भाग ११ अंधारछाया प्रकरण १० - ‘बगतो थोड दीस. मला चोरी मारी करावीशी वाटतिया! ही फुसकी! काय गज वाकवतीया का कुल्प तोडतीया?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
24 Jan 2020 - 12:27 pm

अंधारछाया

दहा

मंगला

गुरूजींना आलो भेटून सांगलीहून. अजून सत्तेचाळीस माळा व्हायच्या होत्या. गुरूजी म्हणाले, ‘आता तीच करेल जप स्वतः. पाहू काय होतय ते. ही मंतरलेली विभूती देतोय ती फक्त सकाळी लावा. फरक दिसेल.
नंतर हे आणि गुरूजी बसले होते बराच वेळ गप्पा मारत. मी बेबीला घेऊन, ब्रेड थोडी भाजीबीजी घेऊन स्टँडवर गेले. हे म्हणाले, ‘लॉर्ड्समधे कटींग वगैरे करून येतो. सावकाश’.
बेबी हात पाय धुवून बसली देवासमोर. माळ हातात घेऊन. म्हणाली, ‘करू सुरू माळा? तू आणि मी दोघीही म्हणूया बरोबरच!
‘चला, आज हात धरून म्हणावे लागले नाही म्हणायचे’. असे म्हणत मी भाकरीचे पीठ मळायला घेतले आणि बेबी बरोबर जपाला लागले.

बेबी

त्यो मांग गारुडी जाता जाईना. म्हनालो, ताप घालिवलास पर आता जात का न्हाईस म्हनतोय, ‘आता असा जाईन व्हय तू म्हनल्यावर? मी न्हाई सोडायचा हिला आता! मग म्या मास्तरड्याला बोलीवला. म्हनलो, ‘हे काय बराबर हाय का सांगा? तू बी बघ की एखांद्याला? माझ्या उरावर का बसतोय? मास्तराच वाईच ऐकत्यात आमच्यातली.
‘बगतो थोड दीस. मला चोरी मारी करावीशी वाटतिया! ही फुसकी! काय गज वाकवतीया का कुल्प तोडतीया? पर थांबून जाईन. लिंबू काढू का कापून?
मग म्या मास्तरड्याला म्हनालो, ‘जरा भिववावी म्हनतो, बगा जरा फुल्या टाकून! दुपारच्याला भैन गेली भाईर म्हनताना मास्तरड्यानं धरली हाताला अन काडल्या फुल्या माज्याकडनं. हात भरलं म्हनताना जाऊन धुतो म्हनला. पडले गपचिप हातरुनात!

काका

काल दौऱ्यावरून आलो नाटकाच्या. आणि आधी ह्यांना विचारलं, ‘काही पत्रबित्र आलयं का शांतीचं? म्हणाल्या, ‘अहो जरा कपडे बिपडे काढा. चहा घ्या. किती हे अधिरल्यासारखं?
‘शांतीचं पत्र आलंय का? का नाही? हे विचारतोय’ मी तडकलोच होतो.
‘आलय हो तुमच्या लाडक्या लेकीचं पत्र! शिंका, दे बाबा पत्र काढून घड्याळाजवळून’
श्रीकांतने पत्र दिले. आंतरदेशीय नाही? आश्चर्य आहे! शांती कधी कार्ड पाठवत नाही! असं मनात आलं. पत्रात फारसा मजकूर ही नव्हता. बेबी पोचल्याचे तिने पत्र टाकले होते आणि आता हे कार्ड!
शांती म्हणतेय, ‘बेबीला जरा ताप आला होता मधे. आता बरं वाटतय. डॉक्टरांचं औषध चालू आहे. शांतीचं पत्र इतकं तुटक तुटक आणि अपुरं आलेल वाचलं आणि उगीचच काळजी वाटली बेबीची. आता पुढच्या नाटकाच्या दौऱ्याच्यावेळी कोल्हापूरहून माधवनगरला जावं. पाहून यावी बेबी. असं मनात ठरवत कपडे काढले.
गरम पाण्याची बादली श्रीकांतनं आणली व मोरीत कढत कढत पाण्याचे चार तांबे घेतले आणि खूप बरं वाटले. पुढल्या वेळेला सेकंड क्लास रेल्वेप्रवासाची अट घालायची ‘वेगळं व्हायचं मला’ साठी बाबूरावांना, म्हणजे इतकं थकल्यासारखं होणार नाही प्रवासाने.
सौंनी ठेवलेला चहा घेतला. पेपर उघडला. इतक्यात पोस्टमन आलेला वाटला. रसरंगच्या संपादकांचं पत्र होतं. आपली मुलाखत छापत आहेत म्हणून. सोबत अंकही होता.
कपडे करून जरा पाय लांब करायला म्हणून बाहेर पडलो. जरा टिळकरोड येईपर्यंत पायात गोळे आल्या सारखे वाटले. म्हणून बसलो एका दुकानाच्या पायरीवर. परतलो मागे. घरी येईपर्यंत अंग गरम झालेयसं वाटलं. कॉटवर सोलापुरी चादर आणि शाल अंगावर लपेटून पडलो. दुपारचा चहा झाला. तो घेतला. जेवणावरची वासनच उडाली. रात्री जरा खीर घेतली अन पडलो अंथरुणात. तर अंग चांगलच कढत झालेल होतं.

