माझी एक शेजारीण होती. म्हणजे ती आहे अजून,पण माझ्या शेजारी ती आता नाही. माझी शेजारीण जेव्हा माझ्या शेजारी राहायची तेव्हा माझ्या घरी सारखी यायची. गप्पा मारायला. येताना घरातलं काम घेऊन यायची. भाजी निवडणे, बिरड्या सोलणे, कपड्यांची दुरुस्ती असं काहीतरी. प्रचंड बडबडी, मन लावून टीव्ही पाहणारी. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन पडला किंवा अर्धी चड्डी घालून आला तरी डोळ्यांत पाणी येईपर्यंत खळखळून हसणारी.
आत्ताही एका टीव्ही शोमधे, शो बघायला आलेले सेलिब्रिटी प्रेक्षक इतके हसतात, इतके हसतात की खुर्चीवरुन खाली पडतात. का तर त्या शोमधे कुणीतरी एक पुरुष साडी नेसून येतो आणि नाच करतो. माणसं इतकी हसू शकतात? की त्यांना हसण्याचे पैसे मिळतात? मला नाही हसू येत. पण त्या हसणाऱ्या शेजारणीची आठवण मात्र येते. तिला हसण्याचं वेड होतं तसं खाण्याचंही होतं. इतके नाना प्रकार करुन ती खायची आणि इतकी हसायची तरी ती लठ्ठ नव्हती. अगदी सडपातळ. तुरुतुरु चालायची. मी मात्र डाएट, व्यायाम करुन आणि न हसूनही लठ्ठ.
तिला खाण्याचं इतकं वेड की तिला कोणाच्या लग्नात काय खाल्लं ते आठवायचं.
"वन्संच्या लग्नात टोमँटोचं सार, काजू, सुकं अंजीर घातलेला पुलाव, अळूवडी असं जेवण होतं."
"तमक्याकडे बारशाला सुरळीची वडी काय झाली होती!"
"पाटवड्या खाव्यात तर अमक्याच्या हातच्या."
"रुमाली वड्या ऊर्फ पुडाच्या वड्या आमच्या जाऊबाई फार छान करतात."
"मला पहिल्या वाफेचा भात लागतो. त्यावर वरण, तूप, लिंबू आणि मागून मस्तपैकी आमटी."
"माझ्या पुरणपोळ्या कशा मऊसूत होतात."
"ह्यांना मोदक आवडत नाहीत ना."
"माझ्या मोठ्या मुलाला रव्याचे लाडू आवडतात.धाकट्याला बेसनाचे. त्यामुळे मला दोन प्रकारचे लाडू करावे लागतात. ह्यांना रवा, बेसन दोन्ही आवडतं पण लाडू नाही आवडत. वड्या आवडतात. मग त्यांच्यासाठी वड्या करते."
"मला ढोकळा खूप आवडतो. पण त्यावर बारीक, लाल मोहरीचीच फोडणी हवी. घरात नव्हती. ह्यांना पिटाळलं मोहरी आणायला. त्यांनी मोहरी आणली. मगच घेतला ढोकळा करायला."
एकदा मी तिच्याकडे गेले होते(उसनं मागायला नाही) तर ओट्यावर मला चार पातेली दिसली. मी म्हटलं,"काय केलंय एवढं?" ती म्हणाली,"आमच्याकडे वालाच्या बिरड्या आवडतात. काल सोलल्या. ह्यांना बिरड्या खूप शिजलेल्या आवडतात म्हणून त्यांच्या वेगळ्या केल्या. त्याचं एक पातेलं. मोठ्या मुलाला शिजलेल्या पण दाताखाली आलेल्या आवडतात, म्हणून त्याच्या वेगळ्या केल्या. त्याचं एक पातेलं. मला बिरड्याची उसळ आवडत नाही.बिरड्याची आमटी आवडते म्हणून त्याचं वेगळं पातेलं. धाकट्याला बिरड्याच आवडत नाहीत म्हणून त्याच्यासाठी तुरीच्या डाळीची आमटी केली. अशी चार भांडी ठेवलीत ओट्यावर." मी थक्क झाले.
