बहिणीला जपणारी मारग्रेट

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
12 Feb 2020 - 7:31 pm

Music For Millions
----------------------
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

आठवणीतला हॉलीवुड

रवींद्र दत्तात्रय तेलंग

अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा. आपआपल्या जागी दोन्हीं चित्रपट श्रेष्ठ. चित्रपट होते-‘म्युझिक फार मिलियन्स’ आणि ‘हा माझा मार्ग एकला.’

टीएनटी वर पहाटे ‘म्युझिक फार मिलियन्स’ तर त्याच दिवशी दुपारी आठवणीतील चित्रपट मधे ‘हा माझा मार्ग एकला’ बघितला. ‘म्युझिक फार...’ मधे बाल कलाकार होती मारग्रेट ओ’ ब्रायन तर ‘हा माझा...’ मधे होता सचिन. तिथे मारग्रेट आपल्या मोठ्या बाळंतीण बहिणीची काळजी घेते, तर इथे सचिन गैरेज मैकेनिक असलेल्या राजा परांजपेंची काळजी घेतो. दोन्हीं चित्रपटांतील कथानकाचा इतकाच भाग सारखा होता, पण या विषयाची हाताळणी मात्र निराळी होती, आपआपल्या परंपरांशी इमान राखून.

1944 सालच्या ‘म्युझिक फार मिलियन्स’ ची सुरवात तर झकास होती. लंदनच्या रेलवे स्टेशनावर येऊन थांबलेल्या प्रवासी गाडीतून लहान मारग्रेट एकटीच उतरते. छोटी ब्रीफकेस, छतरी आणि पर्स सांभाळीत. कंपार्टमेंटचा टीटीई उतरण्यांत तिची मदत करतो, तर ती त्याला सांगते-‘माझी ताई येईल मला ध्यायला...तुम्हीं काळजी करू नका.’ गाडी थांबल्यावर दहा-पंधरा मिनिटांतच फलाट पूर्णपणे रिकामं झालेलं, पण हिच्या ताईचा कुठेच पत्ता नाही. बरं ही कुणाशी बोलत देखील नाही. एकाने तसा प्रयत्न करतांच त्याला चक्क सांगते-‘माझ्या ताईने सांगितलंय की परक्या माणसांशी बोलायचं नाही...’ शेवटी एक वयस्क पोलिसवाला तिची विचारपूस करतो व ताईचा पत्ता मागतो. तर ती आपली ब्रीफकेस उघडून एक फोटो काढते. तो 40-50 जणांचा ग्रुप फोटो असून त्यापैकी एका चित्रावर बोट ठेवून ती सांगते-ही माझी ताई बारबरा (जून एलायसन). ते बघून सारे हसतात. पण त्या फोटोमुळे त्यांना अंदाज येतो की या लहान मुलीची ताई आॅपेरा मधे एक गिटारवादिका आहे. त्या ग्रुपचं नाव वाचून तो पोलिसवाला ती जागा शोधून काढतो व मारग्रेटला तिथे घेऊन जातो. अशा रीतीने दोघा बहिणींची भेट होते.

ही बारबरा आयसेनवर्थ (जून एलॉयसन) आपल्या मैत्रिणींसह रूम शेयर करून राहते. आता मारग्रेट देखील सोबत. रूमवर पोचता क्षणीच घडलेल्या घटनाक्रमामुळे मारग्रेटला कळतं की आपली ताई गरोदर असून तिला मूल होणार आहे...तिचा नवरा सैनिक असून तो युद्धावर गेलाय...मोठा बाका प्रसंग...नकळत मारग्रेटवर आपल्या ताईची काळजी घेणं, तिची निगा राखण्याची जवाबदारी येते. यामुळे मारग्रेट अधिक समजूतदार होते. ती लवकरच सगळ्यांची लाडकी मैत्रीण बनून जाते, अगदी आर्केस्ट्रा कंपोझर सुद्धा तिचा फास्ट फ्रेंड होतो. मारग्रेट देखील ताईच्या कामांत रंगून जाते. निरनिराळ्या कार्यक्रमांत ती ताई सोबत जाते, तिची पुरेपूर काळजी घेते. हा ग्रुप आर्मी कैंपच्या टूरवर जायची तयारी करीत असतांना एके दिवशी एक टेलीग्राम येतो. त्यात एक दुखद बातमी असते की जूनच्या सैनिक नवरा पेसिफिकच्या युद्धभूमि वर मारला गेला. तिच्या मैत्रिणी ठरवतात की बाळंतपण सुखरूप होई पर्यंत बारबराला हे कळू द्यायचं नाही. शेवट बालीवुड चित्रपटासारखाच...

