असीम आणि मीरा

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
24 Dec 2019 - 1:30 pm

लग्न लागलं आणि असीम उठला. त्याला आधीपासूनच लग्नाला यायचं नव्हतं पण ज्याचं लग्न होत तो त्याचा जेष्ठ सहकारी होता. असीमचा मुख्य उद्देश पुढे घोडसाळला जाणे होता. अनासायासे लग्न गुरुवारी होतं, म्हणून मग त्याने सुट्टीच टाकली होती. जेवायला जाताना त्याला मीरा दिसली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. तिनेसुद्धा असिमसारखा वेष घातला होता, जीन्स आणि त्याला साजेसं काहीतरी. असिमला थोडं ते अजीब वाटलं पण त्याने फार विचार नाही केला. त्याला हे सगळं सम्पवून पुढे जायचं होतं. त्याच्या बरोबरच्या लोकांसोबत असीम जेवला, जेवण काही फार फाडु नव्हतं पण पोट भरलं.

आवरून कपडे बदलून असीम बाहेर आला तेव्हा जवळ जवळ तो मीराला धडकला. तिनेसुद्धा कपडे बदलले होते. परत दोघे एकमेकांकडे बघून हसले.
"घाई आहे का कुठे जायची?"
"हो रे , बस पकडायची आहे तालुक्याची, नन्तर परत 2/3 तास इथेच बसून टाईमपास करावा लागेल नाहीतर."
"चल मी सोडतो बस स्थानकावर."
मीराने मान हलवली. असीम आधीच अर्धा तयार झाला होता. फक्त जॅकेट आणि हेल्मेट घातलं की तो सुसाट निघणार होता. पण का कोण जाणे, मीराला मदत करावीशी वाटली आज. त्याचा बुजरेपणा, विशेषतः मुलींच्या आजूबाजूला असतानाचा, आज गायब होता. ते दोघे बस स्थानकावर पोचले, मीरा त्याचे आभार वगैरे मानायला सुरुवात केल्यावर असीम म्हणाला " आधी बघ तर की बस आहे का नक्की, का गेली ते".
मीरा हसली नि आत गेली. फिकट गोरा रंग, पण निस्तेज नाही, जेमतेम खांद्यापर्यंत पोचणारे केस, अतिशय सुरेख डोळे, त्याच्या खांद्यापर्यंत येणारी उंची. असीमला स्वतःच फारच आश्चर्य वाटत होतं आज. ज्या मुलीशी तो जेमतेम तासभर बोलला असेल मागच्या 6 महिन्यात, आज तो तिच्याशी मनमोकळेपणाने, 2 वाक्य का होईना, बोलला. आणि आता त्याला ती नीट दिसत होती. तेवढ्यात असीमला मीरा परत येताना दिसली, पडलेल्या चेहर्याने.
"का ग? गेली वाटत बस?"
"हो ना, आता पुढचे 3 तास हरी हरी इथे बसून, नाहीतर वडापनी पुढे पूढे जायचं."
"बर जाऊ दे, मी सोडू का तुला तालुक्याच्या ठिकाणी? मी त्याच दिशेने जाणार आहे पण तिथून दुसरीकडे."
"त्रास नाही होणार ना तुला? नाहीतर मी तुझ्या ड्राइविंग ट्रीपच्या मध्ये नको यायला."
"नाही ग, खरच माझा तोच रूट आहे, बघ म्हणजे तिथून मी डावीकडे जाणार घोडसाळला."
"काय सांगतोस, मलासुध्या तिथेच जायचय."
"कुठल्या फार्म हाऊसवर?"
"ते नाही ठरलं अजून."
असीमला आश्चर्य वाटलं. "अगं तिथे इन मीन 3 फार्म हाऊस आहेत, तू कोणाशी बोलली आहे का बुकिंग ठेवायला?"

मीराचा पडलेला चेहरा अजून पडला. "नाही रे, मी अचानक ठरवलीये ही ट्रिप. एका मैत्रिणीने 3 नंबर दिले पण मी फोनच नाही केला त्यावर अजून."

असीमला जाणवलं की मामला कुछ और है, पण त्याने पुढे विचारायचं टाळलं. "बघ, मी तुला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मी जिथे राहणार आहे तिथे तुला खोली मिळू शकेल. फक्त मजा अशी आहे की तिथे काहीच रेंज नसते, ना सध्या टेलिफोन चालू तिथला. आपल्याला बघावं लागेल तिकडेच जाऊन."
मिराच्या चेहर्यावर थोडस हसू उमटलं. "चालेल, जाऊ तिकडे आणि बघू काय होत ते."

असीमला तिच्या धाडसाचं आश्चर्य वाटलं पण त्याने ते चेहर्यावर नाही दिसू दिलं. त्यानी तिला चेहर्यावर ओढणी बांधायला सांगितली नि पर्स पाठीवरच्या बॅगेत टाकायला लावली. असीमकडे पण त्याची पाठीवरची बॅग होती, जी त्याने पुढे घेतली. असं सगळं सेटिंग झाल्यानंतर असीम मीराला म्हणाला "आपण ज्या रस्त्यावरून जाणार तो घाटाचा आहे. माझं लक्ष सगळं रस्त्यावर असणार. तर तुला काही सांगायचं असेल तर माझ्या मांडीवर दोनदा थाप दे. चालेल ना?"
मीराच्या होकारानंतर असीमने बाईक चालू केली. मीरा पाठी नीट बसली हे पक्के केल्यानंतर तो निघाला.

मीराला पण स्वतःचे फार आश्चर्य वाटत होते. ज्या मुलाशी ती फार कनेक्ट नव्हती त्याच्याशी आज ती मनमोकळेपणाने बोलत होती. ऑफिसमध्ये त्याच्याशी बोलणं झालं होतं पण ते सगळं कामासाठी. या शांत, फारसा मध्ये न बोलणाऱ्या मुलाबरोबर आज ती अनोळखी ठिकाणी निघाली होती.

मागच्या आठवड्यापासून मीरा खदखदत होती मनातल्या मनात. जशी ती घरी जाऊन आली, तिचा मूड खराब होता. आई बाबांना आता तिच्या लग्नाची घाई लागली होती. त्यांचीपण काही चूक नाही म्हणा यात, मीराच्या मनात आले. तीन बहिणींमधली ही धाकटी आणि प्रसाद तिच्या नंतरचा. त्यांना सगळ्यांचा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण त्यासाठी हिच्या लग्नाच्या मागे का लागावं त्यांनी? आता कुठे नव्या नोकरीत वर्ष झालं होतं. तिच्याकडे पुरेसे पैसे जमले नव्हते. प्रसादच्या ऍडमिशनच्या वेळेला तिने जमलेले पैसे दिले होते बाबांना. मग मला सगळं कळत तर यांनी का समजून घेऊ नये. बाबांनी तिला 3 महिने दिले होते. तुला जमवायचं असेल तर जमव नाहीतर आम्ही मुलगा बघायला सुरुवात करणार. तिला त्यांचा एवढा राग आला होता ना तेव्हा. तेव्हाच तिने एकट्याने फिरायला जायचं ठरवलं. स्वतःचा नीट शांतपणे विचार करायची गरज तिला वाटली तेव्हा. चित्रपटात दाखवतात तस एकटं निघायचं आणि मनाला वाटेल तिथे जायचं. तेव्हा रागाच्या भरात हा विचार सोपा वाटला करायला पण लग्नाच्या इथे पोचल्यावर तिच्या मनात भीती भरायला सुरुवात झाली. ऑफिसच्या मैत्रिणी दुसरीकडे जात होत्या, त्यांना आधीच हिने नाही सांगितलं होतं. गावात आल्यावर एकूण सगळं बघून तिला अजून भीती वाटायला लागली होती. त्यात बस गेल्यावर तिला रडूच आलं होतं. नशीब असीमने नाही पाहिलं ते, तिच्या मनाला विचार चाटून गेला. जेव्हा असीमपण घोडसाळलाच जातोय कळलं तेव्हा तिला थोडासा धीर आला.

