भाग १४ अंधारछाया प्रकरण १३ - ‘रक्ताची उलटी होतेय...मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात न्या...कुठला कोण तो कुडबुड्या गुरूजी...‘मला तर फसवून तुम्हा त्या गुरूजीकडे नेलत!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
30 Jan 2020 - 12:56 am

अंधारछाया

तेरा

मंगला

बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय सणकून तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात.
आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला!
दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे’. मुले शाळेत गेली परत. आजी म्हणाल्या, ‘थोडीशी खीर नंतर दे बेबीला. उपाशी पोटी कशी राहून चालेल’?
तिला हलवून बसते केले. म्हणाले, ‘ही खीर खा. जरा बरं वाटेल!’ तशी घेतलेन चार चमचे आणि म्हणाली, ‘मला ओकारी होणार आहे’. गेली मोरीकडे. ओकारी काढताना आवाज झाला. मी गेले. पाठीवरून हात फिरवला. चूळ भरलीन. उठली परत यायला. तसा तोल गेला. चक्कर आल्यासारखी वाटली. धरून धरून आणली. बसवली गादीत. तंद्रीतच झोपली पुन्हा.
माळातर सगळ्याच राहिल्या होत्या. बसले शेजारी हातात हात धरला. चालू केल्या माळा करायला. दोन-तीन माळातच हात धरवेना इतका धगधगू लागला! ह्यांना म्हणाले, ‘पहा हो, फार गरम आहेत हात! पहा’. ह्यांनी पाहिले, म्हणाले, ‘हाताची मूठ करून मुठीत लावून बघ बरं थर्मामीटर. पाहिला तर एकशे चार अंशापुढे ताप ! कपाळावर गरमी काहीच नाही! पोट-पाठ तेही नॉर्मल!
हे म्हणाले, ‘कपाळावर हात ठेव. अन चालू ठेव जप. तेवढेच आपल्या हातात आहे’.
माझ्याकडून मी जपाच्या माळा चालू ठेवल्या. हे चहा घेऊन ऑफिसात गेले. माझा गाण्याचा क्लास बुडाला होता.
संध्याकाळी साडेपाचला जरा तिला जाग आल्यासारखी झाली. बडबडत होती, ‘कशाला त्रास देताय, जरा पडूदे की गप्प..’. मी काही बोलले नाही. जप करणे चालूच ठेवले. जरा मोठ्या आवाजात.
शाळेतून मुले आली. शशीला बसवले माळा करायला. तो बसला होता म्हणत जोरजोरात. मधेच लता बसली त्याच्या मदतीला. रात्री दहा वाजून गेले तेंव्हा शेवटची माळ झाली. तरीही ही झोपलेलीच होती.
खायला सांगावे म्हणून आजी म्हणाल्या, ‘बेबी, खाऊन घेतेस का थोडसं? मी थांबलेय बघ तुझ्यासाठी, दहा वाजून गेले बघ रात्रीचे. चल ऊठ. मी वरणभात देते. का दूध भात देऊ’?
आळोखे पिळोखे देत उठली. मोरीवर जाऊन आली. अंथरुणात बसूनच खाल्ले चार घास. पाणी प्यायली. म्हणाली, ‘पेपर पाहू दे आजचा’. बसली वाचत बाहेरच्या खोलीत. शशीने तिचे अंथरूऩ झटकून झाडून घातलेन. इतक्यात बाहेरच्या दरवाज्याची कडी काढलेली वाटली. बाहेर गेले तर ही बसली होती धुण्याच्या दगडावर ओकाऱ्या काढत. बरं इतकी अशक्तता आली होती. उठली की झोकांड्या जायच्या. संडासला न्यायला आणायला ह्यांना जावे लागे. दाराशी मी उभी राही. बिचारीची अवस्था पाहवेना. पुढे तीन–चार दिवस असेच चालले गेले.
गुरूवार आला आणि धावले गुरूजींकडे. म्हणाले, ‘ह्या ओकाऱ्या थांबत नाहीत. काही खालेलं अंगी लागत नाहीये तिच्या’.
ते म्हणाले, ‘असे होतेच. धीर धरा. काही होणार नाही तिला. माळा चालू आहेत का नाहीत?
मी म्हणाले, ‘आम्ही शेजारी बसून करतो तिच्यासाठी’. म्हणाले, ‘ठीक आहे. पण तिला शक्यतो मंत्र म्हणू द्या. आता भस्माचे असे करा की थोड्याशा पाण्यात घाला. ते तिच्या खाण्या आधी द्या. मग खाऊ दे काय खाते ते.
रात्रीच्या जेवणाआधी पाण्यात भस्म टाकून दिले, जेवली आणि पडली आडवी. नाही ओकली काही. पुन्हा सकाळ दुपारचा चहा घेतलान. पडला नाही उलटून. जरा टुकटुकी आली तशी बसली माळ घेऊन करायला.
