एखाद्या चित्रपटाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्या चित्रपटात काय काय गोष्टी असणे आवश्यक आहे ?एखादी बऱ्यापैकी कथा, एक क्रूर आणि महाशक्तिमान खलनायक, त्या खलनायकाकडून अन्याय झालेला एक तरणाबांड आणि देखणा नायक, आणि त्याच्यावर भाळलेली सात जन्मोतक हर सुख आणि महत्वाचे म्हणजे हर दुःखमे हमेशा साथ देनेवाली एक लोभस(सोप्या शब्दात सेक्सी आणि हॉट) नायिका, हाणामाऱ्या प्रचंड सेट्स. ठेका धरायला लावणारी , शृंगारिक भावना उत्तेजित करणारी गाणी ....अन अजून अनेक काही ....
आणि एखाद्या चित्रपटात हे काहीच नसेल तर तो चित्रपट कसा असेल ? आज आपण एका अश्याच चित्रपटाविषयी बोलणार आहोत. या चित्रपटाचा कोणी नायक असा नाहीच. किंवा जर असेलच तर त्याचे दर्शन फक्त चित्रपटाच्या सुरवातीच्या काही सेकंदांच्या शॉट मध्ये होते. तो एकही शब्द बोलत नाही. फक्त आपल्या भेदरलेल्या आणि बेडकासारख्या दिसणाऱ्या डोळ्यांनी तो कॅमेरात पाहतो. बस्स ! हा आपला नायक समाजातील अत्यंत गलिच्छ वस्तीत वाढलेला आहे. त्याचा बाप अट्टल जुगारी , बेवडा आहे. आपल्या नायकाला त्याचा हा बाप रोज मारहाण करत असतो. म्हणजे थपडा नाहीत, तर लाथा बुक्क्या !आपला नायकही काही कमी नाहीये बरं. लहापणी शाळेत त्याने त्याच्या शिक्षकांना दगड मारून जखमी केल आहे. बालसुधार गृहातून बाहेर पडल्यावर त्याने एका कारची चोरी केलीय, चाकू हाताळण्यात आणि चालवण्यात तो पटाईत आहे !तर आपल्या या नायकाने एका संध्याकाळी बापाबरोबर झालेल्या भांडणात त्याच्या बापाच्या छातीत ४ इंच खोल चाकू खुपसून त्याचा खून केलाय असा त्याच्या वर आरोप आहे. त्याच्या स्वतःच्या बापाच्या खुनाचा आरोप ! हा खुनाचा खटला न्यायालयात चालवला गेलाय. आपल्या नायकाला सरकारतर्फे एक वकीलपण दिला गेलाय. आणि आता त्याचा नशिबाचा फैसला १२ ज्युरींच्या मतावर ठरणार आहे. या १२ ज्युरींनी खटला पूर्णपणे पाहिलाय. आता त्यांना चर्चा करून निर्णय घ्यायचाय पण एकमताने, कसुरवार की बेकसूर. जर त्यांनी आपल्या नायकास दोषी ठरवले तर त्यास कोणतीही दयामाया न दाखवता थेट लटकवले जाणार आहे. पण नायकास निर्दोष ठरवण्यासाठी उपलब्ध पुराव्यामध्ये एखादी प्रामाणिक शंका सुद्धा त्याला निर्दोष ठरवण्यास पुरेशी आहे .
बरोब्बर ! आपण चर्चा करतोय ती "एक रुका हुआ फैसला " या १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या "१२ अँग्री मेन" याचा हिंदी रिमेक. या चित्रपटाचे ९९.९९ टक्क्यांपेक्षा अधिक कथानक फक्त एका खोलीत घडते. नेपथ्य काय तर, एक आयताकृती टेबल, १२ खुर्च्या, एक सोफा, एक वॉटर फिल्टर , कागदाचे कप , चाकू आणि हो , सर्वात महत्वाचे म्हणजे सिगारेट्स ! पार्श्वसंगीत म्हणजे काय ? तर कबुतरांची गुटर्गु , कागदी कपात पाणी पडल्याचा आवाज, कप खाली टाकल्यावर येणारा आवाज , आणि क्वचित एखाद वेळी वाद्य वापरून केलेले प्रसंगानुरूप ढ्यानननणण !!आपले १२ ज्युरी हे पण आपल्या समाजाचे वेगवेगळे चेहरेच आहेत. कुणी आर्किटेक्ट, कोणी व्यापारी , कुणी सामान्य नोकर , कोणी पेंटर , कोणी जाहिरातीचा डिझायनर ! सुरुवातीस सगळे ज्युरी सभ्यतेचा सुसंस्कृततेचा बुरखा पांघरून वावरत असतात. सुरुवातीच्या मतदानात बारापैकी अकरा ज्युरी आपल्या नायकास दोषी ठरवतात. फक्त एक ज्युरी आपला नायक निर्दोष असल्याचे मत देतो. म्हणजे आपला नायक निर्दोष आहे असा त्याचा दावा नसतो, पण त्याला पुराव्यांवर चर्चा करायची असते. आता इतर ११ ज्युरींना हा विषय पटकन संपवून घरी जायची घाई असते. कोणाला त्याच्या व्यापाराची चिंता असते, कोणाला संध्याकाळी ६ चा दिलीपकुमारचा "मशाल" चित्रपट बघायचा असतो, कोणी एक तर त्याच्या जाहिरातीच्या डिझाईनमध्ये गुंतलेला असतो. हळू हळू चर्चा पुढे जाते, आणि एकेका ज्युरीचे मत बदलत जाते. या संपूर्ण चित्रपटात कोणत्याही व्यक्तिरेखेस नाव नाही. ज्युरी नंबर १ , २ .... १२ अशीच हीच त्यांची ओळख. पण नाव नसतानाही प्रत्येक जण एका विशिष्ट समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतो. जसजशी चर्चा पुढे जाते सुरवातीस अत्यंत सभ्य आणि सुसंकृतपणाचा आव आणणाऱ्या ज्युरींचा बुरखा फाटून त्यांचा खरा स्वभाव कळू लागतो. या चर्चेत प्रथम एकमेकांवर टीका, नंतर वाद , मग प्रत्यक्ष हातघाईचे प्रसंग येतात. या प्रत्येक ज्यूरीची एक विशिष्ट मानसिकता आहे. ती मानसिकता त्यांच्या वयक्तिक आणि सामाजिक अनुभवातून आणि संस्कारातून आलेली असते. आणि त्याच मानसिकतेतून ते आपल्या समाजाकडे आणि पर्यायाने आपल्या नायकाकडे पाहत असतात. शेवटी ११ निर्दोष आणि १ दोषी अश्या परिस्थितीत पुढे काय होते हे तुम्ही प्रत्यक्ष चित्रपटातच पाहावे हे उत्तम.
या चित्रपटात कोणीही तत्कालीन स्टार अभिनेता नाही. तरीही प्रत्येकाने आपले काम चोख केलंय. विशेषतः उल्लेख करावासा वाटतो तो अन्नू कपूर आणि पंकज कपूरचा. या दोन गुणी आणि प्रतिभासंपन्न अभिनेत्यांना बॉलीवूडने अक्षरशः पुढे वाया घालवले असे मला हा चित्रपट पाहून वाटू लागलेय. या चित्रपटात मला एक खटकलेली गोष्ट म्हणजे वेशभूषा. जवळपास प्रत्येक ज्युरी सूट बूट घालून येतो हे पटत नाही. हा चित्रपट १२ अँग्री मेन चे जवळपास संवाद ते संवाद भाषांतर आहे. पण हिंदीत रूपांतर करताना कथानक पूर्णपणे भारतीय समाजाशी एकरूप झालय. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर किती यश मिळाले ते मला अजून समजले नाहीये. पण निर्मात्याचे पैसे नक्कीच वसूल झाले असावेत.
तर मग काय ? बघणार ना "एक रुका हुआ फैसला?"
कौस्तुभ पोंक्षे
प्रतिक्रिया
26 Dec 2019 - 2:45 pm | कुमार१
हा कुठे पाहता येइल ?
26 Dec 2019 - 3:49 pm | पलाश
यूट्यूबवर https://m.youtube.com/watch?v=X18YI592T_o इथे दिसतो आहे.
26 Dec 2019 - 2:46 pm | शा वि कु
12 अँग्री मॅन फार आवडतो. एक रुका हुआ फैसला पाहायची कधी इच्छा झाली नाही. युट्युब वर थोडासा पहिला, तर डायलॉग डिलिव्हरी फार बटबटीत वाटली त्यामुळे पूर्ण पहिला नाही. तुमच परीक्षण मात्र छानच. पुलेशु.
26 Dec 2019 - 2:47 pm | शा वि कु
*मेन
27 Dec 2019 - 5:53 pm | कानडाऊ योगेशु
सहमत. १२ अँग्री यंग मॅन अनकम्पॅरिबल आहे. एक रुका हुआ फैसला मुद्दाम पाहीला. रुपांतर कसे केले आहे ते पाहायला. अनु कपूर ला म्हातारे दाखवले आहे आणि त्याचा आणि पंकज कपूरचा अभिनय अगदी आक्रस्ताळी वाटला. ह्यातलीच स्टाईल पंकज कपूरने नंतर बर्याच चित्रपटात विनोद निर्मीतीसाठी वापरली आहे असे वाटले.
26 Dec 2019 - 3:33 pm | Nitin Palkar
सुरेख परीक्षण. हा चित्रपट तीन वेळा तरी बघितला आहे. आता पुन्हा एकदा बघेन.
26 Dec 2019 - 3:45 pm | mrcoolguynice
एक सोडून सगळे ११ जेव्हा, त्यांच्या मनात असलेल्या कल्पनेलाच उचलून धरतात, तेव्हा आपल्या सारख्या त्रयस्थ प्रेक्षकालाही , विरोधी मत व्यक्त करणारा तो, इरिटेटिंग वाटू शकतो, काही प्रेक्षक तर त्या विरोधी मत व्यक्त करण्यास देशद्रोही मानतील कदाचित.