एव्हाना बाईक घाटाला लागली होती. वळणावळणाचे रस्ते चालू झाले होते. सुरुवातीला जरा मागे सरकून बसलेली मीरा आता घसरत होती. एका वळणावर तिला वाटलं की आता ती मागच्यामागे पडणार म्हणून तिने मागे पकडलेला हात असीमच्या खांद्यावर टाकला. तिला तो चपापलेला कळलं पण रस्ता अजून बराच होता. दुपारचं ऊन संपत आल होत नि घाटात संधीप्रकाश पसरायला सुरुवात झाली होती. ढगातून पडणारे कवडसे, बाजूला दिसणारं हिरवं पिवळं रान, डोंगराच्या पोटातून जाणारा रस्ता, सगळं कसं शांत नि रम्य होत. मीरा विसरून गेली की कितीवेळ ती बाईकवर बसली होती.

असीमने जेव्हा बाईक थांबवली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिचे दोन्ही हात त्याच्या पोटावरुन पुढे गुंफलेले होते. ती जवळजवळ त्याच्या अंगावर भार टाकून बसली होती. तिला अचानक जाणवलं की आपण फारच खेटून बसलोय आणि बाईक थांबली आहे. मीरा बाईकवरून पटकन उतरली.
"पोचलो का आपण?"
"नाही, अजुम 10 15 मिनिट आहेत. पण या स्पॉटच्या पुढे मोबाईलला रेंज नसते. मला बाबांना फोन करायचा आहे. तू पण करून घे."
विचारांच्या भोवर्यात मीरा इतकी अडकली होती की घरी फोन करायचा आहे हेच विसरली होती.

असीम फोन करायचा म्हणून बाईकपासून जरा बाजूला आला. बाबांचा फोन लागत नव्हता. त्याने वळून मीराकडे बघितले, या मुलीच त्याला आश्चर्य वाटत होतं. ते निघाले तेव्हा ती मागच्या सीटवर एकदम ताठ आणि लांब बसली होती. मग जसा घाट लागला तशी ती त्याच्या पाठीवर रेलली. बाजूनी कोणीही बघितलं असत तर म्हटलं असत की लव बर्डस चालले आहेत म्हणून. असीमच्या मनात एकदा आलेलं की तिला जाणीव करून द्यावी पण त्याला वेग वाढवता येत होता आता म्हणून तो काही बोलला नाही. पूर्ण अंधाराच्या आत त्याला तिथे पोचायचं होत.
शेवटी एकदाचा फोन लागला बाबांचा. नेहमीप्रमाणे त्यांनी हे करू नको ते करू नको सांगितलं. आत्या कशी त्यांचं ऐकत नाही हे ही सांगितलं. मग आत्याने फोन ताब्यात घेतला आणि बाबा कसे ऐकत नाही हे सांगितलं. थोडक्यात नेहमीचा संवाद झाला. फोन सम्पवून असीम वळला तर मीरा बाईकशी उभी होती.
"झाला फोन घरी?"
"हो, निघायचं?"

असीमने डोक्यावर परत मडकं चढवलं, मीरा मागे बसली, यावेळेला परत लांब आणि ताठ. असीमला हसायला आलं. आता अंतर फार नव्हतं त्यामुळे तो काही बोलला नाही. रस्ता मातीचा होता आणि चढाव होता. जेव्हा ते काकूंच्या फार्महाऊसवर पोचले तेव्हा धुळीने माखले होते.

त्याच्या (कम)नशिबाने काकू ब्रूनोला घेऊन बाहेरच उभ्या होत्या. मीराला असीमच्या मागून उतरलेले बघून त्यांची एक भुवई उंचावली. ब्रूनोला बांधलं नव्हतं, त्याला बघून मीरा उतरली तिथेच उभी राहिली. ब्रुनो तिच्याकडे आला नि तिला हुंगायला लागला.
"काळजी नको करुस तो काही करणार नाही मीरा. तो तुझी ओळख घेतोय."
"हो, एक बिग डेन माझ्या कमरेला नाक लावतोय नि मी घाबरू नको?"
"कुत्र्याची बरीच माहिती आहे तुला ग." काकू पुढे आल्या. त्यांनी ब्रूनोला हाक मारली. त्याचाही इंटरेस्ट संपला असावा म्हणून तोही उगीच तिला घासून काकूंकडे गेला.
"भैरोबा चहा टाका छान आलं घालून. असीमबाबा आलेत खास पाहुण्यांबरोबर."
'खास पाहुणे' म्हटल्यावर असीम नी मीराने एकमेकांकडे चमकून बघितलं.
"नाही काकू, अस काही नाहीये. ही माझी ऑफिसची कलीग, मीरा."
मीरा लगेच पुढे झाली काकूंशी हात मिळवायला. काकूंनी मिश्किल हसत स्वतःची ओळख करून दिली.
'जा. 3 नंबर खाली ठेवली आहे तुझ्यासाठी. फ्रेश हो नि ये बाहेर चहा प्यायला. मग रात्रीच बोलू.'
"काकू आम्हाला अजून एक खोली लागेल. हिच्यासाठी."
आता मात्र काकू खरंच विचारात पडल्या.
"माझ्याकडे आता एकच खोली आहे. आणि दुसरी उद्या दुपारी मोकळी होईल. तुझ्यासारखेच भटके लोक आलेत."

