अंधारछाया भाग ३ प्रकरण २ - अहो थर्डक्लासातच पाहून ठरवलत होय मी नापास म्हणून? फर्स्टात नंबर असणार माझा.’

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
13 Jan 2020 - 12:07 pm

अंधार छाया

दोन

दादा

स्वामींची मात्र कमाल आहे. माझ्यासाठी स्वामींनी नातू शेठना शब्द टाकला! म्हणाले , ‘ शेठ, या जनार्दनला चांगलासा धंदा द्या बरं. सचोटीचा व चार पैसे मिळवणारा हवा. इथे इस्लामपुरात आल्यापासून माझ्या माहितीचा आहे हा. विश्वासू आणि सरळ मनाचा आहे. सध्या त्याला काही धंदा हवा आहे. मी त्याला ओळखतो. माझी दीक्षा घेतलीयाय त्याने. त्याला धंदा देणे तुमचे काम.’
शेठ काही बोलले नाहीत. पण नाही ही म्हणाले नाहीत. नंतर खाली डॉक्टरांच्याकडे चौकशी केली. दुसऱ्या दिवशी मला भेटायला सांगितले. पुढे मी भेटलो. त्यांच्या सोबत माधवनगरला आलो. महिन्याभरातच लक्ष्मी टॉकीजची मिलच्या मालकीची जागा मला भाड्याने देऊन एका हुंडीतून पैसे देऊन, त्यांनी माझ्या नावाने धंदा काढून दिला. माझे होते आठ दहा हजार. बाकीचे चाळीस-पंचेचाळीस हजार व्याजासह देणे होतो मी त्यांचा. मिलच्या सुताची खरेदी करून बाहेरच्या मागवाल्यांना मी ते द्यायचे. त्यांचे कापड विकत घऊन मिलला विकायचे. असा व्यवहार होता. म्हणता म्हणता दोन वर्षांत कामगार स्टाफ वाढून तीस-चाळीस झाला. क्लार्क, वॉचमन वगैरे धरून बावन्न जण झाले.
माझं मिलमधे येणं जाणं वाढत होते. नातू शेठ असेच कष्टाने मिलमालक बनले होते. मुंबईला बंगला होता. दादर चौपाटी जवळ. महिन्यातून 2-3 आठवडे ते माधवनगरात असायचे. एरव्ही मुंबईतून विक्रीखाते पाहायचे. ब्राह्मणांना कामाला घेण्यात त्यांचा कटाक्ष असे. गोरे-केळकर त्यांची आवडती मंडळी. ही त्यांच्या तालमीत शिकून तयार झालेली होती. आज मोठे मोठे मॅनेजर झालेत.
तसा माझा कापडधंद्याशी संबंध जरा विचित्रच. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाले आणि मी मुंबईला आलो. मुळजी जेठ मार्केटात दलालीचा धंदा केला. काही गाठी कापड अंगावरून वाहून बाजारात विकून पाहिले. तर बंधू रघुनाथचं पत्र आलं म्हणून इंदूरला गेलो. नंतर काही दिवस इलेक्ट्रिक सामानाचा धंदा केला. काही कॉट्रॅक्ट्स घेऊन कामं केली. पुढे त्याला ही कंटाळलो म्हणून एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून नोकरी केली. कागद कापून बाटल्यांना डोसची लेबलं चिकटवणं, लाल, पिवळी, काळी, मिश्रणं बनवणं याच्यातही जीव रमेना. म्हणून मग पुणं गाठलं. पुण्यात माझी गाठ केळकरांशी पडली. त्यांचा हुबळी-धारवाडला टुरिंग टॉकीजचा धंदा होता. त्यांना मॅनेजरसाठी माणूस हवा होता. टुरिंग टॉकीजमधून हुबळी, धारवाड, बेळगाव, खानापुर, विजापुर, भाग खूप फिरलो. पुढं इस्लामपुरात मोहन टॉकीज घ्यायची टूम निघाली. तेंव्हा केळकरांनी मला तिथे जायला सांगितले. मीही तयार झालो. एक तर कंटाळलो होतो एकटेपणाला. वाटे लग्न करावे छान पैकी. रोज रोज वणवण फिरणे नको आता. शिवाय शिलकीत पैसे होते. त्या जोरावर मी मालकीतही भागी मागितली मोहन टॉकीजची. केळकर खूष होते माझ्यावर. लगेच तयार झाले आणि मी इस्लामपुरात आलो. थिएटर मालक म्हणून मी मॅनेजर होतो. रोज दोन खेळ असत. उरूस, जत्रेच्या वेळी चार-चार, पाच-पाच खेळ चालत.
