प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी सत्यघटनांवर आधारित कादंबरी
एक अभिप्राय...
आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील असल्या सारखी आहेत. लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही.
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनांकडे बोट दाखवता येईल.
या कादंबरीची नाळ गुरूचरित्राच्या पारायणाच्या प्रचितीशी जोडली गेली आहे. प्रत्येक पारायणाच्या नंतर विविध तऱ्हेच्या घटना, प्रेरणा, व्यक्तींच्या भेटी प्रसाद रुपाने येत राहिल्या. नाडी ग्रंथ भविष्य, ऑटो रायटींग आदि विषयांची गोडी व त्यावर लेखन कार्य हे त्याच कडीतील एक भाग आहेत.
ॐ नमःशिवाय या पंचाक्षरात मंत्रसामर्थ्य आहे. या नामजपाने मनोशक्ती तयार होऊन मानवेतर योनीतील प्रभावावर उपाय म्हणून उपयोग होतो, याचे धडधडीत उदाहरण म्हणून ही घटना मानता येईल’.
कादंबरीचे उपनामकरण विषय-वस्तूला समर्पक ॐ नमः शिवाय असे दिले आहे.
......
अंधारछाया
लेखकाचे मनोगत
ॐ नमः शिवाय
ही कादंबरी रुपातील सत्यकथा आहे. याचे लिखाण हा पहिल्या गुरूचरित्र पारायणाचा प्रचिती रुपाने मिळालेला प्रसाद आहे. सन १९८५ ते २०१९ पर्यंतच्या दर दत्त जयंतीच्या आधीच्या आठवड्यात गुरूचरित्राचे पारायण अखंडपणे चालू राहिले आहे. ही गुरूंची कृपा आहे कि या ३४-३५ वर्षांच्या काळात बदल्या, सेवा निवृत्ती यामुळे वरचे वर घरे बदलली जाणे, सीमेवरील तणावाच्या वातावरणात काश्मीर, पंजाब सारख्या अत्यंत महत्वाच्या हवाई केंद्रावर जबाबदारीची व रात्रंदिवसाच्या ड्युट्यांची वेळ सांभाळून पारायणाच्या काळात कधीही खंड पडला नाही. ही गुरू महाराजांची कृपा दृष्टी होय.
१९८१पासून १९८६ पर्यंतच्या सुमारास सुब्रतो पार्क मधील रेग्युलर क्वार्टर न मिळाल्याने मी नवी दिल्लीच्या जनकपुरी भागात राहात असे. तेथील दत्त विनायक मंदिरात आरतीला व त्या आधी बॅडमिंटन, चेस व मराठी पुस्तकांच्या लायब्ररीत तर कधी नाटकांच्या तालमींत मी रंगलेला असे. असेच एकदा माझे वरिष्ठ स्नेही कै. रमेश काजवाडकर यांच्याशी चर्चेत गुरूचरित्राचा विषय निघाला. गुरूचरित्र प्रचितीचा ग्रंथ आहे. संकल्प करून प्रचिती घ्यावी. असे त्या चर्चेत त्यांनी आवर्जून सांगितले. मग तर मी जरूर याचे पारायण करू इच्छितो व प्रचिती येते का ते आपल्याला जरूर सांगतो म्हणून थोडेसे आव्हानात्मक बोलून गेलो. पोथीची समस्या त्यांनी आपल्या कडील पोथी देऊन सोडवली. मला आता संकल्प करून पारायण न करायला कारण ही नव्हते. थोडी रजा शिल्लक होती म्हणून वेळेचा प्रश्न ही सुटला.