असीमने मीराकडे बघितलं.
"असू दे असीम, मी दुसरीकडे जाते. फक्त मला सोडशील?"
असीम काही उत्तर देण्याआधीच काकू बोलल्या.
"सध्या हे एकच चालू असेल मीरा. बाकीची लोक शुक्रवारी सकाळी येतात. खोल्या उघडून साफसफाई करतात आणि शनिवार/रविवार बुकिंग घेतात. आता तुला खोली मिळेल पण खायला प्यायला इथेच यावं लागेल. वर तिथे तू एकटीच असशील. त्यापेक्षा अस कर की आधी फ्रेश हो, चहा घेताना बोलू."
असीमने मीराकडे बघितलं, ती अजून गोंधळलेली आणि आता थोडीशी घाबरलेली वाटली.
"मीरा तू जा, फ्रेश होऊन घे. तुझं झालं की मग मला सांग."
मीराने मान हलवली आणि ती त्यांच्या मागोमाग आत निघाली.
' कुठे येऊन अडकलो आपण ' अस मीराच्या मनात सतत येत होतं. अनोळखी माणसं, अनोळखी गाव आणि आपली धाडसी ट्रिप असं सगळं तिच्या अंगावर येत होतं. असीमने तिला खोलीत सोडलं, त्याचीपण बॅग तिथे ठेवली नि तो पाठच्या बाजूला गेला. मीराने दार लावलं आणि ती फ्रेश व्हायला गेली. जसं तोंडावर पाणी मारलं तसा तिचा बांध सुटला. रागाच्या भरात काहीतरी ठरवून काहीतरी करतोय आपण. आपला हा स्वभाव नाही आणि अस एकटं फिरायची सवयही नाही. त्यामुळे येणारे अनुभवपण नाहीत आणि त्यांनंतर येणार शहाणपण पण नाही. डोळ्यातून टीप टपाटपा गळत होती, हुंदके येत होते. बेसिनच्या कडेला हात घट्ट पकडून मीरा उभी राहिली. थोड्यावेळाने ती स्वतःची स्वतः सावरली. तोंडावर पाणी मारून, फ्रेश होऊन, अंगावरची माती घालवून ती मागच्या बाजूला गेली. असीम आणि काकू छोट्याश्या पडवीमध्ये बसून बोलत होते. मीरा जाऊन तिसऱ्या खुर्चीत बसली. काकूंनी तिच्याकडे निरखून बघितलं पण त्या काहीच बोलल्या नाहीत.

चहा आला. असीम समोर एक कप होता पण त्याच्यासाठीपण दुसरा आला. एकूणच असीम आणि काकू एकमेकांना नीट ओळखतात अस तिला जाणवलं. तिचा चहा अर्धा पिऊन झाल्यावर काकू बोलायला लागल्या.
"बघ बेटा. आता याक्षणी माझ्याकडे एकच खोली आहे. पण तू त्या खोलीत आजची रात्र राहू शकतेस. असीम असाही त्याची ती सखी घेऊन जंगलात जाणार आहे. तो काही रात्री परत नाही यायचा. उद्या तुला स्वतंत्र खोली मिळेल. काय म्हणतेस?"
मीराने असीमकडे पाहिलं आणि हलकेच मान डोलवली. तो उठला आणि खोलीत गेला फ्रेश व्हायला. मीराला अचानक चहा फार सुंदर चवीला लागायला लागला. घश्यातून गरमागरम खाली उतरत होता तेव्हा तिला जाणवत होता.
'असीमची सखी??' तीला प्रश्न पडला. ' असू दे, जाऊ दे, असेल काहीतरी.' तिच्या चेहर्यावर बहुतेक हे सगळं मनातलं दिसत असावं अथवा काकूंना मन वाचायची विद्या अवगत असावी. काकूच बोलायला लागल्या.
"असीम मागच्या वेळेला आला होता तेव्हा एक दुर्बीण घेऊन आला होता. परत जाताना ती तो इथेच ठेवून गेला. ती त्याची सखी. मागच्या वेळेस समोरच्या मैदानावर दुर्बीण ठोकून बसला होता रात्रभर. मी थोडावेळ बसले पण नंतर कंटाळा आला. तो आकाशात काय दाखवतोय आणि दुर्बिणीत काय दिसतय याचा मला काहीच मेळ लागेना."
काकूंनी तिच्याकडे निरखून पाहिलं, नजरेत नजर भिडवून.
"तुला काय वाटलं सखी म्हटल्यावर?"
मीराला स्वतःलापण तोच प्रश्न पडला होता की तिने का विचार केला या शब्दावर? तिने काकूंकडे बघून फक्त खांदे उडवले आणि ती चहा पिण्यात गुंग होण्याचा अभिनय करू लागली. पण विचार काही जात नव्हता. तिने अचानक विचारलं काकूंना, इतकं अचानक की तिलाच स्वतःच आश्चर्य वाटलं.
"मग तो आजपण तिथेच जाणार आहे का?"
काकूंना तो प्रश्न अपेक्षित असावा, त्या हलकेच हसल्या आणि म्हणाल्या
"नाही. इथून पंधरा ते वीस मिनिटांच्या चालीवर, आत जंगलात, आमच्या ह्यांनी एक मचाण बांधलं होत. हे होते तोपर्यंत ते जायचे एखाद्या रात्री प्राणी निरीक्षण करायला किंवा शांतपणे झोपायला. हे गेले तस ते दुर्लक्षित झालं. मागच्याच्या मागच्या वेळी मी असीमला सहज बोलले. तो मग ते जाऊन ,शोधून, बघून आला. मग मागच्यावेळी त्याने आणि गोट्याने जाऊन ते नीट केलं, थोडस काहीतरी बदललं (काय ते माहीत नाही, मी कुठे जातेय आत चालायला). यावेळेला तो तिकडे जाऊन दुर्बीण लावणार आहे. कशी ते त्याचंच त्याला माहिती."

मीराला हे सगळं खूप मजेशीर वाटलं आणि तिला उत्सुकता वाटली. तिच एक मन म्हणायला लागलं ' की चल जाऊन राहून बघूया कस वाटत ते, दिसला एखादा वन्यप्राणी तर सोने पे सुहागा. दुसरं मन म्हणू लागलं, वेडी आहेस का? सद्ध्या काय आगीतून फुफाट्यात उद्या मारणं चालू आहे तुझं, आधी एकदम ठरवते काय, यांच्या बरोबर येते काय, आता खोली मिळाली आहे तर मस्त झोप की. ' मीराचा हात थांबला मधेच चहा पिता पिता.
तिच्या नकळत ती विचारून गेली मोठ्याने "मग मी यावेळेला गेले त्याच्या बरोबर तर चालेल का?"
"तो आला की त्यालाच विचार. पण लक्षात ठेव की आत गेलीस की रात्री बाहेर नाही येता येणार. आता थंडी पडायला लागलीये, झाडावर अजून गार वारा लागेल. आणि रात्रभर जागायची तयारी असेल तरच जा."
एवढ्यात काकूंना हाक आली आणि काकू बघायला गेल्या. मीराचा चहा संपला होता पण मनातले विचार उधळलेले होते. तिचा गोंधळ उडाला होता. काय करू काय नको तिच तिलाच कळत नव्हतं.
असीम फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याला मीरा चहाचा कप हातात घेऊन, शून्यात बघत असलेली दिसली. त्याला या पोरीचं आश्चर्य वाटत होतं. कंपनीमध्ये असताना त्याला ती फार सरळ आणि धाडस न करणारी वाटली होती. आणि आता ती त्याच्याबरोबर घोडसाळला आली होती. महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला तिची अडचण होत नव्हती. इथपर्यंत येताना फार बोलणं नव्हतं झालं पण जेव्हा घाट लागला तेव्हा तिने त्याला घट्ट धरलं होत. मुलीशी एवढी जवळीक त्याला सवयीची नव्हती त्यामुळे तो क्षणभर चपापला होता. पण नंतर त्याला काही विशेष नाही वाटलं. तिच्या सटून बसण्याने त्याला एक अजीब शांतता वाटली. यावेळेला बाईक चालवताना मजा आली होती त्याला. इतर वेळेला बाईकशी तो एकटाच तल्लीन व्ह्यायचा, यावेळेला मीरापण झाली होती आणि ती पण पहिल्यावेळेलाच.

मीरा खोलीत गेल्यावर काकूंनी बरेच प्रश्न विचारले. त्यांची उत्तर देताना नाकी नऊ आले त्याच्या. सगळ्यात शेवटी त्या इतकंच म्हणाल्या की "जोडी छान दिसेल तुमची." त्याने काकूंना वेड्यात काढलं "अहो काकू, आम्ही आज बोललोय एव्हढं पहिल्यांदा. आणि तुम्ही जोड्या काय जुळवताय? मला तिच्याबद्दल काही माहीत नाही आणि तिला माझ्याबद्दल." काकू गूढ हसल्या. त्या हसण्याला असीम वैतागला. त्याने तिला बरोबर घेऊन येताना फार विचार नव्हता केला आणि त्याला आता त्याचा पश्चात्ताप होत होता.
"नको विचार करुस फार, करून टाक."
काकूंचा पाठून आवाज आल्यावर असीम दचकला.
"काय करून टाकू काकू?"
"लग्न..."
"कोणाशी?" असीमने प्रश्न विचारला आणि आपलं चुकलं हे त्याला लगेच कळलं. त्याने काकूंकडे बघितलं, त्या आपल्या परत गूढ हसल्या आणि मीराच्या दिशेने निघाल्या.

अर्ध्या तासांनंतर पुढे गोट्या त्याच्यामागे मीरा आणि शेवटी असीम अशी जंत्री निघाली. आता मात्र असीम थोडा वैतागला होता. इथे आली तोपर्यंत ठीक होत पण आता ही त्याच्या खास ठिकाणीपण बरोबर येत होती. त्यात सारखं काकुंच गूढ हास्य त्याला अजून भडकवत होत. मीराच्या येण्यामुळे एक बॅग अजून वाढली होती आणि ती सध्या गोट्याच्या खांद्यावर होती. ते तिघे जसे जंगलात शिरले, तसा मागचा प्रकाश अंधुक होत गेला. एका वळणानंतर आजूबाजूला फक्त अंधारच होता. गोट्याने मुद्दामून टॉर्च लावली नव्हती. अंधारात आल्यावर मीराने एकदम पटकन श्वास घेतला होता. आता ती घाबरली असावी, असीमच्या मनात विचार आला. हा विचार संपतोय ना संपतोय तोपर्यंत असीम मीरावर जाऊन धडकला. अंधार झाल्यावर ती होती तिथेच उभी राहिली होती. तिच्या घश्यातून एक अस्फुट किंकाळी निघाली पण असीमने तीला आवाज दिल्यावर ती शांत झाली. तिच्या त्या अजीब आवाजाने गोट्या परत मागे आला. त्याने टॉर्च पेटवली आणि तीला रस्ता दाखवायला सुरुवात केली.

साधारणतः वीस मिनिटांनंतर त्रिकुट मचाणाच्या खाली पोचलं. असीम खुंटाच्या साह्याने वर चढून गेला आणि त्याने दोरीची शिडी बांधली. तिच्याबरोबर त्याने एक दोरीही खाली सोडली. गोट्याने एकामागोमाग एक अश्या दोन बॅगा तिला बांधल्या आणि असीमने त्या वर ओढून घेतल्या. आता मीराची पाळी होती वर यायची.
या ट्रिपला निघाल्यापासून मीराने 'हे मी काय करते आहे?' असा बर्याचवेळेला विचार केला होता. आता जंगलात शिरल्यावर तो विचार प्रकर्षाने तिला खात होता. पण दुसरं मन म्हणत होत की 'असा धाडसीपणा कधी करणार?' त्या त्या वेळेला या दुसऱ्या मनाचं ऐकून ती निर्णय घेत होती आणि पहिलं मन मग शिव्या घालत होत. जंगलातला किर्रर्र अंधार, शांतता आणि आता मचाणाची उंची या सगळ्या गोष्टींनी तिचा थरकाप उडत होता. गोट्याने खुणेने तिला वर जायला सांगितलं, त्यालाही शांतता भंग करायला जीवावर येत असावी. गोट्याने तिला खांद्यावरची बॅग द्यायला सांगितली, ती त्याने असीमने वरून सोडलेल्या दोरीला बांधली. बघता बघता तिची बॅग वर गेली पण. 'आता मागे परतायचे दोर कापले गेले तुझे मीरा' दुसऱ्या मनाने तिला धीर द्यायचा प्रयत्न केला. शेवटी मीराने दीर्घ श्वास घेतला आणि वर चढायला सुरुवात केली. 'खाली बघू नकोस, खाली बघू नकोस' अस स्वतःला बजावत मीरा वर मचाणावर पोचली तेव्हा तिचे हात जड झाले होते. 'वजन कमी करायला हवं' असा विचार तिच्या मनात येऊन गेला.

मीरा आयुष्यात पहिल्यांदा जंगलात आली होती नि पहिल्यांदाच मचाणावर. 'काय प्रचंड धाडसी आहे मी' असा उपहासात्मक विचार येऊन गेला तिच्या मनात. दोरीच्या शिडीने वर येताना मीरा मचाणाच्या जवळ जवळ मध्यभागातून वर आली होती. वर येऊन बसल्यावर, दम खाताना तिला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आलं होतं की या मचाणाला कडेला काहीच नाही. मचाण संपलं की एकदम खाली. आधीच घाबरलेल्या मीराने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. जिथून ती वर आली होती त्याच्या बाजूलाच असीम त्यांच्या बॅगा बांधत होता. तिथेच वर झाडाला तीन चार यु आकाराचे हुक मारले होते. ती ते बघत असतानाच असीमने त्यांना, प्रत्येकी एक अशी एक दोरी, दुसऱ्या हुकच्या सहाय्याने बांधली आणि तो तिच्याकडे वळला. काकुंकडून निघताना त्याने तिला एक वेगळाच पट्टा बांधायला दिला होता, त्याचा उपयोग आता कळला तिला. पट्ट्याच्या मागच्या बाजूला एक हुक होता त्याला असीमने ती दोरी बांधली. "आता तुला झोप लागलीस तरी गडगडून तू खाली पडणार नाहीस." त्याने जोक मारायचा प्रयत्न केला. "झोप कोणाला येणारे बाबा, इथून हलणार नाहीये मी रात्रभर." असीमने तिच्याकडे निरखून बघितले आणि स्वतःला दुसरी दोरी बांधली. "हे बघ", अस म्हणून तो मचाणाच्या कडेला गेला आणि हळू हळू त्याने स्वतःला झोकून दिले. मीराचा श्वास रोखला गेला जसा जसा असीम तिरका होऊ लागला. शेवटी मचाणाच्या 45 अंशात तिरका झाल्यावर तो थांबला. दोरी आता गच्च ताणली गेली होती नि तो बिनधास्त तिच्यावर जोर देत होता. 4 5 सेकंदांनातर तो हळू हळू सरळ झाला.
थोडक्यात त्याला तिला विश्वास द्यायचा होता, तिला कळलं ते पण अजून हृदयाचे ठोके नेहमीच्या गतीला यायचे होते. तिने असीमकडे बघून उसनं हसायचा प्रयत्न केला पण ते फार काही जमलं नाही. त्याने मान डोलवली आणि तो पुढच्या गोष्टींकडे वळला.

