दोसतार- ३६

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Feb 2020 - 7:41 am

शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते.
तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46058
मंगळवारची तयारी शनिवारपासूनच चालू झाली. शनिवारी शिक्षकांकडून त्या त्या विषयाची पुस्तके घेणे आणि काय शिकवायचे आहे हे समजून घेणे ही पहिली पायरी. प्रत्येकानेच पार पाडली. मी ऑफ तास घेणार होतो. ऑफ तास म्हनजे कोणी शिक्षक रजेवर असतील किंवा आजारी असतील शाळेत आलेले नसतील त्यांच्या ऐवजी वर्गावर जाऊन बसायचे. मुलांना दंगा करू न देणे हे मुख्य काम. ऑफ तासाला असे कोणी खास शिक्षक नसतात. जे उपलब्ध असतील ते येतात. गजेंद्रगडकर बाईंना विचारले ऑफ तासाची तयारी काय करू? बाईंनी माझ्याकडे पायापासून डोक्यापर्यंत नीट पाहून घेतले. कधी कधी काही अफात प्रश्न विचारला की बाबा सुद्धा माझ्याकडे असेच पहातात. लहान असताना मी एकद त्यांना " मी लहान होतो तेंव्हा आमच्या शाळेच्या बाईपण लहान होत्या का ?" असे काहीतरी विचारले होते. बाबाच सांगतात तसे. मला आठवत नाही. लहानपणचे तसेही कुणालाच आठवत नसते. बरेच आहे म्हणा ते. पाळण्यात लोळताना तोंडाने कुणाच्यातरी तोंडावर फुरक्या उडवल्या. किंवा ग्राईपवॉटरची चव कशी होती ? हे काय आठवण्यासारखे काही आहे का ? पण बाबा त्या प्रश्नाने दचकले होते , अजूनही ते मी हा प्रश्न विचारला होता असे सांगताना त्यांनी माझ्याकडे कसे पाहिले होते तसे पाहुन दाखवतात. बाबा असे काही सांगायला लागले की एकदम रंगात येऊन सांगतात.
गजेंद्रगडकर बाई दचकल्या नाहीत पण त्यानी मला नीट पाहिले. मग जरा विचारात पडल्या.
अरे ऑफ तासाची अशी काही तयारी करायची नसते पण मुलांना शांत बसवणे हेच मोठे काम असते. त्यांना काहीतरी कामात गुंतवून ठेवायचे म्हणजे मग ती दंगा करत नाहीत. पण काम असे द्यायचे की त्यात त्यांना गम्मत वाटली पाहिजे.
मुलांना गम्मत वाटेल असे काहितरी द्यायचे म्हणजे ?
ते तू शोधुन काढ. अभ्यास कर जरा. सगळं शिक्षकांनीच सांगितल्यावर तुम्ही स्वतः काय करणार ? तुम्हाला सगळ्यांना चमच्याने दूध प्यायची सवय लागली आहे बघ . स्वतःचा म्हणून काही अभ्यास करायला नको."
जे मी विचारत होतो तोच प्रश्न बाईंनी मलाच टाकला. पाटणच्या शाळेतला प्रश्नांला प्रश्नाने उत्तर देणारा गण्या बाईंकडूनच शिकला असावा. पण हे कुणाला विचारायचे. गण्याला विचारले तर तो म्हणेल बाईंनाच विचारून पहा.
"पण ऐक. तु जे काय करशील ना ते मनापासून कर. उत्क्रुष्ठ कर. जे काही शिकवशील ना त्यात नाविन्य आण. मुलांना ऑफ तासातूनही काही शिकायला मिळेल असे काही तरी पहा. आपल्याला असा एखादा ऑफ तास मिळाला होता हे त्यांच्या लक्ष्यात राहील. कुठलीही गोष्ट मनापासून केली ना की ती उत्क्रुष्ठच होते."