पारायणाला बसण्याधी. मी संकल्प बोलून दाखवला, ‘हे श्रीपाद श्रीवल्लभ, हे नृसिंह सरस्वती व दत्त महाराज, गुरूचरित्राचे पारायण करत आहे. तरी मला प्रचिती मिळावी ही आपल्या चरणी प्रार्थना. मी हे वाचन आपल्या प्रती दृढ श्रद्धाभाव ठेवून करत आहे.’ सुरवात झाली व दुसऱ्या दिवशीचे वाचन झाले. तरीही काही प्रचिती मिळाली नाही. त्या दिवशी दत्त विनायक मंदिरात एकांचे कीर्तन होते म्हणून मी त्यासाठी पुढील रांगेत स्थानस्थ झालो. पण कीर्तनकारानी पुर्वरंगातील पद आळवायला चालू केले व मला मनाने अस्वस्थ वाटू लागले. मधेच उठून जाणे अशोभनीय असूनही सभास्थानाचा शिरस्ता मोडून मी घरी परतलो. वाटेत एक 200 पानी वही घेतली. अन डायनिंग टेबलपाशी खुर्चीत मांड ठोकून जो लिहायला बसलो ते लिहितच राहिलो. रात्री 2 वाजले तेंव्हा लेखनाचा वेग मंदावला. त्यानंतर रोज थोडे थोडे लिखाण होत राहिले. ते म्हणजे ही सत्य घटनेवर आधारित कादंबरी रुपात उतरलेली ही कथा. अशी या कादंबरीची नाळ गुरूचरित्राच्या पारायणाशी जोडली गेली आहे. त्या नंतरच्या प्रत्येक पारायणाच्या नंतर प्रचिती रुपाने घटना, किंवा अन्य रुपाने प्रेरणा, व्यक्तींच्या भेटी अशी प्रसाद रुपात प्रचिती येत राहिली आहे. अगदी नुकत्याच 2013 नंतरच्या पारायणानंतर घडलेल्या अदभूत घटनांची मालिका याचे उदाहरण आहे. त्याचे सूत्ररुपाने वेगळे सादरीकरण केले गेले आहे.
गुरूचरित्राच्या पारायणाची प्रचितीचा आणखी एक प्रखर दाखला म्हणजे माझ्या हवाईदलातील सेवेत माझ्यावर आलेले संकट व त्यामुळे निर्माण झालेली अत्यंत आणीबाणीची परिस्थिती. दृढश्रद्धा भाव व गुरूचरित्राच्या पारायणातून मागितलेली प्रचिती. याचा परिपाक म्हणजे गुरूकृपेने त्या संकटातून आश्चर्यकारकपणे लीलया मुक्तता झाल्याची घटना. नंतर ‘मन में है विश्वास’ या सोनी टीव्हीवरील एका मालिकेत या घटनेवर आधारित २६ जानेवारी २००७ ला एक एपिसोड दर्शवला गेला. ही कथा मी हवाईदलातील काही निवडक मित्रांना रात्रीच्या निवांत वेळी तर कधी वैष्णोदेवीच्या वाटेवर सांगून रात्र जागवली होती. कदाचित म्हणून ती अंतर स्मृतीत दडली होती. मात्र ती पारायणाच्या निमित्ताने प्रचितीच्या माध्यमातून लेखन गंगेच्या रुपाने प्रकट झाली.
याशिवाय असे अनेक प्रसंग घडत गेले की ज्यामुळे गुरूचरित्राच्या पारायणाची प्रचिती वारंवार मिळत राहिली. नाडी ग्रंथ भविष्य, ऑटो रायटींग आदि विषयांची गोडी व त्यावर लेखन कार्य ही त्याच कडीतील एक एक भाग आहेत. असो.