असीमने बॅगेतून एक एक गोष्ट काढायला सुरुवात केली. मचाण खूप मोठं नसलं तरी छोटेही नव्हतें. दोघेजण आरामात शेजारी शेजारी बसून जागा उरेल इतकं होतं. मीराच्या हृदयाचे ठोके जसे जसे नॉर्मलला यायला लागले तस तस तिच आजूबाजूला लक्ष जायला लागलं. चढताना तिला कळलच होत की मचाण किती उंचावर आहे ते ,पण नीट बघताना आता तिच्या लक्षात येत होतं की त्याची जागा पण अचूक निवडली आहे. मचाण ज्या झाडावर बांधलं होत ते दणकट, उंच आणि उतारावरच होत. तिच्या पाठीबाजूला डोंगराचा चढ चालू होतं होता. पुढे रान होत पण या झाडापेक्षा उंच झाड एकही नव्हतं. चंद्र तिच्या पाठीवर होता म्हणजे ती पश्चिम असावी आणि समोरची पूर्व. अंधाराला डोळे सरावले असल्यामुळे तिला आता चंद्रप्रकाश जाणवत होता पण अमावस्या जवळ आली होती कारण चंद्राची कोर फारच क्षीण होती. दूरवर बारीक बारीक दिवे दिसत होते घोडसाळचे. मधलं रान उंचसखल गवत नि झाडांनी भरलं होत पण वरून बघितल्यावर कळत होतं की ते किती घनदाट आहे ते. मीराच्या डोळ्यांना कळ लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की बर्याच वेळात तिने डोळे मिटले नाहीयेत. तिने दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. सुरुवातीला तिला खूप शांत वाटलं, त्यानंतर तिला आजूबाजूच्या जंगलाचा आवाज जाणवायला लागला. पुस्तकात वाचलं होतं की जंगलाचा आवाज असतो, आज तिला तो जाणवत होता. वेगवेगळे चित्र विचित्र आवाज येत होते. प्राण्यांची आणि पक्षांची ओळख नसल्यामुळे तिला कळत नव्हतं की कुठला कोणाचा आहे. निघण्याच्या आधी तिने काकूंना विचारलं होत की इथे हिंस्त्र श्वापद आहेत का म्हणून तेव्हा काकू सहज बोलून गेल्या होत्या की बिबटे दिसतात म्हणून. मग तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यांनी तिला विश्वास दिला की ते माणसाला काही करत नाहीत जर माणसाने काही केलं नाही तर. मीराने जबरदस्ती विश्वास ठेवला कारण तिला आता हे धाडस करायचं होतच.

असीमने त्याची बायन्याक्युलर लावली. मागच्यावेळेस येऊन त्याने मचाणावर ही वेगळी सेटिंग केली होती. मचाणावरच्या हालचालीने ती दुर्बीण हलणार नाही अशी काळजी त्याने घेतली होती. पण झाडाच्या हलण्याचा तिच्यावर असर होणारच होता. मचाण बनवताना विचार केला होता की नाही माहीत नाही पण त्याला त्याचा फायदा झाला होता. पूर्वेकडच आकाश छान मोकळं होत , काहीच अडथळा नव्हता तिथे. अजून वारा सुटला नव्हता आणि थंडीपण वाढली नव्हती, तेवढ्यात त्याला दोन चार ऑब्जेक्टस बघून घ्यायचे होते. मागच्यावेळेला तो रात्री चांगलाच गारठला होता वाऱ्याने. मृग वर आलं होतं आणि व्याधपण. असीमने दुर्बीण तिकडे वळवली आणि सेट करायला सुरुवात केली. तो व्याध लागल्या नंतर असा तल्लीन झाला बघण्यात की क्षणभर विसरलात की मीरा त्याच्याबरोबर आहे हे. त्याने जेव्हा सेटिंग बदललं तेव्हा त्याच लक्ष डोळे मिटून बसलेल्या मीराकडे गेलं. त्याला क्षणभर अपराधी वाटलं, व्याध लावला होता नि आपण हिला दाखवायला विसरलो. पण सेटिंग आता हलली होती. मग त्याने मृगाच्या पोटातले तारे लावले आणि हलक्यानेच मीराला हाक मारली. असीमला वाटलं की मीराला बसल्याबसल्या झोप लागली पण तिने हळूच डोळे उघडले. असीमने तिला खुणेनेच तिकडे यायला सांगितले. ती हळू उठली आणि स्वतःला सावरत त्याच्या इथे आली. मीराने बहुदा आधी कधीच बायनोक्समधून तारे बघितले नसावेत किंबहुना तिने मुद्दामून असे कधी तारे बघितलेले नसावेत अस असीमला वाटलं. तिची प्रतिक्रिया खूपच आश्चर्याची होती. सेटिंग हललसुद्धा तरी ती बघतच होती. असीमने मग तिला अजून वेगवेगळे ऑब्जेक्टस, तारे आणि नेब्युला दाखवले. यासगळ्यात तो स्वतःसाठी जितका वेळ घ्यायचा होता तो घेतच होता. मीरा एकदम अस्वस्थ होत होती तो एकाग्रतेने बघत असल्यावर. आकाशाचा एक भाग बघून झाला असे वाटल्यावर असीम थांबला. मीरा आता तो पुढे काय दाखवणार असा विचार करत असावी, कारण असीमने तिला बसायला सांगितल्यावर तिने विचारलं की संपलं का बघायचं म्हणून. तो हसला. त्याने तिला म्हटलं की अजून खूप आहे बघण्यासारखं पण आता आपण चहासाठी ब्रेक घेऊया, अजून काही ऑब्जेक्टस वर यायचे आहेत क्षितीजाच्या.

असीमने एका बॅगेतून थर्मास काढला आणि दोन छोटे पेले. जेव्हा तो वळला तेव्हा मीरा खाली बसली होती पण यावेळेला पाय मचाणाच्या खाली सोडून. त्याला तिच कौतुक वाटलं, आतापर्यंत घाबरून मागे बसलेली मीरा आता बिनधास्त पाय खाली सोडून बसली होती. त्याने तिला गरम चहानी भरलेला पेला दिला आणि तो पण तिच्यासारखाच बसला. मागच्या दोरीवर आता तिचा पूर्ण विश्वास बसला, असीमच्या मनात विचार आला आणि तो मनातल्या मनात हसला. चहाचे घोट घेता घेता त्याने पहिल्यांदा जंगलातली शांतता अनुभवली त्या रात्री. आतापर्यंत फक्त ऑब्जेक्टस बघायचे एवढंच डोक्यात होत आणि त्याच्यामागे आजूबाजूच्या गोष्टींचा विसर पडला होता त्याला.