गेला आठवडाभर ठीक होती. जपही व्यवस्थित चालला होता. मधेच गुरूजींना दाखवायला घेऊनही गेले सांगलीला. गुरूजींशी नीट बोलली. म्हणाली, ‘आताशे मला इतकी छान झोप येतेय! पुर्वी स्वप्ने पडून झोप कधी मिळालीच नाही गाढ! आता किती दिवस चालणार आहे असे? आता काय होणार आहे आणखीन मला?
गुरूजी म्हणाले, ‘तू बरी आहेसच. आता फक्त तुला पौर्णिमा – अमावास्येला जपायला हवे. तेंव्हा त्या दिवशी सावध रहा. बाहेर कुठे जाऊ नकोस, खाऊ नकोस!’
‘बर’ म्हणाली. आम्ही जायला उठलो त्यांच्याकडून. तेंव्हा गुरूजी म्हणाले, ‘आता जरा कळ काढा. अगदी काम होत आलेले आहे! मलाही हुरूप आला. घरी येऊन ह्यांना सांगितलं, हे म्हणाले, ‘आत्ताच आपली खरी परीक्षा आहे’. तेंव्हा माझ्या लक्षांत नाही आलं, पण दोन दिवसात हिसका कळला!
जेवण इतकं वाढलं हिचं. नेहमीच्या आकारच्या दोन पोळ्या, वाटीभर भात खाऊन उठणारी ही, पहिला वरण भात, चारपाच पोळ्या, पुन्हा भात! पुन्हा भात! हिच्यासाठी वेगळा भात टाकायला लागला दोनदा! काल म्हणाले, ‘जरा थांब. टाकते आणि देते’. तर चिडून वाटी-भांडे ताटात आपटलेन अन गेली उठून! मीही घुश्शात केला नाही भात! आजी म्हणाल्या, ‘मंगला ही खाते आहे अशी अधाशा सारखी, हे काही चांगले लक्षण नव्हे! बाधेल तिला’. झाले तसेच. सोसतय होय असं खाऊन? मग धावल्या बाईसाहेब संडासाकडे! अमावास्या जवळ आली. मला मनातून धाकधूक वाटायला लागली. आता काय होतय म्हणून!
सकाळपर्यंत ठीक होती. अंघोळ वगैरे केलीन भस्म लावून बसली जपाला. चहा करून दिला मधेच मी तिला. जरा सकाळ उघडून वाचायला बसले. ही उठून बागेत जाता दिसली. मी ही ऊठून बाहेर आले. ही झाडाशी ओणवी होऊन खात होती. काय खातेय? पहाते तो ओकली भडाभडा! वर तुळशीची पानं खात होती ओरबाडून! जवळ गेले. पाठीवरून हात फिरवला. बादलीतून पाणी आणले लोटीभर, दिलं चूळ भरायला. घेतलीन चूळ. आली तोंडबींड पुसून. बसली जपाला.
थोडावेळ होतोय ना होतोय तो उठली. मीही धावले तिच्यामागे बाहेर. पुन्हा तशीच ओकारी. परत आणून झोपवली. शेजारी बसून माळा करायला लागले. हातांच्या तळव्यांकडे लक्ष गेले. पांढूरके वाटले तळवे.
रात्रीपर्यंत गेली दोन वेळा! गेली बागेत ओकायला. अन पडली जवळजवळ बेशुद्ध! चालणे अशक्यच होते तिच्याच्यानं. ह्यांनीच आणली उचलून. दारातून आत आणली अन आडवी झाली. ‘हाताचे तळवे फार जळजळतायतं, गरमी वाटतेय फार. खाजवा, खाजवा हातपाय’ म्हणून ओरडत होती.
तिला अंगभर खाज सुटली होती. हाताचे तळवे खाजवून खाजवून रक्त येणार कि काय इतके लाल झाले! अन आलेच रक्त, बोटांच्या बेचक्यातून, मनगटापाशी, रक्ताच्या फरकाट्या उठल्या पाठीवर, पायांच्या घोट्यापाशी! खाज आणि आग सहन होईना तिला! तेंव्हा उठली आणि म्हणाली, ‘ओकारी होतेय’. धड बसता येईना हिला. आता ओकारी होणार म्हणताना, मी घमेले आणले. म्हणाले, ‘होऊ दे झाली तर यात. तुला अशक्तपणा आलाय कर इथेच’.
म्हणे म्हणे पर्यंत वांती झाली. लता–शशीला बाहेरच्या खोलीत धाडले. तोंडाला पदर लावला तरी मला उमासे यायला लागले. पहाते घमेल्यात तर शहारलं अंग. रक्त!
ह्यांना बोलावलं ताबडतोब पहा म्हणून. माझ्या अंगातला त्राण गेला होता खरे तर. मी म्हणाले, ‘रक्ताची उलटी होतेय ... आता थांबणे शक्यच नाही... चांगल्या डॉक्टरला बोलावून घेऊन या. डॉक्टर फडणीसांना नका सांगू. त्यांच्यासाऱखे कुडबुडे डॉक्टर काय कामाचे? आधी तुम्हा डॉक्टरची व्यवस्था करा. हॉस्पिटलात टाका... आता रक्ताची उलटी झालीय... आता मला राहावत नाही...!’ मी हट्टच धरला.
आजीही म्हणाल्या, ‘जनार्दन, काही म्हणता काही व्हायचे! डॉक्टरला बोलवून मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात न्या तिला’.
ह्यांचा विचार दुसराच दिसला.