‘तेरा काम हो जाएगा’ म्हणून मला नाडीग्रंथातील आदेशातून मिळालेल्या योगी राम सूरत कुमार नामक गुरूंची वाणी कशी साकार झाली याचे रंजक उदाहरण या कादंबरीच्या संदर्भात घडले. त्याचे असे झाले की ही कादंबरी दिवाळी अंकात प्रकाशित होऊन अनेक वर्षे लोटली होती. दिवाळी अंकाचे आयुष्य अल्प असते असे म्हणतात. ही कलाकृती पुस्तक रुपाने जपली जावी व वाचनालयात त्याला स्थान मिळावे असे मला वाटे. पण ते घडत मात्र नव्हते. एकदा सुट्टीत पुण्याहून सांगलीला रेल्वेने जायचा प्रसंग आला. दुपारी दीडच्या गाडीत बसलो. माझ्या समोरील बाकावर एक जण आधीपासून प्रवासात असल्याने कदाचित निद्रासुखाचा आनंद घेत होते. त्यांच्या छातीवर वाचता वाचता डोळा लागल्याने एक पुस्तक पडले होते. त्यांच्या निद्रेत बाधा न आणता मी ते सहज चाळायला घेतले. नंतर काही काळाने त्यांना जाग आली. पुस्तकाच्या अनुरोधाने गप्पा निघाल्या. ते म्हणाले, ‘ह्या पुस्तकाचे लेखक प्रकाशक ही आहेत. इस्लामपुरला असतात. ते अप्रकाशित लेखकांची पुस्तके छापायला तयार असतात.’ मी त्या लेखकाचा पत्ता घेतला. चेन्नईला परतल्यावर त्यांच्याशी पत्राने संपर्क केला. त्यांनी ‘छापीन पण हस्तलिखिताच्या बरोबर दहा हजाराचा ड्राफ्ट पाठवावा’ असा प्रेमळ सल्ला दिला. मला ते शक्य नव्हते. पैशाची अट सोडून आपण पुस्तक छापायला तयार असाल तर हस्तलिखित पाठवीन म्हटल्यावर विचार करायला हस्त लिखित मागवले गेले. नंतर काय झाले कोणास ठाऊक त्यांनी पैशाच्या मागणीची अट रद्द करून पुस्तक छापायला सुरवात केली. काही काळाने ते प्रकाशितही झाले. पुढे सवडीने मला इस्लामपुरला जायचा प्रसंग आला तेंव्हा मी आवर्जून त्यांच्या पत्त्यावर संपर्क केला. ते प्रकाशक घरी नव्हते. पण त्यांच्या घरच्यांनी मला माझ्यासाठी ठेवलेले पुस्तकाचे पुडके दिले. त्यात अटी प्रमाणे दहा प्रती होत्या. कालांतराने त्या कमी होत शेवटी एकच हाती राहिली. (प्रकाशनाचे नाव मनोकामना किंवा असेच काहीसे होते असे अंधुक आठवते. पुस्तकाच्या सुरवातीला लेखक-प्रकाशक यांचे नाव, पत्ता किंमत आदीचे महत्वाचे पान या पुस्तकाला नाही.) या गोष्टीलाही अनेक वर्षे झाली. मला आठवतेय एकदा कॉलेजात नोकरीला असताना एक विद्यार्थ्याने तो इस्लामपुरचा आहे म्हटल्याने त्याला मी प्रकाशकांचा फोन नंबर शोधून आण म्हटले होते. त्याप्रमाणे तो मिळाला नंतर प्रकाशकांनी आवर्जून भेटूया असा निरोप दिला पण काही ना काही कारणांनी त्यांची प्रत्यक्ष भेट सफल होऊ शकली नाही. मात्र अगदी अनोळखी लोक तुला मदत करायला पुढे येतील असा वारंवार मिळणारा प्रत्यय इथेही मिळाला. असो.
आता ईपुस्तक रुपाने ह्या लेखनाला प्रकाशनासाठी मी एकुलत्या एक कॉपीची रोज थोडी थोडी टायपिंग करून एक नवी प्रत बनवून तयार केली. त्यात हे नवे लेखकाचे मनोगत घातले आहे. कादंबरीचे उपनामकरण विषय-वस्तूला समर्पक ॐ नमः शिवाय असे केले आहे.
नवी दिल्लीच्या वास्तव्यात हे लिखाण करत असताना ते ऐकायला दोन व्यक्ती नेहमी तयार असत. एक माझ्या घरी त्यावेळी राहायला आलेल्या द्वारका (सोवनी) आत्या व आसपास राहणारे मित्र प्रमोद व कुंदा पानसेचे वडील. आत्याबाई तर या घटनांच्या नंतर माधवनगरला काही वर्षे वास्तव्याला होत्या. म्हणून त्यांना यातील घटना ऐकून माहिती होत्या व अनेक व्यक्तिमत्वे पाहिलेली, भेटलेली होती. आता हे दोन्ही हयात नाहीत.