हे मात्र खरे आहे. आईने स्वैपाक करताना साधा ताकभात जरी केला असेल ना तरी तो उत्क्रुष्ठच असतो. ती मनापासून करते. अगदी कपड्याच्या घड्यापण मनापासून घालते.
शिक्षकांच्या खोलीत जाऊन सोनसळे सरांना विचारूया म्हणून तिकडे गेलो तर शिक्षकांच्या पेक्षा तेथे विद्यार्थ्यांचीच गर्दी झाली होती. जे कोण काय काय शिकवणार होते ते त्या त्या शिक्षकांच्या टेबलाजवळ उभे होते. प्रत्येक टेबलाभोवती तेघे तिघे तरी होतेच. राजा , संगीता , माधुरी, धन्या, मिलिंद , पक्या सगळे सरांना न घाबरता काहीना काही विचारत होते. एल्प्या त्याच्या त्या समांतर रेषांची तयारी करणार होता. पण तो कुठेच दिसत नव्हता. टंप्याचा काहीच प्रश्न नव्हता. त्याच्याकडे शिपाई मामांची जबाबदारी . तास संपल्याची बेल द्यायची प्रॅक्टीस करणे शक्य नव्हते. पण तरीही तो शिपाई मामांच्या सोबत काहितरी बोलत बसला होता. शिपाई मामा जिथे जिथे फिरत होते तिथे तिथे तो त्यांच्या मागे मागे जात होता.
त्या दिवशीचा शनिवारच काय पण रविवारही घरी गेल्यावर कोणी खेळले नसेल. सगळे मंगळवारच्या अभ्यासाच्या तयारीत. कोणी पाढे पाठ करून ठेवतंय. कोणी संस्कृतची सुभाषीत माला. हिंदीचे धडे कविता, शब्दार्थ , मराठीचे व्याकरण , संधी समास , अक्षरगण वृत्त मात्रा व्रुत्त . इंग्रजीचे धडे, गणीताची सूत्रे , न्यूटनचे नियम , रसायनशास्त्रातील अभिक्रीया त्यांची सूत्रे जीवशास्त्रातील प्राण्यांची लक्षणे, परावलंबी वनस्पती, एकपेशीय सजीव म्हणून पॅरामेशियम अमिबाच्या आकृत्या, कवक ,शैवाल एकदल आणि द्वीदल वनस्पती. भाषा आणि भूगोल या दोन्ही मधे वृत्ते आहेत हा एक नवीनच शोध लागला. भूगोलात विषुववृत्त आहे भाषेत अक्षरगण वृत्त आहे. इतिहासातल्या लढाया, कोण कोणास म्हणाले. अब्दाली , इब्राहीमखान लोदी, आणि जनकोजी शिंदे या पैकी कोण कोणास म्हणाले. वसईच्या तहाची कलमे, नगरपालीकेची कामे. राष्ट्रपतीची निवडणूक, विधान सभा आणि विधान परिषद म्हणजे काय गेल्या तीन वर्षाचा अभ्यासक्रम या दोन दिवसात संपला असेल.
हे शिकताना ,राज्यसभा ही राज्यात नसून दिल्लीत असते. किंवा सूर्य ग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीवर पडते असे काही काही नवे शोधही लागले .
भूगोलाच्या पेपरात कारणे द्या लिहीताना एक प्रश्न हमखास असतो. आणि त्याचे हमखास चूकीचे उत्तर ही असते. " चंद्रग्रहण नेहमी पौर्णीमेला आणि सूर्यग्रहण नेहमी अमावस्येला चा का होते.याचे हमखास उत्तर प्रत्येक जण लिहायचा ते म्हणजे पौर्णीमा हा एक चांगला दिवस आहे. म्हणून चंद्रग्रहण पौर्णिमेला होते आणि अमावस्या वाईट दिवस आहे म्हणून सूर्यग्रहण अमावस्येला होते. ही उत्तरे चूक आहेत असे कोणी म्हंटले असते तर अर्धी शाळा त्याला येड्यात काढून मोकळी झाली असती. पण त्या दुसर्‍याला शिकवायचे या भावनेने केलेल्या अभ्यासामुळे आमच्या शंका दूर होत होत्या.