जवळच गांधी चौकात पहिल्या मजल्यावर जागा घेतली मारवाड्याची भाड्याने. काकूंना बोलावले इंदूरहून. माझ्या लहानपणीच आई वारली. उमाकाकूंना लग्नानंतर लगेच वैधव्य आलेलं. तेंव्हापासून मुलाप्रमाणे त्यांनीच मला वाढवले. मुलं आता त्यांना आजी म्हणायला लागलीत तशी मंगला व मी त्यांना आजीच म्हणतो. त्यांना ही इंदुरात राहून कंटाळा आला होता. तेंव्हा मीच घेऊन आलो इथे. माझ्या पाठचा गजाननही वायरमनचा डिप्लोमा घेऊन इथेच आला राहायला. आम्ही मजेत होतो तिघे. संध्याकाळच्या शोला गजानन जाई. मी तोवर क्लबमधे ब्रीज-रमी खेळून येई. जेवून रात्री साडेनऊला मी आधीच्या व रात्रीच्या शोचा गल्ला गोळा करे. शो संपला की अकौंट्स ठीकठाक करून एक दीड पर्यंत परते. सकाळी उशीरा उठणे, थोडासा कॉरस्पॉन्डन्स फिल्म डिस्ट्रीब्यूटरशी, बाकी वेळ मोकळाच मिळे. मला ब्रिजचा नाद होता. त्यामुळे गोराजी साहेब व मॅडम खुष. पुढे सत्तेचाळीस नंतर डी.एस.पी, जज् मंडळीही तिथं असायची. त्यामुळे आमची क्लबची घसट मैत्री वाढतच गेली. तिथेच दत्तू फडणीस भेटला. डॉक्टर चिटणिसांची कोंबडी, वहिनींच्या हातची फ्रेंच आमलेट त्यावेळी हटकून मी हजर असे पोलिसात असलेले शांताराम व वत्सला गुप्ते म्हणजे माझे परम स्नेही. एक दिवस असा गेला नसेल की त्यांना भेटलो नाही म्हणून.
हळूहळू माझे सर्कल वाढत गेले. मला मोहन टॉकीजचा मालक म्हणून लोक ओळखायला लागते. इस्लामपुर गाव तसे त्रासाचे. पत्रीसरकारच्या वेळी काही स्वातंत्र्यवीर थेटरात लपले होते. त्यांना पकडायला पोलिस आले, तेंव्हा गोळीबारापर्यंत मजल जाणार हे ओळखून मी मधेच सिनेमा थांबवून स्लाईड दाखवली पोलिसांच्या खुणेची. ते चारपाच जणांचे टोळके गेलेले पाहिले मी माझ्या डोळ्यांनी. मगच पोलिस पार्टीला मी माझ्या मॅनेजरच्या केबीन मधून तलासासाठी थेटरात पाठवलं. इतर प्रेक्षकांना कळलही नाही. तरी काम झालेलं होतं.
स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्या नंतर प्रज्ञानानंद सरस्वती म्हणून एक संन्यासी स्वामी इस्लामपुरात आले. राहायला होते डॉक्टर वैद्यांच्याकडे. एकदा त्यांच्या प्रवचनाला सहज गेलो होतो. विषय होता अध्यात्मवादाचा. भारदस्त व्यक्तिमत्व, ओघवती वाणी, एकदम भारावलोच मी. पुढे स्वामींच्या दर्शनाला रोज जायला लागलो. क्लबला जायलाच हवे असे वाटेना. माझे क्लबपेक्षा स्वामींकडे जाणे येणे वाढले. स्वामींकडे दादा व कमाताई वैद्य, कमुताई लेले, मी असे असायचो.
स्वामी तेंव्हा तुलसी रामायणातील अध्यात्मिक गोष्टींची फोड करणारे लेखन करण्यासाठी इस्लामपुरात वास्तव्य करून होते. पहाटे चार पासून ते लिहायला बसत, ते दुपारी बारापर्यत. नंतर वैश्वदेव झाल्यावर पुन्हा साडेसात पर्यंत लिखाणाला बसत. भजन, प्रवचन, लोकांच्या गाठी-भेटी होत. भोजनानंतर स्वामी विश्रांतीला जात. पुढे मला अध्यात्माची गोडी चांगलीच वाढली. स्वामींच्या निदर्शनाखाली योगमुद्रा, योगमार्गाने जायचे पसंत केले. आणि दीक्षा घ्यायचे ठरवले.
मध्यंतरी एकंदर माझे बस्तान ठीक बसलेय असे पाहून काकूही मागे लागल्या होत्या लग्नासाठी. मला आधी पसंतच येईनात मुली. मी जरा मुलींबद्दल नाठाळ. काळी दंताडी, थोराड मला बिलकुल आवडत नसत. शिवाय माझं वय ही बत्तीस तेहेत्तीस झालेलं. शेवटी पुण्याहून एक स्थल आलं. आमच्या एका लांबच्या नातेवाईकांकडून. पाहिली मुलगी. छान होती. शांता नाव म्हणे. मीही गेलो होतो रुबाबात. दुटांगी धोतर, पांढराफेक शर्ट, वर पोमेड लाऊन भांग पाडलेला. पायात कोल्हापुरी वहाणा. मला मुलगी आवडली. जरा अटकळ बांध्याची होती. आत्याबाईंनी बाकीचे ठरवले. अठ्ठेचाळीसच्या जूनमधे मी लग्न करून आलो इस्लामपुरात.
सरावाने रोज ध्यानाला बसतो. आज ध्यानहून उठलो. रेमीचे कॅस्टर ऑईल डोक्याला लाऊन केस उलटे फिरवले. कपडे करून सायकल काढली. शशी सायकल पुसेपर्यंत तंबाखूचा एक बार भरला. घड्याळ मनगटात घातले. तेवढ्यात पोस्टमनने पत्र टाकले. लताने उघडून वाचले. म्हणाली, ‘सुभाषमामाचं आहे पुण्याहून’. काय लिहिलय म्हणून मीही थांबलो जायचा.
मंगला म्हणाली, ‘काका म्हणतायत बेबीला पाठवू का तुमच्या कडे काही दिवस? गेल्या परीक्षेत पेपर पुन्हा खराब गेलेत म्हणतेय. अक्काकडे अभ्यास करीन म्हणतेय ती. वाळलीय फार. जरा हवापालटही होईल.’
मंगला म्हणाली, ‘काय करावं?’
मी म्हणालो, ‘तू बोलव ना तिला. मला काय विचारायचं’ आणि सायकल चालू केली.

बेबी

सकाळ मधून एसएससीचा रिझल्ट छापून आला. मला तो पहायची गरज नव्हती. पण समोरच्या इंदुताईंना कौतुक ना! म्हणाल्या, ‘निराश होऊ नकोस. नसला नंबर तरी. खूप अभ्यास केलास ग तू. नसतं नशीबात कधी कधी.’
आवर्जून पेपर घेतला. बाबीताईंच्या शशी, मीरा पास झाल्या होत्या. माझा नंबर नव्हताच!
माझा स्वभाव मस्करीचा, म्हणाले ‘इंदिताईंना, अहो थर्डक्लासातच पाहून ठरवलत होय मी नापास म्हणून? फर्स्टात नंबर असणार माझा.’ अन खदखदून हसले मी.
मला सवयच लागलीय हसायची. काही म्हणून झालं तरी मला आपलं हसायलाच येत. शाळेतली ती सुधी म्हणाली नाही का? ‘अग सरोज, गाढवे कळलं का पोट का दुखतय ते? अगं आईनं काही सांगितल नाही का? जा घरी. ते साफ कर. आराम कर.’ माझं पोटही दुखत होतं आणि हसायलाही येत होतं की मी आता बाई झाले याचं. मी प्रदक्षणेला जाई भिकारदास मारुतीला. तेंव्हा अशी ठेच लागली होती पायाला! चपलेचा अंगठाही तुटला. कळ तर अशी मारत होती. पण मला हसूच सुटलं कलंडून पडल्याचं!
आई सकाळी मला म्हणाली, ‘बेबी शांतीचं पत्र आलयं, पाठवा म्हणून. मग आता केंव्हा जातेस?’
मी जरा घुश्शातच होते. मला मनातून जायचं नव्हतं. पण आत्ताच नाही म्हटलं आणि पलिकडे लवंडलेल्या काकांनी जर ऐकलं तर घर डोक्यावर घेतील. म्हणतील, ‘पहा शांतीनं मोठ्या मनानं बोलावले तर ही शिंची आता अडून बसतेय. इथे काय पुरलय तुझं पुण्यात? आत्ताच्या आत्ता सामान भर आणी चालू लाग.’
मी म्हटलं ‘पाहू’ अन वेळ मारून नेली.
अक्काकडे जायला मला काही वाटत नाही. खर तर अक्का मला फार आवडते. सावत्र बहीण असूनही कधीच तसं वाटलं नाही. पण ते माधवनगर. छोट गाव. तो गांवढळपणा, ते आवडेना. तसं पुण्यात तरी माझं कोण होतं? मैत्रिणी मला आधीपासून कमी. होत्या त्या कधीच पुढे सटकल्या. मी आपली एकटीच. म्हणून माझ्या मनानंच मी भिकारदास मारुतीला फेऱ्या मारायला जाई. आईला माहितही नव्हतं बरेच दिवस!

मांडणीअनुभव