मी स्वतः ११-१२ वर्षाचा होतो. तरीही त्या घटनांच्या आठवणी इतक्या पक्क्या होत्या की मला लेखन करत असताना कोणाला काही विचारायची गरज पडली नाही. कच्च्या लेखनाचे पक्के करताना कार्बन टाकून दोन प्रती तयार झाल्या. त्याना बाइंडींग करून ती दोन बाडे झाली. एकदा सुट्टीत पुण्याला गेलो असताना अवनी वार्षिक दिवाळी अंकामधे छापण्याबाबत चर्चा झाली व ८७च्या दिवाळी अंकात ती प्रकाशित पण झाली. प्रकाशित झाल्यावर दादा सोडून (त्यांचे १९८१ साली निधन झाले.) जवळजवळ सगळ्यांनी ती वाचली. खुद्द बेबीला ही घटना अंधुकशी देखील आठवत नाही! सांगलीतील गुरूजींना बेबीच्या केस प्रमाणे आणखी कोणाची केस ठीक केल्याचे आठवत नाही असे म्हणणे पडले. त्यांनी गोखले हे आडनाव (ते जीवंत असे पर्यंत तरी) गाळावे असा सुचवले होते. मंगला, आईला ही घटना चांगलीच आठवत होती. इतक्या तपशीलवार घटनांची मी नोंद केल्याचे तिला आश्चर्य वाटले. दादांनी केलेल्या युक्त्या व नामजपावरील भाष्य तुला कसे समजले असा तिला प्रश्न पडला होता. मी तिला जेंव्हा सांगितले की या प्रकाराची जेंव्हा चर्चा दादा करत त्यातून अनेक गोष्टींचा माझ्या स्मृतींवर प्रभाव पडला असावा.
माझ्यापुढील आयुष्यात ॐ नमःशिवाय हा जप नकळत चालू असे. काही काळाने ॐ गं गणपतये नमः असा नामजप मोठ्या प्रमाणात झाला. त्याचा प्रभाव पत्नीच्या त्वचा दाहासाठी उपयोगी पडला.
दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्यावर काही प्रतिक्रिया वाचायला ऐकायला मिळाल्या. काहींना वेगळ्या विषयावरील वेधक लिखाण वाटले, आत्मनिवेदनातून फुलत जाणारी कथा वस्तू, बोली भाषेतील वाक्य रचना, सर्व पात्रे रोजच्या घसटीतील वाटतात असे काहींनी मत नोंदवले. दादा हे व्यक्तिमत्व फार छाप टाकणारे आहे. अडचणीतून मार्ग शोधून, विपरीत परिस्थितीत न डगमगता धीराने वाट काढत जाणारे दादा वेळोवेऴी विविधांगाने भेटतात. कधी अध्यात्मिक विचारकाच्या बाजात तर कधी गुप्त हेराच्या मानसिकतेने घटनांचा अन्वय लावायला सरसावणाऱ्याच्या थाटात या प्रकारांची उकल करायला प्रेरित करतात. भीषण प्रसंगी वातावरण निर्मिती फार प्रभावी झाली आहे असे साधारण वाचकांचे मत होते तर काहींनी अनेकदा पात्रांची नावे व नाते संबंध सरमिसळ झाल्याने वाचकाला गोंधळात पडायला झाले होते. उदा. कादंबरीतील पात्र काका लेखकाच्या आईच्या वडिलांचे नाव. पण व्यवहारात वडिलांच्या भावाच्या अर्थाने वापरले जाते म्हणून काही वेळा ते नक्की कोण ते कळायला जड जाते. एकाच पात्राला अनेक तऱ्हेने संबोधण्याने काहीसा गोंधळ उदा. लता, शशी मुले ज्यांना दादा म्हणतात त्यांना मंगला ह्यांना म्हणून संबोधते तर आजी त्याला जनार्दन म्हणून हाका मारतात. आत्मनिवेदन कोणाचे चालू आहे. भान न राहून असे होते खरे. यासाठी पात्रांचे अंतर्गत संबंध व नावे असा परिचय सोबत दिला आहे.
काहींचे मत पडले की गुरूचरित्राच्या पारायणाची चर्चा अनेक खाजगीत करतात. पण ही सार्वजनिक झालेली घटना श्रद्धा व चिकाटीचा प्रत्यय कसा आणतात याचे उत्तम उदाहरण आहे. काही म्हणाले, ‘ॐ नमःशिवाय या पंचाक्षरात मंत्रसामर्थ्य आहे. या नामजपाने मनोशक्ती तयार होऊन मानवेतर योनीतील प्रभावावर उपाय म्हणून उपयोग होतो, याचे धडधडीत उदाहरण म्हणून मानता येईल’. ‘नामजप म्हणजे वेळ जाण्याचा विरंगुळा नाही. जप करणे म्हणजे अमानवीय शक्तीला प्राप्त करण्याचे प्रभावी साधन किंवा शिडी आहे.’
योग्य गुरूच्या मार्गदर्शनामुळे चिकाटी, दृढ श्रद्धेच्या जोरावर आसुरी शक्तींशी समर्थपणे लढा देता येतो व विजय मिळवता येतो. हे पटवून देणारे उदाहरण म्हणून या सत्यघटनेकडे बोट दाखवता येईल.