चित्रपटांतील सात-आठ वर्षाच्या त्या पिटुकल्या मारग्रेटनी अप्रतिम काम केलं होतं. जस-जसे दिवस जातांत, तस-तसं काम केल्यावर ताईला थकवा जाणवूं लागतो. ताईचं काम म्हणजे शेवटच्या रांगेत उभं राहून मोठा गिटार वाजवणं. वादकांचा इतका मोठा ताफा...रिहर्सलच्या वेळी तासनतास उभं राहून म्युझिक डायरेक्टरच्या इशारयावर गिटार वाजवणं म्हणजे सोपं काम नव्हेच. लहान मारग्रेट पडद्यामागे उभी रिहर्सल बघत. कुणाला असो-नसो, पण मारग्रेटला ताईची चिंता जास्त, तिचं सगळं लक्ष रिहर्सलकडे नसून फक्त ताईकडेच (या दृश्यांतील मारग्रेटचे रिफ्लेक्सेस खूपच सुरेख होते.) रिहर्सल दरम्यान मारग्रेट बघते की संधी मिळतांच ताईने हुश्श... करून कमरेवर हात टेकला व रिलैक्स होण्याचा प्रयत्न केला...इतक्यांत गिटारचा नंबर आला म्हणून लगेच सावध होऊन ती पुन्हां गिटार वाजवूं लागली...ताईचं ते हुश्श..., तिच्या चेहेरयावरील वेदना मारग्रेट बघते आणी बेचैन होते. रिहर्सल सुरू असतांना अडथळा कसा आणायचा! पण काही तरी करायला हवं, ताईला त्रास होतोय. ती इकडे-तिकडे बघते, तर समोर एक ऊंच स्टूल पडलेला. मारग्रेट तो स्टूल ढकलत ढकलत ताईकडे नेते...कंपोझर तिला असं करतांना बघतो अन् विचारतो-हे काय करतेस? ती सांगते-ताईसाठी नेतेय...

कां?

‘दिसत नाही का ती फार थकून गेलीय. तुम्हांला काय...!’

कंपाेझर म्हणतो-बाकी लोक पण तर उभे आहेत की...!

तर मारग्रेट म्हणते-माझ्या ताईची गोष्ट निराळी आहे.

कशी...?

तर मारग्रेट सांगता-सांगता एकदम सावध होऊन म्हणते-‘ते एक गुपित आहे...’

(तिला कल्पना आलेली असते की ताईचं गुपित उघडलं तर तिला नोकरीवरून काढून टाकतील.) पण कंपोझर हे समजून चुकलेला असतो व तो मारग्रेटच्या ताईला स्टूलवर बसण्याचा इशारा करतो. ताई आता स्टूलावर बसून गिटार वाजवते. मारग्रेट खुशीत पुन्हां पडद्यामागे जाऊन उभी राहते.

कंपोझर मारग्रेटला विचारतो-‘ओके...’

मारग्रेट उत्तरते-‘ओके...’ दोघे हसतात, रिहर्सल पुन्हां सुरू होते. पण पुढच्या कार्यक्रमांमधे ताईसाहेब स्टूलावर बसून गिटार वाजवतात.

---------------

मारग्रेटचा गौरव केला एकेडमी ने

8 वर्षाच्या मारग्रेट ओ’ ब्रायनला 1944 सालचा आउटस्टैंडिंग चाइल्ड एक्ट्रेसचा पुरस्कार देण्यात आला होता. यावर्षी तिचे म्युजिक फार मिलियन्स, मीट मी इन सेंट लुईस, जेन आयर, दि केन्टरविले घोस्ट आणि लॉस्ट एंजल असे चित्रपट आले होते. 15 मार्च 1945 ला झालेल्या ऑस्कर समारंभामधे बोलतांना प्रसिद्ध आलोचक जेम्स एगी याने मारग्रेट ओ’ ब्रायनचं कौतुक करतांना म्हटलं होतं - ‘Incredibly vivid and eloquent - almost as hypnotizing as Garbo.’

त्या ऑस्कर समारंभाचा संचालक होता बॉब होप. त्याने पुरस्कार घ्यायला आलेल्या मारग्रेटला कडेवर उचललं तेव्हां कुठे ती मायक्रोफाेन पर्यंत पोचू शकली.

बॉब तिला म्हणाला देखील - ‘Will you hurry and grow up, please?’

म्युजिक फार मिलियन्सला त्यावर्षी बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्लेचं नॉमिनेशन मिळालं होतं. पण तो मान पटकावला स्विस चित्रपट Marie-Louise याने.

चित्रपटाचा प्रोडयूसर होता जाे पास्तरनाॅक (Joe Pasternak) आणि डायरेक्टर होता हेनरी कोस्टर (Henry Koster). हे दोघं नुकतेच यूनिवर्सल पिक्चर सोडून एमजीएममधे दाखल झाले होते. कोस्टर या चित्रपटातील आपल्या चमूवर खुश होता. नंतर बाेलतांना त्याने ओ’ब्रायन ला बोर्न एक्ट्रेस म्हटलं होतं. तसंच एलॉयसनला खूप प्रतिभाशाली नटी (Great, Great Talent - she really had the spark.) म्हटलं होतं.

या चित्रपटा दरम्यान ओ’ ब्रायन आणि एलॉयसन इतक्या जवळ आल्या की एलॉयसन ने आठवणीत सांगितलंय की ‘मी माझ्या ड्रेसरवर (आलमारीमधे) ठेवलेले एकमेव चित्र ओ’ ब्रायनचेच होते.’ या दोघींनी नंतर लिटल वूमन (1949) मधे सोबत काम केलं. दोघींना एमजीएम मधे ‘टाउन क्रायर्स’ मुळे ओळखलं जायचं. (Both remembered being known at MGM as the ‘town criers’ because of their ability to weep convincingly at the drop of a hat.)
------

चित्रपटआस्वाद