नुकताच सुरू झालेला जॉब आणि हातातल्या न सावरता येणाऱ्या बॅग्स घेऊन ती स्टेशनावर आली आणि नको तो प्रसंग समोर उभा!
नवरा म्हणून ज्याला आपण टाकलं तो दात कोरीत समोरच उभा! तसं लक्ष नव्हतं त्याचं तरी तिला उगाच आँकवर्ड वाटू लागलं.पुरुषी नजरेने बाईच बाईपण फक्त शरीर म्हणून! पण बाईच्या दृष्टीने ते मानसिकही असतं! आता मधेच त्याने ओळख दाखवली किंवा आपला हात धरला किंवा नेहमी करतो तशी शिवीगाळ केली तर काय? किंवा नव्या नवरीला उगीच आवडावी अशी शीळ मारून गोड बोलला तर?
इतकं जर तर च दूध सारखं खाली वर होऊ लागलं आणि अंगभर थरथर होऊ लागली
मग काय काय करता येऊ शकतं याचा आढावा घेतला पण गंमत अशी त्याने तिला पाहिलंच नाही आणि कमरेच्या खाली आलेली ढगळी जीन्स वर उचलून दोन्ही हात खिशात घालून तो कुठेतरी पसार झाला
आणि अनेक वर्षे पुन्हा तेच नको असलेले प्रश्न छळू लागले.
खरंतर नवरा दारुडा आणि चारित्र्यहीन म्हणून आपण त्याला सोडलंय खरं पण हे फक्त मला आणि माझ्या परिघातल्या माणसांना ठाऊक. जे नुसते परिघाबाहेर हाताच्या घड्या घालून इस्त्री केलेल्या कपड्यांनी उभे आहेत त्यांच्या दृष्टीने हे थोडं वेगळंच! किंबहुना साचेबद्ध असं की, नवरा कसाही असला तरी हिला सांभाळता आला नाही! ऍडजस्ट सर्वांनाच करावं लागतं ही तेवढी मानाची!! काही नाही हो हिचंच कुठेतरी काहीतरी असणार त्याशिवाय का ठामपणे घर सोडलं हिने! त्यात ऑफिस मधल्या लोकांचे तर वेगळेच तर्क वितर्क! एवढी सुंदर आणि हुशार मुलगी असा टोकाचा निर्णय का घ्यावा या बाजूचे काही आणि काही जण आता आपल्याला संधी आहे अशा तयारीनिशी मदतीला उभे!!
पुन्हा जर तर सुरू- आपण पुरुष असतो तर आपण परिघाबाहेर विचार केला असता का? सहजपणे भिडलो असतो का या समस्येला? आणि खरंच असे ठाम स्वतंत्रपणे उभे राहिलो असतो का?
आता भुकेने मनाचा ताबा घेतला आणि त्या बॅग्स कशाबशा ओढत स्टेशनजवळ हॉटेलात मांडल्या. एक वडापाव घेतला आणि बकाबका हाणला! मग चहा घेऊन शांत डोळे मिटून घुटके घेऊ लागली ती.
चहा झाला आणि पैसे देण्यासाठी पाकीट उघडलं आणि काउंटर ला गेली तर अचानक नवरा म्हणवणारा कुठून भसकन उगवला देवजाणे! मगासारखंच आताही त्याने पाहिलं नाहीच आणि अगदी जवळून गेल्याने त्याचा दारुडा उग्र वास नाकात कोंडला! आता हटकलं असतं तर पुन्हा तोच तमाशा झाला असता- लायकी नाही तुझी - मला अक्कल शिकवतेस, पैशाचा माज दाखवतेस! चालती हो वगैरे वगैरे…
मी ना ही अशी खूप घाबरून किती आणि कसे दिवस ढकलावेत हे आता समजत नाहीये. हे शहर इथली माणसे त्यांच्या माझ्याविषयी च्या समजुती गैरसमजुती नकोच मला. थोडं बाहेर पडते इथून आणि नव्याने परीघ आखते आता! परिघाबाहेरचा परीघ! एका अशा जगात जाते जिथे माझं म्हणून खरंखुरं आयुष्य असेल ज्याला अर्थ असेल मर्यादा नसतील.
मी कशी या जाळ्यात अडकले कशी काय भुलले असेल या नवरोबाच्या भूलथापांना?? की स्त्री म्हणून चॉईस नसतोच हातात काही!ही मानसिक आंदोलने कुचंबना आणि व्यक्ती म्हणून सतत होणारे मानसिक आणि शारीरिक बलात्कार हाच की काय तो स्रीधर्म!
आता गाडी येते सगळं सामान कसंबसं एसटीमध्ये ती चढवते आणि महिलांसाठी असलेलं राखीव सीट मोकळं होण्याची वाट बघू लागते. जिथे त्या रांगेत सगळी पुरुषच पुरुष मंडळी मूग गिळून गप्प बसलेली असतात अगदी निर्ढावलेली आणि प्लेन चेहरा ठेऊन! बरं वर चढताना एसटी कुठे निघाली हेही तिने नीटसं पाहिलं नव्हतं, पण फरक काय पडतो म्हणा- इथून तिथून सगळं सारखंच तर जग दिसतंय- तपशील थोडे निराळे असतील पण मानसिकता आणि वाट्याला आलेलं जगणं तेच आहे!
इथून बाहेर पडलं पाहिजे बस्स!
प्रतिक्रिया
22 Nov 2020 - 12:43 pm | विजुभाऊ
दुर्दैव त्या स्त्रीचे.
गरज म्हणा , नाईलाज म्हणा, किंवा हरवलेला आत्मविश्वास यामुळे बाईचे आयुष्य असल्या गांडूळ नवर्या ला घाबरण्यातच संपते.
थोडा धीर देणारा कोणी भेटला तर नवी उभारी घेऊन या स्त्रीया आयुष्य पुन्हा नव्याने उभे करू शकतात.