडली आणि चटणीचा बेत नाश्त्यासाठी होता. नाश्ता अक्षरश: हादडून आम्ही तिथून निघालो नदीकिनारी फेरफटका मारण्यासाठी. आज आमचा कर्नाटकातील मुक्कामाचा शेवटचा दिवस असल्याने आम्हाला सर्व तयारी करून एयरपोर्ट ला निघणे क्रमप्राप्त होते. आमची फ्लाईट सव्वा सहाची होती. त्यामुळे किमान चार वाजता आम्ही बेंगळुरू विमानतळावर पोचण्याचे ठरविले आणि योगधाम मधील सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
बेंगळुरू विमानतळावर येण्यास आम्हाला साडेतीन पावणेचार वाजले. प्रवासातच पोटोबा झाला असल्याने आम्ही निश्चिन्त होतो. चार वाजता चेक इन केले आणि विमानाची वाट पाहू लागलो. साधारण सव्वासहाला फ्लाईट बोर्डिंग केले आणि सज्ज झालो भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये परतण्यासाठी.
--समारोप.
( ता.क. - काही काम निमित्त कूर्ग डायरीज या मालिकेचा शेवट होण्यास उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांशी क्षमा मागतो. आपले प्रेम असेच कायम राहो अशी इच्छा बाळगतो आणि या मालिकेचा समारोप करतो. धन्यवाद )
प्रतिक्रिया
5 Mar 2020 - 3:25 pm | श्वेता२४
नदीपात्राचा फोटो आहे की पेन्टींग? खूपच सुरेख दृश्य
6 Mar 2020 - 1:50 pm | अभिरुप
कावेरी नदीपात्राचा फोटो आहे.
5 Mar 2020 - 8:48 pm | कंजूस
आवडली कूर्ग डायरी.
पुढे कधीही नवीन पर्यटनाचे असेच लेख द्या.
6 Mar 2020 - 1:52 pm | अभिरुप
नक्किच लेखन चालू ठेवेन.
8 Mar 2020 - 1:10 pm | अनिरुद्ध.वैद्य
सुरेख वर्णन! लेखमाला आवडली :-)
9 Mar 2020 - 2:14 pm | अभिरुप
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
8 Mar 2020 - 1:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखमाला झकास झाली. आवडली.
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
9 Mar 2020 - 2:15 pm | अभिरुप
नक्किच लेखन करण्याचा प्रयत्न चालु ठेवेन.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
10 Mar 2020 - 8:53 am | सुधीर कांदळकर
सुब्रमणीला कोणा साधूचा मठ आहे असे ऐकिवात असल्यामुळे तीन वेळा मडिकेरीला जाऊनही सुब्रमणीला गेलो नव्हतो. माहितीबद्दल अनेक धन्यवाद. पुन्हा जाईन तेव्हा नक्की जाणार. मस्त लेखांबद्दल धन्यवाद.
11 Mar 2020 - 1:55 pm | अभिरुप
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर