तिने ठरवलंच होतं
अंगाखांद्यावर खेळणारा
झुरमुर अनुभवांचा गुंताडा,
एकदा सोडवायचाच...
ती मनाशीच घाबरली.
अनुभव दुखावतील
वितळून जातील ना..
तसं आवडत होतंच तिलाही
अनुभवांच्या झुरमुरीत
हरवून जाणं
हरवतानाच तिला भान आलं
गाठ घट्ट बसत चाललीये.
ती थरकापली..
शेवटी काही निरगाठी
कापून काढाव्या लागल्या
जगण्यापासून..
झुरमुर अनुभव आठवणी झाले.
निरगाठींचे चरे मात्र
देहामनावर उरले...
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 9:23 am | मानस
फारच छान ..... कविता
तुमचा मायबोली वरचा लेखही ( स्वच्छतेच्या बैलाला) अत्यंत वाचनीय. माझ्याकडून काही मदत लागल्यास जरुर कळवा.
13 Nov 2008 - 9:34 am | मुक्तसुनीत
कविता आवडली. कवयत्रीच्या याआधी वाचलेल्या कवितांइतकी यातील "इमेजरी" विलक्षण वाटली नाही. (अतिपरियचयादवज्ञा! दुसरे काय ?) अनुभवांच्या बद्ध करणार्या धाग्यांचे वितळणे , त्याचे वर्णन करताना "झुरमुर" या नादाचे विशेषत्व जोडणे , आणि आठवणींच्या निरगाठींचे "चर" उमटणे (चर च्या ऐवजी वळ हा शब्द कदाचित जास्त योग्य ठरता ...असो.) या प्रतिमासंगतीमधे थोडा विसंवाद वाटला.
मात्र , जी (काहीशी परिचित अशी ) कल्पना मांडली आहे ती विशेष वाटली.
एक अनाहूत प्रश्न : काही दिवाळी अंकांमधे (उदा. "शब्द") नीरजा या नावाने काही कविता वाचल्या. त्या आवडल्या. त्या तुम्हीच काय ?
13 Nov 2008 - 9:45 am | नीधप
स्पष्ट अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.. खरंच आवडलं.
चर बद्दलचं मत सोडता बाकीच्या तुमच्या मतांशी मी पण सहमत आहे.
आणी नाही हो ती मी नाही. त्या एक बर्याच प्रसिद्ध कवयत्री आहेत. अनेक कवितासंग्रह पण प्रसिद्ध झालेत. मी लिहिते हे कुणालाच माहीत नव्हते तेव्हापासून त्या लिहायच्या. 'मिळून सार्याजणी' मधे त्यांच्या कविता तेव्हा वाचलेल्या आहेत. कविता आवडल्या होत्या तेव्हा आणि नाव वाचून माझी प्रतिक्रिया होती की मी लिहायला लागेन तेव्हा मला माझं लिखाण माझ्या नुसत्या नावाने करता येणार नाही . गोंधळ होईल लोकांचा.. तसंच होतंय.
मी एकतर नीरजा पटवर्धन असं पूर्ण नाव वापरते नाहीतर फक्त नी.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 9:46 am | विसोबा खेचर
शेवटी काही निरगाठी
कापून काढाव्या लागल्या
जगण्यापासून..
हे बाकी भारी लिहिलंय...!
आपला,
(न उकलणार्या गाठी चक्क सोडून देणारा!) तात्या.
13 Nov 2008 - 10:42 am | दत्ता काळे
हरवतानाच तिला भान आलं
गाठ घट्ट बसत चाललीये.
ती थरकापली..
.. फार छान
13 Nov 2008 - 12:17 pm | नीधप
आभार...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 4:37 pm | लिखाळ
शेवटी काही निरगाठी
कापून काढाव्या लागल्या
जगण्यापासून..
झुरमुर अनुभव आठवणी झाले.
कविता आवडली.
अनुभव भूतकाळांत जाऊन आठवणी बनणे ही प्रक्रिया छान.
अनुभव गोठणे-वितळणे आणि शेवटी निरगाठी कापणे हे काहिसे माझ्या मनात जुळले नाही. तसेच चरे सुद्धा.
बाकी कल्पाना आणि मांडणी आवडली.
-- (नको त्या आठवणी फ्रिज मध्ये ठेवणारा) लिखाळ.
13 Nov 2008 - 7:37 pm | पर्नल नेने मराठे
आवडली 8>
15 Nov 2008 - 4:22 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू