आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)
प्रतिक्रिया
12 Nov 2008 - 7:32 pm | बिपिन कार्यकर्ते
...बडा मजा आया
=)) =)) =))
मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
आपण महान आहात. ;)
बाकी या लोकांसाठी फकिर या शब्दाने संपणारे बरेच जोडशब्दच लागू पडतात. ;)
बिपिन कार्यकर्ते
13 Nov 2008 - 5:14 pm | टारझन
आमचं टेक्निक ..
(फोनची रिंगींग .. आशिक बनाया .. आशिक बनाया .. )
तिकडून : हॅलो सर !! ...... (तडक १२ मिलीसेकंदात कळून चुकतं कुठला फोन आहे)
इकडून : हॅलो मॅडम !! ...
(फोन कट ... पुन्हा त्या नंबरहून फोन घेणे नाही .. )
--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा
16 Nov 2008 - 2:48 am | पाषाणभेद
मी पण या सेनेत येऊ का ?
(जय महाराष्ट्र बोलणारा )पाषाणभेद
12 Nov 2008 - 7:32 pm | छोटा डॉन
झक्कास आहे एकदम, वाचुन मज्जा आली ...
अजुन लिहा असेच ...
( नसत्या ) शंका : हा स्वतःचा अनुभव आहे की कल्पनाविलास ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Nov 2008 - 7:33 pm | ब्रिटिश टिंग्या
झक्कास आहे एकदम, वाचुन मज्जा आली ...
अजुन लिहा असेच ...
12 Nov 2008 - 7:33 pm | घाशीराम कोतवाल १.२
:)] कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
:)] आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
:)] कन्या :- तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
8> आम्ही :- कोणाच्यात ? (दुसर्या चेंडुवर षटकार)
:)] कन्या :- मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
:X आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे ! (तिसर्या चेंडुवर षटकार)
:)] कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
8} आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (चवथ्या चेंडुवर षटकार)
<:P कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये. (पाचव्या चेंडुवर षटकार)
~X( कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? प्लिज कार्ड विषयी बोला.
=P~ आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन (शेवटच्या चेंडुवर सुधा षटकार)
जबर्या हाणलेत षटकार राव =)) =)) =)) =))
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत
12 Nov 2008 - 7:40 pm | लिखाळ
>आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.<
जोरदार. ह ह पु वा. :)..
-- लिखाळ.
12 Nov 2008 - 7:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी एकदा भावाचा फोन उचलला त्याची झोपमोड नको म्हणून! त्या माणसानी मला जे काही पकवलं ते मी सऽऽऽऽऽऽऽगळं ऐकलं. शेवटी मला विचारलं, "तुम्ही कुठे नोकरीला आहात?"
मी, "नाही मला नोकरी नाही."
प्रश्नः "मग आपला स्वतःचा काही बिझनेस आहे का?"
मी: "नाही:
प्रश्नः "मग आपलं महिन्याचं उत्पन्न किती?"
मी: "काही नाही. सध्या भावाच्या कृपेनी त्याच्याच फोनवर बोलत्ये." हे न समजून/ऐकून घेताच, "मग आपल्याला हे कार्ड मिळू शकत नाही."
मी: "Thanks a lot for entertaining me for 10 mins."
यात एकही थाप मारलेली नव्हती.
कधी शेजार्यांकडे असताना असले फोन आले की माझं ठरलेलं उत्तरः "माझ्या सेक्रेटरीशी बोला." मग माझा दोन वर्षांचा मित्र त्याची फोनवर बोलायची हौस भागवून घेतो, "मी आत्ताच जेवलो, तू काय खाल्लं?........." समोरच्याला तो स्वतःची मोठी बहिण किंवा माझा मोठा भाऊ समजून कितीही वेळ बोलू शकतो.
23 Nov 2008 - 10:07 pm | संजय अभ्यंकर
=)) =)) =))
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
12 Nov 2008 - 7:53 pm | लिखाळ
>"मी आत्ताच जेवलो, तू काय खाल्लं?........." समोरच्याला तो स्वतःची मोठी बहिण किंवा माझा मोठा भाऊ समजून कितीही वेळ बोलू शकतो.<
हा हा हा .. या कॉल सेंटरवाल्यांना कशा कशाला सामोरे जावे लागते ! :)
मिपावर कुणी कॉलसेंटर मध्ये काम करणारं नाही की काय? त्यांना आलेले असे मजेदार अनुभव / संवाद ऐकायला आवडतील.