असीमने जेव्हा इथे यायचं ठरवलं तेव्हापासून त्याच्या डोक्यात फक्त तारे बघायचं एव्हढच होत. बाकीच्या गोष्टींचा त्याने विचार पण नव्हता केलेला. आज जर ही नसती आली तर मी फक्त वर आकाशातच बघत बसलो असतो, असीमच्या मनात विचार येऊन गेला. गरमगरम चहा घश्यातून खाली उतरताना जाणवत होता. आजूबाजूची शांतता खूप छान वाटत होती. गार वारा सुटायला लागला होता आणि थोडेसे ढग दिसू लागले होते निरभ्र आकाशात.

" मला घरातून बाहेर पडायचं होतं आणि एकटं फिरायचं होतं." मीराने हलक्या आवाजात शांततेचा भंग केला.
असीमने तिच्याकडे वळून पाहिले. ती दूरच्या एका झाडाकडे बघत होती.
" काही झालं का घरात?" असीमने विषय पुढे न्यायचा प्रयत्न केला.
" लग्नाच्या वयाला आलेल्या मुलीच्या घरात अजून काय घडणार?" मीराने त्याच्याकडे वळून पाहिलं. मीराच्या नजरेत नजर मिसळल्यावर, असीमला एक हताशा जाणवली.
" बहुतेक तेच जे घरातला मुलगा 27 वर्षांचा झाल्यावर घडत आणि तो मुलगा घरी येणारे मुलींचे फोटो बघत नसेल तर घडत." असीम हसत हसत बोलला. मीराने नजर परत त्या दूरच्या झाडाकडे वळवली, तिच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटलं होत.
" बघ" असीमने विषय अजून पुढे नेला, आज का कोण जाणे या मुलीशी मन मोकळं करायला त्याला काहीच वाटत नव्हतं. आजूबाजूच्या जंगलाचा परिणाम होता का हा?
" माझी आई मी बारा वर्षाचा असतानाच गेली" मीराने चमकून त्याच्याकडे पाहिलं. असीमच्या चेहर्यावर आश्चर्याचे भाव उमटले. तो या वाक्याने कधीच सुरुवात नाही करत, लोकांची सहानुभूती नको वाटते त्याला पण आज असं का बोललो मी? आश्चर्य आणि प्रश्न दोन्ही उमटले मनात त्याच्या.
तो गप्प झालेला बघून मीरा म्हणाली " सॉरी ".
आता असीम स्वतःच गोंधळला, पुढे काय बोलू असा क्षणभर प्रश्न पडला त्याला. एक दीर्घ श्वास घेत त्याने स्वतःला सावरलं, 'या मुलीबाबत आपल्याला काहीतरी वेगळं वाटत, त्यामुळे नो लपवालपवी.' त्याने स्वतःची समजूत काढली.
"मीच सॉरी ग." असीम पुढे बोलला. " मला अशी सुरुवात नव्हती करायची, पण असो. आई गेल्यावर आम्ही दोघे म्हणजे बाबा आणि मी 2 वर्ष एकटे राहिलो. आम्हाला त्या एकटेपणाची सवय होते न होते तो आत्या आली राहायला आमच्याकडे. आता त्या दोघांचेपण वय झालंय आणि ते माझ्या मागे लागले आहेत लग्न कर म्हणून." असीम थांबला उरलेला चहा प्यायला.
तोवर एक शांतता पसरली, असीम चहामध्ये गुंतला होता आणि मीरा स्वतःच्या विचारात.
"पण असं फोटोत बघून नि एकदा दोनदा मुलीला बघून कस पसंत करायचं?" असीम चहाचा कप न्याहाळत बोलला " मला काय ते पटत नाही. पण घरच्या दोघांना कोण समजवणार? म्हणून मी सध्या शांतता कोर्ट चालू आहे पवित्रा घेतलाय."
मीराला त्याने दिलेल्या उपमेवर हसायला आलं.
" माझ्याकडे उलटं आहे" मीरा पुढे बोलली "मला तीन महिन्यांच्या कालावधी दिलाय, माझं माझं ठरवायचं असेल तर. नाहीतर ते सांगतील त्या मुलाशी लग्न करावे लागेल." हसू जाऊन मीराच्या चेहर्यावर पूर्वीचे हताश भाव उमटले. " मला लग्न करायचं आहे. पण नोकरीपण करायची आहे. करियरपण करायचं आहे. थोडंस मोकळं जगायच पण आहे. लग्न झालं की जबाबदाऱ्या आल्या, त्या घ्यायची ना नाही माझी. पण थोडस आधी बेफिकीर जगायचं आहे. सासरचे कसे असतील? त्यांना काय आवडेल नाही आवडणार? नवरा काय म्हणेल? महत्वाचे म्हणजे तो कसा असेल नि कसा निघेल? मला माझं मन किती मारायला लागेल? का तो खरच साथ देईल? असे अजून बरेच अनुत्तरित प्रश्न आहेत." मीराने दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. ती सगळंच एका दमात बोलली होती.

