जसं माणसं दगडाला शेंदूर फासू फासू देव बनवत आलीयेत
अगदी तसंच काही माणसे कामापूरते बोलून बोलून अगदी समोरच्याला डायबेटीस होईल इतकं गोड(गॉड) करत आली आहेत.
खरी फॅक्ट अशी आहे की..जेव्हा गरज संपते तेव्हा मित्र म्हणून पाया पडणारे हळूहळू पाय काढायला घेतात आणि हीच का ती माणसे जी केवळ आणि केवळ तुमच्यासाठी या जगात जगत होती असा फुटकळ सवाल पडत राहतो.
तिच मग तुमच्या माघारी गळे काढू लागतात. अशा अपेक्षित मान मरातब न मिळालेल्या लोकांचा एक समाज गोतावळा कायम तुमच्या बाजूने एक लांबून वर्तुळ मारून बसलेला असतो.
बरं हा खटाटोप बऱ्याचदा गैरसमजांच्या मनबंगल्यांवर उभा असतो आणि एक ना एक दिवस तो कोसळतो.. उध्वस्त होतो पण नंतरही त्यांना कधी उपरती करता येतेच असं नाही किंवा ही माणसे - आपल्या छत्रछायेत कधी काळी स्व पायावर उभी राहिली आहेत हे निर्लज्जपणे लपवून किंवा जिरवून टाकतात आणि स्वतंत्रपणे स्वतःच स्वयंभूपणे देव म्हणून नावारुपाला येऊ इच्छितात.तशी टिमकीच सतत वाजवत राहतात.
मग ती माणसं गाव बदलतील नावात बदल करतील कपडे बदलावे तसे संदर्भ बदलतील.
काळ उद्या पुढे सरकलेला असेल तुम्ही जगावर अधिराज्य गाजवत असाल पण आज तुम्ही जे वागलाय ते उद्या पुसू शकणार नाही! फारफार तर सारवासारवी करता येईल जे तुमचं म्हणून मत आहे ते मांडता येईल लादता येईल-पण हे सारं नंतर नंतरचं आहे! तुम्ही 'आज' पुसू शकत नाही आणि हा 'आज' पुन्हा उद्या 'आज' म्हणूनच दत्त उभा राहतो! त्याला भिडताना तुमचं आजचं भलंमोठं सेलेब्रिटी स्टेटस, चकचकीत कपडे आणि तुम्ही ओरबाडून स्वतःवर फोकस केलेली लाईम लाईट काहीही करून समाधानी वाटू देत नाही.अशा सतत असमाधानी राहण्याचा शाप लागलेल्या आजारी माणसांचं करायचं काय?