दादा

वांतीत रक्त पाहिले. पण एवढे घाबरण्यासारखे आहे असे मला वाटले नाही. वाटले जरा थांबू आपण. गुरूजींनी सांगितल्याप्रमाणे भस्म पाण्यातून पाजवा बरे! पाहू काय फरक पडतोय ते. हे विसरून चालणार नाही की आज अमावास्या आहे. तेंव्हा आज त्रास हा होणारच!
थोडी समजूत पटल्यासारखी झाली मंगलाची. मी बेबीकडे पाहिले. ती वेगळीच वाटली मला! गुंगीत होती पण चेहरा त्रासलेला, रागीट वाटला. आम्ही तिला त्रास देतोय असा भास वाटला.
तिची अवस्था पार खराब होती. अंगाला खाजवून खाजवून रक्त येत होतेच. पुन्हा वांतीतून रक्त! हा आसुरी शक्तींचाच प्रताप आहे अशी माझी खात्री झाली. आता आपण गडबडलो, घाबरून माघार घेतली, तर सगळ्या केल्यावर पाणी फिरणार होते. पण मंगलाला धीर धरवला पाहिजे होता. स्वतः बेबीला सहन करायची मानसिक तयारी हवी होती. समजत तर सगळेच होते, पण प्रत्यक्षात सगळेच बेजार झालो होतो!
गेले काही महिने घरातील घरपण गेले होते. सगळे मावशीपाशी कोंडाळे करून होते. तिच्या जपाच्या माळा हा आमचा रोजचा चर्चेचा विषय होता. मुलांच्या शाळेचा अभ्यास कधी होई कधी नाही. मंगलाने तर अभ्यास घ्यायचे पार सोडून दिले होते. तिचे इतर आवडीचे विषय, गाण्याभजनाचा क्लास. इतके सगळे विस्कळीत झाले होते. आजींना दम्याचा त्रास होतोय हेही आम्ही विसरलो होतो. बिचाऱ्या श्वासा-श्वासागणिक धाप टाकत सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही कामात होत्या, कधी जेवण तर कधी चहा. बरीच वर्षे झाली त्यांनी स्वैंपाक मंगलाकडे सोपवून. आता त्यांच्या अंगावर पडली जबाबदारी जेवणाखाणाची.
सगळेच आम्ही मेंटल टेन्शन खाली होतो. शेजारच्या कुणाला काहीही माहित नव्हते. आम्ही कधीच कुणाचा सल्ला घेतला नाही. त्यामुळे सगळे बोलणे, चर्चा, घरातल्या घरात आणि गुरूजींपाशी.
शशीला भस्म आणायला सांगितले. पाण्यातून चमचाभर पाजले तिला. आणखीन चिडल्यासारखी झाली. तेंव्हा मी म्हणालो, ‘असे चिडायला काय झाले? मंत्रजपाने तुला बरे व्हायचेय ना’?
‘तुम्हाला कोणी सांगितलेत असले धंदे? मी माझी बघून घेईन. आधी हे जप करणे थांबवा बरं’. बेबी एकदम संतापून म्हणाली.
बराच वेळ आम्ही कुणीच काही बोललो नाही. तशी आणखी ताठर झाली. मी मंगलाला म्हणालो, ‘जरा बोलत कर तिला. पाहू काय काय म्हणतेय’?
मंगला म्हणाली, ‘बेबी अग हा त्रास तुला होतोय तो बंद नको का व्हायला? बाधा झालीय. त्यामुळे तुला त्रास होतोय. तेंव्हा आमच्यावर रागवून काय उपयोग? जरा शांत हो. पहा, तुझे तुलाच सहन करायची शक्ती येईल.