-- लिखाळ.
12 Nov 2008 - 8:11 pm | वाटाड्या...
जबरा एक एक अनुभव...
अदितीचे अनुभवही छानच..बाकी भारतात होतो तेन्व्हा जाम पकायचो दुपारच्याला जेन्व्हा कचेरीमधे झोपेत असायचो तेन्व्हा....
मुकुल
12 Nov 2008 - 8:49 pm | योगी९००
मला ही या गोष्टीचा (म्हणजे फोन करणार्या लोकांचा राग येतो). पण मी शक्य तेवढ्या नम्रतेने क्रेडिट कार्डवाल्यांना नकार देऊन संभाषण संपवतो.
पण आपण असा त्या लोकांचा (आणि आपलाही) वेळ का वाया घालवायचा? सरळ मला यात सारस्य नाही असे सरळ सांगायचे. आपण तणावमुक्त होण्यासाठी दुसर्याचा का उगा रक्तदाब वाढवायचा? आणि त्यांचे शिव्याशाप घ्यायचे?
आहो कोणी हौस म्हणून अशी नोकरी करत नाही. त्यांना पण काही मजबुरीच असेल ना..आपल्या सुदैवाने आपण अशी नोकरी करत नाही. म्हणून आपण त्यांची खिल्ली उडवणे योग्य नाही. भले ते लोकं भर दुपारी आपली झोपमोड करत असतील. पण आपण त्या बॅंकेला आपला नंबर या फोनच्या लिस्ट मधून काढा असे कळवू शकतो. आधीक माहितीसाठी येथे टिचकी मारा.. नकामलाफोनकरू.
कदाचित बर्याच जणांना माझे मत पटणार नाही. कारण मनुष्यस्वभाव असा की "एकाला मजा पण दुसर्याला सजा". ज्या लो़कांचा मार्केटिंग क्षेत्राशी संबंध आहे ते कदाचित माझ्या भावना समजतील. जरी मी मार्केटिंग/कॉलसेंटर क्षेत्रात नसलो तरी या क्षेत्राचा चांगलाच अभ्यास केला आहे. आहो आणि आपल्याला गरज पडते तेव्हा आपण कॉलसेंटरलाच फोन करतो ना..?
बाकी हा लेख विनोदी लिखाण म्हणून छान आहे. पण नका अशा रितीने तणावमुक्त होऊ.
खादाडमाऊ
12 Nov 2008 - 10:51 pm | शैलेन्द्र
अगदी मनातलं बोललात..
पण या लोकांशी मराठीतच बोलायचं
13 Nov 2008 - 12:34 am | यशोधरा
>>कोणी हौस म्हणून अशी नोकरी करत नाही. त्यांना पण काही मजबुरीच असेल ना..
खरं आहे. आपल्या घरातील मुलीशी असे कोणी बोलत आहे अशी कल्पना करुन पहा बरं!
लेख विनोदी ढंगाने लिहिला आहे ते ठीक आहे, तरीपण अश्या पद्धतीने बोलू नये असे वाटते.
माझ्या कंपनीचेही कॉल सेंटर आहे, मी स्वतः तिथे काम करत नाही, पण तिथे काम करणारे लोक आता ओळ्खीचे झाले आहेत, त्यांचे अनुभव ऐकताना कळते की किती तणावाखाली काम करतात. सेकंदा- सेकंदाचा हिशेब असतो, ब्रेक किती वेळ घ्यायचा, रोजचे टारगेट असते, तेवढे संपवावे लागते, कोणीही कसेही बोलले तरी शांत रहायचे... सतत ८ तास बोलायचे.. वाटते तेवढे सोपे नसते..
13 Nov 2008 - 12:09 am | विसोबा खेचर
जबरा...! :)
13 Nov 2008 - 4:37 am | सुक्या
मीही बरेच दिवस अश्या वेळी अवेळी येणार्या फोन मुळे अगदी त्रासलो होतो. नंतर त्या कॉल करनार्याला असेच भंडावुन सोडु लागलो. माझ्या मित्राच्या सहकार्यामुळे मला कॉल सेंटर मधे काम करनार्यांची दिनचर्या अन त्यांचे त्रागे समजले. तेव्हापासुन असा फोन आला की मी सुरुवातीलाच नाही म्हनुन सांगतो. ते लोक ज्या मानसिक परीस्थितीत काम करतात हे पाहील्यावर त्यांच्यावर ओरडणे किवा आपली करमणुक करुन घेणे मला तरी पटत नाही.
असो बाकी राजकुमार साहेबांचे संभाषण झकास आहे. कोतवालाने निवडलेले षटकार तर निव्वळ अप्रतीम. लगे रहो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
13 Nov 2008 - 8:10 am | नीधप
त्यांच्याबद्दल कणव, कळवळा हे सगळं ठीक आहे. पण मग त्या लोकांनी पाळायच्या एथिक्सचे काय?
किती जण फोन करणार्याला खरंच वेळ आहे का? ऐकण्यात इंटरेस्ट आहे का? हे आधी विचारून मग माहिती सांगतात?
किती जणांकडे ज्या व्यक्तीला फोन केलाय त्या व्यक्तीचे योग्य नाव असते? किती जण हे मानतात की त्यांनी विचारलेली सगळी माहिती द्यायला ज्याला फोन केलाय तो बांधील नसतो. आणि त्याने माहिती दिलीच पाहिजे असं तुम्ही सांगू शकत नाही.?
काही प्रसंग (हे तुरळक नाहीयेत.)
प्रसंग १
कॉ.से. मधली व्यक्ती - मे आय स्पीक टू अमुक तमुक
अमुक तमुक - धिस इज शी.
कॉ.से.म.व्य. - हमारा एक इन्श्यु. प्लॅन है. जिसमे _____ है, आपको ये मिलेगा, वो मिलेगा.... (थोडक्यात नॉन स्टॉप गाडी सोडणे)
अ.त. - आय ऍम बिझी ऍण्ड आय ऍम नॉट इंटरेस्टेड.
कॉ... - व्हाय मॅम? धिस इज अ व्हेरी गुड ऑफर मॅम. हाउ कॅन यू नॉट बी इंटरेस्टेड विदाउट लिसनिंग टू ऑल द इन्फो?
अ. - आय ऍम बिझी.
कॉ. - यू डोन्ट हॅव ५ मिनिटस?
अ. - नो.
कॉ. - ऐसे कैसे हो सकता है?
अ. वैतागून फोन ठेवते.
प्रसंग २
कॉ. - इज धिस अमुक तमुक?
त.अ. - नो धिस इज तमुक अमुक.
कॉ. - या या. सेम थिंग.
त. - सेम थिंग?
कॉ - या मॅम. आम्ही काही खास व्यक्ती निवडल्यात क्रेडीट कार्ड देण्यासाठी. त्यात तुमची निवड झालीये.(हे इंग्लिश किंवा हिंदीतून)
त. - माझी? पण माझं बरोबर नाव पण माहीत नाहीये तुम्हाला.
कॉ. - तुम्ही अमुक तमुक आहात.
त. - नाही मी तमुक अमुक आहे.
कॉ. - काय फरक पडतो? दोन्ही एकच. आम्ही तुम्हालाच कार्ड देऊ
त. - पण मला नकोय.
कॉ. - तुम्हाला निवडलंय ना पण.
त. - कम्पलसरी आहे का? नकोय मला कार्ड.
कॉ - तुम्हाला निवडलंय.
त. - मला नकोय. धन्यवाद...
त ने फोन ठेवला.
अजून महान प्रसंग पुढच्या पोस्टमधे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 8:39 am | मराठी_माणूस
कदाचीत त्याना काय बोलायचे , कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे ते ठरवण्यात आलेले असेल , कशा पध्द्तीने पाठ पुरावा करायाचा ते सांगीतले गेलेले असेल. ह्या संवादाचे बर्याच ठीकाणी रेकॉर्डिंग केले जाते आणि त्यांच्या परफॉरमन्स साठी ते तपासले जात असेल तर ते काय करणार
जास्तीत जास्त वेळा झिडकारुन बोलण्याचा प्रतीसाद मिळाल्यावर ही पुढ्च्या कॉल साठी परत उत्साहाने सामोरे जाणे हे अवघड आहे.