एकदा ती दक्षिण भारतात ट्रीपला गेली. परत आल्यावर मला म्हणाली,"मद्रासला (चेन्नई) गाडी थांबली तर कापे, कापे असं ओरडत एक माणूस आला. म्हटलं काय आहे ते बघावं. तर ती चक्क कॉफी होती. (खूप हसून) मग ती मी घेतली. प्यायले. काय कॉफी होती.. वा वा.. आणखी एकदा घेऊन प्यायले. मस्त. वन्सं बघतच राहिल्या. मला फिल्टरची कॉफी आवडते. ह्यांना उकळलेली आवडते. वन्संना मात्र चहा आवडतो..."
मी तिला अडवत, शिताफीनं विषय बदलत म्हटलं, "कन्याकुमारीला गेलात त्यादिवशी होळीपौर्णिमा होती. मावळतीला सूर्य आणि उगवतीला पौर्णिमेचा गोल चंद्र एकाचवेळी पाहिलेत की नाही? खूप सुंदर दिसतं. फोटो काढलात की नाही?"
तिचं उत्तर, "पाहिलं.माझ्या वन्संची जाऊ तिथंच राहते. मिस्टर सरकारी मोठे अधिकारी आहेत. समुद्रावरुन तिच्याकडे गेलो. तर त्यांनी पुरणपोळ्या केल्या होत्या. काय झाल्या होत्या. मऊ, लुसलुशीत. तव्यावरून थेट पानात. पोळी बुडवून खायला सोबत नारळाचं दूध. मी चार पोळ्या खाल्ल्या."
एकदा त्या आणि मी एके ठिकाणी वास्तुशांतीला गेलो होतो. मी सहज म्हटलं, "हा हॉल किती बाय कितीचा असेल गं? आणि बंगल्याभोवती प्लॉट किती स्क्वेअर फुटाचा असेल?"
तर ही म्हणाली,"ह्या हॉलमधे वीस माणसं जेवायला बसतील. किचनही मोठं आहे , दहा पान उठेल."
पण आमचं बोलणं ऐकत असलेली घरमालकीण मधेच म्हणाली,"ह्या हॉलमधे दहा माणसं झोपू शकतील. वरचा हॉल मोठा आहे. तिथं वीस माणसांच्या गाद्या टाकता येतील इतकी जागा आहे. 'हे' अगदी गाढ झोपतात. माझी झोप सावध आहे.
माझे दीर खूप घोरतात. माझ्या जाऊबाई दुपारी पण झोपतात आणि रात्रीपण झोपतात."
एक जेवणावर तर दुसरी झोपण्यावर. बोलत राहिल्या.
आम्ही वास्तुशांतीचं जेवलो. मी गोड आणि तळलेले पदार्थ टाळले. भात अगदी थोडा घेतला. कोशिंबीर जास्त खाल्ली. ती मात्र सगळं जेवली. अगदी पोटभर.
मला कधीकधी ती बोअरिंग वाटायची.सारखं खाण्याबद्दल बोलायची म्हणून. गप्पांमधे राजकारण नाही, समाजकारण नाही,पेपरातल्या बातम्यांवर चर्चा नाही, वाचलेल्या पुस्तकावर मतप्रदर्शन नाही. फक्त खाणं! कधीकधी मला तिचा हेवाही वाटायचा. जगण्यावर इतकं प्रेम! साध्या साध्या गोष्टीत इतकं स्वारस्य!केळ्याचा सालीवरुन पडलेला नायक पाहूनही इतका हास्याचा निरागस खळखळाट! वयानं इतकं मोठं होऊनही? इतकं समरसून रोजचा दिवस एन्जॉय करायचा? मला असं जगता येत नाही याचं मला वाईटही वाटायचं. मला आनंदी होण्यासाठी, हसण्यासाठी काहीतरी मोठ्ठं 'कारण' लागतं.काहीतरी मोठ्ठं घडावं लागतं. ती माझ्यासारखी नव्हती. आता तर ती माझ्या शेजारीही राहत नाही. कुठंतरी, कुणालातरी ती तिच्या नातवाला किंवा नातीला काय खायला आवडतं हे सांगत असेल.
