कधी कधी खूप कंटाळा येतो.
तो नेमका कशाचा येतो, सांगता येत नाही. सगळं सुखात चालू असतं. आखीव, रेखीव रुटीन. शीशी,मम्मं गाईगाई. त्यात कसलाही बदल नाही. खरं तर नो न्यूज इज गुड न्यूज, असं म्हणतात. त्यानुसार आपला रोजचा घटनाक्रम त्याच वेळेला, तशाच पद्धतीनं चालू आहे ही चांगलीच गोष्ट आहे की नाही? पण नाही. आपल्याला ती चांगली वाटत नाही. काहीतरी वेगळं घडावंसं वाटतं. रुटीन तोडायचं म्हणून पर्यटनाला जाणे, सिनेमाला जाणे, फिरायला जाणे, मित्रमैत्रीणींच्यात गप्पा मारणे असे काही उपाय आपण करतो. पण ते वरवरचे असतात. खोल कुठेतरी कंटाळा हटवादी तापासारखा आपल्यात मुरलेला असतो. तो जात नाही.
नोकरी करत असताना तेही एक रुटीन असायचं. पण तेव्हा दमणुकीमुळे कंटाळायला वेळ नसायचा. पहाटे उठणं, डबा करणं, घरच्यांचा स्वयंपाक करणं,चहापाणी, स्वतःचं आवरणं, लोकल पकडणं,रोजचा दीड,दोन तास प्रवास करणं यांतच दमायला व्हायचं. मग ऑफिसात गेलं की वाटायचं,अरे बापरे. आत्ताच दमलो आपण! अजून दिवसभर नोकरी तर करायची बाकीच आहे की! एकदा कामाला सुरुवात केली की,चहा,कॉफी घ्यायला,डबा खायला,निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला,पाणी प्यायलाही वेळ नसायचा. आपल्याला कंटाळा आलाय हे लक्षातच यायचं नाही. नोकरीवरुन घरी आल्यावर स्वयंपाक, शनि रवि (इथं मला वार शब्द लिहायचा कंटाळा आलाय.) घरची कामं, साफसफाई, आठवडाभर येता जाता, चरायसाठी काहीतरी करुन ठेवणे, यांत वेळ जायचा.
यात सगळं आयुष्य गेलं. मग रिटायरमेंट झाली. जो भेटेल तो विचारायचा,"रिटायरमेंटनंतर काय करणार?"
मी हसत म्हणायची,"आधी मला कंटाळा तर येऊ दे, मग विचार करेन काय करायचं त्याचा!"
तेव्हा वाटत असे की,कंटाळा तर कंटाळा. कसा असतो बघूया तरी! कंटाळायला मोकळा वेळ तर मिळू दे.
रिटायरमेंटनंतर सुरुवातीचे दिवस मस्त गेले. रिटायरमेंटच्या दिवशी सेंड ऑफ पार्टीला मी सद्गदित आणि दुःखी वगैरे होण्याऐवजी मस्त आनंदात होते. इतकी की माझं निरोपाला उत्तर देणारं भाषण खूपच लांबलं. सर्वांना सामोसा, वेफर्स आणि बर्फी (कंटाळवाणा मेनू) खायची ओढ लागलीय (काहीजण त्याचसाठी आलेत) आणि मी किती चांगली आणि कर्तव्यतत्पर होते हे सगळ्यांनी सांगून झालंय. तेव्हा आता आपण खाली बसावं हे माझ्या लक्षातच आलं नाही. (सॉरी,खूप लांबलचक, कंटाळवाणं वाक्य नाही का श्री?)
उद्यापासून लोकलचा प्रवास नाही हे आठवून मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी सारखे सुटकेचे निश्वास सोडत होते.
रिटायरमेंटनंतरचे दोन, तीन महिने मज्जेत गेले.स्वातंत्र्य, मुक्तता! पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला हातापायातले साखळदंड तटातट तुटलेल्या, चित्रातल्या भारतमातेसारखी मी दिसत असे.