13 Nov 2008 - 8:51 am | नीधप
उत्साह नाही.. जॉब करत असतात ते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 8:49 am | नीधप
प्रसंग ३
कॉ. - अमुक तमुक शी मी बोलू शकतो का? (हा फोन घरी आला आहे)
अ.त. ची मुलगी - नाही ते घरात नाहीयेत.
कॉ. - त्यांचा मोबाईल नंबर द्या.
अतमु -कशाला?
कॉ. -त्यांच्याशी बोलायचंय.
अतमु - तुम्ही कोण?
कॉ. -क्रेडीट कार्डबद्दल माहिती द्यायची आहे.
अतमु. - ते नाहीयेत घरात आणि त्यांना नवीन कार्डमधे इंटरेस्ट नाहीये.
कॉ. - त्यांचा वर्क नंबर द्या मला. कुठे काम करतात ते? त्यांची निवड झालीये या कार्डसाठी.
अतमु. - निवड? मग तुम्हाला माहीत नाही ते कुठे काम करतात की रिटायर्ड आहेत ते?
कॉ. - ते रिटायर्ड आहेत का? मग त्यांच्याकडे क्रेडीट कार्ड कुठल्या कंपनीचं आहे?
अतमु. - तुम्ही ही सगळी माहीती का विचारताय? ही वैयक्तिक माहिती आहे. मला नाही वाटत मी तुम्हाला ही माहिती द्यावी म्हणून.
कॉ. - त्यांना क्रेडीट कार्ड द्यायचं तर ही माहिती दिली पाहीजे.
अतमु. - त्यांना नकोय ना कार्ड. आणि माहितीही द्यायची नाहीये.
कॉ. - पण त्यांना निवडलंय.
अतमु. - कम्पलसरी नाहीये यातलं काहीच तेव्हा आता फोन ठेवा.
प्रसंग ४
कॉ. - मिसेस अ. त. आहेत का?
(मिसेस अ. त. ना अचानक जाउन ४ दिवस झालेत. घरात त्यांची मुलगी आहे. ती अजून शॉकमधे आणि दु:खात आहे. )
मु. -अं? नाही.
कॉ. - कधी भेटतील?
मु. - ते शक्य नाही. त्या गेल्या ४ दिवसांपूर्वी. (या ठिकाणी इंग्रजीमधे 'नो मोअर' हा शब्द वापरला होता.)
कॉ. - ओह मग मला त्यांचा मोबाईल नंबर मिळेल का?
मु. - अहो मी तुम्हाला सांगितलं ना त्या गेल्या चार दिवसांपूर्वी. (नो मोअर) कोण तुम्ही? तुम्ही ओळखत होतात का त्यांना?
कॉ. - नाही पण मोबाइल नंबर द्या ना. मी एका क्रेडीट कार्ड कंपनीकडून बोलतेय.
मु. - अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का? त्या गेल्यात चार दिवसांपूर्वी म्हणजे वारल्यात, निधन झालं त्यांचं. (इथे पास्ड अवे, एक्स्पायर्ड असे शब्द वापरले)
कॉ. - पण मग मोबाइल नंबर द्यायला काय हरकत आहे?
मु. - कळतंय का तुम्हाला मी काय सांगितलं ते? त्यांचा ४ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. आता या जगात नाहीत त्या. (इथे मुलगी चिडली होती.)
कॉ. - मग एवढं चिडायला काय झालं. मी तुम्हाला क्रेडीट कार्ड देऊ शकते.
मु. - या आता.
मुलगी फोन आदळते. नंतर तिच्या लक्षात येतं की त्या बयेचं नाव आणी कंपनी विचारून घ्यायला हवी होती तक्रार करण्यासाठी.
प्रसंग १ व २ एक दिवसाआड घडतच असतात. प्रसंग ३ हा मी पुण्यात असते तेव्हा एकदातरी होतोच. प्रसंग ४ हा गेल्या वर्षी माझी आई गेली तेव्हा घडलेला आहे.
कॉसे मधले लोक वयाने निदान १८-२० तरी असतात तेव्हा बेसिक गोष्टी न कळणे हे गृहित धरू शकत नाही. बाकी सगळी अक्कल बरी असते मग साधे एथिक्स कसे नाहीत? त्या लोकांना ऐकाव्या लागणार्या अपमानाबद्दल मला तरी फारशी सहानुभूती नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 10:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कॉसे मधले लोक वयाने निदान १८-२० तरी असतात तेव्हा बेसिक गोष्टी न कळणे हे गृहित धरू शकत नाही. बाकी सगळी अक्कल बरी असते मग साधे एथिक्स कसे नाहीत? त्या लोकांना ऐकाव्या लागणार्या अपमानाबद्दल मला तरी फारशी सहानुभूती नाही.