26 Dec 2019 - 4:03 pm | पलाश
चांगलं परीक्षण लिहिलं आहे.
फार फार वर्षांपूर्वी :D दूरदर्शनवर हा सिनेमा लागला होता. तेव्हा या सिनेमाविषयी काहीच माहीत नव्हते. नेहेमीच्यापेक्षा काही वेगळंच रसायन आहे हे लक्षात आल्यावर (भाजी निवडायची बाजूला ठेवून :D) पूर्ण लक्ष देऊन सिनेमा बघितल्याचं आठवतं. हा सिनेमा फार आवडला होता.
26 Dec 2019 - 4:03 pm | जॉनविक्क
लहानपणी सोनी वर हा चित्रपट अधून मधून लागायचा किमान ७-८ वेळा पाहिला असेलच
26 Dec 2019 - 4:22 pm | वकील साहेब
१२ अंग्री मेन हिंदीत कुठे बघायला मिळेल?
26 Dec 2019 - 8:36 pm | चौकटराजा
माझया " टॉप टेन" मधला हा चित्रपट आहे. माणसाने कितीही न्यायी व्हायचा आव आणला तरी सत्य शोधन करताना त्याची जडण घडण ही देखील महत्वाची ठरते हा या चित्रपटाचा गाभा आहे. एखाद्या इलेक्ट्रिकल अभियंत्याला सर्कीट मधील कोणता कंपोनंट बिघडला आहे हे आयसोलेशन ने कळते पण हाच नियम तो त्याच्या माणूस म्हुणूनच्या आयुष्यात वापरेल असे नाही ! युट्युब वर असलेला" एक्झाम" हा चित्रपट असाच संदेश देतो तो ही प्रतिसादकांनी आवश्य पाहावा ! तसेच "चारलीज चॉकलेट फॅक्टरी " या जॉनी डेप च्या चित्रपटा ची मी शिफारस करतो !
27 Dec 2019 - 12:29 am | सौन्दर्य
आमच्या कंपनीच्या एका कम्युनिकेशन विषयावरच्या ट्रेनिंग सेशनमध्ये हा सिनेमा दाखवला होता. सुरवातीला तर अगदीच बोअरिंग वाटला पण जसजसे कथानक पुढे सरकू लागले, खुर्चीत अगदी सरसावून बसलो. सिनेमा संपल्यावर एक अप्रतिम कलाकृती पाहिल्याचा आनंद लाभला. आपले स्व:ताचे पूर्वग्रह, संस्कार, संस्कृती एखादया घटनेकडे आपल्याला पूर्वग्रहानुसार कसे बघायला लावते ह्याचे हा सिनेमा एक उत्तम उदाहरण आहे.
27 Dec 2019 - 12:36 am | भुजंग पाटील
१२ आन्ग्री मेन चे इंग्लिश नाटक, टिव्ही सिरिज, २-३ सिनेमे आणि रिमेक, तसेच रशियन, चायनीज रुपांतरे पण येऊन गेली.
पण सगळ्यात उठून दिसला तो हेन्री फोन्डा चा (१९५७) अभिनय. प्रो. बलराज साहनींशी खूप साम्य वाटते.
हिंदी सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा ज्युरी सिस्टीम भारतातून जावून ३ दशके लोटली होती. त्यामुळे कदाचित लोकांच्या पचनी पडला नसेल.
(नानावटी खटल्याचे कारण पुढे करून नेहरुनी ज्युरी सिस्टीम बन्द केली होती)
28 Dec 2019 - 6:15 pm | कुमार१
आज पाहिला. सुरवातीस कंटाळा येतो. पण, पुढे तो आपली पकड घेतो.
अनु कपूरना मी ओळखलेच नाही; त्यांना अंताक्षरीत पहायची सवय होती ना !
पंकज यांचा इथला अभिनय आक्रस्ताळी >>> +११११. संवाद कळत नाहीत. अन्यत्र ते उच्च अभिनेता आहेत.
29 Dec 2019 - 8:04 am | सुधीर कांदळकर
संध्याकाळी चर्चेला आरंभ होतो तेव्हा १ विरुद्ध ११ अशी परिस्थिती असते. पंकज कपूर एकेकाची मते ऐकून वाद घालून ती कशॊ खोडतो ते सुंदर आहे. केवळ एका रात्रीच्या चर्चेवर आधारित चित्रपट मला आवडला होता.
स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.
30 Dec 2019 - 8:33 am | जॉनविक्क
तो फक्त वाद घालत नाही, सत्यांन्वेषणही करतो
29 Dec 2019 - 5:59 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
30 Dec 2019 - 8:50 am | जॉनविक्क
मिपाचे साहित्य संपादकांची हटकून याद येते
30 Dec 2019 - 10:05 am | सुधीर कांदळकर
बरोबर तो सत्यान्वेषण करतोच वर खरे ते पटवूनही देतो. जे जास्त कठीण असते.