ओरडली, ‘बास झालं तुमचे उपदेशाचे डोस! तुम्ही मला छळायला बसला आहात. पुण्यात होते तेंव्हा झाले होते का आधी असे कधी? इथे आल्यावर सगळे चालू झाले. तुम्हीच मला त्रास देताय! कुठला कोण तो कुडबुड्या गुरूजी, त्याच्या नादाला तुम्ही लागलातच कसे?
मी म्हणालो, ‘नव्हता तुझा विश्वास त्यांच्यावर तर मग आधी का नाही म्हणालीस जाणार नाही म्हणून? त्याच्याकडून मंत्र तरी कशाला घेतलास’?
‘मला तर फसवून तुम्हा त्या गुरूजीकडे नेलत! मला सांगितलं भविष्य बघायला जाऊ! तिथं नेऊन मला फसवलत. ही अशी माझी बहीण! कशी म्हणावी हिला बहीण! वैरीण आहे!
मंगला धीराने म्हणाली, ‘ठीक आहे, मी जरी तुला न सांगता नेले तरी देवाच्या नावाचीच दीक्षा घेतलीना? भोंदू देव-देवर्षीकडे थोडेच गेलो होतो? कवट्या लिंबे, बिब्बे होते तिथे’?
‘तो महाबदमाश, त्याला तुम्हा भाळलात! आता मला हे छळतायत. माझी मधल्यामधे फरकट होतेय. मी काय करू? माझी काय दैना केलीत? वेळापरी वेळ गेला. काम नाही. नुसता तो जप. असे भंडावलेत तुम्ही! थांबा, आता करते का बघा!
बेबी गुंगीत बोलत आहे असे मानले तरी ती खरेच बोलत होती. सुसंबद्ध बोलत होती. यावरून शुद्धीत होती हे नक्की!
आम्हाला काय करावे सुचेना. लता, शशीला बाहेर जायला संगितले. लता घाबरली म्हणाली, ‘मी आई जवळच बसणार!’
मी आणि मंगलाही बाहेरच्या खोलीत आलो. आजी बसल्या होत्या कोपऱ्यात. त्या थांबल्या तिथेच. राग उतरू दे तिचा म्हणून थांबलो आम्ही.
विचार करत होतो, ‘हे’ मला छळतायत म्हणजे कोण? आम्ही की त्या आसुरी शक्ती? हे मान्य आहे की डिवचले आम्हीच. त्यामुळे आता त्या शक्तींचा तळतळाट चालू झाला आहे! पण आम्हाला असे बोलून हिने काय मिळवले? काहीच पर्पझ नसावे. वैतागली असेल त्रासानी. म्हणून म्हणाली झालं’ मी मनावर घेतले नाही.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

उत्कंठा वाढतेय. छान लिहीताय.
एक सूचना करू का.
शीर्षक इतके लांबलचक कशाला देताय. नुसते "अंधारछाया भाग ***" असेही चालू शकेल

सुचिता१'s picture

30 Jan 2020 - 2:23 pm | सुचिता१

प्रत्येक भागागणिक उत्कंठा वाढतेय पण शिर्षक वाचुन अंदाज येतो आणि थोडा विरस होतो. शिर्षक छोटे ठेवले तर वाचायला अजून मजा येईल.

राजाभाउ's picture

31 Jan 2020 - 4:52 pm | राजाभाउ

प्लिज पुढचा भाग लवकर टाका. दुपार पासुन ४ वेळा येउन गेलो राव !!

विनिता००२'s picture

31 Jan 2020 - 4:52 pm | विनिता००२

वाचतेय