मंगला

त्या दिवशी चादरीवर फुल्या पडल्या त्याला झाले दहा दिवस. त्या दिवशी संध्याकाळी तापही शंभरच्या खाली आला तो चढलाच नाही. दोन दिवसात अंथरुणावरूनही उठली बेबी. न्हायली. जपही करायला लागली बिनबोभाट. मधेच शशी–लता कडून माळ हातात घेऊन आपणच ओढे मणी, तर कधी कधी ॐ नमः शिवाय म्हणत राही. आता स्वतःच म्हणते, ‘अक्का मी करते जप’. बसते मधल्या खोलीत. एकशे आठ माळा आता भराभरा होतात.
दुपारी हे आले. जेवणं बिवणं करून आडवे झाले. मीही थोडी मासिकं चाळत होते इतक्यात ही झोपेतून दचकून जागी झाली. म्हणाली, ‘अक्का काय जोरात किंचाळले मी ग’?
मी म्हणाले, ‘कुठे काय? आम्ही नाही ऐकले काही? तू ओरडली नाहीस!’
बेबी घाबरलेली वाटली. जरा वेळ बसली तशीच. मग म्हणाली, ‘मला नाही नाही ते स्वप्न पडले होते. स्वप्नात लोकं माझ्यामागे लागले होते! मी पळतीय पुढे पुढे! कधी पडतेय कधी ठेचकाळतेय! तर कधी उठून चालता चालता दमून बसतेय! तेवढ्यात ते लोक अगदी जवळ आल्यासारखे वाटतायत! शेवटी माझ्या अंगावर आला एक माणूस हात टाकायला. तशी मी किंचाळले आणि बहुधा जागी झाले’.
मी म्हणाले, ‘स्वप्नात तू घाबरलीस. आता शांत हो. आम्ही आहोत तुझ्या जवळ. कोणी काही येत नाही तुझ्या जवळ. तू जपावर विश्वास ठेव. मग तुला काहीच होणार नाही’.
थोड्या वेळानं उठली. पाणी पिऊन जपाला बसली. मग मला हायसं वाटलं!
रात्री अंगारा फुंकला चहूकडे. मधल्या खोलीत आणि गप्पा मारत पडलो होतो अंथरुणावर. शशी सांगत होता. शाळेतून ट्रीप जाऊन आली महाबळेश्वर, प्रतापगडला. त्याच्या गमती जमती सांगत होता. सातारच्या एस्टी स्टँडवरचे ते बेचव जेवण, रात्री वाईला शाळेत झोपायची सोय केली होती. त्याशाळेच्या राखणदाराने यांना आत येऊ द्यायला नकार दिला! मग रात्री हेडमास्तरांकडे जाऊन किल्ली घेऊन परत येईतो पर्यंत रात्रीचे बारा वाजले! प्रतापगडावर पाऊस झाला होता. चढता चढता घसरून रपारप पडत होते सगळे. केळकर सर पडले तेंव्हा आम्हाला बरं वाटले. कारण तेच म्हणत होते, ‘साधे नीट चालायला नको. पाय घसरतोच कसा तुमचा’? धुक्यात एकदा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा एकदा चेहरा दिसे, तर कधी घोडा! महाबळेश्वराहून दोन-तीन पॉइंट्स पाहून परतली मंडळी तेंव्हा वैतागली होती.
दोन तास झाले असतील. इतक्यात किंचाळली ही! हा बेबीचा आवाज म्हणून मी उठले. हे ही जागे झालेच. पाहतो तो बेबी उठून बसली होती थरथर कापत होती. तिच्या मच्छरदाणीत जाऊन हात हातात घेतला. पाठीवरून हात फिरवला. तशी रडायला लागली. म्हणाली, ‘मला झोपच येत नाहीये, झोपलं की सारखं आठवताय काही काही, मग स्वप्न पडतायत... मी किंचाळतेय!’
मला काही सुचेना, तिची समजूत कशी घालवी ते. हे उठले. भस्माची पुडी काढून हातात दिली. म्हणाले, ‘लाव तिला’.
बेबीला म्हणाले, ‘या भस्माची शक्ती कशी आहे हे तुला माहीत आहे. आता लाव. एक माळ कर आणि झोप.
शशी-लता उठून बसलेच होते. मी शशीला तिच्या मच्छरदाणीत जायला सांगितलं. आमच्यात माझ्या शेजारी झोपवलं तिला.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

25 Jan 2020 - 10:03 pm | सुचिता१

पुभाप्र.

छान चाललीय कादंबरी, पुढील भाग येऊ द्या लवकर, ही विनंती.

आंबट गोड's picture

27 Jan 2020 - 11:50 am | आंबट गोड

बेबीच्या अंगात जो कुणी आहे तो फारच वस्ताद दिसतो! :-)
कसला रांगडा आहे! मास्तर्ड्याचं वाईच ऐकतात म्हणे 'आमच्यात'....!!
'त्यांच्यात' ही असे कुणाचं ऐकायचं व कुणाचं नाही असे प्रवाद आहेत होय?
बिचारी बेबी!

राजाभाउ's picture

27 Jan 2020 - 1:17 pm | राजाभाउ

पुढचा भाग कधी?