प्रतिक्रिया
23 Dec 2019 - 3:58 pm | मुक्त विहारि
व्यक्तीमत्व छानच रंगवले आहे...
खाण्या वरती प्रेम करणारी व्यक्ती जास्त आनंदी असते.
आता, ही तुमची शेजारीणच बघा ना...तिने फक्त तिला कुठले पदार्थ आवडले, ह्याचेच वर्णन केले. न आवडलेल्या पदार्था बाबत ती एक चकार शब्द बोलत नाही.
23 Dec 2019 - 4:56 pm | श्वेता२४
माझंपण खाण्यावर लई प्रेम हाय. शिवाय झोपण्यावर पण!(आता काय करावं?) कधी कट्ट्याला भेटलात तर माझ्याशी बोलणार नाही का?
23 Dec 2019 - 5:11 pm | दादा कोंडके
शेवटचा पॅरॅ चपटी मारून लिहल्यासारखा वाटतो. छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं फक्त लहान मुलांचा निरागसपण म्हणून खपून जातो. लहान मुलं छोट्या छोट्या गोष्टींवर भोकाड पसरून रडतात आणि आक्रस्तळेपणासुद्धा करतात. असं मोठ्या लोकांनी केलं तर त्यांना वेड्याच्या इस्पितळात ठेवावं लागेल.
23 Dec 2019 - 7:52 pm | सुचिता१
व्यक्ती चित्रण आवडले.. तुमची शैली नेहमी च आवडते, पण फुटकळ गोष्टींवरून हसत राहणाऱ्या लोकांची सोबत त्रासदायक असते असा माझा अनुभव आहे, कारण ते आपण ही त्यांच्या बरोबरीने हसत राहावे अशी अपेक्षा ठेवतात.
हसतमुख असणे वेगळे.
23 Dec 2019 - 9:22 pm | जॉनविक्क
आत्मकेंद्रिता प्रत्येकात असते, फक्त खाण्यात रस असणाऱ्यात ती समोरच्याला कंटाळा आणेल इतकी असू शकते :)
24 Dec 2019 - 1:13 am | जालिम लोशन
झकास
24 Dec 2019 - 6:26 am | मदनबाण
आजी तुला काय काय आवडतं खायला ते पण सांग ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shikara | Official Motion Poster | Dir: Vidhu Vinod Chopra | 7th February 2020
24 Dec 2019 - 6:50 am | कंजूस
छान.
रात्रीही झोपल्यावर दात खात असेल कडकट्ट कडकट्.
24 Dec 2019 - 7:13 am | धनावडे
झकास
24 Dec 2019 - 8:04 am | विजुभाऊ
आनंदात जगत असतात हो माणसं.
जगात काय चाललंय याचं त्याना काहिही पडलेलं नसतं अर्थात त्यामुळे त्यांच्या जीवनात काहीच फरक पडत नाही.
साध्या साध्या गोष्टीत आनंद घेता येतो या लोकाना. हे असे लोक दु:खे पण उगाळत बसत नाहीत, गत काळची दु:खे आठवून रडत बसत नाहीत.
छोटे छोटे आनंदही ते जपून ठेवतात. आपण मात्र कॉफी पिण्यासारख्या साध्या गोष्टीच आनंदही जपून ठेवू शकत नाही.
जगावर स्वतःची छाप उमटवायची याना कधी गरज पडत नाही. काही खूप मोठे करून दाखवावे अशी इच्छा ही नसते.
जे जगतो ते आनंदात जगावे इतकीच माफक अपेक्षा असते.
24 Dec 2019 - 10:57 am | संजय पाटिल
+१००
24 Dec 2019 - 10:56 am | अनिंद्य
हसरा लेख :-)
पण पुरुषांनी स्त्रीवेष घेण्यात हसण्यासारखे काही आहे असे कधी वाटले नाही, हसू येत नाही.
मलासुद्धा कोणत्या मेजवानीत विशेष काय खायला होते ते आठवते :-)
24 Dec 2019 - 10:59 am | संजय पाटिल
छान लेख....
तुमची शैली छान आहे!
24 Dec 2019 - 12:20 pm | वामन देशमुख
छान लिहिले आहे, आजीबाई!