कुठलेही फोन नंबर्स घेऊन तिथे फोन करायचा आणि लोकांना वेळ आहे, गरज आहे, हवं आहे, ऐकून घेण्यात रस आहे याचा विचार न करता या लोकांनी मला अनेकदा पिडलं आहे. अज्जुकांसारखाच अनुभव मला माझे वडील गेल्यावर जवळजवळ सहा महिन्यांनी आला होता. तेव्हाही तीच परिस्थिती, "ही डाईड सेव्हरल मन्थ्स अगो" एवढ्या शब्दांत स्पष्ट सांगितल्यावरही पुन्हा तो बाबाजी मला तुमच्या आईला क्रेडीट कार्ड हवंय का विचारत होता. तीही नाही म्हटल्यावर हळूच आवाजात शेजारच्या सहकार्याशी दबत्या आवाजात बोललेलं, "काय पोरगी आहे, सरळ आई-बाबांना मारून टाकते", हे ही मी ऐकलं आहे. मला या लोकांबद्दल काडीमात्र सहानुभूती नाही. तेव्हा त्रास करुन घेतला स्वतःला, आता मात्र मी माझी करमणूक करुन घेते.
मी माझ्या कामासाठी फोन करते आणि काम होत नाही तेव्हा मी त्यांच्यावर भडकत नाही; कारण या लोकांच्या हातात काहीही नसतं हेही माहित असतं. पण हे क्रेडिट कार्ड वाले, खासगी बँकात खातं उघडा म्हणणारे लोक, स्पष्ट शब्दात, "माझ्याकडे पैसे नाहीत", असं सांगितलं तरीही डोकं उठवतात. आमच्या कामाच्या वेळात, कामं करत असताना त्रास देतात, त्याबद्दल त्यांना काहीही वाटतही नाही. आणि हो, "डीएनडी"ला रजिस्टर केल्यावत मला फोन आला होता, त्यांचे म्युच्युअल फंड घेतल्याची शिक्षा भोगत होते मी!
13 Nov 2008 - 11:28 am | साती
या लोकांना वेळेचे भान नसते आणि रात्री अपरात्री किंवा दुपारच्या चुकून झोपायला मिळण्याच्या वेळेतही यांचे हे प्रकार चालू असतात. त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची खरंच काही गरज आहे असे मला वाटत नाही.
साती
13 Nov 2008 - 12:55 pm | योगी९००
हो हे ही खरेच की मलाही या गोष्टीचा त्रासच होतो. पण माझा अनुभव असा की मी जेव्हा जेव्हा शांत डोक्याने या लोकांना नकार दिला आहे तेव्हा तेव्हा कधीही त्या कंपनीच्या लोकांनी मला परत फोन केलेला नाही. कदाचित मी थोडा नशिबवान असेल तुमच्या पैकी काही जणांपेक्षा... किंवा काही चांगल्या लोकांनी मला फोन केला असेल.
मी माझा या बाबतीमधील एक वाईट अनुभव सुद्धा लिहीन पुढच्या प्रतिक्रियेत..
आणि मी फक्त माझा अनुभव मांडतोय.. आपल्या सर्वांची मते जुळली असती तर "मिसळ्पाव" चा जन्म तरी झाला असता का..?
खादाडमाऊ
("प्रेम दिले तरच प्रेम मिळते" यावर थोडापार विश्वास ठेवणारा)
13 Nov 2008 - 2:08 pm | नीधप
>>जेव्हा जेव्हा शांत डोक्याने या लोकांना नकार दिला <<
कधी कधी सिच्युएशन्स अश्या असतात की तुम्ही शांत डोकं नाही ठेवू शकत. उदाहरणार्थ प्रसंग ४.
>>तेव्हा कधीही त्या कंपनीच्या लोकांनी मला परत फोन केलेला नाही. <<
तुम्ही लक्की. किंवा तुम्हाला कार्ड देऊन दिवाळं निघेल हे त्यांना पटलं असेल.. (ह. घ्या.)
