ते आणि मी म्हणजे तसे एकच! पण भेट व्हायची नाही ..अधे मध्ये एखादा फोन आणि सविस्तर गप्पा .
कधी कान उघाडणी तर कधी प्रेमळ काळजी वजा पाठराखण . तसे कोण तुम्ही कुणाचे काहीही असता नसता, ठाऊक नाही, पण एक दुवा असतो. आपला माणूस कुठेतरी आपला विचार करतोय अशी हक्काची गडद सावली तुमच्या वर पडलेली असली कि आतून कसं छान आणि गारगार वाटतं राहतं.
मी काम नसतानाही बऱ्याचदा त्यांच्याशी बोलायचो . कधी नुसते हा हू करतील तर कधी चक्क रागावून फोन ठेऊनच देतील आणि पुन्हा म्हणतील - लाज वाटते का किती दिवस झाले साधा फोन ही तू केलेला नाहीयेस !
ठाऊक आहे ते विसरले असतील किंवा फोन वर मिस कॉल पण दिसतं हे त्यांना ठाऊक नसेल तरीही मीच प्रांजळपणे माफी मागून पुन्हा उत्तरतो-
हो माफ करा सॉरी चुकलं माझं बघा - साफ विसरलोच मी !!
पुन्हा त्यांचं आहेच - बघ तोंड वर करून म्हणतो कसा - विसरलो म्हणे !
म्हातारा असलो म्हणून काय झालं - आहे तर हाडामासाचा माणूसचं ना!
बरं चुकलं माझं sss मी सूर लावून बोलतो
तिकडून हळू आवाजात - घरी ये मिसळ केलीये , म्हातारी यायच्या आधी फस्त करू !!
बरं आता तुम्ही गेलात ! म्हातारे असलात म्हणून काय झालं !! मेलात ते मेलात बऱ्याच आठवणी विसरूनही गेलात! तुमचा वाढदिवस होता आज आणि तो आपण सेलिब्रेट करणार होतो - पेढे खाऊन , शिवाय डायबेटीस काय रोजचाच होता , एक पेंढ्याने काय मरत नाही माणूस हेही तुम्हीच ठासून बोलणार होता .
आता देवाकडून व्हाट्सअँप तर घ्या तुमच्या मोबाईल वर !! ते गुलाब गुच्छ कुठे पाठवायचेत मी??
आणि यंदा तुम्ही विसरलात मला, मी तर फोटोला हार पण घातलाय तुमच्या !! परत रागावू नका उगाच मला !!
म्हातारे कुठले -----हं
ते काय असतं ना या म्हाताऱ्या जीवाचं कि ते आपल्यात तरुण व्हायला पुन्हा त्या त्यांच्या चुका आपल्याकडून गिरवून घ्यायला असे काठी घेऊन समोर ठाकलेले असतात. धाक दाखवून रागावून ही जीवापाड प्रेमच करत असतात ते.
आपण मात्र तरुण ! कधीच म्हातारे होणार नसतो ना त्यांच्यासारखे त्यांच्याइतके ! आणि असे वेडे तरुण आपल्या म्हातारवयाला शिल्लक म्हणून कोण बांधणार ? चला 'ते' फोन करून किंवा व्हाट्सअँप शिकून दम द्यायच्या आत सटकतो . नमस्कार.
प्रतिक्रिया
21 Nov 2020 - 1:08 pm | विजुभाऊ
काय नीट समजलं नाय हो?