हे लेखन ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात आहे. त्यात अतिशयोक्ती वा वातावरण निर्मितीसाठी रंगवून केलेले वर्णन नाही. दुसरी बेबी हे पात्र परिस्थितीजन्य पुराव्यातून निर्मित झालेली व्यक्तिरेखा आहे.
कालौघात बहीण लता, सुभाष व श्रीकांत मामा, मधू, इतकीच पात्रे जानेवारी २०२० मधे जीवंत आहेत. माझी आई – मंगला सन २०१४, बेबी मावशी सन २०१६ निवर्तल्या. अन्य प्रत्येक जण संसारिक कर्तव्ये पार पाडून सेवा निवृत्त होऊन मुले नातवंडे यांच्या समावेत रंगलेली आहेत. बेबी मावशीचे विवाहोत्तर जीवन काही ना काही कारणांनी खडतर व कष्टाचे गेले. माझी आई व बेबीमावशी सध्या वृद्धनिवासात एकत्र राहातात. काही कारणांनी बेबी मावशी आता अन्य वृद्धनिवासात राहायला गेली आहे. विवाहानंतर तिच्या मुलाला पोलिओ झाला. अपंग मुलगा, पतीचे दुर्लक्ष, कडक सासूरवास, बेताची माहेरची परिस्थिती यामुळे अनेकदा टोकाचे प्रसंग आले.
आपल्या सासूच्या तालेवार वागण्याचे अनेक किस्से सांगताना ती म्हणे, ‘आमच्या सासूबाईंना हिन्दी सिनेमे पहायचा फार शौक होता. सकाळ मधील सिनेजाहिरातीतून त्यांच्या आवडत्या कलाकारचा सिनेमा सेकंड रनला आला की त्यांचा हुकूम सुटे. मग मला मॅटिनीच्या खेळाचे तिकिट रांगेतून काढायला आधी पायी पाठवले जाई. मग तंगडतोड करत घरी जायला लागे. काऱण सासूला टांग्यात चढवायला-उतरवायला मी लागे. सासू एकटी मागे बसणार. मग टांगेवाल्याच्या शेजारी बसून मला जावे लागे. मध्यांतरात खाऊचा डबा द्यायला थेटरात डोअर कीपर प्रमाणे बाहेर थांबून राहावे लागे. मुखशुद्धी साठी पान व आईसक्रीम तत्परतेने आणणे आदि कामाला मी लागे. सिनेमा सुटला की पुन्हा सासू-सुनेची वरात टांग्यातून घरी परत. पण एकदाही त्या पठ्ठीने ‘तू पण थांब सिनेमा पाहायला, तू पण आईसक्रीम खा’ म्हणून म्हटले नाही! पुण्यात एकदा कुठेसे सत्यसाई आले असताना त्यांनी दूरवरून गर्दीतून नेमके हिच्या कडेवरील मुलाला हस्त स्पर्ष करून दिलेला आशीर्वाद, विजेचे बिल फार येते म्हणून मेणबत्या पेटवून रात्र काढणारा, कष्टाळू पण मनस्वी, तापट व मदिराप्रेमी पती, या परिस्थितीने ताऊन सुलाखून जीवनाचा गाडा हाकताना ‘कशी मी जगले याचे नवल वाटते!’ असे खदखदा हसून किस्से सांगताना मला माधवनगरातील बेबी मावशी डोळ्यांसमोर येते. मेहनती जावई व तिची मुलगी स्मिता मात्र जिद्दी व कष्ट करून आपले व घरच्यांचे सर्व यथा साग्र लाड पुरवत, आईच्या हार्टच्या बायपास ऑपरेशनसाठी तिने केलेल्या अपार धडपडीतून आर्थिक सहाय्य मिळवून, आईला सांभाळताना पाहून एक मुलगी आईच्यासाठी प्रेमाखातर किती तत्पर आहे याची खात्री पटते.
ईश्वरावर प्रगाढ श्रद्धा, नामजपाचे सामर्थ्य यामुळे जीवनाच्या अनेक कसोटीच्या क्षणी आधार मिळतो. याचे इतरांसाठी प्रेरक एक उदाहरण म्हणजे अंधार छाया उर्फ ॐ नमः शिवाय.
पुढे चालू...