>>प्रेम दिले तरच प्रेम मिळत<<
कॉसे वाल्यांचं प्रेम हवंय कुणाला इथे. आहे तेच नको झालंय..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Nov 2008 - 3:07 pm | योगी९००
नीरजा ताई,
तुमचे माझ्या टिप्पणीवरिल उत्तर मला आवडले.
(तरिसुद्धा "प्रेम दिले तरच प्रेम मिळतं" यावर थोडाफार विश्वास ठेवणार)
खादाडमाऊ
13 Nov 2008 - 1:15 pm | आपला अभिजित
एक लेख पूर्वी इथे लिहिला होता.
या पोस्टशी संबंधित त्यातील काही मुद्दे :
काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना.
वरील अनुभव माझ्या बाबतीतला आहे.
एकदा मी ऑफिसात असताना असाच एका मधाळ आवाजाच्या युवतीचा फोन आला. मी तिच्या प्रतिनिधीला (तिला नव्हे बरं का राजकुमारा!) भेटण्याची वेळ दिली. ऑफिसचा पत्ता दिला. जवळची खूण (लॅंडमार्क) विचारल्यावर `शनिवारवाडा' असं सांगितलं. त्यावर ती म्हणते,
`सर, कोई `लॅंडमार्क' नहीं हैं क्या?`
मी कोसळायचाच बाकी होतो. शनिवारवाड्याव्यतिरिक्त कुठला दुसरा लॅंडमार्क ह्या बयेला हवा होता?
`वो पेशवा का पुराना हवेली है ना, उसके बाजू में जो नीरा का दुकान है ना, उसके सामने हैं हमारा कार्यालय' असं सांगायला हवं होतं का हिला?
(हीच प्रतिक्रिया माझ्याच जुन्या लेखावर चुकून चिकटवली गेली. तुम्हाला उगीच पुन्हा वाचायचा त्रास. दिलगीर आहे.)
13 Nov 2008 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
येव्हड्या भरभरुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभार ___/\___
ह्या लेखाचा उद्देश कोणाचीही खिल्ली उडवणे वा टिंगल करणे हा नसुन कधि कधि आपण सुध्दा ह्या लोकांना मस्त्त वैताग देउ शकतो ह्याची मजा लुटणे हा आहे. प्रत्येक फोनला येव्हडा वेळ घालवणे आपल्याला हि शक्य नाहिये, सहज कधितरि गंमत म्हणुन केलेला हा एक उपद्व्याप होता. असाच ताप आम्हि एकदा 'आई चि आई चि आई ' ह्या बॅंकेतुन ५ दिवस रोज फोन करणार्या इसमास दिला होता. ह्या लेखामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्हि त्यांची जाहीर माफी मागतो.
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
13 Nov 2008 - 3:56 pm | संताजी धनाजी
बाकी दुपारचे गरगरीत जेवण ही कल्पना आवडली :)
- संताजी धनाजी
23 Nov 2008 - 8:19 pm | पुणेरी भामटा
lekhak puNeree aahe
23 Nov 2008 - 9:51 pm | टवाळचिखलू
अरे परवाच हे मला मेल मधे आलं होतं .. मला उगम माहीत नाही....
जावुद्या माझ्याजवळ अशा प्रसंगाच रेकोर्डींग आहे कसं पाठवु ?
एकाचा कोल रेकोर्ड केलाय .. एकदम मजेशीर आहे ....
- चिखलू
24 Nov 2008 - 9:10 pm | झकासराव
=))
राजकुमारा मस्तच लिहिल आहेस. :)
अवांतर : अरे भावा तुझ्या ह्या छोटेखानी लेखाची मेल बनली आहे आणि ती सगळीकडे फिरत आहे.
मलाच दोन वेळा आली आहे ही मेल.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
25 Nov 2008 - 2:54 pm | परिकथेतील राजकुमार
काय सांगताय काय ? चला म्हणजे लोकांनी वाचावे असे काहितरी लिहितो म्हणा कि आम्हि ;)
खरेतर प्रत्येक लेख इथुन कॉपी पेस्ट करताना त्यावर मि.पा. ची लिंक येइल असे काहितरि केले पाहिजे, म्हणजे अशा मेल्स बरोबर मि.पा. ची पण प्रसिध्दी आपोआप होइल !
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
5 Apr 2012 - 7:27 pm | मी-सौरभ
वर्षं सरली पण त्रास अजून आहेच :(