सोमवारीशाळेत प्रत्येकजण उद्या ची तयारी करत होता. कागदावर काहीतरी नोट्स काढत होता. एरव्ही दंगा करणारी सगळीच जण आज एकदम अभ्यासु झालेली. माझ्या मनात मात्र अजून ऑफ तासाला काय करायचे तेच चाललेले. काहीतरी वेगळे शिकवायचे हे नक्की. बघुया वाचनालयात मिळतेय का काही ते.
वाचनालयात गेलो खरा पण काय पहायचं तेच माहीत नाही. ते कोणत्या पुस्तकात सापडेल हा त्याच्याही पुढचा प्रश्न . जे करायचे ते एकदम मस्त करायचे होते.
थोडावेळ इकडे तिकडे केले. काय करायचे हेच ठरत नव्हते तर काय वाचायचे ते समजणार तरी कसे. काहीतरी वाचू म्हणून वाचनालयातल्या सरांना "विश्वकोष " मागितला. त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिले.
विनायक ना. आठवी ब मधला. कशाला हवाय विश्वकोष तुला
सर त्यात बघायचं आहे ऑफ तास कसा घ्यायचा ते.
सरांनी पुन्हा एकदा माझ्याकडे नीट पाहिलं नाकावरच्या चष्म्या च्या वरून. न्याहाळणे की कायसं ते या अशा पहाण्यालाच म्हणत असावेत बहुतेक. चश्मा असताना चश्म्यातून पहाण्या ऐवजी त्याच्या वरून का बघतात हे मोठे लोक कोण जाणे.
ते तुला विश्वकोषात नाही सापडणार.
असे कसे सर. विश्वकोषात नाही असे काहीच नसते.
अरे पण तुला जे हवे आहे ते त्या आव्रुत्तीत नसेल. त्या पेक्षा असे कर त्या तीन नम्बरच्या कपाटात किशोरचे अंक आहेत त्यात पहा. त्यात काही खेळ गोष्टी असे काहितरी असेल ते सांग मुलांना ऑफ तासाला.
अरेच्चा. खरेच की. ते तीन नंबरचे कपाट काचेच्या आड किशोर मासीकांचे अंकच्या अंक उभे होते. कपाट उघडले. अलीबाबाला गुहा उघडल्यावर खजीना दिसावा तसा तो खजिना दिसला. एक एक अंक चाळत बसलो. शांता शेळकेंच्या कविता, गोष्टी , प्रभाशंकर कवडींची चित्रे. किती वेळ बघत होतो काय माहीत. कोणीतरी खांद्यावर हात ठेवला .
उठा. चला शाळा सुटली. आता उद्या या.
सर हे दोन अंक वाचायचे आहेत. उद्याच्या शिक्षक दिनाच्या तयारीसाठी. थोडा वेळ थांबूद्याना
कपाटाला कुलपं लावून वाचनालय बंद करायचंय मला.
पण सर मग माझी तयारी अर्धी राहील ना.
मग असे कर ही पुस्तके घरी घेवून जा. त्या रजिस्टर मधे नोंद कर आणि घेऊन जा.
रजिस्टर मधे नोंदवून ते किशोर चे दोन अंक दप्तरातून घरी आणले.
उद्याची तयारी करायची आहे पण काय करायचे तेच कळत नाहिय्ये.
"आज "आणि "उद्या" मधे फक्त दहा तासांची एक रात्र आहे.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

king_of_net's picture

11 Feb 2020 - 5:56 pm | king_of_net

वाचतोय!!

श्वेता२४'s picture

12 Feb 2020 - 1:56 pm | श्वेता२४

मी नेहमी शिक्षक दिनाला मराठी शिकवायचे. त्याची आठवण झाली.

बांवरे's picture

17 Feb 2020 - 12:14 am | बांवरे

वाचतो आहे. पु.भा.प्र.