काहीजण रिटायरमेंटनंतर कंटाळतात आणि कुठंतरी पार्टटाइम नोकरी करतात. मी ते कंटाळा येऊनही केलं नाही.
"निवृत्तीनंतर काय करावे" सारखी पुस्तकंही विकत न घेता लायब्ररीतून आणून वाचली नाहीत. कंटाळा घालविण्यासाठी बागकाम करावे, हास्यक्लबला जावे, पत्ते खेळावेत, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना भेटी द्याव्यात, त्यांचे मनोरंजन करावे, विणकाम, शिवणकाम, भरतकाम करावे, नातवंडांना सांभाळावे, आवडती गाणी ऐकावीत, रेडिओ, टीव्ही लावावा, स्वयंपाकघरात नवे पदार्थ करावेत, ज्याची जन्मभर चेष्टा केली ती पोथी वाचावी, ध्यानधारणा करावी, (प्राणायाम सांगायचा राहिलाच) अशी अनेक कामं कंटाळा घालवण्यासाठी मला उपदेशिली गेली. पण हे करुनही माझं मन कशात रमलं नाही. आपण खरं म्हणजे 'रिकामटेकडे'आहोत टाईमकिलिंगसाठी आपण हे सगळं उसनं अवसान आणून करतोय हे माझ्यातरी मनातून जात नाही. माझा कंटाळा जेन्युईन,ओरिजनल आहे. एवढं सगळं करुनही फक्त दिवसच संपतो, कंटाळा संपत नाही.
मग मी हल्ली असं करते की,कंटाळा आलाय ना मी तर सरळ कंटाळते. आपल्याला दुःख झालं की आपण दुःखी होतो. आनंद झाला की आनंदी होतो. ती ती मनुष्यसुलभ भावना आपण त्या त्यावेळी अनुभवतो. तसा मी कंटाळा 'अनुभवते'.
तुला कंटाळा आलाय ना मग 'कंटाळ'. बोअर हो. साधा उपाय. पण तो न करण्यासाठी झगडून आपण त्रास करून घेतो. आयुष्यातली सगळीच वर्षं सारखी नसतात. काही सुखाची,काही दुःखाची. काही व्यस्ततेची, काही कंटाळ्याची.
मगाशी सागितलेले कंटाळा घालवण्याचे उपाय तरी तुम्ही कशाच्या जोरावर करणार? तर तुमच्या शारीरिक क्षमतेच्या जोरावर! उद्या तीच कमी झाली किंवा संपली तर? तर तुम्हांला कंटाळा गाठणारच. कंटाळा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ती एक अपरिहार्य अवस्था आहे. तिचा स्वीकार एक ना एक दिवस केलाच पाहिजे. तो दिवस उशीरा येवो एवढा प्रयत्न फार तर करता येईल.
माय गॉड! तुमच्याजवळ हे सगळं बोलल्यावर खूप बरं वाटतंय. मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. फ्रेश वाटतंय. कंटाळा गेला की काय? हो वाटतं! खरंच की..
याचा अर्थ तुमच्याशी वरचेवर बोललं पाहिजे. डन! थँक्यू फ्रेंडस्!
प्रतिक्रिया
3 Mar 2020 - 2:50 pm | नरेश माने
छान लेख!
3 Mar 2020 - 3:15 pm | वामन देशमुख
...
3 Mar 2020 - 3:30 pm | आंबट गोड
छान लेख. न कंटाळता लिहीलात येव्हढा..हे महत्त्वाचे!
पण खरंच...येतो कधी कधी फार कंटाळा................. माणसांचा, जबाबदारीचा, अपेक्षांचा, विचारांचा, प्रेमाचाही......!!!
का ही - का ही नको..फक्त निवांत बसू द्या काही वेळ असे वाटते!
3 Mar 2020 - 8:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
चांगले लिहिताय. टंकाळत राहा म्हणजे कंटाळा येणार नाही.