असीमने आकाशाकडे नजर टाकली. ते आता निरभ्र झालं होतं. आकाशाला बहुतेक त्याच्या मनातलं कळत असावं. त्याच मन असच मोकळं झालं होतं आणि काही प्रमाणात मीराचंही झालं असावं. असीम उठला आणि त्याने मीराकडून पेला घेतला आणि तो थर्मासजवळ ठेवला. मग त्याने तिला हात दिला उठायला. तिने क्षणभर त्याच्याकडे रोखून बघितलं, त्याच्या नजरेत तिला एक मोकळीक जाणवली. त्याच्या हातात हात देऊन, थोडासा जोर देऊन ती उठली.
असीमने मग तिला उत्तर दिशा दाखवली. सप्तर्षी आणि त्यांच्यातले सात तारे. क्रतु, पूलह, पुलत्स्य, अत्री, अंगीरा, वसिष्ठ आणि मरीची. त्यातला वसिष्ठ आणि त्याचा बायनरी अरुंधती. मग ते कसे, ट्रू बायनरी , ऑप्टिकल बायनरी आणि स्पेक्ट्रम बायनरी आहेत. जेव्हा असीम व्हाईट द्वार्फ म्हणजे श्वेत बटू वगैरे सांगायला लागला तेव्हा तीच मन भरकटल.
आज तिच्या मनाने जे काही धाडसी निर्णय घेतले होते, ते अजूनतरी लाभत होते. मीराने बाजूला उभ्या असलेल्या असीमकडे नजर टाकली. एका तश्या संपूर्ण अनोळखी मुलाबरोबर ती पूर्ण दिवस आणि आता चालू असलेली रात्र होती. त्याने तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा प्रयत्न तर सोडाच पण विचारपण नव्हता आणला. उलट तिच त्याच्या एकट्याच्या ट्रिपमध्ये घुसली होती, तरी तो शांत होता.
असीमच्या हलक्या हाकेने ती तिच्या विचारातून बाहेर आली. "बघ वसिष्ठ आणि अरुंधती लावले आहेत" त्याने दुर्बिणीकडे इशारा केला. मीराने दुर्बिणीला डोळे लावले आणि तारे बघायला सुरुवात केली. तिच्या दृष्टीने ते नेहमी डोळ्यांना दिसतात तसेच पण थोडेसे जास्त तेजस्वी, एव्हढाच फरक होता. असीम परत तिला इकडे बघ नि वर बघ अस सांगत होता, पण तिला काय ते झेपत नव्हतं. तिचं तिचं बघून झाल्यावर ती बाजूला झाली.
" दिसलं का नीट?" असीमने प्रश्न केला.
"तू लग्न झाल्यावर बायकोला घेऊन असच करशील का?" मीराच्या अनपेक्षित प्रश्नाने असीम गडबडला. त्याला क्षणभर काहीच सुचलं नाही. मग त्याने स्वतःला सावरले, " तीला आवड असेल तर का नाही?"
"पण तिला ताऱ्यानची नाही पण फिरायची आवड असेल तर?" असीमने मीराकडे रोखून बघितले.
"हे बघ. मला बाईकवर फिरायला आवडत. वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडत. त्याप्रमाणेच अश्या आडगावी जाऊन तारेही बघायला आवडतात." असीमने एक श्वास घेतला आणि सोडला, मीरा पुढे काही बोलायच्या आत तो पुढे बोलला " बघ मीरा, माझ्या आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या आवडी निवडी मिळतील याची काय गॅरंटी? तिने मला साथ द्यावी आणि मी तिला देईन. अजून काय हवं? वाद होणार, भांडण होणार त्याप्रमाणे प्रेमही केलं म्हणजे बास."
असीमने यावेळेला तिच्या नजरेत नजर भिडवली "कधी कधी मला एकटं जाऊ दिलं तर उत्तम."
"तू देशील का तुझ्या नवर्याला असं फ्रीडम?" मीराने नजरेतून नजर नाही काढली, असीमचे डोळे काळेभोर होते. डावी भुवई, उजव्या भुवईपेक्षा थोडीशी तिरकी होती.
" हो का नाही. त्याने मला असं कधी कधी जाऊ दिल तर," असीमच्या चेहर्यावर हसू उमटलं " हसू नकोस असीम. मी खर बोलतेय." असीमने नजर समोर वळवली आणि दोन्ही हाताचे तळवे त्याने वरच्या दिशेने केले, पोलीस हँडस अप करून घेतात तसे, हसू अजून वाढलं त्याच्या चेहर्यावर.
"ओके, म्हणजे जिथे तुला एकटं जायची इच्छा असेल आणि मग तिथे जायची बस गेली की थोडस रडायला येईल, तस एकटं?"
त्याने परत तिच्याकडे बघितलं. यावेळेला हास्याबरोबर त्याचे डोळेपण लुकलूकले.
मीराचा चेहरा एकदम पडला, तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही.
" सॉरी" तिच्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून त्याला एकदम अपराधी वाटलं.
"मग मी तुझ्या कमरेला पकडल्यावर तू का चपापला?"
आता चेहरा पाडायची वेळ असीमवर आली होती. " त्याच काय आहे ना" असीमने बोलायला सुरुवात केली तसं मीराच्या चेहर्यावर हसू उमटलं,
"हसू नकोस, तू पहिलीच मुलगी आहेस, माझ्या मागे बसून इतका लांब प्रवास करणारी. आधी मी चपापलो पण नंतर एकदम शांत वाटलं. तू माझ्या चालवण्याशी एकदम एकरूप झाली होतीस. ते कळलं का तुला?" मीराचे गाल लाल झाल्याचा भास झाला असीमला. काही वेळाने त्या दोघांच्याही लक्षात आलं की आपण एकमेकांकडे खूप वेळ बघतोय. दोघांनीही नजर दुसरीकडे वळवली. असीम परत नवे ऑब्जेक्टस सेट करायला लागला आणि मीराची नजर परत दूरच्या एका झाडाकडे लागली.

"तुला अजून काय आवडतं?" मीराच्या प्रश्नानी असीम त्याच्या तंद्रीतून बाहेर आला.
"दुर्बीण आणि बाईक याशिवाय अजून काही वाईट सवयी आहेत का असं विचारायच आहे का तुला?" असीमने परत तिच्याकडे बघितले. मीराने मान डोलवली.
"मी अधूनमधून पितो. रम आवडते मला. विशेषतः अश्या छान ठिकाणी, यापेक्षा छान गारव्यात, सतरंजी घालून त्यावर रम पित बसायला आवडतं. फिल्म बघायची अजून एक वाईट सवय आहे."
आता प्रश्न विचारायची वेळ असीमची होती. "तुला ग?"
"मी तापट आहे असं आई म्हणते माझी. बाबा म्हणतात लघू विचारी. फार पुढचा विचार नाही करत मी कधी कधी."
"हो जसा आजचा होता." असीमचे डोळे लुकलूकल्याचा भास झाला तिला.
तिने पटकन पुढे होऊन त्याला हातावर चापटी मारली. दोघांनाही मनापासून हसायला आलं. आकाश खूपच मोकळं होत आज, उरलेसुरले ढगसुध्दा गायब झाले होते.

उरलेली रात्र एकीकडे ऑब्जेक्टस बघत आणि बोलत कधी संपली ते दोघांनाही कळलंच नाही.

मचाणावरून उतरताना मीराला काहीच जाणवलं नाही. असीमने दोरीने खाली सोडलेल्या बॅगा घेताना तिच्या लक्षात आलं की दुरून सूर्य वर यायची चाहूल लागली आहे. रात्र गेली होती, कशी ते तिला कळलंच नव्हतं. असीम खाली उतरला आणि त्यांनी बॅगा घेतल्या. असीम पुढे आणि मीरा मागे असे दोघे निघाले. फार्महाऊसवर पोचेपर्यंत दोघेही स्वतःच्या विचारात मग्न होते. असीम बाहेर उभ्या असलेल्या काकूंवर जवळजवळ धडकला आणि पाठून मीरा त्याच्यावर. काकू हसल्या आणि दोघांनीही त्यांना तसाच प्रतिसाद दिला.
"या तोंड धुवून, मी चहा टाकते." यावेळेस दोघेही एकत्र खोलीत गेले आणि आळीपाळीने फ्रेश झाले.

गरमागरम चहा हातात धरून आपापल्या विचारात मग्न असलेल्या दोघांकडे बघून काकू म्हणाल्या, हलकेच, "चांगलं आहे. नीट विचार करा." दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रवास, रात्रीच जागरण असं करूनसुद्धा दोघेही थकलेली नव्हती. दोघांचे डोळे मिटू लागले होते पण मनात काहूर माजलं होत. दोघेही नाश्ता करून जेव्हा आपापल्या खोलीत आडवे झाले तेव्हा शरीर थकून झोपू पाहत होत आणि मनाला जाग राहायची इच्छा होती.

खरतर असीमला झोप झाल्यावर निघायचं होतं पण मनोमन अजून थोडावेळ थांबून मीराशी गप्पा मारायच्या होत्या. मीराच्या मनातही तसच होतं पण मी कशी पहिली बोलू म्हणून ती गप्प होती. यावेळेस काकू खरंच मदतीला धावून आल्या. "तुम्ही किती दमलेले दिसत आहात, अजून एक रात्र थांबा आणि जा" असं काकूंनी म्हटल्यावर दोघांनीही एकत्र होकारार्थी मान हलवली. दुपारच्या जेवणानंतर काकू कार घेऊन बाहेर गेल्या. बागेतल्या झोक्यावर असीम आणि मीरा बसून बोलत होते. दोघांनाही जाणवत होतं की काही विषय निरर्थक आहेत पण मन मोकळं करायला खूप सहज होत होतं. गोट्या चहा घेऊन आला. मीराने प्रश्नार्थक नजरेने आधी त्याच्याकडे आणि मग हातातल्या घड्याळाकडे पाहिल. असीमने चहाचा कप उचलला आणि मीराने नकारार्थी मान हलवली.
"ही काय चहा प्यायची वेळ आहे?"
" मला कधीही चालतो आणि इथे चहा प्यायचे लाड होतात."
"...." मीराने असीमकडे पाहिलं आणि मान डोलावली.
" तू का थांबलीस?"
" तू का थांबलास?"
" मला तुझ्याशी बोलून खूप बरं वाटत, लपवायची किंवा खोटं बोलायची इच्छा होत नाही. असं माझं पहिल्यांदाच होतंय. म्हणून थांबलो. "
मीराला एकदम उत्तर अपेक्षित नसावं, तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. नजरेत नजर मिसळली तेव्हा तिला एक आपलेपणा आणि एक ओढ जाणवली. ती झोक्यावरून उठली आणि समोर जाऊन उभी राहिली. मीराला जाणवलं की असीमची नजर तिच्याकडे होती आणि मग त्याने दुसरीकडे बघायला सुरुवात केली.
' काय होतंय मला? काय ओढ आहे ही?'

मीराच्या आणि असीमच्या नशिबाने काकूंच्या लँडलाईन चालू झाला. आईने मीरावर चिडचिड केली पण मीराची आज झाली नाही. चक्क आल्यावर बोलू असं तिने आईला प्रेमाने सांगितलं.

" आपण उद्या सकाळी निघुया ना?"
असीमच्या प्रश्नाने मीराने त्याच्याकडे वळून पाहिलं. परत नजरेने न बोलता खूप काही बोललं. त्याच्या नजरेत नजर ठेवत मीरा बोलली " मला खरंतर जायची इच्छा नाहीये, पण जावं लागेल." असीमने मान डोलवली.
" मला भेटशील परत चहाला किंवा जेवायला?" डोळे एकमेकांना बघत होते.
"तू मला डेट ला विचारतो आहेस?"
" तस समज. तुझी हरकत नसेल तर मला तुझ्याशी डेट करायला आवडेल."
मीराने परत पाठ केली असीमकडे.
असीमच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. ' आपण विचारून चूक नाही ना केली?' विचार चाटून गेला त्याला.
" कधी जायचं?" त्याच्या शेजारी येऊन बसत मीराने विचारलं. तेव्हा असीमला जाणवलं की आपण श्वास रोखून धरला आहे हे. " तू म्हणशील तेव्हा." श्वास सोडत असीमने उत्तर दिलं. तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्या हास्याने त्याची कळीसुध्या खुलली.

दुपारी दोघे झोपली तेव्हा प्रसन्न मनाने शांत झोपली. संध्याकाळी चहा झाल्यानंतर दोघेच बाहेर चक्कर मारायला गेले. आता काकू फक्त दुरून बघत होत्या. असीमला त्यांचा राग येणही बंद झालं होतं. जेवण झाल्यावर रात्री परत दोघेच झोक्यावर गप्पा मारत बसले.

विषय अनंत होते दोघांकडे आता.

सकाळी सकाळी ती दोघे निघाली तेव्हा काकू जाग्या होत्या. असीम काकूंच्या पाया पडला, मीराही पडली. यावेळेला बाईकवर बसल्यावर तो अनोळखीपणा नव्हता. मीराला सकाळीच ऊन, त्यात दिसणारी झाडं, पानं, फुलं, पक्षी, चरायला निघालेली जनावर सगळंच सुंदर वाटत होतं. असीमला बाईक इतकी का छान पळते आहे हे उमजत नव्हतं. घाटात असीम एका ठिकाणी थांबला. त्याने मीराला विचारलं की आपण एक सेल्फी काढायचा का? इतकं छान वाटत होतं त्याला की ते 'वाटणं' कॅमेऱ्यात कैद करून घेऊन जावंसं वाटत होतं. पण भावना कश्या कैद होणार चित्रात? प्रयत्न केला त्याने आणि मीराचाही तोच प्रयत्न होता हे ही जाणवलं.

तिला जेव्हा त्याने घराजवळ सोडलं तेव्हा त्याला तिथून निघूच नये असं वाटलं. मीराही शांत उभी होती. शेवटी बाईक चालू करत, आपण भेटू लौकरचं असं पक्के करत तो निघाला. पुढच्या सिग्नलला वळेपर्यंत मीरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती. जेव्हा ती सोसायटीच्या गेटमधून आत शिरली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण जो राग घेऊन घरातून बाहेर पडलो होतो, तो आता कधीच मावळला आहे. मन कसं प्रसन्न होतं. सगळ जग आता तिच्या विरुद्ध आहे ही भावनासुद्धा कधीच उडून गेली होती.

असीमने बाईक लावली आणि घराकडे बघत एक दीर्घ श्वास घेऊन सोडला.

आज मन हलकं होतं आणि हृदय प्रफुल्लित.

कथालेख

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

24 Dec 2019 - 2:05 pm | स्वधर्म

रंगलीय कथा.

श्वेता२४'s picture

24 Dec 2019 - 2:41 pm | श्वेता२४

छान

मस्त जमलीय . मजा आली. रात्रीच वर्णन छान आहे, कथा तिथच ते सकाळी मचाणावरुन खाली उतरतात तीथेच संपवली असती तरी चालली असती.

मुक्त विहारि's picture

25 Dec 2019 - 11:57 am | मुक्त विहारि

छान आहे.

एस's picture

26 Dec 2019 - 12:22 am | एस

कथा फारच छान लिहिली आहे. तरल आणि सुंदर. फक्त ते जंगलात जाऊन तारेनिरीक्षण करणे हा भाग थोssडासा खटकला. त्यासाठी उंच आणि वैराण जागा उदा. टेकडी वगैरे हवी. बाकी कथेचा प्रवाहीपणा आणि शेवट आवडला.