3 Mar 2020 - 11:41 pm | कानडाऊ योगेशु
ह्या वाक्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत.
5 Mar 2020 - 11:37 am | विनिता००२
भारीच!
मला पण कधी कधी रुटीनचा फार कंटाळा येतो. मग मी सरळ कंटाळून घेते.
निवांत बसून राहते. कुठलेच काम करत नाही, मॅगी बिगी करुन खाते. मग कंटाळून झाले की उठते. :)
5 Mar 2020 - 12:43 pm | जालिम लोशन
कंटाळा आला म्हणुन मिसळपाव बघत होतो, लेख वाचला आणी कंटाळा गेला. चला कामाला लागतो.
5 Mar 2020 - 1:53 pm | तुषार काळभोर
साधा उपाय. पण तो न करण्यासाठी झगडून आपण त्रास करून घेतो.
खरंय ..
पण सध्या कंटाळा करायला पण वेळ नाही :(
रिटायरमेंट ची वाट बघतोय...
6 Mar 2020 - 12:27 pm | मराठी_माणूस
नेमकेपणाने मांडलेले प्रखर वास्तव
9 Mar 2020 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद टंकायचा टंकाळा आला म्हणून केवळ साधी पोच. :)
-दिलीप बिरुटे
9 Mar 2020 - 12:03 pm | कंजूस
झकास.
लेखणी चालू ठेवा. आमचा कंटाळा भुरकन उडतो.
11 Mar 2020 - 11:50 am | आजी
नरेश माने-"प्रतिसाद द्यायचा कंटाळा आलाय.हाहाः" पण मी मात्र कंटाळा न करता प्रतिसाद देतेय. तुमचा पंच आवडला."छान लेख"ही तुमची प्रतिक्रिया मनाला समाधान देऊन गेली.
वामन देशमुख-मेनी मेनी थँक्स.
आंबटगोड-"काही नको.फक्त निवांत बसू द्या."हे तुमचे वाक्य आवडलं.मला वाटतं,निवांत बसून तुमच्यासारख्या स्नेह्यांचे प्रतिसाद वाचावेत.
राजेंद्र-"चांगलं लिहितेय"म्हणता?थँक्यू."टंकाळत राहा,म्हणजे कंटाळा येणार नाही."हा तुमचा सल्ला पाळते आहेच.
कानडाऊ योगेश-माझ्या वाक्याला तुमच्या टाळ्या!तुमची द्या टाळी,माझी घ्या टाळी!(कोरोनाची भीती न बाळगता)
विनीता००२-तुमचा उपाय माझ्यासारखाच.मस्तपैकी कंटाळायचं!
जालिम लोशन-माझा लेख वाचून कंटाळा गेला हे वाचून मला उत्साह आला.चला.कामाला लागा!
पैलवान-तुम्हांला कंटाळा करायला वेळ नाही?लकी आहात!
मराठी माणूस-"नेमकेपणानं मांडलेलं प्रखर वास्तव"आवडलं?धन्यवाद.
दिलीप बिरुटे-"लिहित राहा"ही तुमची मागणी तुम्हांला कंटाळा येईपर्यंत पुरी करत राहेन.
कंजूस-जरुर लिहेन.तुमच्यासारख्यांच्या प्रतिसादामुळे मला स्फूर्ती येते.
13 Mar 2020 - 1:54 am | किल्लेदार
ऑफिस मध्ये बसून कंटाळलो होतो म्हणून मिपावर आलो तर कंटाळ्यावर लेख... लेख वाचून कंटाळा पळाला. पण संध्याकाळी घरी गेलो की परत मला तो नक्की गाठणार.....
कंटाळा शब्दातच "टाळा" असल्यामुळेच कदाचित तो "टाळता" येत नसावा. :) :) :)
2 Apr 2020 - 11:06 am | आजी
प्रतिसादासाठी धन्यवाद.